आईस पत्र...
आईस पत्र...


प्रिय आई,
शिरसाष्टांग त्रिवार दंडवत...
शाळेत असतानाही कधी मला पत्र लिहायला जमले नाही, त्यामुळे तुला कधी पत्र लिहिन असे माझ्या मनाच्या दारी देखील डोकावले नव्हते, पण आजकाल मी बऱ्यापैकी तोडकं-मोडकं का होईना लिहीत असते. त्यातलाच एक भाग म्हणून तुला पत्र लिहीण्याचा हा घाट घातला खरा, पण आता तुझा विषय आला की काय लिहावं हेच सुचत नाही कारण, तुझ्याकडे एवढं बारकाईने लक्षच नाही दिलं गं कधी! जेवढं तू जन्मापासून ते आजपर्यंत केलंस किंवा पुढेही करशील त्यातलं काही अंशी तरी मी तुझ्यासाठी करु शकले तर ते माझं भाग्यच असेल. तुझ्यासाठी काव्य स्फुरणे म्हणजे महादिव्यच..! कारण तुला कशाची म्हणून उपमा द्यावी..? चराचरात तुझं अस्तित्व आहे, तरी या काही ओळी तुला अर्पण....
मला राहू दे गं आई
सदैव तुझ्याच ऋणात,
कशी होऊ सांग उतराई
भरलेस श्वास या देहात..
आई तू नेहमीच त्याग केलास अगदी माझ्या जन्मापासून म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष जन्माच्या अगोदर पासूनच उदरातील मला निरोगी व सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून आवडत्या अन्नपदार्थ/गोष्टींचा त्याग, मग मी जन्माला आल्यावर कित्येक रात्री तुला जागून काढाव्या लागल्या असतील माझ्या शांत झोपेसाठी, मी लहानाची मोठी हो असताना माझ्या शैक्षणिक आणि वैयक्तिक गरजा पूर्ण करताना स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा त्याग करावा लागला असेल, मला उत्तम कपडे मिळावे म्हणून स्वतःसाठी कधी साडी घेतलीच नसशील, मला वेळच्या वेळी खाऊ मिळावा म्हणून तू स्वतःच्या आवडी निवडी बाजूला सारल्या असतील, आमची शिक्षणं व्यवस्थित पार पडून नोकरीसाठी म्हणून स्वतःची दागदागिने गहाण टाकलेस, दादाचे लग्न झाल्यावर वहिनीने त्याला घेऊन वेगळे राहण्याचा हट्ट केला तेव्हा त्यांच्या सुखी संसारासाठी स्वतःच्या आनंदावर विरजण घालून सुन आल्यावर आरामदायी जीवनजगण्याची जी स्वप्ने पाहिली होती त्यांचा किती सहज त्याग केलास. तुझा त्याग इतका महान आहे की तुझ्यापुढे हजारदा नतमस्तक झाले तरी कमीच.
चार नमुन्याचे चौघं आम्ही भावंडं. त्यातली मी तर फारच मुडी, हट्टी, कसल्याच कामाला कधीच हातभार न लावणारी; पण हे अवगुण सुद्धा लग्न झाल्यावरच समजले. आता जेव्हा सकाळी पाचला उठून आंगण झाडावं लागतं, रांगोळी घालावी लागते, पोरांना शाळेसाठी तयार करून सर्वांचे चहापान पहायला लागते तेव्हा तुझी बरोबरी होऊच शकत नाही हे लक्षात आले.
बाबांच्या व्यसनाला कंटाळून गेलेली तू आम्हाला कधीच कशी निराश दिसली नसशील हा प्रश्न आता खुपच सतावतो. सारं काही सहन करून हसतमुखाने संसाराची नाव आमच्या ओझ्यासहीत किती सहजपणे तुझ्या जीवनाच्या सागराच्या ऐलतीराकडुन पैलतीराकडे नेलीस, त्यात आलेल्या वादळ वाऱ्याची थोडीही झळ आम्हास न लागू देता.
अजून खुप काही आहे जे की तुला सांगावसं वाटतं पण राहून जातं. या पत्राद्वारे ही बरंच सांगण्याची इच्छा आहे पण, तुझ्या तुझ्या या त्यागाच्या मुर्ती समोर शब्दांची सुद्धा समाधी लागली आहे गं आई. असो एवढंही बोलणं कधीच झालं नसतं आपलं. या पत्राच्या सहाय्याने थोडाफार भार हलका झाला एवढंच.
शामची आई मधे साने गुरुजींनी जसे आईचे चित्रीकरण केले, अगदी तंतोतंत तु तशीच आहेस. हे जग पाहण्यासाठी अथवा चांगले,वाईट हे पारखण्याची
दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा देह झिजवलास
तुझी थोरवी मी कुठवर वर्णू? हे शब्दभांडार तोकडे पडले आहे. तुझे प्रेम, कृतज्ञता, कर्तव्यबुद्धी, माधुर्य, सोशिकता, काहीअंशी तरी माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो. तुझ्या देहाचे परीस झाले, तुझ्या स्पर्शाने माझ्या जीवनाचे सुवर्ण होवो.
शेवटी एकच कळकळीची विनंती करते, की माहेरपणाला तू कधीच गेली नाहीस तर, मला एक संधी दे तुझं माहेरपण करण्याची... तुझी आई होऊन तुला जपण्याची. तुझ्या इतपत जमेल की नाही ठाऊक नाही पण, प्रयत्न नक्कीच करेन ....
तुझ्यासाठी काव्य सुमनांजली...
ममतेची खणी तू गं आई, मानले देवास तुझ्या ठायी
रिती झालेली तुझी जागा, कशानेच भरणार नाही..!
तुझ्या ममतेच्या मेघांतून, वात्सल्य नेहमी बरसत राही
अमृतरुपी वात्सल्याने जशा, चाटतात वासराला गाई!
तप्त उन्हाने व्यापलेल्या, या जिवनाच्या सागरात,
शेषाचे रूप धारण करूनी,आम्हा लेकरांना सावली देई.!
तुझीच लाडकी,
लेक...