भेटी लागी जीवा
भेटी लागी जीवा


''अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन तिन्ही लोकां
जाईन गे माये तया पंढरपुरा
भेटेन माहेरा आपुलीया.'
या ज्ञानराजांच्या कल्पनेनं मनाचा वटवृक्ष हर्षपल्लवीत होऊन, आनंदाश्रू पापण्यांचे उंबरे ओलांडू लागतात. वसुंधरा जशी पावसाच्या थेंबाकरीता आसुसते अशीच काहीशी ओढ विठ्ठलभक्तांना लागलेली असते. समस्त वारकरी संप्रदायाला आषाढी वारीचे वेध लागतात. भगव्या पताका हाती नाचवत, चंद्रभागेच्या तीरी जाण्याची आस मनात दाटून येते. आषाढी वारी ही देवशयनी एकादशी ला असते. देवशयनी एकादशी म्हणजे या एकादशीला देव झोपतात म्हणून या एकादशीला 'देवशयनी' संबोधले जाते. देवशयनी एकादशी पासून ते कार्तिकी पर्यंत भगवंत शयन करतात. आषाढी ते कार्तिकी हा चार महिन्यांचा कालावधी 'चातुर्मास' म्हणून संबोधला जातो, या कालावधीत वारकरी संप्रदायातील बरीचशी मंडळी संप्रदायाचे अध्ययन करतात. बरेच भाविक चातुर्मास पाळतात.
पुंडलिक माता-पित्यांची सेवा करत असताना, श्री विठ्ठल दारी येऊन उभे राहतात, तेव्हा श्री. विठ्ठल पुंडलिकास म्हणाले "अरे पुंडलिका मी तुझ्या दारी आलोय, माझ्याकडे बघ तरी" तेव्हा पुंडलिक वदले, देवा मी आईवडिलांच्या सेवेत लीन आहे, सेवा संपुष्टात येताच मी आपल्या दर्शनास येईल, तेव्हा ताटकळत उभे न राहता ही घ्या वीट आणि या विटेवर उभे रहा. अठ्ठावीस युगांपासुन देव विटेवर उभे आहेत. याचमुळे विटेवर उभे राहिलेल्या देवांना विठ्ठल या नावाची उपाधी मिळाली असावी. पुढे झाले असे की, पुंडलिक आई वडीलांच्या सेवेत असताना मधेच पुंडलिकाच्या माता-पित्यांच्या निधन झाले. आई वडीलांच्या निधनानंतर पुंडलिक मंदिरातच विठ्ठल भक्ती मधे रमून गेले. लोकांना प्रवचन सांगू लागले. प्रवचन सांगता सांगता लोकांना अनुग्रह देऊ लागले. अनुग्रह घेण्यासाठी लोक दूरवरुन पंढरी नगरीत येत असत. मग ही प्रथा निरंतर चालू आहे यालाच बहुदा 'वारी' हे नाव देण्यात आले असेल.
श्री ज्ञानदेवांच्या इच्छेने महाराष्ट्रातील माणसे भगव्या ध्वजाखाली एकत्र येऊन प्रचंड उत्साहाने शके १२१३ साली पहिली वारकरी संप्रदायाची दिंडी पंढरीच्या वारीला निघाली. ज्ञानेश्वरांनी वळण पाडलेल्या या पायी वारीच्या बीजाचा वटवृक्ष सद्य स्थितीला गगनास जाऊन भिडला आहे. अनंत वैष्णव एकत्र येऊन टाळ, मृदंग, वीणा, चिपळ्या, भगव्या पताका, गरुडध्वज यांची मांदियाळी विठ्ठलाच्या अंगणी सजवतात. या वारीचा पायंडा अजूनही तसाच चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून महान संताच्या दिंड्या पायी चालत पंढरीच्या वाळवंटात एक होतात. उन वारा पाऊस याचा कसलाही त्रास वारकऱ्याला जाणवत नाही इतका भक्तीभाव मनातून वाहत असतो. प्रत्येक वारकऱ्याची जीवनातील एक इच्छा असते ती म्हणजे एकदा पायी वारी करायची आणि कृतकृत्य व्हायचं.
माझ्या विठ्ठोबारायाची पंढरी म्हणजे साक्षात चैतन्याचा उसळलेला महासागरच जणू. आषाढीच्या उषःकाली भक्तांच्या मनी भक्तीचा मोगरा फुलला होता. चंद्रभागा हर्षोल्हासाने वाहू लागली, गर्द निळ्या आसमंतातून शुभ्र चंद्रबिंब पाझरू लागले, जणु अल्हाददायक वारा तन्मयतेने पायी घुंगरू बांधून वृक्षवल्लींना राम कृष्ण हरी चे भजन गाऊन दाखवतोय. चंद्रभागेच्या तीरी भगव्या पताका फडफड करत डौलाने उभ्या होत्या. वारकरी राम कृष्ण हरी चा जागर करत चंद्रभागेत स्नान करु लागले. साऱ्या नगरीत हर्षाचे वातावरण पसरलेलं, सर्वांना अनुभवायचा आहे तो आषाढीचा नेत्रदीपक सोहळा. जिकडे पहावं तीकडे माणसंच माणसं दृष्टी पडतात. सगळ्या मराठी मातीतील माणसं माझ्या विठ्ठोबारायाच्या चरणाशी एकरुप होतात. राम कृष्ण हरी चा गजर करतात. वाजत गाजत रिंगण घेत गावे पार करत भगव्या पताका आसमंती फडकावत वैष्णवांची मांदियाळी चंद्रभागेच्या वाळवंटी येते आणि एकच जयघोष करते. "बोला पुंडलिक वरदा हरीविठ्ठल! श्री पंढरीनाथ महाराज की जय! श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.जय जय राम कृष्ण हरी.
विठ्ठल मंदिराकडे पाऊले सरकताना श्री नामदेव श्री जनाबाई यांच्या महान भक्तीची आठवण आल्या खेरीज राहत नाही. तुळशीमाळा, चंदन, फुलांचा सुवास सर्वत्र दरवळत होता. गोपीचंदनाचा टिळा भालचंद्रावर रेखाटून भावीक पुढे सरकत होते. वाड्या वाड्यातील गायी म्हशी हंबरून जणू राम कृष्ण हरीचा गजर करत होते. मोरपीसांच्या टोप्या मस्तकावर विराजमान करून 'दान पावलं गं' चे गीत गात वासुदेव विहरत होते. मनाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. तेव्हा ज्ञानेदेवांच्या ओळी ओठांवर सजल्या.
कानडा ओ विठ्ठलु, कर्नाटकु
तेणे मज लावीएला वेधू
आषाढी निमित्ताने विठ्ठलाचा गाभारा सहस्त्रदीपांनी उजळून निघाला होता. गाभाऱ्यातील पुजारी परमात्म्याला दही दुग्धाचा अभिषेक करून पीतांबराने नटवण्यात तल्लीन होते. तुळशीहार फुलांचे हार गळ्यात सजले. समईच्या शुभ्रकळ्यांच्या प्रकाशात ती सावळी विठ्ठल मूर्ती उठून दिसत होती. पानावरील दव चकाकावे तसे ते सगुण रुप चमकत होते. पितांबरात शोभणारा विठ्ठल, कंठी कौस्तुभ मणी, अंगभर भरजरी शेला, तळपती मकरकुंडले, गळा तुळशीहार आणि रंद कपाळी मोठा चंदनटिळा. कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला पंढरीचा राणा पाहून डोळे न पाणावतील तर खरे. साक्षात चैतन्यमुर्ती पांडुरंगाचं दर्शन घेऊन भक्ताची मनं तृप्त झाली. विठुरायाची ती सगुण श्यामल मूर्ती डोळ्यात साठवून भक्त पुढे सरकत होते. अंतरंग राम कृष्ण हरी ने उजळून निघाले. गरुड खांबाला मीठी मारून आनंदाने सभा मंडपातील विणा, पखावज, टाळां निनादत होत्या. हरिनामात टाळ चिपळ्या धुंद झाल्या. राम कृष्ण हरी चा स्वर उंचावला. भक्ताच्या देहकांतीतून हरिनामाचे अमृत पाझरू लागले.
रुप पाहता लोचनी ¦ सुख झाले हो साजणी ¦¦
तो हा विठ्ठल बरवा ¦ तो हा माधव बरवा ¦¦
बहुत सुकृतांची जोडी ¦ म्हणूनी विठ्ठल आवडी ¦¦
सर्व सुखाचे आगार ¦ बाप रखमा देवीवर ¦¦
सोहळा पार पाडून दिवस उजाडतो तो परतण्याचा, तेव्हा मात्र मनाची होणा-या घालमेलीचे काय ते वर्णन करावे? मृगातील काळीकुट्ट ढगांसारखेच मनाचा आसमंत गहिवरून येतो, तेव्हा नांदायला निघालेल्या कन्येसारखीच भक्तांची भाव अवस्था असते.
कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे
तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा
चुकलिया माये बाळ हुरुहुरु पाहे
जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी
"बोला पुंडलिक वरदा हरीविठ्ठल श्री ज्ञानेदेव तुकाराम, पंढरी नाथ महाराज की जय"