गुज प्रीतीचे
गुज प्रीतीचे
ओढ मनात
गुज ओठांत
लाज गालात..... हसली l
पैंजण पायात
झुमके कानात
चोळी दंडात.....रुतली l
रात डोळ्यांत
चंद्र कवेत
धुंदी स्पर्शात.... भिनली l
निलांगी नभात
पहाट धुक्यात
कळी दवात...... भिजली l
इशारा नजरेत
दाद खुणेत
प्रीत हृदयात...... जागली ll
कट्यार दोन डोळ्यांची
हृदयी आरपार गेली,
अजुनी जिवंत मी
करणी अशी काय केली..? ll
गुलाबी ओठांचे धनुष्य
तू असे काही खेचले,
तीर काळजात परि
गीत ओठी अंकुरले ll
कुरळी बट केसांची
गाली अशी विहरते,
मानेवर सुरी माझ्या
परि ओंजळ प्रीत मागते ll
गोऱ्या नितळ पाठीवर
वेणी घनदाट रुळते,
नागीण डंख माझ्या तनुवर
अमृतात परि रोम रोम न्हाते ll
रेशीम बाहुंचे हार
गळा माझ्या तू घातले,
पेटले वणवे तरी
चकोर देहाचे तृप्तले ll

