Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Raosaheb Jadhav

Tragedy

5.0  

Raosaheb Jadhav

Tragedy

अन् ती निबंधात नापास झाली.

अन् ती निबंधात नापास झाली.

6 mins
24.2K


तसं शाळा बुडवून घरी राहनं तिला काही नवं नव्हतं. आता बी कामाच्या ऐन हंगामात सलग आट दिवस घरीच व्हती ती. कांदे निन्द्नीला आल्याले. निन्दन पूरं झाल्याबिगर तिला शाळात जाता येनार नव्हतंच. तशी परवानगी बी सरांकडून आपसूकच मिळली व्हती. ‘शाळाच्या अभ्यासापेक्शा निन्द्न महत्वाचं,’ हे बिंबलेलं तिचं मन शाळा बुडल्याची बोचनी मनाला लावून घेण्याइतकं टवटवीत राह्यलं नव्हतं. शाळा बुडवून आधूनमधून आईसंग शेतात राबनं आंगवळनी पडलं व्हतं तिच्या.

“आटवी झाली. बास झालं सिक्शन. आता आयपत बी नयी अन कामाला मानूस बी मिळत नयी. कामाच्या दिसात तर कुत्र्याला बी हाळद लागती. ती तं मानुसहे. धरील आथ माहासंग. व्हईल तेवडीच निन्दा-खुर्पायला मदत.” पोरगी ‘शाळाबाह्य’ व्हऊ नये म्हणून समजवायला गेल्याल्या सरांपुडं ‘घर झाडून पुंजा कोपऱ्यात लोटावा’ तसी ती मोकळी झाली अन सरांच्या मनात ‘त्या केराचा उखाडा’ झाला.

“कायमची शाळा सोडून देण्यापेक्षा जमेल तेव्हा येऊ द्या तिला शाळेत, परीक्षा मात्र टाळू नका. शक्य होईल तेवढं शिकू द्या. तशी हुशार आहे ती. काही अडचण आली तर घेऊ सांभाळून आम्ही. घरी ठेवून मोडून टाकाल पोर कामानं.” ह्या जाधव सरांच्या आर्जवी मताच्या भिडंला बळी पडून चालू ठीवली मंदानं नंदाची शाळा.

आज सोम्मार. सामाई परीक्सेचा पयला पेपर. आली नंदा शाळात. पेपर देनं आवस्यक व्हतं म्हनून आली. नव्वीच्या वर्गात चाचणी परीक्शा देऊन झाल्यावं तशी ती येत राह्यली आठ पंधरा दिसातून चार-दोन दिवस.

“प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललंय बरं का गं. आता प्रश्नपत्रिकेला कृतिपत्रिका म्हणायचं.” तिच्या बांधाशेजरी रान्हाऱ्या पमिंनं सरांनी दिलेला उद्याच्या परीक्शाचा निरुप आदल्या दिशीच दिला व्हता. येळापत्रक बी दिलं व्हतं.

अन ती ‘कृतिपत्रिका’ आज तिच्या पुढ्यात व्हती.

जरी ती खूप हुशार नव्हती, तरी तिला वाचता येत व्हतं अन लिहू बी शकत व्हती ती. शक्य तेव्हढी ‘कृतिपत्रिका’ तिनं उत्तरपत्रिकेच्या आखीव रेघांमधी घुसवली. चूक बरुबर देव जाने किंवा तपासनारा. पण ‘कागद निळे नायतर काळे करणं आवश्यक अस्तात’, हे ती जानत व्हती.

‘कृतिपत्रिकेतल्या आकलन अन पाठांतराच्या पायऱ्या वलांडत ती अभिव्यक्तीच्या टप्प्यावर आली’. प्रस्नात दिलेल्या ‘कृती’ ती वाचू लागली.

त्यात पयली ‘कृती’ व्हती: ‘तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या स्नेहसंमेलनातील बक्षीस समारंभाची बातमी तयार करा.’ तिनं सवत:च्या लांब केसांमंधी बोटं खुपसून डोकं खाजवत मचकुराची जुळवाजुळव करायला सुरवात केली. कठीणच व्हतं ते. कारन शाळात जवा-कवा ‘स्नेहसम्मेलन’ व्हायचं; तव्हा ती घरी निन्द्न-खुर्पन नायतर वावरात जे काय काम आसंल ते करायला शाळा बुडवून घरीच राह्यची. म्हन्ल तर ते आंगवळणीच पडलं व्हत मायलेकींच्या. त्या काळात शाळात शिकवायचे तास व्हत नसायचे अन मंदाला पोरीला संग घेऊन पडज्या फेडायचं काम बी सोईचं वाटायचं. शेवटी तो ‘प्रश्न’ तिनं तिढंच सोडून दिला ‘लिहू नंतर जमलं तर’ असा ईचार करत एक कोरं पान बी सोडून दिलं अन वळली पुढल्या प्रश्नाकडं.

‘भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.’ डोकं भनभंलं. घरात टी.व्ही. नयी. दुसऱ्याईच्या घरात जाऊन पाह्यची मुभा नयी. क्रिकेट खेळाची माह्यती नयी अन आवड बी नयी. तशात पोटाच्या ‘प्रश्नानं’ तिचं पोरवय आधीच हिसकून घेतल्यालं. लहानपंचे खेळ बी वयासंग निसटून गेलेतं. अन या ‘प्रश्नाला’ दुसरा ‘पर्याय’ बी नयी. ‘सगळेच प्रश्न असे सोडून दिले तर पास कसं व्हणार?’ ती सवत:चंच डोकं खाऊ लागली.

मंग तिनं ईचार केला अन लिवू लागली धाडधाड त्या ‘प्रश्नाचं उत्तर’:

‘आमच्या गावात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना नुकताच पार पडला. त्या सामन्याची तयारी आमच्याच गावातील काही कॉलेजच्या पोरांनी केली होती. त्यांनी सगळ्यात आधी गावठाण जमिनीवर वाढलेले गाजरगवत कापून जागा साफ केली. मंग एका रोटरीवाल्याला सांगून तेथे रोटरी मारून घेतली. त्यावर टॅँकरभर पाणी मारून क्रिकेटसाठी मैदान तयार केले. आमच्या मळ्याची वाट आधी त्याच गावठाणावरून जात होती. आता मात्र तेथून कोणालाच जाऊ देत नव्हते. आता मळ्यातून गावात येताना त्या मैदानाला वळसा घालून जावे लागायचे. ज्या दिवशी सामना होणार होता त्या दिवशी त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात एक मंडप घातला होता. खुर्च्या टाकल्या होत्या. नेमक्या त्याच दिवशी आईने मला गावातल्या दुकानातून चहा पावडर आणायला पाठवले होते. पमीसुद्धा नेमकी त्याच दिवशी गावात आली होती. मग मी आणि पमी खूप वेळ त्या गर्दीत उभे राहिलो. त्या मैदानाच्या मध्यभागी आमच्या गावातील जाधवाच्या संजूने तीन स्टंप दगडाने ठोकून पक्के रोवले. ‘हा संज्या स्वत:ला फार शहाणा समजतो’ असं पमी म्हणाली. नंतर प्रमुख पाहुण्याचे भाषण झाले आणि दोन्ही संघाचे कॅप्टन मैदानात उभे राहिले. उन्हाळी-पानकळी झाल्यावर डाव सुरु झाला. मंग आम्ही दोघी तेथून निघालो. आमच्या कांद्याच्या वावरात पोहचलो. आज पमीसुद्धा आमच्याच कामात पडजी करणार होती. दोन-तीन तास फुकट घालवले म्हणून आईने शिव्या दिल्या. पाटीखाली डालून ठेवलेली भाकर पमीने आणि मी खाल्ली. मग दिवसभर आईसंग उन्हाळ कांदे काढले. सरसकट काढायला आले होते ते. संध्याकाळी पमीच्या आईने माझ्या आईला सांगून पमीसोबत गावात मिसरीचा पुडा आणायला पाठवले. तेव्हा तो सामना संपला होता. आम्ही गावात जात होतो तेव्हा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते जिंकलेल्या संघाला वल्डकप दिला जात होता. सगळेजण टाळ्या वाजवत होते. आम्हीपण टाळ्या वाजवल्या. अशा रीतीने आमच्या गावात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना उत्साहात पार पडला.’

येळ सरला. सरांनी सम्दे पेपर जमा केले. घरी आली. तंतन करू लागली. फडफड बोलू लागली. “घरात एक बी सोय नयी. कसा ल्याहायचा पेपर? पेपर ल्याहायला कायकाय मायती लागती मायतीय का?”

“काय गं, आवघड व्हता का?” मंदा.

“नयतर काय? आपल्या घरात टीवी नयी का कसली सोय नयी. दुसर्यायच्या घरात मोबाईल ये, इन्टरनेट ये. एक तर रोज शाळात नयी. व्हईलं का अस्यानं मी पास? सांग बरं...” नंदा.

“जावदे. घेतील पास करून. सांगितलंय ना सराईनं. कर व्हईल तेव्हढं. घे काढून येव्हढं साल. आताच घरी राह्यली तर सरानला बी राग यइल.” मंदा.

“येवुं दे जावदे. मी नाय जानार उद्या पेपरला.” नंदा.

“आगं घेतील ते करून पास. टाक देऊन येवढे पेपर. पावू दिवळी झाल्यावं काय करायचं ते. पुढल्या मयन्यात येनार हायेतं पांढरवाडीचं पावनं. मामा बी म्हन्ला जमलं तं टाखु उरकून.” मंदा.

“तुला त येऊन जाऊन माहा लग्नाचं पडलंय.” नंदा असं बोल्ली खरी पर... गप, आगदी गप झाली. लग्नाचा ईशय तसा दुसर्यांदा निन्घाला व्हता तिच्या. तिला बी तो ईशय आता मनात हवासा वाटू लागला व्हता. खरं त तिच्या वयाच्या साऱ्या पोरींच्या तो आवडीचा ईशय. ‘शेवटंच सत्य तेच असतं,’ असं बिंबलेलं तिचं मन आता त्याच ईचारात गढत गेलं. मंग तिनं संध्याकाळचा सैपाक केला. भांडे घसले. अन बोलत राह्यली मनातच... झोपस्तवर.

सरले सगळे पेपर. लागल्या दिवळीच्या सुट्या.

तसं बी तिला सुट्या काय अन शाळा काय सार्कच. तरीपन सुट्या सरल्यावर दुसऱ्या दिशी ती पमीसंग शाळात गेली. त्या दिशी सरांनी ‘तपासलेल्या उत्तरपत्रिका’ सगळ्यांला बगायला दिल्या. नंदा नापास. जेमतेम ईस गुण. ते बी सरांनी उपकार म्हणून दिलेलं. ‘एवढा मोठा निबंध त्याला शून्य गुण कसे दिले’ म्हनून नंदाचा पेपर पमीनं सरांकड नेला. तव्हा सरांनी पस्टीकरन दिलं. “विषय संगती नाही त्यामुळे आशयसमृद्धीचे गुण देता येत नाहीत. आणि विषयसंगती व आशयाला गुण नाही म्हटल्यावर भाषासौंदर्य आणि भाषाशुद्धता गौण ठरते. तेव्हा कसे देणार गुण?”

“जे पायलं ते लिव्हलं, मी नयी पायली ती म्याच” नंदा.

अरे जग पार चंद्रावर गेलं अन तुम्ही साधी क्रिकेटची मॅच पाहू शकत नाही.” चिडलेले सर बोलले.

त्या दिसापून नंदा रोज ‘चंद्र’ पाहू लागली.

त्या रातीसुद्दा नंदा कधुळपोत चंद्राकडं एकटक पाहात व्हती. वटट्यावर गोधडी आथरून आडवी व्हत मंदानं हाक दिली तवा ती भानवर आली अन उठून आईनं आथरल्या गोधडीवं जाऊन आडवी झाली.

“सध्या चित काय थार्यावं दिसत नयी तुहं. घे झोपून. सकळी लवकर जायचंय खंडूतात्याची पडजी फेडाया. गहू निन्दाय्चाय त्यचा. ‘तुहे सात काम बाजूला ठिवून माही पडजी पयले फेड म्हन्ला तो.’ दोघी गेलो तर जाईल फिटून दोन दिसात. मंग जाय परवापुन शाळात. आट दिस आपल्या बी वावरात वाप नयी व्हणार.” मंदा.

मंदाचं बोलनं नंदाच्या कानी पडलं का नाय कोणास ठाव? पर नंदा मात्र डोक्यात चंद्र धरून आईनं टाकल्या गोधडीवं आडवी व्हऊन घोरू लागली व्हती. मंग मंदानं तिच्या कानुड्या आंगावर गोधडी वढली. डाव्या दंडावर हात ठिवत डोळे मिटले अन ती बी कुशीत चंद्र घेऊन घोरू लागली...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy