Raosaheb Jadhav

Others

5.0  

Raosaheb Jadhav

Others

दृष्टिकोन...

दृष्टिकोन...

1 min
3.7K


टळटळीत दुपार टळत आली होती. सावल्या मावळतीकडे झुकू लागल्या होत्या. झाडाच्या बुडाजवळ बारदन पसरून त्यावर बराच वेळ आडवं केलेलं अंग बसतं केलं. पँटच्या खिशातून मोबाईल काढला. स्क्रीनवर आडवेतिडवे बोट फिरवून त्याचं लॉक उघडलं. अजूनही पासवर्ड न विसरल्याचा आनंद मेंदूतून स्क्रीनवर झळकला. नेटचा डाटा चालू केला. मग थेट व्हॉटसअॅपच्या गळ्यावरून बोट फिरवू लागलो. एका ग्रुपवर कुणाचातरी वाढदिवस साजरा होताना दिसला. त्या संदेशांच्या वावटळीत उडणाऱ्या पाचोळ्यातला एक फुलांचा गुच्च उचलून, मी पण ‘हार्दिक शुभेच्छांसह’ एक संदेश ‘फॉरवर्ड’ करून टाकला. दुसऱ्या एका ग्रुपवर कुणा पारीतोषिक विजेत्या हस्तीचे अभिनंदन चालू दिसले. शेवटी त्या बिना ओळखीच्या हस्तीचे नाव ‘कॉपी’ करून उचलले आणि ‘अभिनंदन’ म्हणून तसलाच एक फुलांचा गुच्छ सोडला. आणखीन एक ग्रुप उघडून त्यातील एकेक वेदना, संवेदना, सहवेदना न्याहाळत, बोटाने लोटत, टेहळणी करत; पायऱ्या उतराव्या तसा एकेक मेसेज वर ढकलताना मी आणखी खाली उतरत राहिलो.... तोच- आणि पुढे ‘शोकसंदेश!’...

“बापरे! कोण गेलं?” हुडकत वर सरकत गेलो. फोटो होता. काय ओळख चालंना. ‘अपघाती निधन’... जाऊ द्या. आपल्याला काय त्याचं. पण मन काय मानीना. मग ‘RIP’ लिहीलं. गुच्छ टाकला. तो पण श्रद्धांजलीच्या अवसानासह पोस्ट झाला. अजून एका ग्रुपवरचे दोन विनोदी चुटकुले वाचले. नेटचा डाटा बंद करून मोबाईल खिशात घातला. दूरवर नजर फेकली. उजाड रान.

“खरंच माणसाच्या दृष्टीचा कोन इतका लहान होऊ शकतो?”


Rate this content
Log in