आई, तू कधी बदलणार......?
आई, तू कधी बदलणार......?
मागच्या महिन्यात आली होती ती, उड्या मारत , आनंदात ! दिसायला छोटीच वाटत होती, मला वाटलं पहिली किंवा फार तर दुसरी खेप असेल.
मी history विचारायला चालू केलं, ती म्हणाली, " मॅडम, पाचवी खेप...." मी पेपरवरचं वय पाहिलं, तर २८ ! मी उडालेच.... " मॅडम, दोन पोरी, एक पोरगं, एक खाली झालंय आणि आता हे तीन महिन्याचं, आधीचे तिन्ही सीझर !" सगळं एका दमात तिने सांगितलं पण मला दम लागला, चौथं सीझर करायचं आता हिचं? हिचा तिसरा महिना पण मला सहा महिन्यांनी ऑपरेशन थिएटरमधील थरार imagine करूनच घाम फुटला. मी झापायला चालू केलं," काय गरज काय? तीन सिझरच करु नका सांगतो आम्ही, आणि शाबास तू चौथं, अगं जीवाची काही परवा आहे की नाही? किती वर्षांची आहेत मुलं ?
" पहिली मुलगी चौदा, दुसरा मुलगा तेरा आणि तिसरी मुलगी नऊ वर्षांची.... तुम्ही आधी हा सोनोग्राफी रिपोर्ट बघा ना, चांगलय ना बाळ?" ती
" काय? म्हणजे लग्न तेराव्या वर्षी झालं? म्हणूनच सीझर झालं असेल पहिलं आणि मग आपोआप पुढचे. दाखव रिपोर्ट..." मी
रिपोर्ट पहाताच माझेच हातपाय गळाले. " तुला समजवला नाही रिपोर्ट? "
" नाही मॅडम,ते म्हणाले लगेच डिलिव्हरीच्या डॉक्टर कडे जा, मी इकडे आले, का, काय झालं?" तिने विचारलं.
" अगं, बाळ पोटात गेलंय. कोण आहे बरोबर? खाली करावं लागेल, आधीचे तीन सीझर असल्याने धोक्याचं असतं खाली करणं पण.....नवरा आला असेल तर आत बोलाव, मी समजून सांगते सगळं मग ऍडमिट करू" मी
"असं कसं झालं? आता काय करू? माझं काही खरं नाही...." ती रडू लागली
आधीची तीन बाळं असली तरी प्रत्येक मुल आईला प्रियच असतं, मी समजू शकत होते. "हे बघ, रडू नको. आहेत ना बाळं आपल्याला? नाही असं नाही,जाऊ दे, झालं ते झालं...शांत हो"
" ताई, कोणी नाही आलं माझ्यासोबत. मला आई व्हायचं नव्हतं, बाळ हवं होतं नवऱ्यासाठी... तो घरात नाही घेणार मला.
माझं हे दुसरं लग्न. शाळा जेमतेम चौथीपर्यंत शिकले,आईच म्हणाली नको शिकू, तिनेच तेराव्या वर्षी लग्न लावून दिलं. एक मुलगी, एक मुलगा लगेच झाले. नवऱ्याचं दुसऱ्या बाईबरोबर जमलं, टाकली त्याने मला, पोरं ठेवून घेतली सासूने. आईपण म्हणाली, पोरं असली तर दुसरं लग्न नाही होणार मग मी ही ऐकलं तिचं. शिक्षण नाही, आईकडे गरिबी लगेच आईने ह्या नवऱ्याशी लग्न लावून दिलं. मग माझी तिसरी ,पण ह्याची पहिली पोरगी झाली. जरा बरे गेले चार वर्ष पण मग ह्या सासूबाईंचा मुलगा पाहिजे म्हणून लकडा सुरू झाला.
आधीच तीसऱ्या सिझरवेळी डॉक्टर ने सांगितलं होतं,आता नको म्हणून त्यामुळे माझी इच्छा नव्हतीच. हळूहळू नवऱ्यालाही वाटू लागलं. तीन चार वर्षे झाली दारूचाही नाद लागला, रोज रात्री ओरबाडतो. मी गोळ्या घेत होते गुपचूप ते कळलं सासूबाईंना , त्यांनी सांगितलं त्याला. मग काय बेदम मारहाण रोजची. मुलगा दे नाहीतर घर सोडून जा म्हणाला. कुठे जाणार मी? तिसरं लग्न करू? आई बाबांचे खायचे वांदे, मला कोण नोकरी देणार, मुलीला कसं सांभाळणार? शेवटी मी म्हंटलं तू कबूल कर, पोरगा किंवा पोरगी काहीही झालं तरी शेवटचं आणि त्यानंतर दारू बंद, मारणं बंद. तो हो म्हणाला म्हणून नाखुषीने मी हे मुल ठेवलं. आता सासूबाई चिडणार, त्याला वेडंवाकडं भरवणार आणि तो नक्की मला सोडून देणार...." ती उद्विग्न होती.
आणि मी ? निर्विकार ! हतबल ! का, का, का? सगळं वर्तुळ पूर्ण करायचं ठरवलं तर सातत्याने हेच दिसतंय, 'शिक्षण' कमी पडतंय, पाटी पुस्तकातील नाही तर 'आई' ह्या संकल्पनेतील.... आईलाच ( सासू असली तरी कुणाची तरी आईच ना ? ) मुळात वाटत असतं, घराचं गोकुळ व्हावं आणि गोकुळात फक्त भरपूर कृष्ण असावेत, चुकून एखादी राधा असलीच तर तिने शिकून काय करायचं? शेवटी संसारच ना? मग लवकरच संसाराला लागलं तर काय हरकत? अल्पवयात होणारी,नाही आईने लावलेली लग्न आणि तिथून सुरू होणारं नको असलेल्या, लादलेल्या मातृत्वाचं दुष्टचक्र.....
मी पोटातली मुलगी पाडणार नाही किंवा माझ्या मुलीला मी शिकवणारच, लहान वयात लग्न लावू देणार नाही आणि हे सगळं जगाला ओरडून सांगण्यासाठी किंवा नवऱ्याकडून करून घेण्यासाठी मी स्वावलंबी होणार हे जोवर प्रत्येक आई, मुलगी, सासू, नणंद, बहीण, वहिनी, पत्नी ठरवणार नाही तोवर कोण करणार तिचं सबलीकरण?
बाईच बाईची वैरी असते ही संकल्पना बदलून सगळ्या मुलींच्या आया आणि सासुरूपात लपलेल्या सुनांच्या आयांनी बदलंलच पाहिजे......! वेळ आली आहे आता प्रत्येक मुलीने आईला आणि सासूला विचारण्याची,"आई, तू कधी बदलणार.....?"
