Kuldipak Pustode

Inspirational

4  

Kuldipak Pustode

Inspirational

यशाचा खडतर ध्येयप्रवास...!

यशाचा खडतर ध्येयप्रवास...!

8 mins
579


         एखादा प्रवास सुरू करतांना त्यामागे नक्कीच काहीतरी ध्येय असते. मनाशी ठरविलेले एखादे स्वप्न, स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आणि यशाच्या उंचीवरून दिसणारे हे अतिशूद्र अडथळा आणणारे घटक पाहण्यासाठी एकदा चालून आलेल्या वाटेकडे पाहिलं की नवी उमेद मिळते हे निश्चितच. चालतांना आपण निर्मिलेली पायवाट अनेकांना प्रेरणा देणारी असते, तेव्हा निर्मितीचे आपले स्वप्न जपायला हवंय. परंतू मार्गात येणारे अनेक अडथळे, हेवेदावे, उघड-छुपा, विरोध आणि संकटे ह्या सगळ्या परीक्षा पार करत ध्येयाप्रत पोहोचणे सहज सोपं कधीच नसतं. प्रत्येकाला वेगळा संघर्ष असतोच. एका अर्थाने आपण सगळेच धावत असतो. एखाद्या ध्येयाच्या दिशेने आपला प्रवास चालूच असतो. कधी ध्येयापर्यंत पोहोचता येतं, तर कधी ध्येय थोड्याश्या अंतरावरून निसटून जातं. पण त्या ध्येयाने प्रेरित होऊन ध्येयपूर्ती करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि मग मिळालेले यश, याचा आनंद अनमोल असतो. 


"Your Body is A strong Machine but

You have to fuel it with a powerful Mind...!"


        दसऱ्याची सुट्टी मिळाल्यामुळे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरच पारंपारिक रित्या शुभ कार्याची सुरुवात करावी, या उद्देशाने माझ्या डोस्क्यात एका ध्येयाचा किडा वळवायला लागला. लगेचच एका क्षणात त्या किड्याची निर्णयाप्रत आली. 'लाखनी' (जि.भंडारा) ते 'सिरेंगावबांध' (जि.गोंदिया) 38 किलोमीटर हा प्रवासाचा अंतर रनिंग मारत पूर्ण करायचा म्हणून विचार पक्का झाला. आणि तेही कोणाच्या सोबतीविना जायचं ठरवलं. प्रवासामुळे होणार असल्या त्रासाची मला जाणीव होती, पण त्यापेक्षा मी पाहिलेल्या माझ्या ध्येयाच्या प्रवासाची आनंदाची तीव्रता जास्त होती. प्रवासाला जायचा दिवस ठरल्याप्रमाणे आधीच्या दिवशीच सगळी तयारी करून ठेवलेली. सकाळी लवकर बाहेर पडावं, उन्हाच्या आत जास्तीत जास्त रस्ता काटायचा या विचारानं रात्रीला अडीच वाजताचा अलार्म लावून ठेवला.


        माझी उत्सुकता शिगेला पोहोचलेली, कधी सकाळ होते आणि मी एकदाचा बाहेर कधी पडतोय असे झाले होते. ठरलेल्या दिवशी आणि वेळे प्रमाणे मी 25 ऑक्टोबर, 2020 ला मध्ये पहाटे गजराच्या आवाजाने झटपट जागा झालो. रविवारची थंड पहाट, वातावरणाने धुक्याची दुलई लपेटून घेतलेली. पावसाची तशी चिन्हे दिसत नव्हती. श्वास आपली गती कमी करू लागला आणि डोळ्यांच्या पापण्या जागेवर स्थिरावल्या. अंथरूण जागेवर ठेवून रूम चकाचक साफ करून घेतली. दातांवरून ब्रश फिरवला. पाण्याचे दोन घोट पोटात ढकल्ले. आणि सगळी आवरा आवर करून पायात Alidas चे बूटमोजे घातले, अन निघालो अंगात परिवर्तनाचं बळ नि डोक्यात विचारांचे काहूर घेऊन वादळवाटा, अंधारवाटा तुडवत नवा सूर्य आणण्यासाठी.. 


         स्टार्टिंग पॉइंट वर जेमतेम दहा मिनिटे आधी पोहोचलो. कसाबसा थोडाफार वॅार्मअप केला. मग काय 3:30 ला मनात एक भयान हिमतीचा आत्मा घेऊन, मोबाईलच्या उजेडात देशभक्तीचे गाणं आणि शिवाजी महाराजांचे पोवाडे लावून, देवाचं नाव घेतलो नि रस्त्यावरनं धावायला लागलो. मी गावाकडे याबाबत कोणालाही अवगत केलेले नव्हते. राईड करताना घरच्यांना किंवा इतर जवळच्या मित्रांना कोणालाच लाइव्ह लोकेशन शेअर केलेलं नव्हतं. हायवे असल्याने ट्रकांची थोडीफार रहदारी चांगलीच वाढली होती. या महामार्गाचे मला नेहमीपासूनच एक वेगळ्या प्रकारचे ऍक्शन राहिले आहे. माझ्या गावी जायला इथूनच जावे लागे, म्हणून काय कि हा रस्ता आणि वाटेत लागणारी गावं ही एकदम तोंडपाठ होती. आणखी होता एक मार्ग; पण तो थोडा कमी पल्याचा होता आणि मला जास्त संघर्ष स्वीकारायचं होतं. कारण माझ्या माता-पित्याने माझ्यासाठी आज पर्यंत केलेल्या संघर्षांपुढे हे काहीच नव्हतं. 


"जखम आई, दुःख जेव्हा बाप होते,

सोसल्यावर गझल आपोआप होते..

ध्येय वा उद्दिष्ट नसले जीवनाला,

जन्म घेणेही युगाचा शाप होते...!"


        रात्रभर झोप नाही, त्यामुळे शरीर थकलेलं. तरी पण कशाचीही पर्वा न करता जोमानं रनिंग ला सुरुवात केली. स्टेप-बाय-स्टेप पावलं पडत होती. त्यामुळे डोकं शांत ठेवून नार्मल पेसने रन करत होतो. हळूहळू गती स्पीड पकडत होती. सर्व सुरळीत चालू असताना अर्ध्या तासानंतर लाखणी पासून 6 किलोमीटर दूरवर पिंपळगाव येथे दाखल झालो. पुढे लगेच उड्डाणपूल असल्या कारणाने खालून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू बसस्थानकांवर माझ्या स्वागतासाठी माझ्याही आधी गावाचं रक्षण करणारे कुत्रे तत्परच होते. क्षणाचाही विचार न करता लागलेत बिचारे माझ्या मागे. त्यात मी एकटाच असल्याने जीव जायला लागला, मी आता फक्त मरायचो राहिलो होतो. पण त्यांच्या तुलनेत माझी धावण्याची स्पीड जास्त असल्या कारणाने मागे फिरून नंतर उड्डाणपुलावरून पळायला लागलो. ते पण एकतर्फी बरंच झालं, त्यांच्यामुळे मला आणखी मोठं आव्हान स्विकारता आलं. म्हणतात ना, कोणत्या ना कोणत्या मार्गाने देव कुठल्यातरी रूपात येतोच आणि तो मला त्या कुत्र्यांच्या रूपात दिसला. उड्डाणपुलावरून चढताना तर काय अस्मादिक feeling like top of the world. सातवे आसमान पर.. 


          प्रवासात येणारी प्रत्येक लहान मोठी चढ माझ्यासाठी एक लहान मोठी अडचण होती. चढावर पूर्ण ऊर्जा आजमावी लागायची. पायाला गोळे भरलेले होते पण त्यांच्याकडे माझं लक्ष जात नव्हता. कारण काही वेळ मी खूप त्रास सहन केला तर मला उतारात आराम मिळणार आहे, हे माहीत असल्याने अधिकच उत्सुकता होती. खूपदा थांबावेसे वाटले. पण एकदा मी ऐकले होते की, 'लता भगवान करे' वयाच्या 65 व्या वर्षी नऊवारी साडीमध्ये, अनवाणी पायांनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊन सलग तीन वेळा मॅरेथॉन स्पर्धा जिंकू शकते तर मी का नाही धावू शकणार? त्याचप्रमाणे नुकत्याच 17 ऑक्टोंबर ला 'दिपक चिल्लर' नावाचा व्यक्ती 100 किलोमीटर जागा 11 तासांत पार करतो तर मी का नाही करू शकणार? याच विचाराने येईल त्या अनुकूल-प्रतिकूल घटकांचा सामना करत समोर जात राहिलो. 


"लक्ष का धावून केवळ गाठता येते?

रांगणे ही भाग असतो युद्धतंत्राचा...!"


        सामोर वृक्षांनी वेढलेला हिरवागार परिसर आणि त्यातून वेडीवाकडी वळणे असलेला रस्ता लईच बेकार एकदम खडकाळ होता. पायाचे, गुडघ्याचे पार भजे झाले. त्यात वाराही विरुद्ध दिशेने वाहत होता. पुरती दमछाक झाली. पार वाट लागली.. धावताना मात्र मनात सकारात्मक ऊर्जा ठासून भरल्याने मनातील वाईट विचार, नकारात्मकता, न्यूनगंड या सर्व गोष्टी विसरून जात होतो. रस्त्यावरून धावताना अंगावरून, केसांतून वाहणाऱ्या गार वाऱ्याशी, उडणाऱ्या पक्षांशी, त्यांच्या आवाजाशी आणि पायाखालील जमिनीशी मी एकरूप होऊन, काळ आला तरी मागे नाही हटायचे या विचाराने अंतर भरभर कापत राहिलो. काळ्याभोर अंधारात एकदा वाटलं, मोहघाटाच्या जंगलात बिबट्या दर्शन देईल, पण नाही झालं. त्याच्या नशिबातच नव्हते. जर तुम्ही एखादे चांगले काम किंवा मनाला आवडणारी योग्य गोष्ट करत असाल तर नियती तुम्हाला नेहमी साथ देते, असेच काहीसे घडले माझ्या बाबतीत. गर्द काळ्या रातीला चिरत चिरत पुढं जात राहिलो..


"उद्देश पावलांचा, जाणे पुढेच जाणे..

 हे ध्येय काय आहे, थांबायचे बहाणे...!"


        सकाळी असणारी थंडी आता गायब झाली होती. वारंवार शरीराला पाण्याची कमतरता भासत होती. Body Dehydration मुळे Muscles Cramp ही होत होते. माझ्या डाव्या गुडघ्याला सुजन अाली आणि आता रस्ते ठीक नसल्या कारणाने तो पुन्हा दुखू लागला होता. पाय जमिनीवर टेकवत नव्हते. प्रचंड वेदना होत होत्या. तेव्हढ्यातच वाटेत भेटलेली एक अनोळखी मावशी माझ्या शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारांकडे बघून कुतूहलाने म्हणत होती, की "सगळा घामाने चर्चेरा होऊन गेलाय बिचारा, तरी न थकता पळत आहे!" हे त्यांचे बोल ऐकूण माझ्या दमलेल्या पावलांनी अजून थोडा स्पीड पकडला. जीवनाचे तसेच आहे चार इकडच्या-तिकडच्या गोष्टी आत्मसात करून एखादी व्यक्ती छोटी मोठी ध्येय प्राप्त करू शकते, मात्र आपले सर्वोच्च अंतिम ध्येय प्राप्त करून चिरंतन यश प्राप्ति तोच करू शकतो जो यशाच्या खडतर मार्गावरून मार्ग क्रमना करतो.


"माणसे होतील हसणारी पुढे बुटकी-खुजी,

ध्येय इतके आपले उत्तुंग असले पाहिजे...!"


        व्यवस्था अशी होती, की कुठेही थांबून विश्रांती घेऊ शकत नव्हतो. कारण योग्य ठिकाणी वेळेतच पोहोचायचे होते. थोडा जास्त त्रास सहन करत होतो, कारण असा थरार पहिल्यांदा अनुभवत होतो. "नकोच हे असले विचार. यांना महत्त्व देत बसलो तर जीवनाचा कार्य प्रवास कधीच पूर्ण होणार नाही, स्वत्व कधीच जाणार नाही." असं भरपूर मनात चाललंय होतं. माणसाचे विचार त्याच्या पायांखालील वाटांवर अवलंबून असतात. खराब रस्त्यावरून वाट काढत पळण्याचा बराच त्रास होत होता. त्यातून पुढे आल्यावर वाटेत जांभळी, साकोली, कुंभली, धर्मापुरी, सावरबांध, शिवणीबांध, सानगडी अशी अनेक छोटी-मोठी गावं लागली. अगदी रमत-गमत सहजच सामोर जात राहिलो. 


"हरल्याची ही कशाला व्यर्थ आता कारणे;

ध्येय रागावून मागे ठेवते धिक्कारणे..


हार आहे गौण, जिद्दीला पुन्हा जोपासता,

चालते धैर्यास ध्येयाचे उरी सत्कारणे...!"


        गाव जसजसा जवळ येत होता, तसं एक वेगळेच समाधान मिळत होतं. सकाळचे सात वाजत आले असताना रनिंग संपण्याच्या मार्गावर होती. तीन-चार किलोमीटर रनिंग बाकी असताना, पूर्ण हात-पाय ब्लॉक झाले होते. तरी पण ज्वलंत जिद्दीने तिथून पुढचे साडेतीन किलोमीटर फुल स्प्रिंट मारत रन पूर्ण करून रेस संपविली. सगळ्यांशी झुंजत मी गावाच्या शिवेत आपल्या गोंदिया जिल्ह्यात पोहोचलो. 3 तास 50 मिनिटात कडाक्याची थंडी, ऊन, प्रदूषण याची तमा न बाळगता माझ्या आयुष्यातील पहिली फुल मॅरेथॉन 38 किलोमीटर न दमता, न थकता अतिशय उत्साहात पूर्ण केली. ट्रेक संपला, पण अजूनही पाय चालतच होते, ते थांबलेच नव्हते. ते तयारी करत होते, पुढच्या ट्रेक ची.. शरीर ओरडून पुन्हा पुन्हा एकच हाक देत होतं, "अरे बाबा, बस आता, थांब आता..!" मग या मानसिक आव्हानांवर मात करीत, शरीराला होणाऱ्या वेदना व कष्ट यांवर विजय मिळवून, काही केल्या मी हे पूर्ण करणारच अशा जिद्दीने जेव्हा आपण फिनिश लाईन वर पोहोचतो, तेव्हा मग वाटायला लागतं.. "अरे वा, मजा आली!" तोपर्यंत आणि तिथपर्यंत मजा बिजा कमी आणि सजाच जास्त वाटते हेच खरं! या काळात जो संघर्ष मला करावा लागला त्यामुळे मी भविष्यातल्या कोणत्याही संकटांला तोंड देण्यासाठी सिद्ध होऊ शकलो.


"वाट काट्यांची निरंतर चालतो मी..

मग कुठे गावी फुलांच्या पोचलो मी...!"


       'नवरात्रोत्सवाच्या' निमित्ताने आज अखेरच्या दिवशी धावुन माझ्या आगळ्या-वेगळ्या व्रताची उपासना करण्यात आली. आजची सकाळ उजाडली होती ती मॅरेथॉन स्पर्धेच्या तयारीने.. ही मॅरेथॉन स्पर्धा नसली तरी आयुष्याची रेस जिंकण्यासाठी या अनुभवाचा नक्कीच उपयोग होईल. त्याचप्रमाणे स्पर्धा स्वतःचीच असेल तर कधीच अपयश येत नाही. पण स्वतःसोबत जिंकण्याचा आनंद मात्र सांगता येतो आणि त्या आनंदाची मज्जा ही काही औरच. लगबग, अवरासावर, धावपळ, पळापळ अगदी एकरूप झाल्यासारखं वाटतं.. आज एक वेगळा आनंद, एक वेगळा अनुभव मिळत आहे. स्पर्धा संपवून आल्यावर अनेकांकडून कौतुक, अभिनंदन, काहींकडून काळजी व्यक्त होत होती. आणि हीच उर्जा जगण्याला बळ देत असते. नशा, झिंग, मजा म्हणा किंवा खुमखुमी पण ट्रेक कम्प्लीट झाला होता. स्वतःची नवी ओळख करून देणारा हा ट्रेक कायम लक्षात राहील. प्रवास सोपा कधीच नसतो, ध्येय खांद्यावर घेऊन चालावं लागतं, मुठीत आत्मविश्वास आणि काळजात त्या ध्येया बद्दल अतोनात निर्मळ प्रेम असावं लागतं. स्वप्न बरीच मोठी आहेत. अजून खूप मोठं अंतर गाठायचंय. आता कुठे प्रवास सुरू झालाय.. मार्ग खडतर आहे, पण ध्येय निश्चित.. आता नवीन स्पर्धेचे वेध पण लागले आहेत. फक्त वातावरण परत आधी सारखे होण्याची वाट बघतोय..


         शेवटी या अनुभवातून एवढेच सांगेन.. आव्हानांचा खडतर प्रवास पार करूनच यशाचा मुक्काम गाठता येतो. खऱ्या अर्थाने तुम्ही हा प्रवास किती करता यापेक्षा कसा करतात याला जास्त महत्त्व आहे. असंख्य निराळे अनुभव मग ते कटू असो वा आनंददायी असो हे येतच राहतात. पण आपण प्रत्येक राईड मधून सगळ्याच गोष्टींचा आनंद घ्यायचा असतो. ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले समजले पण नाही पाहिजे. आपल्या हातात फक्त आपला प्रवास असतो, जग त्याच्या नजरेतून आपल्या प्रवासाचे अर्थ लावत असते. आपण फक्त चालत राहावे, दुनिया काय म्हणते, यावर फारसे लक्ष देऊ नये. तरीही जर दुनियेने आपले कौतुक केले तर मोठ्ठा बोनस समजावा. धावण्यामुळे केवळ व्यायाम होतो असे नव्हे तर जीवन देखील समृद्ध होण्यासाठी त्याची मदत होत असते हा अनुभव येतो. चला तर मग "मी पण धावू शकतो" हा विचार मनामध्ये आत्ताच पक्का करा आणि हा विचार पक्का झाला तर उद्या सकाळी मैदान आपल्या स्वागतासाठी तयार आहे. ओझं होण्यापेक्षा तुम्ही मार्गस्थ व्हा..


"When you feel like giving up,

look back at how for you've come.


be strong. Stay on your path. 

Never stop going."


         मी आभारी आहे माझ्या एकंदर प्रवासातल्या वचन अडचणींचा, मला इथपर्यंत वाट दाखवली. माझ्या कष्टाची इभ्रत जपली.. आणि जिच्यामुळे या ट्रेकच्या वेळेचं योग्य नियोजण करता आलं ती माझी मैत्रीण सपणा ताई भेंडारकार, तिचं जेवढं आभार मानावं तितकं कमीच. तिच्याशिवाय हे इतक्या लवकर शक्यच नव्हते. तसेच ज्यांनी मला फेसबुक वर लिहतं केलं असे सर्व मित्र, त्यात खास करून रोशन दादा त्यांचेही खूप खूप आभार.. माझ्या पुढील प्रवासात ही तुम्हा सर्वांचे मार्गदर्शनपर आशीर्वाद, प्रेम, शुभेच्छा, साथ सदैव सोबत राहू द्या...


"ठाऊक आहे मनाला, मुश्किल प्रवास वाट..

आव्हानांना हरवता, वाढे जगण्याचा थाट...


फक्त आता लढ म्हणा, एवढीच आहे इच्छा..

मग सहज भेटतील, यशाच्या कैक शुभेच्छा...!"


       हे सूर, काळजात पेटलेल्या वनव्यातून आले, शरीराला होणारे कष्ट सहन करून, त्यावर मात करून शेवटी उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे खरं तर केवळ अशक्य आहे. आणखी बरंच काही आहे. तरीपण तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत थांबतो...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational