Anagha Hunnurkar

Inspirational

4  

Anagha Hunnurkar

Inspirational

वसा

वसा

10 mins
455


'डॉ. प्रिया भारद्वाज', दारावरची पाटी नजरेस पडल्याने ती सहजच वाचत श्रीरंग आत शिरला. प्रियानेच त्याला बोलावून घेतले होते. रुग्णालयाची ओपीडीची वेळ संपल्यावरच भेटायचे, असा त्यांचा शिरस्ता होता.

'काय गं, काय काम काढलेस' खुर्चीवर बसत श्रीरंग म्हणाला. श्रीरंग रानडे हा प्रियाचा वर्गमित्र. त्याचा वैद्यकीय उपकरणांच्या विक्रीचा व्यवसाय असल्याने, तो श्री समर्थ रुग्णालयालाही उपकरणे पुरवीत असे. त्यामुळे, प्रियाने अथक मेहनत करून कसे हे रुग्णालय उभारले होते, हे त्याने जवळून पाहिले होते.श्रीरंग विसावत असतानाच शांताबाई पाणी व चहाचा ट्रे घेऊन आल्या. हसत हसत त्यांनी 'राम राम' केला.

'नमस्कार शांताबाई, कशा आहात?' श्रीरंगने विचारपूस केली.

'बरी हाय, इट्टलाची किरपा' गळ्यातील तुळशीमाळ कपाळाला लावत 'येते भाऊ, मोप कामे हाईत' म्हणत त्या निघुन गेल्या. त्यांची लगबग बघून दोघेही हसले व प्रियाने मूळ विषयाला हात घातला.


'अरे श्रीरंगा, या कोविडचं काही खरं नाही. डॉक्टर असुनसुद्धा काळजी वाटून राहिली आहे रे.'

'अगं हा इंपोर्टेड आजार आहे' श्रीरंग त्याच्या विनोदी स्वभावानुसार हसत म्हणाला.

'हो रे, पण रुग्णालय चालवायचं म्हणजे माफक प्रमाणात मास्क, ग्लोव्हज हवेत ना. मास्कची टंचाई जाणवतेय रे.' प्रिया सांगत होती.

'हो ते तर आहेच पण आपण आधीच चर्चा केली होती ना आणि असं ठरलं होतं की कर्मचाऱ्यांना पाच मास्कचा सेट द्यायचा व रोज एक वापरला की तो परत पॅकबंद पिशवीत ठेवायचा व पाचही वापरून झाले की सहाव्या दिवशी परत पहिला वापरायचा'

'सुरवातीला तेच करत होतो रे पण माझ्या असेही लक्षात आले की वापरलेले मास्क केवळ पाच दिवस पिशवीत ठेऊन परत वापरण्यात धोका आहे.कारण प्रश्न फक्त कोविडचा नाहीये. इतर काही जिवाणूंची वाढ होऊ शकते ना रे.नवीन मास्क उपलब्ध नाहीत आणि रुग्णालयात जवळजवळ ऐंशीच्या वर माणसे कामाला आहेत. प्रत्येकी रोज एक मास्क, या हिशोबाने महिन्याचे जवळजवळ अडीच हजार मास्क आणायचे कुठून? परत त्यामुळे खर्च वाढणार व साहजिकच तो भार पडणार पेशंटांच्या बिलावर. वर केवढा तरी बायोमेडिकल वेस्ट तयार होणार. आधीच पर्यावरण आपले गढूळ. त्यात हा अमाप कचरा. जमिनीत पुरला तरी आणि समुद्रात वाहून गेला तरी प्लास्टिकच ना ते. त्यात पशु व मासे यांनाही वाढता धोका'


डॉ. प्रिया पर्यावरण संतुलनाविषयी आग्रही होती. त्यामुळेच रुग्णालयाची वास्तु बांधताना तिने वेगवेगळ्या औषधी वनस्पती व झाडे लावून, आवारात सुंदर बाग बनवून घेतली होती. दादू माळी त्या नंदांवनाची मन लावून मशागत करत.तसेच रुग्णालयात जिथे शक्य असेल तिथे कागदाची बचत व प्लास्टिकचा कमी वापर यावर भर दिला जात होता. स्वच्छता राखून पर्यावरणपूरक जे काही करता येईल, ते केले जायचे हे श्रीरंगला माहीत होतेच.

'अगदी खरंय तू म्हणतेस ते. आपणच आपले पर्यावरण सांभाळले पाहिजे. अगं चीनच्या एकट्या वूहान शहरात एक दिवसाचा बायोमेडिकल कचरा चाळीस टनांवरून, दोनशे चाळीस टनांवर गेला आहे म्हणे. ' श्रीरंगने दुजोरा दिला.


नुकतेच वर्ष संपले होते व जगाने २०२० मध्ये पदार्पण केले होते. वूहान शहरात व्यतपुत्ती झालेल्या कोरोना विषाणूने जगभर पसरायला सुरुवात केली होती. ना त्याची लक्षणे लक्षात येत होती ना त्यावर कुठले ठोस औषध होते. उलट सुलट बातम्यांचे पेव फुटले होते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ तर उडालीच परंतु हळूहळू प्रत्येक देशाचे सरकार या संकटाला तोंड देण्यास कंबर कसू लागले. सुरवातीला काही देशांनी 'हर्ड इम्युनिटीचा' (कळप रोग प्रतिकारशक्ती) अवलंब केला तर काहींनी चाचण्यांवर भर दिला. या पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संपर्कात येणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याची, अतिदक्षतेने आरोग्य सुरक्षा बघणे,बंधनकारक होते.


डॉ. प्रिया आपल्या रुग्णालयात काम कारणाऱ्यांशी आपुलकीचे संबंध ठेऊन होती. श्री समर्थ रुग्णालय हे मुळातच सेवाभावनेपोटी स्थापित केले होते. माफक दरात रुग्ण सेवा हे श्री समर्थ रुग्णालयाचे ब्रीद होते. तसेच ते रुग्णालय म्हणजे एक मोठे कुटुंबच होते. त्या दोघांचे संभाषण चालूच होते तेव्हाढयात दारावर टक टक झाली.

'कोण आहे? आत या' - डॉ. प्रिया

दारावर मेट्रनबाई सौ. मालिनीताई होत्या. दार उघडत त्या म्हणाल्या ' मॅडम, डॉ. लिंगायत सर, तुम्हाला फोन करायचा प्रयत्न करताहेत.'

'हो अहो, माझा फोन सायलेंट आहे. बोला'

'मॅडम, ते विचारताहेत की मास्क गरम ओव्हन मध्ये निर्जंतुक केले तर चालतील का?कारण त्यांना स्टरलायझर हवा आहे'

डॉ. लिंगायत, हे निर्जंतुकीकरण विभागाचे मुख्य होते. डॉ. प्रियाने लागेश त्यांच्याशी संपर्क साधला व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

'हो हो चालेल' फोन ठेवत डॉ. प्रिया म्हणाली

'मॅडम, एक विचारू का? ' मेट्रनबाई उद्गारल्या. 'हो जरूर' डॉ. प्रियाने सामंती दर्शवली.

'मॅडम, हे मास्क आपण परत परत वापरतो आहोत पण सगळ्यांच्या मनात भीती आहे हो. लवकर ही बला टळो असे झाले आहे.' मेट्रनबाई म्हणाल्या

'तुमचं म्हणणं रास्त आहे मालिनीताई, मलाही तुमच्या सगळ्यांचीच काळजी आहे. त्यामुळे मी खटपट करतेच आहे. लवकरच काहीतरी मार्ग निघेल.' डॉ. प्रिया शंकानिरसन करीत होती.

'ती तर आमची सगळ्यांचीच खात्री आहे म्हणून तर रोज नेमाने ड्युटी करतोय, मॅडम. मी ही त्यांना समजावून सांगत असते पण म्हटलं तुमच्या कानावरही घालावे' म्हणत मेट्रनबाई निघाल्या.


डॉ. प्रिया परत श्रीरंगकडे वळल्या 'अरे म्हणून तर मग हायड्रोजन पेरॉक्सीड या जंतुघ्न द्रवाच्या वाफेने ते मास्क स्वच्छ करून घेतले. परंतु हे करायला प्लाझ्मा निर्जंतुकीकरणाचे मशीन लागते . आत्ताच तू बघितलेस ना. तेच मशीन अन्य कामासाठी उपलब्ध असावे लागते. त्यात परत हे मास्क मुबलक हवेशीर ठिकाणी नीट वाळवले नाहीत तर ते आरोग्याला धोकादायक ठरू शकतात, असे समजले.'


ती श्रीरंगला पुढे सांगू लागली 'अपुऱ्या प्लाझ्मा स्टरलायझर मुळे मग गरम हवेचे ओव्हन वापरून सत्तर अंशावर अर्धा तास मास्क ठेऊन निर्जंतुक केले'

'छानच की. मग अडचण कसली गं' श्रीरंग म्हणाला

'अरे अवि म्हणतो की हे एन 95 मास्क , चार थर एकत्रित करून बनवले असतात. त्यातील दोन थर पॉलीप्रोपेलिनचे असतात व दोन थर सेल्युलोसचे. त्यामुळे मास्क गरम करणे धोकादायक ठरू शकते. मेडिकल कौंनसिलचेही तेच मत आहे.'


अवि उर्फ श्री. अविनाश भारद्वाज हे प्रियाचे यजमान. पेशाने यांत्रिकी अभियंता. कमीत कमी वेळात यंत्रातून जास्त उत्पादन कसे करता येते ह्यात अविनाशची हातोटी होती. प्रक्रियेचा किंवा कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करून त्यातील अडथळे, मंदगती किंवा अकार्यक्षम जागा अचूक ओळखून सुधार सुचवण्यात त्याचा हातखंडा होता. रुग्णलयातील कितीतरी प्रक्रिया व ऑपरेशनच्या फिल्म काढून, त्यांचा अभ्यास करून मग शस्त्रे कुठे ठेवावीत, परिचरिकेने कुठे उभे राहावे अशा बऱ्याच गोष्टी निदर्शनास आणून बदल घडवून आणले होते. त्यामुळे वेळ व खर्च, दोहोंची बचत होई.


रुग्णालयाच्या अनेक अडचणी, प्रिया अविनाशला सांगायची.सध्या मास्क निर्जजंतुकीकरणाची समस्या प्रियाला अस्वस्थ करीत होती. गूगलची मदत तर होतीच. शेवटी परस्पर चर्चा करून ते दोघेही या निष्कर्षापर्यंत आले की अल्ट्रा व्हायोलेट (युव्ही - नीलातीत) निर्जंतुकीकरण ही एकमेव सुरक्षित प्रक्रिया आहे ज्याने कोविद विषाणूचा डीएनए समूळ नष्ट होतो असे सिद्ध झाले होते.नीलातीत तंत्रज्ञानाचा वापर करणारी अनेक उत्पादने बाजारात होती. जसे युव्ही रोबोट, युव्ही ट्रंक, युव्ही डबे वगैरे. परंतु जेव्हा यांचे तांत्रिक तपशील पडताळून पाहिले तेव्हा असे लक्षात आले की पृष्ठभागावर जरी ते प्रभावी असले तरी मास्कच्या बाबतीत ती उत्पादने उपयोगी नव्हती.

 'नीलातीत तंत्र एअरकंडिशनिंग व ऑपरेशन थिएटर निर्जंतुक करण्यास वापरले जातेच की' अविनाश म्हणाला,'परंतु मास्कसाठी असे यंत्र सध्या तरी भारतात उपलब्ध नाही.'

'आता काय करावे ?' इति प्रिया

'तू निश्चिन्त रहा. विचार करून आपण उपाय शोधून काढुच.' अविनाशने प्रियाला अश्वस्त केले.

प्रियाला हसूच आले. 'अवि, आपल्याला कोविड माहीत आहे आणि कोविड माहीत नाहीये अशी संभ्रमित अवस्था झाली आहे सगळ्यांची.;

'रोज नवीन मार्गदर्शक तत्वे येत आहेत आणि रोज काहीना काहीतरी बदल करावे लागताहेत' प्रिया सांगत होती.


मग त्यानंतर जवळजवळ महिनाभर, रोजचा कामाचा व्याप सांभाळून, अनेक कोष्टके, काळ, काम, वेग यांची गणिते, लागणारे तापमान, तेज

(रेडियन्स), अंतर यांचे अंदाज वगैरे गोष्टींचा उहापोह झाला व प्रार्थमिक स्वरूपात आधी घरीच हा प्रयोग करायचा असे ठरले. तसा त्यांचा बंगला प्रशस्त असल्यामुळे घरी प्रयोग करण्यास विशेष अडचण नव्हतीच

'प्रिया, अगं आता युव्ही या विषयावर एवढी माहिती गोळा केली आहे की लागलीच पीएचडी करून मोकळा होतो' अविनाश हसून म्हणाला.

'हो ना रे,अवि, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तेच दिसते आहे.' प्रियाही विनोदात सामील झाली.


डॉ. प्रिया हा सगळा वृत्तांत वरचेवर श्रीरंगला सांगत होतीच.'अरे आमचे हे ठरते ना ठरते तोवर आपल्याकडे लॉकडाउन जाहीर झाला ना' श्रीरंगला सगळी पार्श्वभूमी समजून आली.

'मला आता नीलातीत किरणांच्या ट्यूबलाईट हव्या आहेत' प्रिया म्हणाली. 'श्रीरंगा, त्या मिळविण्याचे काम तुझे.'

श्रीरंग लागलीच कामाला लागला. चौकशीअंती एक वितरक तयार झाला. परंतु त्या नीलातीत ट्यूबलाईट, त्याच्या गोदमातून उचलायच्या, या अटीवर. लॉकडाउनमुळे वितरकाकडे ड्राइवर नव्हता. आता आली का पंचाईत. हातातोंडाशी घास आला होता पण गिळता मात्र येत नव्हता. मग रीतसर चौकशी करून अंती पोलीस परवानगी घेऊन रुग्णवाहिकेतून त्या ट्युबलाईट मागविल्या गेल्या.


ट्युबलाईट जेव्हा उघडल्या गेल्या तेव्हा लक्षात आले की त्या होत्या दीड फुटी आणि घरचे ट्युबलाईट होल्डर होते तीन फुटी. लॉकडाउनमुळे इलेक्ट्रिकल दुकाने बंद. मग अविनाशने आपल्या गराज मधील छोट्याश्या वर्कशॉप मध्येच त्यातील काही तीन फुटी होल्डर कापून दीड फुटी करून घेतले.


डॉ. प्रिया दहा मास्क घरी घेऊन आली. प्रत्येक मास्क एकएका झिपलॉक मध्ये ठेवण्यात आला होता. त्यावर वापरणाऱ्या व्यक्तीचे नाव व कितवा मास्क नंबर लिहिले होते. नीलातीत किरणे ही मानवी शरीराला धोकादायक असल्यामुळे आधीच या ट्युबलाईटना एक एक लांब वायर जोडली होती. मग सगळी कामे आटोपली की निजानीज व्हायच्या सुमाराला त्या ट्युबलाईट हॉलमध्ये मांडून सभोवती मास्क लटकवून ठेवले गेले. प्रत्येक पिशवीतून मास्क, ग्लोव्हज (हातमोजे) घालून, काळजीपूर्वक काढला गेला होता. वायरी बेडरूम {शयनकक्ष) पर्यंत नेल्या गेल्या व तिथून स्विच सुरु केला गेला. दरवाजा बंद करून केवळ फटीतून, दिवे काम करताहेत ना याची अधूनमधून पडताळणी केली गेली कारण ती किरणे डोळ्यांनाही धोकादायक होती. घरीच एक जुना निकामी असलेल्या फ्रिजमध्ये मग ते मास्क सुरक्षितपणे ठेवण्यात आले .


दुसऱ्या दिवशी ते सगळे मास्क सूक्ष्मजैविक चाचणीसाठी पाठवण्यात आले. कोविड विषाणू जरी नसला तरी अन्य सूक्ष्म जिवाणू चाचणीत आढळले. म्हणजेच मास्क पूर्णपणे निर्जंतुक झाले नव्हते. निर्जंतुकीकरण करताना प्रखरता वाढविणे जरूरीचे होते. मग एका पॅकबंद खोक्याला आतून अल्युमिनियम फॉईल लावून त्यात नीलातीत ट्युबलाईट बसविण्यात आल्या.अल्युमिनियम फॉईलमुळे प्रकाश सतत परावर्तित होऊन प्रखरता वाढण्यास मदत झाली .

'आपण अगदी पेअरी व मादाम क्युरी शोभत आहोत' अविनाश प्रियाला म्हणाला.

'हो ना, त्यांनी गराजमध्ये रेडियमचा शोध लावला, आपण खोक्यात' प्रिया म्हणाली आणि दोघेही खळखळून हसले.


मग ते मास्क त्या नवीन खोक्यात निर्जंतुकीकरणासाठी ठेऊन दिले गेले व नंतर चाचणीसाठी पाठवले गेले. मास्क छान भाजले गेल्यामुळे पूर्णपणे निर्जंतुक झाले होते परंतु खोक्यातीळ जागा सीमित पडली त्यामुळे उच्च तापमानात मास्क एकत्र ठेवल्यामुळे त्यांचा आकार बदलला.

'आकाराचे बघता येईल रे, मोठी जागा तयार करावी लागेल व मास्क वेगळे वेगळे लटकवावे लागतील.पण चाचणी यशस्वी झाली हे महत्वाचे.' डॉ. प्रियाने आनंदित होऊन म्हटले.


यथावकाश अविनाशच्या मदतीने व डॉ. लिंगायतांच्या देखरेखीखाली, रुग्णालयातील निर्जंतुक विभागात खास यासाठी एक लाकडी कपाट बनविले गेले व त्यात अल्युमिनियम फॉईल व नीलातीत ट्युबलाईट बसविण्यात आल्या. तांत्रिक तपशीlलाप्रमाणे वेळ, तापमान व तेजाचे मापक यंत्र बसविले गेले. त्या विभागातल्या कर्मचाऱ्यांना, मास्क निर्जंतुकीकरण कसे करायचे याचे औपचारिक प्रशिक्षण दिले गेले. पुरेशी जागा असल्यामुळे मास्क ठराविक अंतरावर लटकवता येऊ लागले .त्यामुळे त्यांचा आकार बदलला नाही. प्रत्येक मास्क वर वापरणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्यामुळे तो निर्जंतुक मास्क त्या व्यक्तीस परत वापरासाठी दिला जाई. मास्कचा वापर,निर्जंतुकीकरण आणि परत वापर याविषयीची तपशीलवार कार्यपद्धती नेमून तुपाची सविस्तर नोंद ठेवली गेली. 


रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आता हायसे वाटू लागले. मास्क परत वापरण्यात जी एक अनामिक भीती होती, ती गेली होती. डॉ. प्रिया अधुनमधून सभा घेऊन सगळ्या कर्मचाऱ्यांना सद्य परिस्थिती समजावून सांगत .'आणीबाणी तर आहेच पण आपण सगळ्यांनी मिळून हे व्रत घेतले आहे. त्यामुळे आता आपण सगळेच कोविड योद्धे आहोत. ' मॅडम धीर देत.


चाचणीचा अहवाल बघून,' कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच' श्रीरंग आनंदाने म्हणाला.

'अरे नाही रे, सध्या हे चालून जाईल तरी अजून एक चाचणी बाकी आहे' प्रिया म्हणाली.

'आता ती कोणती? ' इति श्रीरंग.

'असे निर्जंतुक मास्क कितीदा वापरता येतील याची पडताळणी करावी लागेल. काही झाले तरी एन 95 मध्ये प्लास्टिक आहेच ना रे. तर मास्कमधून जी श्वसनक्रिया होते त्यावर प्रक्रियेमुळे काही परीणाम तर नाही ना होत हे तपासले पाहिजे.' प्रिया म्हणाली.


श्रीरंगने कौतुकाने हात जोडले. 'अगं किती सखोल विचार करतेस गं, खरंच व्रतस्थ असल्यासारखी तू हा पेशा पत्करला आहेस' श्रीरंग भावूक झाला. त्याने या पेशातील अनेक व्यावहारिक तज्ञ फार जवळून पाहिले होते. डॉ. प्रिया निश्चितच त्या सगळ्यांहून वेगळी तर होतीच पण तिच्या यशाचे गमक या सखोल विचार पद्धतीत होते हे त्याला प्रकर्षाने जाणवले.


निर्जंतुकीकरणाच्या दहा सायकल झाल्यावर ते मास्क कापड संशोधन संस्थेकडे चाचणी साठी पाठवले गेले. निर्जंतुक मास्क किती वेळा सुरक्षितपणे परत वापरता येतील हे जाणून घेण्यासाठी ही तपासणी जरूरी होती. कर्मचारीही रिपोर्टची आतुरतेने वाट पाहत होते. काळजीचे सावट सर्वांवर होतेच.


कापड संशोधन संस्था, सरकारी असल्यामुळे या रिपोर्टची खूपच मदत होणार होती. रिपोर्ट ई-मेलने येणार होता त्यामुळे डॉ. प्रिया आणि अविनाश दोघेही सारखे वेळ मिळेल तसा, ई-मेल बघत होते. अट्ठेचाळीस तासात रिपोर्ट येईल असे सांगितले गेले होते. परंतु तिथेही कर्मचारी कमी असल्यामुळे संशोधनाला विलंब लागू शकेल असेही कळविण्यात आले होते. वाट पहाणे, हेच फक्त त्या दोघांच्या हातात होते


एक दिवस, डॉ. प्रिया, पेशंटला तपासत असताना, अचानक अविनाश आल्याची तिला वर्दी दिली गेली. 'अवि, असा यावेळी?' प्रियाच्या मनात आले. पेशंट गेल्यावर , डॉ. प्रिया हात धूत असतानाच अविनाश दार उघडून 'अभिनंदन' म्हणत आत शिरला.

'अगं, ई-मेल बघितलिस का? कापड संशोधन संस्थेचा रिपोर्ट आला आहे . निर्जंतुक केलेले मास्क दहा वेळा वापरता येतील. रिपोर्ट ने ओके दिला आहे' अविनाश हर्षित होऊन सांगत होता.

'काय म्हणतोस, अरे देवच पावला रे' डॉ. प्रिया

'आधी श्रीरंगला फोन कर. त्याच्यामुळेच तर ट्युबलाईट मिळाल्या आणि हे सगळे जमून आले' अविनाश म्हणाला.

'हो तर' म्हणत डॉ. प्रिया , श्रीरंगला फोन जोडू लागली.

आत, पेशंट तपासणी चालू असल्याने,त्यांच्याबरोबर परिचारिका सुमनही होती. लागलीच बाहेर जाऊन ती मेट्रनबाईंच्या कानात कुजबुजली,'निर्जंतुक मास्क जरी दहा वेळा परत वापरला तरी श्वसनासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा रिपोर्ट मिळाला आहे.' बातमी हाहा म्हणता कर्मचाऱ्यांत पसरली. या आनंदाच्या बातमीने श्री समर्थ रुग्णालय चैतन्याने मोहरून गेले.


तेवढयात श्रीरंग चॉकलेटचा मोठा पूडा घेऊन आलाच. 'अभिनंदन' म्हणत त्याने अविनाशला आलिंगनच दिले असते परंतु सोशल अंतर ठेवण्याच्या नियमामुळे त्याने आवरते घेतले. शांताबाई पाणी व चहा घेऊन आल्याच.

'शांताबाई, अहो पेढेच घेऊन येणार होतो. पण लॉकडाउनमुळे मिठाईची दुकाने बंद ना, म्हणून ही चॉकलेटं. सगळ्यांना वाटायची बरं का.' श्रीरंग म्हणाला.

शांताबाई हसत हसत , 'व्हय की' म्हणत पुडा घेऊन निघून गेल्या.


ओपीडी संपायलाच आली होती. एक दोन पेशंट बघून , मग ते तिघेही निवांत बसले.

'आता सगळ्या चाचण्या आटपल्या आहेत, तर अविनाश, मला सांग, हे यंत्र आपण व्यावहारिक स्तरावर बनवू शकतो का ?' श्रीरंगने विचारले.

'अरे त्यासाठी अजून बरेच वाचन व संशोधन करावे लागेल. नमुना म्हणून हे यंत्र ठीक आहे परंतु अजून बरंच काम करावे लागेल. मास्कच्या टंचाई मुळे हा खटाटोप केला. उद्या मास्क भरपूर प्रमाणात उपलब्ध झाले तर कदाचित हे मशीन व्यवहार्य करण्यास बदल करावे लागतील' अविनाश म्हणाला

'म्हणजे अजूनही दिल्ली दूर आहे तर' श्रीरंग म्हणाला व तिघेही हसले.


तोवर बाहेर रुग्णालयात सगळेच कर्मचारी त्यांची बाहेर येण्याची वाट पहात होते. त्यांनाही अभिनंदन करायचे होते. एक मोठी काळजी मिटली होती. डॉ. प्रिया व श्री. अविनाश भारद्वाज यांनी इतिहास रचला होता. भारतातील पहिले 'सुरक्षित मास्क निर्जंतुकीकरण' मशीनचे श्रेय त्या दोघांना जात होते. 


Rate this content
Log in

More marathi story from Anagha Hunnurkar

Similar marathi story from Inspirational