STORYMIRROR

Pramod Moghe

Inspirational

2  

Pramod Moghe

Inspirational

विधिलिखित की योगायोग ?

विधिलिखित की योगायोग ?

2 mins
74

जीवनाच्या या अमर्त्य प्रवासात आपल्याला अनेक प्रवासी भेटतात. कारण मानवी जीवन हा देखील एक प्रवास आहे.या प्रवासात काही लोक आपल्याला भेटत असतात आणि ते आपल्या सोबतचा त्यांचा कार्यकाळ संपत आला की ते त्यांचा स्टॉप वर उतरत असतात. या प्रवासात जी माणसं भेटतात ती काही रक्ताची तर काही प्रेमाची तर काही भावनेची जोड असलेली तर काही नुसतीच ओळखीची, परंतु या हजारो माणसाच्या प्रवासात नेमकी काहीच माणसं भेटतात, आणि ती भेटणं हा योगायोग असतो की विधिलिखित? 


कारण आपल्या आयुष्याच्या अनेक टप्प्यावर अनेक वळणावर ही माणसं भेटत असतात ती आपल्याला सोबत म्हणून किंवा आपल्याला त्या प्रसंगातून सावरण्यासाठी आपले मार्गदर्शक म्हणून, त्यातल्या काही माणसांचा सहवास हा कायम हवा हवासा वाटतो, तर काही कायम भांडणारी, तर काही कायम प्रेमरूपी सहवास करणारी. अशी माणसं आपल्याला या प्रवासात भेटत असतात. क्वचित प्रसंगी तर ती रक्ताच्या नात्यापेक्षा ही जवळची वाटतात, आणि नकळत आपण ही आपलं मन त्यांचा समोर कोणताही संकोच न करता मोकळं करतो.


हे सर्व विधिलिखित असतं की निव्वळ योगायोग.कारण अशी माणसं या प्रवासात भेटतात ती योगेश्वराच्या कृपेनेच नाही का, कारण त्याचं वचनच आहे तसं... 'संभवामी मी युगे युगे...' कारण तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता, आहे आणि राहिलही.


तो प्रेमस्वरूप असताना सुंदर बासरी वाजवणारा कान्हा होता ज्याने राधे सोबत असताना प्रेमयोग सारखा अतिशय कठीण अध्याय सोप्या शब्दांत सांगितला आणि कुरुक्षेत्रावर जाताना मात्र तो पुन्हा राधेच्या जीवनातून एक प्रवासी असल्या सारखा निघून गेला. कुरुक्षेत्रावर मात्र त्याने अर्जुनासोबत असतांना साऱ्या जगाला नीती, युद्धातील जटिल डावपेच, आणि साऱ्या जीवनाचे सार असलेला गीता उपदेश दिला मात्र युद्ध समाप्ती नंतर तो ही एक प्रवासी असल्यासारखा अर्जुनाच्या जीवनातून निघून गेला.तो तर एक योगपुरूष होता युगंधर होता तरीहि त्याला त्याच्या प्रवासाच्या टप्प्यावर येणाऱ्या संकटाशी प्रवास करत तो त्याचं विधिलिखित करत होता, योगायोग करून आणत होता.तो आज ही आपल्याला, आपल्या जीवनरुपी प्रवासात एक प्रवासी म्हणून भेटत असतो. काही माणसांची भेट घडवत असतो. 


त्यातील काही आपल्याला आई-बाबा, भाऊ-बहीण अशी नात्यांमधली, तर काही सहचारिणी अथवा जोडीदार तर काही मित्र म्हणून तर काही अनोळखी प्रवासी म्हणून भेटणं हे त्या योगेश्वराचं आपल्या बाबतीत केले विधिलिखित असतं आणि ते प्रवासी योग्य वेळी भेटणं हा योगायोग असतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational