उदार त्याची सावली
उदार त्याची सावली
सिंदेवाहीवरून चंद्रपूरकडे आगेकूच करताना राजोली गावालगतचा २ किलोमीटर चा रस्ता मला अतिशय आवडतो. त्या रस्त्यावर दुतर्फा कडुलिंबाची शंभरेक झाडे थाटात उभी आहेत. म्हणजे उन्हाळ्यात सूर्य काटकोनात आग ओकत असताना सुद्धा रस्त्यापर्यंत पोचायला स्वतः सूर्यदेवालाही घाम गाळावा लागेल एवढी दाट झाडी. आता पावसाळ्यात तर ती हिरवीगार झाडे मन मोहून टाकतात.
२-४ दिवसांपूर्वी त्याच रस्त्या वरून जायचा योग आला. सकाळची प्रसन्न वेळ, सूर्याचा आणि ढगांचा लपंडाव सुरु होता, अतिशय सुंदर मोहक वातावरण, आजूबाजूला हिरवीगार भाताची शेतं, ओढ्याचं झुळझुळत पाणी, अनेक प्रकारचे छोटी मोठी झाडे, ना-ना प्रकारचे पक्षी-पाखरं, सगळं कसं अगदी मोहक. पण अगदी नकळत, सहज लक्ष गेलं ते ह्या झाडाकडे. काय आहे त्यात?? काहीच नाही.... ना सुगंधी फुले आहेत... ना रसदार फळे... ते सोडा, पण एखादे पानसुद्धा नाही. वरवर निर्जीव दिसणारं, ओसाड, शुष्क आणि एकाकी उभं एक झाड. तरीही हे झाड किती सुंदर दिसतंय.
वर वर्णन केलेल्या रस्त्याच्या कडेला सुमारे ३० मीटर वर एका शेतात हे झाड आहे. निष्पर्ण झाड. वरकरणी पाहता हे आंब्याचे झाड असावे असा मी अंदाज बांधला. आता जरी हे झाड शुष्क, ओसाड, निर्जीव, निष्पर्ण आणि एकाकी दिसत असलं तरी त्याच्या खोडाची लांबी रुंदी आणि फांद्यांचा पसारा पाहून या झाडाच्या संपन्नतेची आणि सुबत्तेची कल्पना करता येईल. परंतु.... एकेकाळी समृद्ध असलेल्या या झाडाखाली आता एकही वाटसरू सावलीच्या शोधात येत नाही. हे पाहून हे रुक्ष झाड आतल्या आत झुरत असेल. साऱ्या जुन्या प्रिय अप्रिय घटना त्याच्या नजरेसमोरून फिरत असतील. एका रोपट्या पासून डेरेदार वृक्ष आणि आता फक्त निर्जीव आणि रुक्ष हा सारा प्रवास त्याला नक्की आठवत असेल. आता एकाकी उभ्या असलेल्या झाडाच्या मनात काय काय येत असेल, त्याने अनुभवलेले सुखदुःखाचे अनुभव ऐका त्याच्याच शब्दात.......
मला अजूनही आठवतायत रोपटे लावलेले ते दोन हाथ, मी मोठा होईस्तोवर मला दिलेली साथ.
मला अजूनही आठवताहे गर्द सळसळत्या पानांतून वाहणारा वारा, अवेळी आलेल्या पावसातल्या गारा.
मला अजूनही आठवताहेत माझी सुगंधी फुलं, फांद्यांवर लोंबकळणारी मुलं.
त्याच मुलांनी आंब्यांसाठी भिरकावलेले दगडधोंडे, गोड आंबे खाल्ल्यावर सुखावलेली त्यांची तोंडे.
मला अजूनही आठवताहे सावली खाली उभा असलेला तो मनुष्य, आणि त्याने पाहिलेला सप्तरंगी इंद्रधनुष्य.
मला अजूनही दिसताहे त्या रात्रीची ती शांत चंद्रकोर, तिच्या चांदण्यात थुईथुई नाचणारा मोर.
मला अजूनही ऐकू येताहे पक्ष्यांनी केलेला कलरव, कोंबड्यांचा आरव, आणि भ्रमरांचा गुंजारव.
मला अजूनही आठवताहे पांथस्थांना प्रखर उन्हात दिलेली शीतल छाया, मुसळधार पावसात दिलेली ओली माया.
मला अजूनही आठवताहे पहिल्या पावसात आलेला मातीचा सुवास, शेतकऱ्यांच्या शिदोरीतला भाकरीचा घास.
मला अजूनही डोळ्यांसमोर दिसतोय मी पाहिलेला उन्हाळा, हिवाळा, पावसाळा.
पाण्याने ओथंबून गेलेला तो ढग काळा, सूर्याने ओकलेल्या अग्निज्वाळा, माकडांचा गोतावळा, वर उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांच्या माळा,
पाखरांची भरलेली शाळा, मधुर गाणारी कोकिळा, खाली पडलेला पालापाचोळा, फांद्यावरचा मधमाशांचा पोळा, झाडाखाली जमलेला मित्रमेळा,
त्यांचा लागलेला लळा, त्यांनी बांधलेला झोपाळा, झोपाळ्यावर घेतलेला हिंदोळा, त्यांचा तो आनंदसोहळा,
पांथस्थांनी लावलेला जिव्हाळा, हे सगळं पाहून माझा होत असलेला विरंगुळा.
सारं सारं काही मला आठवतंय कारण मी ते खोल मुळात साठवून ठेवलंय.
हे सगळं ऐकल्यावर आपल्याला त्या झाडाची खरंच कीव येईल. पहा ना... हे झाड या भरल्या सृष्टीत काहीसं एकाकी झालंय. जणू काही सर्व ऐहीक जबाबदाऱ्या पार पाडून ते विरक्त झालंय. जमीनी वर हे ध्यानस्त योग्यासारखं निष्पर्ण विहारतंय. तरी हे झाड आज जिद्दीने उभं आहे. पुन्हा बहरण्याची आस घेऊन. त्याला आशा आहे पुरुज्जीवनाची. त्याची सावली आधी सारखी नसली तरी थोडी का होईना शीतलता देण्यास अजूनही सक्षम आहे. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंच आहे ना.....
‘‘जो खांडावया घावो घाली।
कां लावणी जयाने केली।
दोघा एकचि साउली।
वृक्षु दे जैसा॥’’
म्हणजे आपणास तोडण्यासाठी घाव घालणाऱ्यास तसेच आपली लागवड करणाऱ्यास, दोघांनाही झाड सारखीच सावली देते. म्हणून म्हणतो की आधीसारखी नसली तरी आहे...
