तू, मी आणि पाऊस
तू, मी आणि पाऊस


तो असाच कोसळत होता, काळ्याकुट्ट ढगांतून आपली वाट काढत बरसत होता, झाडांवरून, पडत पडत रस्त्यावर वाहत होता, समिधा एका ऍड फर्ममध्ये कॉपी रायटर म्हणून काम करत होती. काही वर्षांपूर्वी पाऊस हा समिधाचा जीव होता, चातकाप्रमाणे ती त्याची वाट पाहत राहायची, त्याच्या आगमनाने अगदी हुरळून जायची, लिखाणाची आवड असल्यामुळे अनेक कविता ती पावसावर करायची, पाऊस जणू तिच्या शब्दांना प्रेरित करत होता, आणि तिच्या लेखणीतून व्यक्त होत होता, पाऊस जणू तिचा प्रियकरच होता. आता मात्र हा पाऊस तिला तेवढाच नकोसा होता, भेसूर, राक्षसी वाटायचा.
"शी, ही काय वेळ आहे का येण्याची?", समिधा वैतागून म्हणत होती.
ती अशीच एक पावसाळी रात्र होती, ते दोघे एका मीटिंगवरून परत येत होते, पण पाऊस सारखाच कोसळत होता, तरीही त्यांनी पुढचा प्रवास करायचा ठरवला होता. समिहान त्याच ऍड फर्ममध्ये क्रिएटिव्ह रायटर म्हणून काम करत होता, समिधा त्याला असिस्ट करत होती, त्यांची छान मैत्री झाली, छान ट्युनिंग जमायचं दोघांचं, त्यातच ती त्याच्या प्रेमात पडली, तिने त्याला लग्नासाठी विचारले, आणि तो ही तयार झाला, पण करिअरच्या एका चांगल्या टप्प्यावर आल्यावर दोघांनी रितसर घरच्यांची परवानगी घेहून लग्न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता."
समिहान पाऊस खूप येत आहे, आपण थोड्यावेळ कुठेतरी थांबू या, त्या कोसळत्या पावसातच समिधा त्याला म्हणाली.
"अगं वेडे, हा पाऊस तर तुझा जीव की प्राण, आणि तू आज..." समिहान तिला म्हणाला.
"नको मला भीती वाटते आहे, आज या पावसाची, काहीतरी..." समिधा घाबरून म्हणाली.
समिहानने तिची तंद्री मोडली, आणि म्हणाला, "चल वेड्यासारखं काही नको म्हणू, असं काही नसतं, एक करू शकतो, मी गाडी चालवतो, तू मला तुझ्या छानशा कविता ऐकाव".
समिहानच्या शब्दांनी तिला जरासा धीर आला, आणि ती तयार झाली, आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.
समिहान म्हणाला, "काय मस्त कॉम्बिनेशन आहे, तू, मी, आणि पाऊस."
एकीकडे समिहानची ड्रायव्हिंग आणि दुसरीकडे समिधाच्या कविता, प्रवास सुरु करण्याअगोदर त्यांनी खाण्याचे पॅकेट्ससुद्धा घेतले होते. त्यांचा हा वेगळा प्रेमाचा पावसाळी प्रवास, समिधाच्या ओल्याचिंब करणाऱ्या शब्दांबरोबर सुरु झाला. समिधा आपल्या कवितांची वही काढून त्यातली कविता ऐकवू लागली.
नभ दाटून आले
मेघ गहिवर झाले
थेंबांनी भरली आस
दरवळला एक सुवास
पावसाने रान भिजवले
पक्षी गाती आनंद गाणे
धरतीत सुख अंकुर रिजवले
जीवन फुलले पुन्हा नव्याने...
" वा.. वा.. क्या बात है, समिधा रिअली गुड, यार एक नंबर... आय प्रॉमिस यु... तुझ्या ह्या सगळ्या कविता मी छापणार आहे," समिहान आनंदाने म्हणत होता., समिधाच्या प्रत्येक कवितेवर समिहानची उस्फुर्त दाद मिळत होती.
तिच्या कवितांसमवेत समिहानने गाणीसुद्धा लावली.
मन चिंब पावसाळी
रानात गंध ओले
घनगर्द सावल्यानी
आकाश वाकलेले
कधी हिंदी तर कधी मराठी पाऊस गाण्यांची मैफिल जमली होती.
बरसो रे मेघा मेघा
बरसो रे मेघा मेघा बरसो
त्यातच समिधा तिच्या कवितासुद्धा म्हणत होती
किती आठवावा नव्याने
तुझा हळवा पाऊस
राहा माझ्या जवळी
दूर नको जाऊस
तुझ्या आठवणी भिजवतात
तुझ्यातच मला रिजवतात
सांगू कसे मी साजना
बाहेर बेधुंद पाऊस
आणि तुझ्या विरहाच्या यातना
असा हा मन आणि शरीर दोन्ही चिंब भिजवणारा प्रवास त्या दोघांचा चालू होता. संध्याकाळ उलटून गेली होती, आणि रात्र वर चढत होती, मात्र पाऊस थांबत नव्हता, जणू काही अपूर्ण इच्छा राहिली असेल त्याची, जणू काही दुःख दाटले त्याच्या मनी... असा तो अविरत कोसळत होता... आणि अचानक...
समिधाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती, हॉस्पिटलमध्ये होती, तिच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाले होते, डोक्याला थोडासा मार लागला होता, तिची आई तिच्याजवळ होती... तिने समिहानबद्दल विचारले...
आज पूर्ण तीन वर्षे झाली त्या घटनेला, त्या पावसाळी रात्री त्यांच्या गाडीला जोराचा अपघात झाला होता, अपघात इतका विचित्र होता की, गाडीचा चक्काचूर झाला होता, समिधा बाहेर फेकली गेल्यामुळे वाचली होती, पण समिहान... जागीच...
तेव्हापासून हा पाऊस समिधाला नकोस वाटत होता, "काय झाले असते जर आम्ही थांबलो असतो, का त्याने माझे ऐकले नाही... जर हा पाऊस पडलाच नसता तर..." ती आपल्या मनाशीच बोलत होती आणि तिच्या सर्वांत प्रिय पावसाला बोल लावत होती. मात्र तिला हे कळात नव्हते, हा तर निसर्ग... तो त्याचे काम करणारंच, जर माणसाने आपल्या स्वतःवर नियंत्रण नाही मिळवले तर असेच होणार...
समिधा जागेवरून उठली, तिने खिडक्या बंद केल्या, आणि पुन्हा तीच वही काढली, आणि लिहिल्या ह्या ओळी...
संपले सगळे काही क्षणांत
आठवण उरली फक्त मनात
क्रूर, निष्ठुर, आणि निर्दयी
काय म्हणू तुला हे पावसा
दुसऱ्यास छळणे, तुझ्याच ठायी
माझ्या जीवनाचा बेरंग झाला असा
जा आता पुन्हा नको येऊस
त्याला तर दूर नेले
त्याच्या आठवणी नको नेऊस
त्याच्या आठवणी नको नेऊस...