तुझ्यानंतर
तुझ्यानंतर
तुझं माझ्या आयुष्यात येणं ही गोष्ट पूर्णपणे माझ्या कल्पने पलीकडची होती. अनपेक्षित होती. सुरुवातीला या गोष्टी नकोशा वाटत होत्या, उगाच डोक्याला त्रास. कदाचित मागच्या 1- 2 वर्षीपासून एकटं राहण्याच्या सवयी मुळे . काही ठराविक व्यक्तींचा सहवास सोडला तर जास्त लोकांची गर्दी मुळीच आवडत नव्हती. असो, दिवस सरत गेले, आणि तुझा सहवास आवडू लागला. तासन् तास बोलण एकत्र कॉलेजला जाण. तुझ्याशी भावनिक आणि मानसिक रित्या जोडलो गेलो. माझ्या जवळच्या व्यक्ती मधील तू एक झालीस. एक वेळ तर अशी आली की, एक दिवस असा गेला नसेल की मी -तुला किंवा तु- मला कॉल केला नसेल. सगळं कसे आनंदात चाललं होत. पण कदाचित सुख जवळ आलं की दुःख बाहेर वाट बघतच असाव. अचानक तू बोलायचं बंद केलंस दु:खाचा डोंगर कोसळल्यासारखं वाटू लागलं. मन कारण शोधू लागल, माझ चूकल तरी कुठं?तुझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न केला पण तू म्हणालीस, "होत कधी-कधी बोलायला काही नसल्यावर, अस वेड्या सारख विचार नको करत जावू".मेंदूला तर पटलं हे बोलणं, पण मन प्रतिकार करू लागल. त्या शेवटच्या कॉल नंतर कित्येक रात्री उघड्या डोळ्यांनी निघून गेल्या. काही दिवस जेवणावरून मन उडून गेले. उठता-बसता जेवता - झोपता फक्त तू आणि तूच डोक्यात. कॉलेजमध्ये मला सोडून माझ्या मित्रांसोबत हसून बोलण मनाला खूप वेदना देत होतं. कित्येकदा अश्रू वाहिले. एकांत जास्त आवडू लागला. जाब विचारावासा वाटत होता, का तू असं केलंस एकदा भेटून सांगायच होतस, तुझ्या काही गोष्टी बदल, त्रास होतो मला याचा. बदललो असतो तुझ्यासाठी. नको नको त्या गोष्टींचा विचार मनाने केला. मग समजल, विरहानंतर लोक वेडी का होतात. गमभरे स्टेटस टाकून लोक का व्यक्त होतात. सुरुवातीला या लोकांचा राग खुप यायचा पण आता मी त्यांच्यातला एक झालो होतो. सगळ कस बदलल्या सारख वाटत होत.
रात्रीचा बराच वेळ तिच्याच विचारात जात होता . जस की, भेटल असेल कोणीतरी आपल्यापेक्षा चांगलं, आता कशाला विचारतील लोक आपल्याला वगैरे. खूप सारे असले विचार आले. लेक्चर चालू असताना सुद्धा तिझ्याच विचारात. बरेच emotional song ऐकले. देवदास झालो होतो पूर्ण. या सगळ्यामुळे कॉलेजकडे लक्ष दिल नाही आणि 3 विषय बैकलॉग ला पडले. तरी पण काहीच फरक पडेना. नंतर अनेक मित्रांनी समजावून सांगितल, पण वास्तव स्विकारायची तयारीच नव्हती.दररोज त्याच रस्त्याने जायचो, कोणाचाही फोन आला तरी तिझाच आहे अस वाटायचं.पण मान्य तर करावं लागणार होतं. अजूनही हातात वेळ होती. थोड़ा त्रास झाला पण स्विकारलं वास्तव. कॉलेज दररोज करायला लागलो, लायब्ररी जॉईन केली. अभ्यासात आनंद मिळू लागला. एकांताचा असा पण फायदा होतो हे कळायला बराच उशीर झाला होता.
या सगळ्यात एक गोष्ट समजली की कोणत्याही व्यक्तीला जवळ करताना विचार केला पाहिजे. आपण कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि नंतर त्याचा पश्चात्ताप होतो. कोणत्याही व्यक्तीकडून जास्त अपेक्षा करू नयेत. कारण अनेकदा अपेक्षांचा भंग होतो. अपेक्षा भंग झाला की दु:ख निश्चित वाट्याला येतच. मला याचा त्रास जास्त होत होता कदाचित मी मनाने खूप हळवा आणि डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवणारा माझा स्वभाव होता. पण आता तिचे खुप आभार मानावेसे वाटतात. ती सोडून गेल्यावर फक्त पुस्तकांना जवळ केल मी. अभ्यासात चांगली सुधारणा झाली, महत्त्वाच म्हणजे वास्तव पहायला शिकलो.
तरुण मुलांना पाहिलं की वाईट वाटत. या गोष्टी आजच्या तरुण पिढीला समजणे, खूपच गरजेच आहे. त्यातल्या त्यात प्रेम कळायला हवं. अनेकजण मुलींचा नकार मिळाला म्हणून त्यांच आयुष्य खराब करतात. प्रत्येकजण आपल्या जागी योग्य असतो, फक्त समजून घेणे गरजेचे आहे. कोणी सोडून गेल्याने आयुष्य संपत नाही. हा पण चालायच थांबवल की, नक्की संपत. त्यामुळे कधी थांबायच नाही. किती ही मोठे संकट असल तरी. मग कोणी सोबत असू किंवा नसो.
