STORYMIRROR

Sunny Kumbhar

Inspirational

2  

Sunny Kumbhar

Inspirational

तुझ्या माझ्या संसाराला आणी काय हवं ?

तुझ्या माझ्या संसाराला आणी काय हवं ?

3 mins
122

  मला एक मराठी गाणे खूप आवडते. लहानपणी खूप वेळा ऐकायला मिळायचे - "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं नव्या घरामंदी काय नवीन घडंल घरकुलासंग समदं येगळं होईल दिस जातील, दिस येतील भोग सरंल, सुख येईल.."  जसे बालपण संपून गेले तसे या गाण्यामधील भावार्थ समजून आले. लहानपण संपते, शिक्षण संपते मग नोकरी त्यानंतर वयाने तसेच मनाने परिपक्व झाल्यानंतर लग्न होऊन संसार चालू होतो. त्यानंतर वेध लागतो तो मुलांना जन्म देण्याचा. हे सगळे कार्यचक्र घडत असताना मग दोघांनाही वेध लागतात ते आपल्या स्वतःच्या हक्काच्या घराचे. त्यासाठी ते दोघे खूप काटकसर करून बचत केलेले पैसे नवीन घरासाठी वापरतात. त्यांचे हे स्वप्नसुद्धा पूर्ण होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ते अगदी आनंदी जीवन जगत असतात. घराचा हप्ता, मुलांचे शिक्षण इत्यादीसाठी पैशांची जुळाजुळव चालू होते. काहीपण करून पैशांची जमवा जमव करून ते हफ्ते फेडत असतात. आता मला सांगा हे सर्व करत असताना ते दोघे आपल्या आरोग्याची काळजी घेत असतील का? मी तर असे म्हणेन की, सर्व लोक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतच असतील असे नाही. मला हे प्रत्यक्षात दिसते आणि जाणवते की, पहाटे मी जेव्हा व्यायाम करण्यासाठी जात असतो तेव्हा वयस्कर लोकंच व्यायामासाठी तसेच चालण्यासाठी येत असतात. अगदी क्वचितच युवावर्ग दिसत असतो. हे वयस्कर लोक मला अगदी टवटवीत आणि आरोग्यदायी वाटत असतात. अशा पहाटे अनमोल वेळेला बरेचसे लोक बिछान्यात असतात याचे खूप वाईट वाटते. सध्या मोबाईलमुळे लोकं वेडी झाली आहेत. मध्यरात्री पर्यंत मोबाईल बघत झोपून जातात आणि सकाळी ७ किंवा ८ वाजेपर्यंत बिछान्यात पडून असतात. उठल्यानंतर सुद्धा ही लोकं पूर्णपणे आळशी वाटतात. मग सांगा वाचक हो, अशा नित्य क्रमामुळे शरीराची तसेच आरोग्याची हेळसांड होईल की नाही? सध्या नवनवीन रोगांमुळे सर्व विश्व हैराण झाले आहे. अशा रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पहाटे उठून व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.            

 सर्वात श्रीमंत कोण? ज्याच्या जवळ घर, गाडी, पैसा आणि बंगला आहे तो का? आपल्या सर्वांची व्याख्याच अशी आहे की, हे सर्व ज्याच्या जवळ आहे तोच सर्वात श्रीमंत आणि भाग्यवान आहे. पण हे सत्य आहे का? वाचक राजा आपण येथेच चुकतो. हे सर्व असलेले कित्येक लोक सध्या ताण तणावात आपले आयुष्य जगत आहेत. अशा ताण तणावातून आरोग्य पूर्णपणे उध्वस्त होत आहे. जे रोग पूर्वी पन्नाशी नंतर होत होते, जसे की - बी.पी, मधुमेह, लकवा आणि इतर रोगांनी सध्या आजच्या युवा वर्गाला ग्रासत आहेत. त्याचे कारण सुद्धा स्पष्ट आहे की, पूर्वीचे लोक उत्तम आरोग्यदायक आहार घ्यायचे तसेच त्या जोडीला कष्ट तसेच व्यायाम होता.             

निरोगी मन बनवायचे असेल तर प्रथम आपल्या शरीरावर कार्य केले पाहिजे. ज्याचे शरीर चांगले त्याचे मन सुद्धा चांगले आणि निरोगी असते. त्यासाठी रात्री १० ते १०.३० वाजेपर्यंत झोपून पहाटे ५ ते ५.३० वाजेपर्यंत उठायला हवे. त्यानंतर नित्यक्रम आटोपून निसर्गाच्या सानिध्यात जायला हवे. ही सकाळची वेळ पूर्ण ऑक्सिजनने पुरेपूर असते. ज्याला धावता येते त्याने धावले पाहिजे, ज्याला धावता येत नाही त्याने चालले पाहिजे, आणि ज्याला चालताच येत नाही त्याने प्राणायाम तसेच ध्यान धारणा केली पाहिजे. असे केल्याने आरोग्य एकदम ठणठणीत राहील आणि भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांपासून मुक्ती होईल.            

जेव्हा ताण तणावामुळे तसेच व्याधीमुळे शरीर थकून जाईल त्यावेळी मग ऑपरेशनसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतील आणि जेव्हा बचत केलेली रक्कमसुद्धा कमी पडेल तेव्हा जे घर घेतले होते, ते विकावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून मी म्हणतो की, हे सगळे जर टाळायचे असेल तर मग नियमित पहाटे व्यायाम केला पाहिजे. म्हणून तर मी म्हणेन की, "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? तर त्याला व्यायामाची जोड हवी."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational