त्रास देऊ नका कोणाला
त्रास देऊ नका कोणाला
माणूस जेव्हा कोणत्याही नात्यात आपला अभिमान, आपला अहंकार मोठा करतो, तेव्हा तो दुसऱ्याच्या मनाचा विचार करणे थांबवतो. त्यातूनच मी म्हणेन तेच खरे आणि मी म्हणेन तसेच व्हायला पाहिजे हा अट्टाहास जन्माला येतो. जोवर समोरचा माणूस तुमचे ऐकतो, तोवर सगळे ठीक असते. पण त्याने ऐकले नाही की अहंकाराला ठेच पोचते. मग समोरच्याने आपले ऐकावे ह्यासाठी त्याला त्रास देणे सुरू होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कित्येक वेळा, तुझ्याच भल्यासाठी बोलतोय, असे म्हणून आपल्या अहंकारावर पडदा टाकला जातो. कधी कधी ते खरे असते, पण बहुतांश वेळा नाही. असे दुसऱ्याला त्रास देताना त्याला शारीरिक व मानसिक दोन्ही क्लेश होत असतात, हे त्रास देणारा पूर्णपणे विसरून जातो. मानसिक त्रासाचे तर दुःख हे बाळंतिणीच्या कळांएवढे कधी कधी तीव्र असते, असे शास्त्रज्ञ सांगतात.
दुसऱ्यांना त्रास देऊन माणसे घरातले, ऑफिसमधले किंवा इतरत्र कुठेही असो, तिथले वातावरण गढूळ करून टाकतो. त्या ठिकाणी आनंद हरवून जातो. जो त्रास देतो त्याला कवचित कधीतरी आनंद मिळतो, पण तो आपला अहंकार कुरवळल्याचा आनंद असतो; मनातील खरा आनंद नव्हे.
जो त्रास सहन करतो त्याच्या मनात अनेक नकारात्मक भावना उत्पन्न होतात, जसे की दुःख, राग, द्वेष, कमीपणा, न्यूनगंड, नैराश्य इत्यादी. ह्यातून बाहेर पडणे त्या व्यक्तीला अवघड जाऊ शकते. कित्येकदा कायमस्वरूपी मानसिक आजार होण्याची शक्यता असते. कधी कधी ह्यातून आत्महत्येसारख्या टोकाच्या घटनाही घडतात. त्यातून त्या व्यक्तीचे पूर्ण कुटुंब उध्वस्त होऊ शकते. तेव्हा कोणीही कोणालाही त्रास देऊ नये.
अध्यात्मिक दृष्ट्या बघितले तर अशा प्रत्येक कृतीतून तुम्ही दुसऱ्याला त्रास देऊन आपलेच पाप वाढवत आहात, ह्याची जाणीव ठेवावी माणसाने. शेवटी काय हो, स्वर्ग उपभोग आणि नरक यातना ह्या दोन्ही इथे पृथ्वीवरच आपल्या वागण्याने माणूस भोगतो, हे आजूबाजूला बघून लक्षात येतेच. जे आहे त्याचा हिशोब आज ना उद्या तुम्हाला द्यावा लागणारच. मग दुसऱ्या कोणाला त्रास देऊन पापाचा आलेख न वाढवता, दुसऱ्यांची मने जपून, त्यांना आनंद देऊन पुण्याचा साठा वाढवूया.
