तो कुठे असेल?
तो कुठे असेल?


सुजाताला नुकताच गव्हर्नमेंट जॉब मिळाला होता. नवीन नवीन जॉब ,नवे रक्त, नवा उत्साह! ती रोज छानपैकी तयार होऊन, ऑटोरिक्षाने ऑफीसला जायची. .ऑफीस समोर जिथे ऑटोरिक्षा थांबायची, तिथेच तो तिला दिसायचा. कधी डावीकडे असलेल्या ,भल्यामोठ्या कडुनिंबाच्या झाडाखाली, तर कधी उजवीकडे असलेल्या गजुच्या चहाच्या टपरीवर. ऑटोरिक्षा थांबली, की त्याचे पैसे देऊन होत नाहीत तोच ती झटक्याने मान वळवून घाईत ऑफिसमध्ये जायला निघायची ,आणि तो समोर दृष्टीस पडायचा. असे कितीतरी दिवस चालले. बरेचदा तिला इच्छा व्हायची की, त्याच्या जवळ जावं, कमीत कमी त्याला नाव तरी विचारावं. पण हिम्मत होत नव्हती. चहाच्या टपरीचा गजू , ऑफिसमध्ये चहा आणायचा. तिला वाटलं विचारावे का याला - - - ?त्याच्याबद्दल - - - काहीतरी - - ? पण पुन्हा विचार करी," गजू काय म्हणेल ., त्या दिवशी सुजाता, अशीच ऑटोरिक्षातून उतरली.
समोरचे दृश्य बघुन अक्षरशः हादरली. तिला भयानक किळस अली आणि दुसऱ्याक्षणी कीव सुध्दा -! तो रस्त्यावर पडलेली ,मातीने भरलेली ब्रेड उचलुन खत होता. नेहमी शांतपणे झाडाखाली असलेला तो,आज भयानक रागात दिसत होता. सुजाता हे, बघुन बावरली, हे गजुने हेरले. " मॅडम, आज त्याला खायला काही मिळाले नसेल, म्हणून असा चिडला तो . घरी गेलो की ,आणतो त्याच्यासाठी काहीतरी."गाजूने भरलेले चहाचे ग्लास उचलले आणि तो निघून गेला. गजू भला मुलगा होता. बरेचदा तो त्याला चहा दयायचा. खायला काहीतरी दयायचा. सुजाता ऑफिसमध्ये गेली. दुसऱ्या दिवसापासून सुजाता रोज पेपर मध्ये गुंडाळून त्याच्या साठी काहीतरी आणत होती. लोक काय म्हणतील याची ती पर्वा करत नसे. तो कधी बाकाबका खात असे, तर कधी ते अन्न सुजाताच्या समोर रस्त्यावर फेकून देत असे. सुजातापेक्षा सिनियर असलेल्या राधिका मॅडम तिला एक दिवस म्हणतात,"काय ग, सुजाता एखाद्या हॅन्डसम तरुणाच्या प्रेमात पडायच्या वयातच, या वेडपट म्हताऱ्याच्या काय नादी लागतेस ?" सुजाताला, राधिका मॅडमचा रोख लक्षात येई. ती हसुन म्हणे,"असा ,कोणी भेटला तर, नक्की विचार करेल " सुजाता बरोबर, राधिका मॅडम सुध्दा त्याच्यासाठी काहीतरी आणत होत्या.
पावसाळ्याचे दिवस होते. वरून पडणाऱ्या सततधार पावसात तो ,पूर्णपणे ओलाचिंब झाला होता. पाय पोटाशी घेऊन ,मान खाली घालुन बसला होता. ऑफिस सुटल्यावर सुजाताने बघितले, तो अजुनही त्याच स्थितीत होता. तिने सकाळी दिलेली भाजी पोळी ,भिजून ओलीचिंब झाली होती. सुजाताला वाटले ,दिवसभर ,पावसात भिजून नक्की आजारी पडेल. दुसऱ्या दिवशी ती, त्याच्या साठी रेनकोट आणते. तो गजुच्या चहा टपरीवर चहा पित होता. कालच्या पावसाचा काहीच असर झाला नव्हता. ती त्याला रेनकोट देते. आज पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दिसतात. तो नम्रपणे हात जोडतो आणि रेनकोट घेवून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो तिथे दिसत नाही. सुजाताला वाटते गेला असेल इथेच कुठे येईल उद्या. चार पाच दिवस होतात .पण त्याचा पत्ताच नाही. रविवारी ती एकटीच शहरभर त्याला शोधते. पण नाही सापडत. सोमवारी गजू ऑफिसमध्ये चहा घेवून येतो त्याला विचारते .गजू म्हणतो," या अशा माणसांचं काही खरं असतं का मॅडम. गेला असेल भटकत भटकत कुठेतरी. दिसलं असेल असच एखाद झाडं .रमला असेल तिथेच ". चार वर्षानी सुजाताची बदली दुसऱ्या ऑफिसमध्ये होते. तिचे लग्न होते. एका मुलीची आई होते. पण तरीही कामानिमित्त त्या जुन्या ऑफिसमध्ये आली की ,तिचे डोळे त्याला त्या झाडाखाली शोधतात .कुठे गेला असेल?काय करत असेल ? हा विचार तिच्या मनात येतोच.