Asmii's Blogs

Inspirational

3  

Asmii's Blogs

Inspirational

तिची बकेटलिस्ट

तिची बकेटलिस्ट

3 mins
286


तिला रोज तिच्या डायरीमध्ये तिच्या इच्छांची किंवा हव्या असलेल्या गोष्टींची यादी लिहायची सवय होती, अगदी मग त्या आयुष्यात हव्या असणाऱ्या खूप मोठ्या गोष्टीही असोत किंवा अगदी लहान लहान गोष्टीसुद्धा. आताशा ती रोजच अशी यादी करायला लागली होती १, २, ३,......असे. जी इच्छा पूर्ण झाली ती लगेच खोडायची. बकेट लिस्टच म्हणा ना....


त्या यादीमध्ये बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असायच्या, जसे की आज मला वडापाव खायची इच्छा आहे, आज शॉपिंगला जावंसं वाटतंय, आज स्वयंपाकात एखादा नवीन पदार्थ बनवावा, आज ऑफिस काम पूर्ण व्हावे..... ई. किंवा काही मोठ्या गोष्टीही असायच्या उदा. स्वतःचा फ्लॅट घ्यायचंय, परदेशवारी करायची, स्वयंपाकात सुगरण बनायचं आहे...ई.


तिला अलीकडे अनुभव यायला लागला होता की अशाप्रकारे लिहून ठेवल्याने गोष्टी खरंच उशिरा का असेना पण पूर्ण होतात नक्की. छंदच जडला होता तिला, रोज रात्री सगळं आवरून झाल्यावर डायरी लिहायची, येणाऱ्या दिवसासाठी.


अशीच एकदा रविवारची सकाळ उगवली. नेहमीप्रमाणे उठून आवरायला घेतलं. बाथरूममध्ये जाऊन बघते तर काय पाणी काढलेलं, तिचा टॉवेल, ड्रेस सगळं काही जागच्या जागी ठेवलेले दिसले. अरेच्चा! असं कसं झालं? असो, अंघोळ उरकून किचनमध्ये आली. तर आज चक्क नवरा नाश्ता बनवताना दिसला, म्हणाला, “तू बस डायनिंग टेबलवर मी आलोच नाश्ता आणि चहा घेऊन...” तिला कळेना याला झालंय काय, गालातल्या गालात हसली, स्वारींना आज कुकिंग करायची हौस आली असावी!


गरम गरम आयते पोहे आणि चहाचा आस्वाद घेतला. चला आता बास, लागा कामाला, स्वयंपाक काय करायचा? आज रविवार चारी ठाव आणि काहीतरी स्पेशल करायला हवं.... विचार करतच होती, तितक्यात नवरा म्हणाला, “अशी उभी काय आहेस,जा बागेतल्या झोपाळ्यावर तुझं आवडत पुस्तक ठेवलंय, वाचत बैस. आज स्वयंपाक घरी नाही करायचा, मी बाहेरून मागवतो. आणि त्यानंतर थोडा आराम कर, मी नाटकाची तिकीटं बुक केली कालच, तुला नाटक बघायला खूप आवडतं ना! मस्तपैकी वनपिस घाल, तिथून आपण तिघेही परीला घेऊन बागेत फिरायला जाऊ आणि डिनर पण बाहेरच घेऊ...“ तिच्या भुवया हे ऐकून उंचवल्याच.


ती म्हणाली, “अरे पण तुला बाहेरचं खायला आवडत नाही ना, त्यात काय बनवते ना घरीच...”


तो, “मला बाहेरचं आवडत नाही म्हणून काय झालं तुला मात्र रविवारी आराम हवा असतो ना, रोज करतेय ना घरी, तुझ्यासाठी मी एवढं नाही करू शकत?”


तेवढ्यात तिची चिमुकली आली तिकडून धावत, “मम्माsss, बघ! मी माझा होमवर्क केला आणि आज तू नाही हं मला भरवायचं, मी माझ्या हाताने एकटी जेवणार आहे, मी मोठी झाली आता, तुला नाही त्रास देणार...” तिच्या चिमुकलीकडे कौतुकाने पाहत म्हणाली, “अगं बाई! आज सूर्य कुठे उगवला आहे, मम्माला आज पप्पांनी आणि परीने surprise वर surprises द्यायचं ठरवलं की काय...”


परी, “हो, पप्पांनी आणि मी मिळून दर रविवारी तुला आराम द्यायचं ठरवलं...” 


हे ऐकून एकदम तिला आठवलं की कधीतरी आपण आपल्या डायरीमध्ये लिहिलं होतं, “सोम ते शनी पूर्ण धावपळीत जातात निदान रविवार तरी पूर्ण आरामात घालवावा आणि आपल्या सगळ्या आवडत्या गोष्टीच कराव्यात...”


आठवून एकदम नवऱ्याकडे बघितलं, तर तो मिश्कीलपणे हसत होता, “याचा अर्थ तू....???”


“होय, मी तुझी डायरी वाचली, मला माफ कर, पण वेडी, संसार काय फक्त तुझ्या एकटीचा आहे का? आपल्या दोघांचा आहे ना, मग तुझ्या इच्छा, तुझी स्वप्नं अशी डायरीमध्ये का लिहून ठेवायची गरज पडते? आमच्या सगळ्यांचं करतेस आनंदाने, आम्हालाही कधीतरी कळू दे तुला काय हवं आहे ते, मान्य आहे मला, गृहीत धरलं तुला, चूक झाली पण आता इथून पुढे नाही, आजपासून तुझी सगळी स्वप्नं ही माझीदेखील आहेत आणि मीही ती तुझ्यासाठी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.” ऐकून डोळ्यात पाणीच आलं....!! 


सारे काही हसत सुखी संसारासाठी केले,

परी मनामध्ये बरीच गोड गुपितं दडलेले!

सगळ्या रंगांनी होते आयुष्य भरलेले

त्या सात रंगांशिवाय नभी पुरून उरलेले

आज मात्र तिला आकाश ठेंगणे झाले 

आणि आयुष्यात इंद्रधनुष्य उमटले!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational