Ramesh Dongare

Tragedy Inspirational

4.2  

Ramesh Dongare

Tragedy Inspirational

तेजस्विनी

तेजस्विनी

5 mins
451


आज सकाळपासूनच मन अस्वस्थ होतं. कारण तसं काहीच नव्हतं. पण मन कशातच रमत नव्हतं.संध्याकाळ झाल्यावर मोकळ्या हवेत फिरून यावं म्हणून बाहेर पडलो पण कुठे जावं याचा विचार होत नव्हता. पाय नेतील तिकडं जात होतो.विचारांच्या तंद्रीत मी शहराबाहेर होऊ घातलेल्या उपनगरात केव्हा येऊन पोहोचलो हे माझे मलाच समजले नाही. तेवढ्यात “काका मला ओळखलत का? मी केतकी. माझ्या समोर एक किंचित सावळी, शिडशिडीत बांध्याची साधारणपणे चाळीस वर्षाची स्त्री उभी होती. बोलके डोळे, हसतमुख चेहरा, लांबसडक काळ्या केसांची वेणी घातलेली, ती माझ्या मित्राची मुलगी होती. ती नुकतीच कामावरून येत असावी असं तिच्या एकूण पेहरावावरून दिसत होती. काका घरी चला.इथं जवळच मी रहाते. तुमच्याशी खूप गप्पा मारावयाच्या आहेत. ती मला खूप वर्षानंतर भेटत होती. मी, ही तिचं कसं चाललं आहे हे जाणून घ्यायला उत्सुक होतो.


आज्ञाधारकासारखा मी तिच्या मागोमाग चालू लागलो. तेथून काही पावलं चालल्यानंतर तिचा फ्लॅट असलेल्या अपार्टमेंट मध्ये आम्ही पोहोचलो. डोअरबेल वाजल्यानंतर पंधरा सोळा वर्षाच्या मुलीनं दार उघडलं. तिनं माझ्याशी आपल्या मुलीची ओळख करून दिली. यंदा तिचं 10 वी चं आहे.बोर्डात आली तर ती मुलीला बाईक घेऊन देणार आहे असं तिने सागितलं. “काका आरामशीर बसा, मी थोडं आवरून तुमच्यासाठी चहा घेऊन येते.” अस सांगून ती किचनमध्ये गेली.


हॉल उत्कृष्ट प्रकारे सजविलेला होता. केतकीने स्वतःतयार केलेली सुंदर पेंन्टींग्ज भितीवर लटकत होती. समोरील काचेच्या कपाटात केतकीस लहानपणापासून मिळालेली मिड्ल्स-कप- ट्रॉफीज व्यवस्थित डेकोरेट करून ठेवलेल्या दिसत होत्या.दोन फोटोही होते. एका फोटोत केतकी आणि तिची मुलगी तर दुसऱ्या फोटोत केतकीला “आदर्श माता” म्हणून स्मृतीचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांनी गौरव केल्याच्या प्रसंगाचा होता.हा फोटो व बातमी पेपर मध्ये छापून आलेली बातमी मी वाचली होती.


केतकीचे वडिलाना भाऊ म्हणत. ते व मी चांगले मित्र होतो. एकाच चाळीत शेजारीशेजारी रहात असल्याने दोन्ही कुटुंबात घरोबा होता. दोन्ही घरातील संबंध चांगले जिव्हाळ्याचे होते. दोन्ही घरातील लहानसहान बातम्या एकमेकांपासून लपून रहात नसत. केतकीचे लहानपणापासूनच आमच्या घरात येणे जाणे होते. अभ्यासात व खेळात तिने अनेक बक्षीसे मिळविली होती. बक्षिस मिळालं की ती सर्व प्रथम आम्हाला दाखवायला आणायची. मग मी चॉकलेट, पेन पेन्सिल देऊन तिचे कौतुक केलं की खूप आंनदून जाई.


अभ्यासात 10 वी पर्यत तिनं पहिला नंबर सोडला नाही.12 वी नंतर तिने सायन्सला अँडमिशन घेतली.काँलेज मध्ये असताना पुरूषोत्तम करंडाच्या एकांकिकेमध्ये तिला उत्कृष्ट अभिनयाचं प्रथम पारितोषिक तेंव्हा मलाही खूप आनंद झाला होता. बघता बघता ही चुणचुणीत हासरी, लाजरी केतकी MSc प्रथम वर्गात चांगल्या गुणानी उत्तीर्ण झाली. एके दिवशी भाऊ सांगू लागले केतकीचं लग्न ठरलं असून जावई एमडी आहे. तो नाशिकला प्रॅक्टिस करत असून त्याचा स्वतःचा दवाखाना आहे. केतकी साठी एवढं मोठं स्थळ मला चक्रावून टाकणारं होतं. कारण दोन्ही घरांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये जमीन अस्मानाचं अंतर होतं. भाऊनी केतकीचे लग्न नाशिकला मोठ्या थाटात करून दिलं. मुलीने नशीब काढलं म्हणून भाऊंच्या कुटुंबाइतकाच आम्हालाही आनंद झाला होता.


पहिलं वर्ष चांगल गेलं. दुसऱ्या वर्षापासून केतकी नाशिकहून घरी आली तरी आमच्याकडं क्वचितच यायची. काय बिघडलं असावं याचा अंदाज येत नव्हता. एक-दोनदा ती रस्त्यात दिसली पण तिचं पूर्वीचं हास्य मावळलं होतं. उसनं आवसान आणून ती हसण्याचा प्रयत्न करी. जणू ही आमची पूर्वीची केतकी नव्हतीच. दोन-तीन महिन्यानी घरी येऊन आठ, दहा दिवस राहून परत नाशिकला जात असे. घरी आली तरी घरातून बाहेर पडत नसे. एक दोन वेळा याबद्दल मी भाऊंकडे विषय काढला तेव्हा त्यानी उडवाउडवीची उत्तरे देऊन गप्प केलं. असेच सहा-सात महिने निघून गेले असतील. एक दिवशी भाऊ माझ्याकडे आले आणि म्हणाले रमेशराव उद्या नाशिकला याल काय? जावयाची समजूत काढायची आहे. त्यानं ऐकलं तर ठीक नाहीतर केतकीला परत घेऊन येऊ. मला कशाचाच बोध होत नव्हता.


दुसऱ्या दिवशी आम्ही नाशिकला निघालो. प्रवासात भाऊ सांगत होते. केतकीचा नवरा बाहेरख्याली आहे. लग्नाआधीपासूनचं त्यानं एक बाई ठेवली आहे. केवळ आईच्या हट्टासाठी आपण लग्न केलं असं म्हणतो. दररोज रात्री खूप उशिरा, घरी दारू पिऊन झिंगत येतो. तेव्हा त्याला अंगावरच्या कपड्याचीही शुद्ध नसते. दवाखान्याकडे त्याचे लक्ष नसल्यानं पेशंटही येत नाहीत. पन्नास लाखाचं बँकेकडून कर्ज काढून क्लिनिक सुरू केलं. पण कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने जप्ती आणली आहे. वडीलांकडून पैसे घेऊन ये म्हणत, त्यानं केतकीचा अनन्वीत मानसिक व शारीरीक छळ सुरू केला आहे. आपल्या मुलीनं खूप सोसलं. गेली दोन-तीन वर्षे ती आपल्या आईवडीलांना त्रास होऊ नये म्हणून सर्व अत्याचार सहन करत होती. आठ-दहा दिवसांपूर्वी केतकी घरी आली तेव्हा तिच्या नवऱ्याने पैसे आणल्याशिवाय इकडे येऊ नकोस नाहीतर हाकलून देईन असा दम भरला आहे. आपण नाशिकला येऊन जावईबापूंची समजूत काढू, असे सांगून भाऊंनी तिला परत पाठवलं होत. ”रमेशराव तो माणूस नाही हैवान आहे. तो तिला मारूनही टाकील.” भाऊ व्याकूळ होऊन सांगत होते. हे ऐकाल्यावर मी सुन्न झालो.


केतकी ही माझ्या मित्राची मुलगी असली तरी मी ही तिच्यावर आपल्या मुलीप्रमाणेच प्रेम करत होतो. नाशिकमधील एका प्रतिष्ठित मित्राच्या मध्यस्थीनं आम्ही तिला परत घेऊन आलो. झाल्या प्रकाराने ती खूपच खचून गेली होती. चार-पाच महिन्यानी थोडी सावरल्यावर तिनं नोकरीसाठी खटपट सुरू केली. केतकी जात्याच हुशार, चुणचुणीत असल्याने माझ्या ओळखीमुळे तिला एका कंपनीत नोकरी मिळाली. त्याचवेळी घटस्फोटासाठी कोर्टाच्या फेऱ्या चालू होत्या. त्यातच ती प्रसूत होऊन तिला मुलगी झाली व जगण्याला आधार मिळाला.


आता इथून पुढे तरी सर्व काही व्यवस्थित होईल असे वाटत असताना भाऊंचं अचानक निधन झालं. मी ही चाळीतील जागा सोडून दुसरीकडे फ्लॅटमध्ये रहावयास गेल्याने केतकीची खुशाली समजत नव्हती. एक दिवस रस्त्याने जाताना केतकीच्या आई दिसल्या. त्या ओढग्रस्त दिसत होत्या. केतकीने गावात फ्लॅट घेतल्याचे त्यांचेकडून कळाले तसंच त्यांनी एकदा मला घरी येऊन जाण्याची विनंती केली. केतकी माझी मानलेली मुलगी होती व तिच्या खुशालीची उत्सुकता मला चैन पडू देत नव्हती. एक दिवस मुद्दाम मी तिच्या आईला भेटायला गेलो. बराच वेळ झाला तरी त्या काही बोलल्या नाहीत. कदाचित कसं बोलावं, याची त्या मांडणी करीत असाव्यात. डोळ्यात पाणी आणून सांगू लागल्या, “केतकीचे भोग केव्हा संपणार हेच समजत नाही. तिच्या नशिबी सुख नाही हेच खरं”. तरणीताठी मुलगी मी तरी तिला किती दिवस पुरणार, म्हणून तिचं पुन्हा लग्न करून दिलं.


“काय झालं, मला नीट समजेल असे सांगाल का”? असं विचारल्यावर त्या सांगू लागल्या, पुण्यातील शास्त्रींचा मुलगा, चांगला शिकला सवरलेला. स्वतःचा व्यवसाय, बंगला, कार सर्व समृद्धी आहे पण सासू-सासरे केतकीचा छळ करतात. लग्न झाल्यावर सर्व नोकरांना कामावरून काढून टाकले. नवऱ्याच्या पहिल्या बायकोच्या दोन मुली आहेत. त्या मुलींचे लाड, कौतुक करतात. पण केतकीच्या मुलीचा दुस्वास करतात. नोकरी सांभाळून घरातलं मर मर काम करायचं पण प्रेमाचा एक शब्दही नाही. मुलाची आई-वडीलांसमोर बोलायची हिम्मत नाही. ते तिला मारहाणपण करतात. सासरे मोठे पुढारी आहेत म्हणे. त्यांना कोण समजवणार. शेवटी सर्व त्रासाला कंटाळून केतकीने बँकेचे कर्ज काढून हा गावात फ्लॅट घेतला आणि वेगळे राहू लागली. नवरा दोन-चार दिवसांनी येऊन जातो. केतकी म्हणते मी आता स्वतंत्र आहे. इथून पुढे कोणाची गुलामगिरी पत्करणार नाही. फावल्या वेळेत झोपडपट्टीतल्या बायकांना शिकवते. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महिला बचतवर्ग चालवते. स्वतःच्या मुलीला शिकवून डॉक्टर करण्याचा तिने ध्यास घेतलाय. तुम्ही तिला एकदा तिला भेटून धीर द्या. ती तुम्हाला भाऊंचे जागी मानते.


“काका, चहा घेताय ना, कोणत्या विचारात गुंग होतात? केतकीच्या हाकेने मी भानावर आलो.


निघताना तिनं मला वाकून नमस्कार केला. परत निघताना माझ्या डोळ्यांच्या कडा भिजून गेल्या. ती केतकी नव्हती तर अफाट धैर्याची “मूर्तीमंत तेजस्विनी“ होती व तिच्या तेजाच्या प्रकाशात मी न्हाऊन निघालो होतो. परिस्थितीशी झगडण्याचं सामर्थ्य तिनंच मला दिलं होतं. सकाळपासून मनावर साठलेलं मळभ केव्हाच विरून गेलं होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy