स्वप्नार्थ !!
स्वप्नार्थ !!


संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. दिवसभराची मार्गक्रमणा पूर्ण करून सूर्य पश्चिमेच्या खांद्यावरती विसावत होता. दिवसभर अविश्रांत धावपळ केलेला सूर्य असा पश्चिमेच्या खांद्यावर ती विसावलेला पाहून वातावरण ही पूर्ण सैलावले होते. संपूर्ण वातावरणात एक रक्तलालिमा भरून राहिलेला. पुरी सृष्टी त्यामध्ये न्हाऊन निघालेली. मैदानातल्या झाडांवर परतीचे पक्षी विश्रांत अवस्थेत आपापल्या फांद्यावर विसावलेले. काहींचा विनाकारण चिवचिवाट वातावरणातील शांतता भंग करत होता. अन त्या गोंधळात, मैदानावरती आपापल्या ग्रूप मध्ये, फुटबॉल आणि क्रिकेट चा डाव मांडलेले विद्यार्थी, अजूनच भर घालत होते.
कुणी चालण्याचा व्यायाम करत होते कुणी जिम च्या आरशात स्वताला न्याहाळत होते. दिवसभर कॉलेज मध्ये लेक्चर्स आणि प्रेक्टिकल करून कंटाळलेले काही जण, परीसरातल्याच विद्या गणपतीच्या मंदिरापुढच्या बेंचवर शांतपणे ध्यानधारणा लावून बसलेले. काही जण मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेले, काहीजण कानात इयर फोन लाऊन मोठमोठ्याने हातवारे करत गाण्याचा आनंद घेत होते. एखाद दुसरी बहुचर्चित जोडी बागेच्या हिरवळीवर भविष्याचा आढावा घेत बसलेली तर कॉलेज हॉस्टेल च्या उपाहारगृहात काहीनी चहा कॉफी सह आपली गप्पांची मैफिल जमवलेली. आणि अशा सांज कातर वातावरणात, प्रत्येकजण आपापल्या प्रकारे व्यस्त असताना, बागेच्या एका कोपऱ्यात एका झाडाखाली, एकाकी बाकड्यावर, अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे एकटक बघत, कपिल स्वताच्याच विचारामध्ये बुडून गेला होता.
कपिल ! एका सुखवस्तू घरातला एकुलता एक मुलगा ! खूप हुशार आणि एकपाठी. एकदा केलेला अभ्यास त्याला परत करावा लागत नसे. एकुलता एक असल्यामुळे लहानपणापासून अगदी लाडाकोडात वाढलेला. घरी आई आणि वडील दोघेही एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. शिक्षकांचा मुलगा म्हणून प्रत्येक इयत्तेत त्याच्याकडे जरा जास्तच लक्ष दिलं गेलं होतं. स्वताची उपजत बुध्दी आणि इतर साऱ्या शिक्षकांचे अधिकचे मिळणारे मार्गदर्शन यामुळे कपिलने शाळेत पहिला दुसरा नंबर कधीच सोडला नव्हता. अगदी दहावीला बोर्डाच्या परीक्षेत सुध्दा तो तालुक्यात सर्वप्रथम आला होता. दहावी झाल्यानंतर जसे सगळेच विद्यार्थी भविष्यातल्या स्वप्नरंजनामध्ये बुडून जातात तसाच कपिल ही भविष्याची स्वप्ने पाहू लागला होता. त्याच्या डोळ्यासमोरून त्याने पाहिलेल्या स्वप्नांचा चित्रपट हळूहळू पूढे सरकत होता. बुडत्या सूर्याकडे एकटक पहात तो त्याचं विचारामध्ये स्वताला विसरून गेला होता. आणि इतक्यात,
" कपिल का रे ? एकटाच का असा बसलायस ? "
कपिल ने दचकून मागे पाहिले. बाकड्याच्या पाठीमागे कठड्यावर हात ठेवून कुंभार सर उभे होते. विचारामध्ये हरवून गेलेला कपिल भानावरती आला. किती वेळ तो असाच विचारात होता कोण जाणे. सुर्यास्त केंव्हाच झाला होता. हॉस्टेल च्या जवळजवळ सगळ्या खोल्या प्रकाशाने उजळून निघाल्या होत्या. बागेतले सोलर दिवे त्याच्या भोवती घोंगावणाऱ्या पतंगानी भरून गेले होते. मैदानावरचा क्रिकेटचा सामना संपवून मुले कधीच हातपाय धुवून जेवण्यासाठी मेस ला निघून गेली होती. कुंभार सरांचा आवाज ऐकताच कपिल गडबडीत उठून उभा राहिला आणि चाचरतच बोलला,
" नाही आपलं ..सर असच ..सहज .."
कुंभार सरांना त्याचा हा गोंधळ पाहून थोडं विचित्र वाटलं. त्यांनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि नजरेनेच त्याला बसायची सुचना केली. तेही त्याच बाकड्यावर त्याच्या शेजारी बसले,
" हे बघ, कपिल मी जवळ जवळ एक तासापासून तुला इथे बसलेला बघतोय. मी सायंकाळच्या वॉक साठी बाहेर पडून नंतर लायब्ररी मध्ये जाऊन पेपर वाचून आलो तरी सुध्दा तु इथेच ? ? काय झालय "
"नाही सर माझ्या लक्षात नाही आले किती वेळ झाला ते सॉरी सर "
कपिलला कधी एकदा इथून निघून जातोय असे वाटायला लागले. आपल्याला आपल्या नकळत सर मघापासून बघताहेत हे समजून त्याला अपराधी असल्यासारखे वाटू लागले. खाली मान घालून हातात असलेल्या गवताच्या काडीशी तो नुसताच चाळा करत बसला.
" हे बघ कपिल, मी नुसता चेहरा पाहून विद्यार्थी वाचतो हे तर तुला आतापर्यंत समजलेच असेल माझ्यापासून कुणीच विद्यार्थी आपल्या भावना लपवू शकत नाही. तुम्ही घरापासून पहिल्यांदाच इतक्या लांब शिक्षणासाठी आलेले असता आम्ही शिक्षकच आता इथे तुमचे पालक असतो. सांग मला काय झालय? तुला हे कॉलेज आवडलेले नाही का ? तुला घरची आई वडिलांची आठवण येतेय का ? "
" नाही सर खरच तसं काही नाही"
" मग तुझ्या चेहऱ्यावर मला तो नवीन कॉलेज ला आल्याचा आनंद का दिसत नाही ? तु कुणाशी बोलत नाहीस तु कुणामध्ये मिसळत नाहीस. असं का ? काय प्रॉब्लेम आहे ? मुलं त्रास देतायत का ? की घरी काही प्रॉब्लेम आहे ? "
सरांच्या प्रत्येक प्रश्नावरती तो नकारार्थी मान हलवत राहिला. एकदा मान वर करून त्यानं सरांच्याकडे पाहिलं पण ओठापर्यंत आलेले शब्द ओठातच राहिले. आपण काहीतरी बोललो आणि सरांना आवडले नाही तर ? त्यानं एक आवंढा गिळला आणि खाली मान घालून तो तसाच बसून राहिला.
" बर असुदे, तुला सांगायचे नसेल तर राहू दे पण जेवलायस का तु ? बघ रात्रीचे नऊ वाजत आलेत. चल लवकर जेवून घेऊ नाहीतर मेस बंद होतील आणि दोघांनाही उपाशी रहावे लागेल "
सरांनी त्याच्या खांद्यावरती थोपटले आणि त्याचा हात हातात घेवून त्यांनी त्याला उठवले. आणि ते मेस च्या दिशेने चालू लागले. कपिल यंत्रवतपणे उठला आणि सरांच्या मागे चालू लागला.
कुंभार सरांच्या बरोबर जेवण घ्यायचे य़ा विचारानेच त्याला अवघडल्यासारखे वाटायला लागले होते.
कुंभार सर, या कॉलेज मधले त्याचे सगळ्यात आवडते सर. आज फक्त तीनच महिने झाले होते त्याला या अभियांत्रिकी कॉलेज मध्ये येवून.
तसे हे मोठ्या शहरातील एक नामांकित खाजगी कॉलेज होते. पण अकरावी बारावी मध्ये कपिलने काही वेगळीच स्वप्ने बघितली होती. त्याला मेरीट वरती आय आय टी , एन आय टी सारख्या मोठ्या संस्थेमध्ये शिक्षण घ्यायचे होते.गेली दोन वर्ष तो या एकाच स्वप्नासाठी रात्रंदिवस झटत होता. त्याची बुध्दी आणि कष्ट करायची तयारी यामुळे सगळ्यांनाच वाटत होतं की त्याचं हे स्वप्नं नक्की पूर्ण होणार. पण बारावीचा निकाल लागला अन त्याचं हे स्वप्नं अगदी थोडक्या मार्कांच्या फरकाने खंडित झाले. चांगले कॉलेज मिळायचे तर ट्रेड चांगला नाही ट्रेड चांगला मिळाला तर कॉलेज मनासारखे नाही दोन्ही चांगले मिळाले तर ते सोयीचे नाही आणि ज्या कॉलेज ची स्वप्नं बघितली त्या कॉलेज ला प्रवेश मिळत नाही. शेवटी नाविलाजाने त्याला या खाजगी कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा लागला. गेले तीन महिने तो अजूनही त्या धक्यातून सावरला नव्हता. इतकी वर्षे उराशी बाळगलेले स्वप्नं असं अपूर्णतेत हातातून निसटलेले पाहून त्याला स्वताचाच राग येत होता.
"अरे कूठे हरवलास ? काय खाणार आहेस बोल ना . तुला काय ऑर्डर द्यायची ती दे. मी फक्त डाळ भात खाईन सध्या जरा डायट करतोय मी आता. वय झाले तब्येत सांभाळायला हवी ना "
सरांच्या गडगडाटी हास्याने तो विचारातून एकदम भानावरती आला. विचारा विचारातच ते केंव्हा मेसमध्ये येवून पोहोचले ते त्याचे त्यालाही कळाले नाही. जेवणात उगा जास्त वेळ जायला नको म्हणून त्यानेही कसेबसे डाळभातच ऑर्डर केला .संपूर्ण जेवण होईपर्यंत कुणीच कुणाशी बोलत नव्हते. कुंभार सर शांतपणे एकेक घास घेत कपिल चे निरीक्षण करत होते आणि त्यांची नजर चुकवत कपिल भराभर भाताचे गोळे घश्याखाली ढकलत होता. त्याच्या हाताला एक सूक्ष्मशी थरथर जाणवत होती. दोघांचेही जेवण झाले. हात धुवून सरांनी त्यांच्या खात्याच्या वहीत दोघांच्या जेवणाची नोंद केली अन ते बाहेर आले. रात्रीचे अकरा वाजत आलेले. वातावरणामध्ये एक आल्हाददायक असा गारवा पसरला होता. कपिल ला केंव्हा एकदा तिथून निघतो आणि रूमवर येतो असे झाले होते. सरांच्या सहवासात त्याचे अवघडलेपण जास्तच वाढायला लागले होते. अन सर काही त्याची पाठ सोडायला तयार नव्हते.
" बर चल आता एकटा रूमवर नको जावू. आज माझ्या रूमवरच रहा"
बडीशेप तोंडात टाकता टाकता कुंभार सर बोलले अन त्याला नकारच देता येईना. थोडे आढेवेढे घेतले त्याने पण सरांना आज काही करून त्याच्याशी बोलायचेच होते, त्यामुळे ते त्याचा नकार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कपिल पूढे दुसरा पर्यायच नव्हता दोघेही सरांच्या रूम वरती आले. हॉस्टेल च्याच पहिल्या मजल्यावर कोपऱ्यातील खोलीत सर एकटेच रहात होते. खोली अतिशय टापटीप आतमध्ये गेल्या गेल्या उदबत्ती चा मंद सुगंध मनाला सुखावून गेला. खोलीत एक टेबल दोन खुर्च्या आणि बेड इतकेच साहित्य, आणि टेबला वर खूप सारी पुस्तके.
" ये बैस आणि आता मला सगळ्या गोष्टी सविस्तर सांग. अजिबात संकोच बाळगू नकोस "
सरांचा तो आश्वासक शब्द त्यांची ती आत्मीयता, तो जिव्हाळा पाहून कपिल भारावून गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वहायला लागले आणि धीर एकवटून त्याने आपल्या आजपर्यंत मनामध्ये दाबून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो भडाभडा बोलत राहिला कुंभार सर त्याच्या खांद्यावरती थोपटत राहिले. जवळ जवळ दोन तीन तास तो अविरतपणे बोलत राहिला. त्याने आई आई टी चे पाहिलेले स्वप्नं, त्यासाठी घेतलेले कष्ट , घरच्यांची अपेक्षा, त्या पूर्ण करता न आल्यामुळे आलेलं नैराश्य आणि त्यातून कमी कमी होत गेलेलं संभाषण , झालेला ऐकलकोंडा स्वभाव खूप काही तो कोसळणाऱ्या पावसासारखा कोसळत राहिला. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी त्याने मनामध्ये ठेवल्या त्या सगळ्या बाहेर आल्या. आई वडिलांसोबत त्याने पाहिलेले स्वप्नं मोडून पडल्यावर आई बाबांशी कसे बोलायचे, त्यांच्या नजरेला नजर कशी द्यायची असा विचार करून स्वताच्या मनात दाबून ठेवलेली ती खदखद ढगफुटी सारखी फुटून बाहेर आली. कुंभार सरांनी त्याला पूर्ण कोसळू दिलं. कोसळून कोसळून तो पूर्ण रिकामा झाला. स्वप्नभंगाच त्याचं दुःख अश्रू आणि शब्दातून पुरेपूर वाहिले. आणि ओंजळी मध्ये डोके ठेवून मोकळा झालेला तो तो शांतपणे खुर्चीवर बसून राहिला. कुंभार सर फक्त त्याच्याकडे पहात राहिले ते काहीच बोलले नाहीत. थोडा वेळ दोघेही शांतच होते. त्याच्या पाठीवर फिरणारा सरांचा हातच काय तो मौनात बोलत होता. बाहेर रातकिड्याची किरकिर चालू होती. पहाटेचे तीन साडे तीन वाजत आले होते. सरांनी आपली खुर्ची त्याच्या पूढे ओढली आणि खिडकी उघडली. एक थंडगार हवेचा झोत आतमध्ये आला बाहेर किर्र काळोख होता. सर शांतपणे त्याच्याशी बोलू लागले,
" कपिल आता माझं ऐक, इतके दिवस तु या स्वप्नाच्या मागे लागलास पण बघितलेली सगळी स्वप्नं पूर्णच झाली पाहिजेत असं कुणी सांगितले रे तुला ? या जगामध्ये अशी कितीतरी लोकं आहेत की ती रोज नवीन नवीन स्वप्नं बघत असतात स्वप्नं जरुर बघावित खूप मोठी मोठी बघावीत. त्या स्वप्नांच्या पुर्ततेची आसही असावी. पण अट्टाहास कशासाठी ? स्वप्नं म्हणजे एक प्रवास असतो ते अखेरचे स्थान नक्कीच नसतं. एक स्वप्नं नाही सापडलं तर रडत बसून, कुढत बसून त्याचं मार्गावरती रेंगाळत बसण्यापेक्षा वळण घे अन दुसऱ्या स्वप्नाकडे प्रवास सुरु कर. मोठी मोठी स्वप्नं बघता यायला हवीत. ती आवाक्यात आणण्यासाठी कष्टाची तयारीही हवी. पण अयशस्वी झाली तर योग्य वेळी ती स्वप्नं बदलताही यायला हवीत. नवीन नवीन स्वप्नं निर्माण करता यायला हवीत. एकाच स्वप्नामध्ये किती दिवस गुंतून रहायचे विषय संपवायला शीक कपिल हे जग खूप मोठे आहे हे आयुष्य खूप मोठे आहे. स्वप्नं आयुष्यापेक्षा कधीच मोठी नसतात.
स्वप्नांकडे एका नवीन नजरेने बघायला शीक. तु स्वप्नांवरती स्वार हो स्वप्नांना तुझ्यावरती स्वार होऊ देवू नकोस. स्वप्नं म्हणजे साध्य नव्हे त्याला साधन बनव नाही पूर्ण झाले तर दे सोडून ती स्वप्ने आणि कवटाळ नव्या स्वप्नांना उराशी ! आज तुझी स्वप्ने पूर्ण झाली नाहीत नाविलाजाने या कॉलेज मध्ये तुला प्रवेश घ्यावा लागला पण अरे इथे प्रवेश मिळावा हे देखील कुणाचे तरी स्वप्न असेलच ना ? इथंही प्रवेश मिळू न शकलेली कितीतरी मुलं असतील. सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्याच मनासारख्या होत नसतात प्रत्येकाला प्रत्येकवेळी आनंद मिळतो असं नाही. आपल्या आनंदाच्या व्याख्या बदलायला शीक.आनंद आणि स्वप्नं एका माळेत गुंफायला शिक. स्वप्नं म्हणजे फक्त दोरा असतो रे त्या माळेचा तुटला तर बदलायला शिक. आणि मग तुला समजेल एक स्वप्नं तुटलं तर दहा इतर स्वप्नं पूढे उभी रहातात"
कपिल दिग्मुढ पणे नुसता ऐकत होता. सरांचा शब्द न शब्द प्रत्यक्ष त्याच्या अंतःकरणात शिरत होता. खिडकीतला काळोख हळूहळू कमी होत होता. कपिलला स्वप्नांचा एक नवीनच अर्थ समजला होता पश्चिमेच्या खांद्यावर विसावलेला सूर्य पूर्वेच्या खांद्यावर बसून, रक्तलालीमेच्या किरणांनी गालातल्या गालात हसत होता.