Gajanan Tupe

Inspirational

4.7  

Gajanan Tupe

Inspirational

सुरखी

सुरखी

3 mins
1.0K


दुपारी बाराचा सुमार... गावात जाणारा पांदीचा रस्ता ओस पडला होता. शेतावरची कामं आटपून ते दोघेजण जेवण्यासाठी गावाकडे निघाले होते. पोटातल्या भुकेमुळे पावलांनी चांगलाच वेग घेतला होता. इतक्यात बाजूला असलेल्या एका घरातनं पोरीच्या रडण्याचा आवाज आला. दोघेही थांबले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांचीही पावले आपसूकच त्या घराकडे वळली. आठ-नऊ वर्षांची कळकटलेली पोरगी भोकांड पसरून रडत होती. डोळ्यातल्या पाण्याने तिचे दोन्ही गाल भिजले होते. नाकातल्या शेंबडाची नाकपुरातून वरखाली ये-जा सुरू होती. घरभर शाळेतली वह्या आणि पुस्तकं पसरली होती. त्यातल्या एकाने तिला विचारलं.

 "काय झालं रडायला" 

तशी ती रडायची गपकन् थांबली. त्या दोघांना बघून तिची आईही थोडी वरमली. त्यातल्या एकाने तिला विचारलं, 

"काय गं नाव काय तुझं..?"

 "सुरखी"

तिनं नाव सांगितलं आणि नाकातून खाली येणारा शेंबूड फर्रकन वर खेचला...


====================================


     काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मुंबईवरून अचानक गावी जाणं झालं. अचानक मोठ्या बंधूंनी आज शाळेत निरोप समारंभाला जायचे आहे, म्हणून सांगितलं. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आमचे बंधूराज गावचे सरपंच, त्यामुळे स्कूल कमिटीचे चेअरमनसुद्धा... त्यांच्यासोबत शाळेत गेलो. हायस्कूलच्या अनेक जुन्या आठवणी मनात उचंबळून आल्या. सगळे शाळकरी मित्र आठवले, विशेष म्हणजे वर्गातल्या पोरींचीही आठवण आली. शाळेत असताना केलेल्या अनेक करामती आठवल्या, भांडणं आठवली, खेळाचे सामने आठवले, शाळेतील विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आठवले, शाळेतील निवडणूक आठवली. बंधूंच्या सोबत सगळ्यांना भेटत होतो. बोलत होतो. पण... मनात मात्र सगळ्या आठवणींची उजळणी होत होती. बघताबघता निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरु झाला. शाळेतील गुणवंत आणि विविध विषयांमध्ये तसेच क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकं प्रदान करण्यात आली.


पाहुण्यांची भाषणे झाली. त्यासोबतच निरोप समारंभात दहावीच्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भाषणे केली. मात्र, त्यातील एका मुलीने आपल्या भाषणात एक सुंदर वाक्य उच्चारलं,

ती म्हणाली, "या गावाचे, या शाळेचे आणि इथल्या माणसांचे... आमच्यावर खूप उपकार आहेत. जिथे जाऊ तिथे गावाचे, शाळेचे, इथल्या शिक्षकांचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करू. त्या नावाला बट्टा लागेल, असं कोणतंही गैर काम आमच्याकडून होणार नाही. उद्या जगात नीट वावरण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी... इथे जमलेल्या सर्व पाहुण्यांनी आणि वडिलधाऱ्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावेत..!"

निरोप समारंभ संपला आणि आम्ही घरी जायला निघालो... इतक्यात मघाशी भाषण करणारी ती मुलगी अचानक आमच्या बंधूंसमोर आली आणि त्यांच्या पाया पडली. "यशस्वी हो" असा त्यांनी आशीर्वाद दिला. पुन्हा एकदा राहिलेल्या मंडळींचा निरोप घेऊन आम्ही गाडीत बसलो...


=====================================


गाडीत बसल्यावर मी आमच्या बंधूंना विचारलं, 

"दादा तुझ्या पाया पडलेली मुलगी कोण..?"

"तू ओळखलं नाहीस..?"

त्याच्या प्रश्नावर मी फक्त नकारार्थी मान हलवली...


अरे ही जानुबुवाची पोरगी....

पाच वर्षापूर्वी विहिरीत पडून जीव गेला ना... त्यांची


माझ्या डोक्यात काही प्रकाश पडत नव्हता. मुंबईत गेल्या वीस वर्षे वास्तव्य असल्यामुळे डोक्याला ताण देऊन पण नेमकं आठवत नव्हतं. माझी गोंधळलेली अवस्था बघून बंधुराज हसायला लागले... म्हणाले, "मागे चार-पाच वर्षांपूर्वी... एकदा असाच मुंबईवरून आला होतास बघ... तेव्हा आपण रानातून येताना... पांदीतल्या एका घरात गेलो होतो... आठवतं का..? तिथं एक शेंबडी पोरगी रडत होती... तीच ही 'सुरेखा'..."


आता कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. रडून डोक्यावर घर घेणारी, आणि नाकातला शेंबूड वर घेत स्वतःचं नाव सांगणारी हीच ती... "सुरखी"!"

दादाच्या वाक्यानंतर माझा 'आ' वासला... तो गाडी चालवत आपल्याच तंद्रीत बोलत होता.

"पोरगी शाळेत हुशार आहे..... यंदा दहावीला..... केंद्रात नंबर काढते की नाही बघ........." जानुबुवा विहिरीत पडून मेल्यापासून हिला विद्यार्थिनी दत्तक योजना राबवून मी दत्तक घेतलं..... नाहीतर पोरीचं शिक्षण बंद पडलं असतं.... तिची आई एकटी बाई, काय काय करणार...? बाप खूप चांगला माणूस होता.... माळकरी.... दर वर्षी पंढरपूरच्या वारीला जात होता.... गेला बिचारा...... आताही पुढे कॉलेजला गेली...... तरीपण लागेल तेवढा खर्च मी करणार..."


दादा अजून बरंच काहीकाही पुढं बोलत होता. माझ्या डोक्यात मात्र वेगळेच विचारचक्र सुरु झालं. शेंबूड वर ओढत नाव सांगणारी "सुरखी" आणि... निरोप समारंभात भाषण करणारी 'सुरेखा"..... दर वर्षी पंढरपूरच्या वारीला न चुकता जाणारा माळकरी..... जानू बुवा आणि जानू बुवाच्या पोरीच्या.... शिक्षणासाठी...... धडपडणारा माझा भाऊ आता मला पांडुरंगासारखा वाटू लागला.


मी मनातल्या मनात विचार करत होतो. या जगात अशा "सुरखी" बऱ्याच आहेत... गरज आहे ती फक्त त्यांचं 'सुरेखा'मध्ये रुपांतर करणाऱ्या एका आश्वासक हाताची... कमरेवरचे हात सोडून... गरजूंच्या मदतीसाठी पुढे करणाऱ्या... एका विठ्ठलाची..!


Rate this content
Log in

More marathi story from Gajanan Tupe

Similar marathi story from Inspirational