सुखाचा पेटारा
सुखाचा पेटारा


गोष्ट आहे एका सदाची. सदानकदा रडका. कुणी विचारावं, "काय रे सदा, कुठवर आली कापणी? "तर ह्याने म्हणावं, "काही खरं नाही ओ शेतीचं. यंदा पावसाने पारच दगा दिला.शेरभर पेरावं न मूठभर उगवावं. "सकाळी उठून कुणी सदाच तोंड पाहू नये असं गाववाले त्याच्या बद्दल बोलत. अख्या गावची जमीन तशीच खडकाळ पण ह्याला वाटे भावांनी कावेबाजाणे पडकी जमिन आपल्या माथी मारली.मग त्याच्या आणखी चडफडाट होई. आई बापानी शाळा नीट केली असती तर आजचा दिस येगळा झाला असता अशा विचारांनी तो माय बापाला शिव्या घाली. पण लहानपणी आपणच शाळंला नाय जायचं म्हणून जो घाना घालून माय बापाच्या नाकी नऊ आणले होते याची त्याला पुसटशीही आठवण नव्हती.
त्याचे सदा काहीतरी बिनसले. कपाळावर आठ्या कायम. आपलंच नशीब फुटकं असं त्याला वाटत राही. सगळी दुःखे देवाने आपल्याच पदरी घातली म्हणून तो देवाला कोसी, दैवाला दोष लावी. सुख -समाधान कुठेतरी विकत मिळते आणि ते घेण्याची आपल्या नाशिवापायी शक्य नाही अशीच जणू त्याची समजूत होती. तो एकतर चिडलेला, दुःखी किंवा हताश - निराश असे. मनःशांती, सुख - समाधान त्याच्या गावीही नव्हते.
एके दिवशी मारुतीच्या उंबराखाली त्याला बरीच गर्दी दिसली. "आत्ता कशाला कोण आडवा झाला... नसता रिकामा ता... "त्याच्या तिरसट डोक्यात विचार आला. कुरकुरतच तो गर्दीतुन पुढे सरकला. पण समोर वेगळंच चित्र त्याला दिसलं. रंगीबेरंगी चिंध्यांच्या कोटाचा, झिपऱ्या केसांवर दाबून बसवलेल्या टोपीचा, लाल नाकाचा जादूगार! विदूषकाचा वेशात असला तरी त्याच्या नजरेत एक प्रकारची गंभीरता होती. ऐखाद्या योग्याचं तेज त्याच्या चेहऱयावर पसरलं होतं. पण साऱ्यांचं लक्ष त्याच्या जादूकडे लागलं होतं.त्याच्या प्रत्येक प्रयोगानंतर गर्दीतून टाळ्या, शिट्ट्या ऐकू येत. बारकी पोरं आ वासून बघत. सदाने परावरच जरा सरकासरकी करून जागा मिळवली.
जादूगाराने जवळपास त्याची सारी पोतडी रिकामी केली होती. त्याच्या टोपीही चिल्लर नाण्यांनी अन एखाद दुसऱ्या चुरगळलेल्या नोटांनी भरत आली होती.मग एक अखेरचा प्रयोग म्हणून, गर्दीची उत्सुकता ताणत त्याने पोतडीतून एक जुनाट परंतु सुंदर नक्षीचा छोटा पेटारा काढला. पण ह्या प्रयोगासाठी त्याला प्रेक्षकांमधून एकजण हवा होता. एकवार त्याने गर्दीवरून आपली नजर फिरवत क्षणभर सदावर टेकवली. त्याला हवा तसा प्रेक्षक मिळाला होता. त्याने खुणेनेच सदाला समोर येण्याची विनंती केली. सदाने क्षणभरच इकडे तिकडे पहिले न जरा अनिच्छेनेच तो उठला. मग जादूगाराने अलगद तो पेटारा सदाच्या हाती दिला. अन आतल्या मखमली गादीवर ठेवलेलं एक चाकाकणारं सोन्याचं नाणं काढलं. क्षणभराचं सदाचे डोळे दिपून निघाले.
जादूगाराने ते नाणे हातावर उंच धरून एकवेळ गर्दीला दाखवले आणि तो म्हणाला, "हे शंभर नंबरी सोन्याच नाणं. सुरतारपूरच्या राणीनं बक्षीस म्हणून मला दिलं."मग तो सदाला उद्देशून बोलला, "मी तुझ्या डोळ्यांदेखत हे नाणं लपवतो आणि तू जर ते ओळखलंस तर हे नाणं तुझं.''सदा सावध झाला. पण दुसऱ्याच घटकेला त्याच्या मनात आले, "मी इतका कपालकरंटा, मला कसला भेटणार सोनं !"मग जादूगाराने सफाईतपणे ते नाणं हया हातातून त्या हातात केलं आणि मुठी वळत्या करून सदापुढे धरल्या. सदाने जरा डोकं खाजवल्यासारखं केलं आणि एका मुखावर बोट ठेवलं. जादूगाराने ती उघडली पण श्या त्यात नाणं नव्हतं. मग सदाने जरा चिडूनच दुसऱ्या मुखावर बोट ठेवला, जादूगाराने मूठ उघडली न काय आश्चर्य नाणं त्यातही नव्हतं. सदाने मग जरा गुश्यातच जादूगाराचे खिसे वगैरे चाचपल्यासारखे केले पण त्याला नाणं मात्र मिळालं नाही. जादूगाराने खेळ संपल्याच्या अविर्भावात गर्दीला अभिवादन केले तसा लोकांनी हुर्यो केला नि गोंगाट करत गर्दी पांगली.
जादूगारही आपल्या सामानाची आवराआवर करायला लागला. सदा मात्र अजूनही चरफडत तिथेच उभा होता. तो मनाशीच म्हणाला, "नाणं मुठीत बंद होईपर्यंत मी अगदी लक्ष देऊन नजर ठेऊन होतो, मग नाणं गेलंच कुठे? "नाणं नाहीतर नाही पण आपली हर त्याला मान्य नव्हती. तो पेटारा अजूनही त्याच्या हातातच होता. तो परत करावा आणी त्या नाण्याचा छडा लावावा म्हणून तो जादूगाराच्या जवळ गेला आणि त्याने आपली शंका बोलून दाखवली. जादूगार काहीतरी गूढ हसला. जणू सदाला त्याने आरपार पहिला असावा. मग जादूगाराने त्याला पेटाऱ्यातल्या मखमली गादीत पाहायला सांगितले न काय आश्चर्य गादीत ते नाणं अगदी गुडूप झालं होतं. जादूगारानेच ते मुठी बंद करायच्या आधी शिताफीने अलगद सदाच्या हातातल्या उघड्या पेटाऱ्यात सोडलं होतं.
सदाच्या चेहऱ्यावरची निराशा पाहून तो म्हणाला, "तू बाहेरच सगळीकडे नाणं शोधात राहिलास पण एकदाही तू पेटाऱ्यात डोकावला नाहीस. तू सुखाच्या शोधात आहेस काय? "सदाने चमकून वर पाहिले आणि मान डोलावल्यासारखे केले. किंचित हसून जादूगार बोलला, "सुखाचंही असंच असतं. आपण सारे जगभर सुख शोधत फिरतो. त्यासाठी किती खटाटोप करतो. पण खरी गम्मत इथेचंय. सुख, समाधान हे अगदी आपल्या जवळच असतं, आपल्या मनाच्या गाभाऱ्यात, हवं तेवढं. गरज असते ती एकदा त्यात डोकावण्याची."सदाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. जादूगाराची वाक्य त्याला पटली आणि आपल्या मनाच्या पेटाऱ्यात लपलेल्या सुखाचा अनुभव त्याला झाला.