सर आज ही नाही दिला ना !
सर आज ही नाही दिला ना !
कथा -- सर आज ही नाही दिला ना!
मी एक शिक्षिका आहे.जवळजवळ तेवीस वर्षे झाली नोकरी .या काळात अनेक विद्यार्थी भेटले.काही कायम स्मरणात राहिले.अशीच एक सत्य घटना आज सांगावीशी वाटली.
नुकतीच खुल्ताबाद तालुक्यातील गल्लेबोरगांव येथून बदली होऊन मी औरंगाबाद तालुक्यात पाबळतांडा येथे रुजू झाले.माझी द्विशिक्षकी शाळा होती.माझ्यासोबत नितीन अष्टेकर सर होते.ते मला ज्युनिअर होते.साहजिकच शाळेचा चार्ज सिनियर असल्यामुळे माझ्याकडे होता.
पाबळतांडा या शाळेची भाग शाळा म्हणजे बल्डीतांडा शाळा होती.पण मुख्य शाळा पाबळतांडा होती.साहजिकच सर्व अभिलेखे आणि इतर सर्व साहित्य पाबळतांडा इथेच यायचे.असेच गणवेश आलेत आणि अष्टेकर सर त्या भाग शाळेचे गणवेश घेऊन गेले.तांडा म्हटल्यावर ऊसतोडी हाच मुख्य व्यवसाय असतो.तिथे ही उत्तम जाधव हे ऊसतोडी करणारे होते.त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा होता.
सोनी (नाव बदलून) ही दुसरीत होती.अतिशय चुणचुणीत व हुशार अशी होती.शाळा कधीच चुकवत नसे.रोज नियमीत अभ्यास करायला आवडत होते.गणवेश आल्यानंतर सरांनी नेहमीप्रमाणे सुचना दिल्या की, "बघा उद्या आपल्या सर्वांना गणवेश मिळणार आहे.सर्वांनी शाळेत यायचे आहे." मुलांना खूपच आनंद झाला.सोनी पण आनंदाने घरी गेली.तिच्या आतेभावाचे लग्न होते,म्हणून घरातील सर्वजण दुसऱ्या दिवशी लग्नाला जायच्या तयारीला लागले.
सोनीला पण घेऊन जायची तयारी झाली.पण सोनीने ठाम नकार दिला."उद्या मला शाळेचा ड्रेस भेटणार आहे."सोनी म्हणाली.बाबा "अग,मी सराला फोन करुन सांगतो .ते काढून ठेवतील." सोनी"नाही.मला नाही यायचे लग्नाला". सोनीला खूप समजावले पण ती तयार नाही झाली.
दुसऱ्या दिवशी तिला टेम्पो मध्ये बळजबरी चढवले .पण त्या दिवशी काळ तिची वाट पाहात होता जसा ती उतरुन गेली.शेवटी घरी ती आणि तिची आजी थांबली आणि सर्व पैठणला लग्नाला निघुन गेले.
इकडे सोनीने पटपट आवरले आणि कपडे धुवायला नाला बंडींग वर आली.शाळा भरायला वेळ होता.जशी तिने आजीचे पातळ पाण्यात टाकले....ती पण पाण्यात खेचली गेली आणि ओरडली. जवळच्या दोन लहान मुलांनी पाहिले आणि ते ओरडत सांगायला पळाले.समोरुन सर येत होते .त्यांनी सरांना सांगितले सर पण धावत गेले.तो पर्यंत 2/3 जण आले.सोनीला बाहेर काढले.पण.........संपले होते.तरी तिला सरांनी कवटाळून मोटारसायकल घेऊन 3/4 कि.मी वरील दवाखान्यात नेले.पण उशीर झाला होता.सर्वजण सुन्न झाले.जवळपास 12 वाजत आले.सरांनी तिच्या नातेवाईकांना कल्पना दिली.आणि आई वडीलांना घेऊन या.असे सांगितले .3/4 वाजता सर्व आले.
अत्यंत शोकाकूल वातावरणात तिचा अंतिमसंस्कार केला गेला.सर माझ्याकडे आले आणि खूप जोरजोरात रडायला लागले .त्यांची ती आवडती विद्यार्थीनी होती.सरांना आवरणे आम्हालाही कठीण झाले.सरांना संध्याकाळ पर्यंत ताप चढला.प्रत्येकाला काहीच सुचत नव्हते.
आणि रात्री सोनी सरांच्या स्वप्नात येऊन ,"सर, मी थांबले होते.तरी तुम्ही आज शाळेचा ड्रेस नाही दिला". सर 2/3 दिवस भयानक तापात फणफणत होते.त्यानंतर चौथ्या दिवशी सरांनी शाळेचा एक गणवेश जिथे तिला पूरले होते त्या ठिकाणी ठेवला.
मी पण सुन्न झाले.आणि अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.