Smruti 2022chya - Sankalp 2023che
Smruti 2022chya - Sankalp 2023che
हॅलो, मेजर धीरज पाटकर....?
हो, बोलतोय...आपण कोण...?
मी...मी...मुग्धा, मुग्धा जोशी....
Oh...! Yes...nice to hear from you....
माफ करा...आपण आधी फक्त मॅरेज साईट वरच बोललो ना...त्यामुळे आवाज ओळखणं शक्य नाही झालं... असो..बोला ना...फोन केलाय म्हणजे....
हो , हो... पुढे काही ठरवण्या आधी मला आपल्याशी बोलावंसं वाटलं...म्हणून कॉल केला... आपल्याला वेळा आहे ना...आणि राग तर नाही आला...?
छे, छे..अजिबात नाही..उलट बरं वाटलं तुम्ही कॉल केलात... खरं तर मीच करणार होतो.. पण जरा धीर धरला... नावाप्रमाणे...
सो नाईस ऑफ यू... आता आपण अजून मुंबईतच आहात ना....की ड्युटीवर..?
नाही नाही...मी अजून आठ दिवस तरी रजेवर आहे...unless emergency call... बरं बोला ना...
मला असं म्हणायचंय... म्हणजे फोनवर बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटुयात का..? म्हणजे जास्त मोकळेपणी बोलता येईल....मला काही प्रश्न, शंका आहेत...त्या आपल्याशी बोलूनच क्लिअर करता येतील...
Oh yes...काहीच हरकत नाही... मीही तुम्हाला हेच सुचवणार होतो... By the way....तुमचा प्रोफाइल मधला फोटो खूपच pleasant आहे...
Thank you very much... मग उद्या संध्याकळी नरिमन पॉइंटला भेटुयात..?
हो नक्कीच...मला समुद्र फार आवडतो...
मलाही...
.......
हॅलो, मी मुग्धा.... उशीर झाला का मला ..?
अजिबात नाही...मीच लवकर येऊन बसलो...माझ्या रेवालाही फार आवडायचा समुद्र...तिच्याच आठवणीत समुद्रावरची शांती अनुभवत बसलो होतो.... एरव्ही हे सारं आठवायलाही वेळ नसतो ना....
हं.... बरं, मी एक विचारू का...?
हो... कॅरी ऑन...
मी आपणाला...ss...
हां..हां...आधी एक दुरुस्ती करतो...हे आपण तुपण म्हणू नका...उगीच खूप म्हातारं झाल्यागत वाटतं....हा ss हाss हा...
ओके... तुमची हरकत नसेल, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नसेल तर मला तुमच्या मिसेस बद्दल सांगाल...?
अर्थातच... सांगायलाच हवं ना.... त्रास तर होणारच... ती माझी अश्र्वत्थाम्याची जखम आहे मुग्धा... तुला सांगतो, तिला मी कधीच विसरू शकणार नाही.... सॉरी, मी पटकन एकेरीवर आलो...
नाही नाही...सॉरी नका म्हणू...
तर, 2020 क्या करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी मी काश्मीरला पोस्टिंग वर होतो.... इकडे संपूर्ण देशात. करोनाने थैमान घातलं होतं... इकडे माझे आई, बाबा आणि माझी बायको, माझी रेवा होते...त्यांच्या काळजीने माझा आणि माझ्या काळजीने त्यांचा जीव थाऱ्यावर रहात नव्हता.... वेळ मिळेल तसेआम्ही एकमेकांच्या संपर्कात होतोच... फोनवरून दोन्हीकडची खुशाली एकमेकांना कळवत होतो... पण ती किती खरी आणि किती खोटी.... ते देवालाच ठावूक होते... माझी रेवा खूप धीराची होती... माझ्या अनुपस्थितीत माझ्या आईबाबांची ती, सख्खी मुलगी घेणार नाही इतकी काळजी घेत होती....प्रेमाने सेवा करत होती.... मी तिला माझ्याबरोबर चलण्यास सांगतही होतो....पण आईबाबांकडे कोण पाहणार म्हणून ती इथेच राहिली.... डॉक्टर होती ना ...सेवा तिच्या रक्तातच होती...प्रेमळ तर इतकी की दोन शब्दांतच समोरच्याला आपलंसं करून घ्यायची... तिचे पेशंटस तर तिच्या नुसत्या दर्शनानेच अर्धे बरे होत असत...करोना काळात तर वेळ काळ विसरून लोकांची सेवा करत होती..... अखेर व्हायचं तेच झालं...ह्या आजाराने घात केला... हजारो लोकांचे प्राण वाचवून माझी रेवा मात्र आम्हा सर्वांना सोडून गेली.... तिचं अंत्य दर्शन सुद्धा कुणालाच झालं नाही...
तुला एक सांगतो मुग्धा... देश हे माझं पाहिलं प्रेम आहे... रेवा हे माझं दुसरं प्रेम आहे...
तिला मी कधीच विसरू शकणार नाही... वीरमरण आलं तिला... लोक सैन्यात जायला घाबरतात... मरणाच्या भीतीने... माझ्या रेवाने मात्र शहरात राहून लोकसेवा करता करता वीर मरण पत्करलं.... आमच्याकडे परमवीर चक्र तरी मिळतं ग.... पण इथे ह्या बलिदानाला ना वीरचक्र मिळालं ना एक फूल तिला कुणी वाहिलं....
मी तिला कधीही विसरू शकणार नाही... मी तर पुन्हा लग्नच करणार नव्हतो... पण आईबाबांच्या मायेपोटी आणि हट्टा पायी तयार झालो...
तू मला हो म्हणायच्या आधी भरपूर वेळ घे... शांतपणे विचार कर आणि नंतरच काय तो निर्णय घे... मी आहे अजून 8 दिवस तरी इथे....
तुम्हाला डॉक्टर मुलगीच हवी होती ... काही कारण....
हो , माझ्या रेवासाठी...तिच्या सेवाभावी वृत्तीला श्रद्धांजली म्हणून त्याच पेशातल्या मुलीसोबत लग्न करायचं मी ठरवलं होतं... संकल्पच केला होता म्हटलंस तरी हरकत नाही... मी तिथे देशसेवा करत असताना तिने कमीत कमी गरजूंची सेवा तरी करावी इतका माझा उद्देश होता... ईच्छा होती... त्यात तू, तुझे विचार अगदी फिट्ट बसले....
अरे मी माझ्याच बद्दल किती बोलत बसलो...
तुझ्याबद्दल ऐकायला आवडेल मला...तुझी मतं , तुझे विचार...
हो ते तर मी बोलणारच आहे, पण मला आधी सांगा , तुम्ही इतके रुबाबदार, आकर्षक आहात... तुमच्या मानाने मी खूपच डावी आहे, तरीही तुम्ही मला हो का म्हणालात.... ? बाकी तर आपण बऱ्याच गोष्टी फोनवरच बोललोय... पण फोटोमधून आपलं रूप कळत नाही ना....तुम्हाला माझा फोटो खूप आवडला म्हणालात... पण प्रत्यक्ष आणि फोटोत खूप फरक आहे ना...
अजिबात नाही.... आपण आता वयाने matured आहोत... लूक्स फारसे बॉदर करत नाहीत माझ्यासाठी...
हां....थांब, थांब....बाह्य रूप अगदीच मॅटर करीत नाही असं नाही... पण तुला
खरं सांगू... तुझा सावळा रंग गोऱ्याहूनही खूप छान तजेलदार आहे... आणि डोळे तर फोटोत आहेत तसेच निर्मळ, प्रामाणिक आहेत... मला तर पाहता क्षणीच तुझे डोळेच फार आवडले... स्वच्छ मनाचे प्रतीक... अगदी आरशा सारखे आहेत...
पण मला एक सांग, तुझं तर अजून लग्नही झालेलं नाहीय तरीही तू एक विधुर , त्यातून सैनिक... का बरं हो म्हणालीस...?
माझे बाबा, ही सैन्यात होते... ते माझा अभिमान आहेत..मी माझ्या प्रोफाईल मधे लिहिलं होतंच... ते लढाईत शहीद झाले.... बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला ... बाबां प्रमाणेच मलाही सैन्यात जाऊन देशसेवा करावयची होती... पण आईने धसका घेतला... मला जाऊ द्यायला तिचे मन धजेना... तिचं मन तोडून जाणं मलाही पटेना... बाबांच्या माघारी तळहाता वरच्या फोडाप्रमाणे जपलं तिने मला... मीच तिचा एकुलता एक आधार होते... त्यामुळे तशी नाही तर अशी देशसेवा करावी असे मी ठरवलं...आणि डॉक्टरही झाले...पैसा कमावणे हा माझा कधीच उद्देश नव्हता, नाहीय... गरजुंची सेवा मनापासून करावी इतकंच मला वाटतं...
आणि हो... सैनिक होता आलं नाही तरी सैनिकाशीच लग्न करायचं असा मी तेव्हाच संकल्प केला होता... तो अशा तऱ्हेने पूर्ण होईल...किती भाग्यवान आहे मी... तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला आवडेल मला...नव्हे तो माझा बहुमान समजेन मी...
आणि हो... अजून एक गोष्ट..
मी लग्न करून कुठेही गेले, कोणाच्याही घरात गेले तरी माझ्या बरोबर माझी आईही असेल...तिला मी एकटी सोडणार नाही...सासू सासरे, दिर नणंदा, यांच्या सोबतच मला माझ्या उतार वयातल्या आईची ही सेवा करावयाची आहे...
........
माझा salute स्वीकार करावा मिस मुग्धा...
एक कडक salute ठोकत मेजर धीरज म्हणाले...
तुझे विचार फार आवडले मला...
चल निघूया... बराच उशीर झालाय...तुला घरी सोडून नंतरच मी घरी जाईन...
घाई करू नकोस...तुझ्या आईशी शांतपणे बोल... त्यांना सारं पसंत असेल तरच आपण पुढे जाऊ... तिला पसंत नसेल तरीही मला कळव... एक सुंदर विचारांची मैत्रीण जपायलाही आवडेल मला... माझ्याकडून तर आताच होकार आहे...
......
इतक्या सुंदर विचारांची दोन प्रगल्भ माणसं पुढे एकत्र आलीच आणि त्यांनी देश सुंदर बनवण्याला हातभार लावत आपला खारीचा वाटा उचलला , हे मी तुम्हाला वेगळं सांगायलाच हवं का...!!!?
