साने गुरुजी

Inspirational

2.5  

साने गुरुजी

Inspirational

श्यामची आई

श्यामची आई

2 mins
17.5K


पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या ब-यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या द-याखो-यांत असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत; रानावनांतील कानाकोप-यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल, की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील, की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ता-यांसारखे तेजस्वी हिरे असतील; परंतु मानवजातीस त्यांचे अद्यापि दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील, की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे, असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे. हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे, तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करितात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात.

मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला. त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात, असे नाही; आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव-निर्जीव सृष्टी शिकवीत असते; परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे, हे आईबापच शिकवितात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला; आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला; जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्याच सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो; आईजवळ रडतो; आईजवळ खातोपितो; आईजवळ खेळतो-खिदळतो, झोपतो, झोपी जातो, आईजवळ त्याची ऊठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय.

आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात, ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिका-याला, चार दिवसांच्या उपाश्याला, ज्याप्रमाणे मिळेल तो बरावाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल, त्याची निवडानिवड न करता अधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान दोनचार महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले, तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो, की त्याच्या मनासही रंग येतो, असे बायका म्हणतात.- याचा अर्थ एवढाच, की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळेल.


Rate this content
Log in

More marathi story from साने गुरुजी

Similar marathi story from Inspirational