Shanti Gurav

Inspirational

4.4  

Shanti Gurav

Inspirational

शर्यत

शर्यत

2 mins
223


ससा तो ससा की कापूस जसा

     त्याने कासवाशी पैज लावली

     वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ

     ही शर्यत रे अपुली.


ही कविता सर्वांना लहानपणापासूनच माहित आहे. यात आहे दोन प्राण्यांची शर्यत. लहानपणापासूनच आपसातली शर्यत सुरू होते. मलाच पुढे जायचं आहे, मलाच लक्ष्य गाठायचं आहे ही भावना तेव्हापासूनच जन्म घेते. जसजसे वय वाढते ही शर्यत अजून वाढत जाते. मुले शाळेत दाखल झाल्यापासून या शर्यतीला वेग येतो.ही शर्यत असते गुणांची, टक्केवारीची. ही जीवघेणी शर्यत कधीकधी खरोखरच एखाद्याचा जीवही घेते. पालकांच्या व स्वतःच्या इच्छा आकांक्षा चे ओझे पाठीवर घेऊन ही शर्यत पूर्ण करता करता मुलांचा जीव मेटाकुटीस येतो. या शर्यतीत यांची दमछाक होते. मग ती मागे पडतात. ही शर्यत जीवनाला पूर्णविराम लावते.

    यातून सावरुन पुढे गेल्यावर जीवनात स्थिरस्थावर होण्यासाठी परत शर्यत सुरू होते. स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी नाना तर्‍हेचे कष्ट घ्यावे लागतात. त्यातही कधी थोडीशी गफलत झाली किंवा काही कमी पडले तर ती व्यक्ती मागे पडते. मग ती व्यक्ती प्रचंड मानसिक तणावातून जाते. म्हणजे त्यांचा जिवाचा खेळ होतो.नुकत्याच एका बातमीत वाचले की एक एमबीए झालेला , चांगल्या नोकरीत असलेला तरुण जीवनाच्या शर्यतीत मागे पडून आपले आयुष्य संपवून बसला.

    सध्या आपली ही शर्यत सुरू आहे कोरोनाशी. कधी कोरोना विषाणू पुढे तर कधी आपण पुढे. शर्यत कधी संपणार कोणालाच माहित नाही. मात्र यात कोरोनानेच हरावे अशी सगळ्यांची तीव्र इच्छा आहे.

    शर्यतीत धावणाऱ्या घोड्यांची उत्तम बडदास्त ठेवली जाते. आपल्या घोड्याने नेहमी प्रत्येक शर्यत जिंकावी अशी प्रत्येक मालकाची तीव्र इच्छा असते. त्यामुळे घोड्यांना उत्तमात उत्तम सोय दिली जाते. उत्तम खाद्य दिले जाते. पण ज्यावेळी तोच घोडा जखमी होतो. शर्यतीतून पूर्णपणे बाद होतो. तेव्हा त्यालाच गोळ्या घालून आयुष्याच्या शर्यतीतून संपवले जाते. ते फक्त शर्यतीसाठी पाळले जातात. त्यांच्या भावनांशी कुठेच संबंध नसतो नंतर निरुपयोगी झाल्यावर त्यांना सहज दूर केले जाते.

    अनेक राज्यात प्राण्यांच्या शर्यती होतात. त्यात बैल, घोडा यासारखे प्राणी जीव तोडून धावतात. या प्राण्यांच्या सुरक्षिततेचे सारे नियम धाब्यावर बसवून या प्राण्यांना पळवले जाते. मग आता या शर्यतीवर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. काही प्रमाणात या शर्यती थांबल्या आहेत.

    खरेतर शर्यत असावी पण ती स्वतःची स्वतःच्या मनाशी. आपल्यातल्या चांगल्या व वाईट गुणांशी. यातून चांगल्या गुणांना जिंकण्याची. आपल्या सद्गुणांना पुढे आणण्याची. वाईट विचारांना, गुणांना हरवण्याची. स्वतःला परिपूर्ण करण्याची. ती पण एक शर्यत आहे आणि ती शर्यत स्वतःसाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण ती शर्यत असेल स्वतःची स्वतःशी.


Rate this content
Log in

More marathi story from Shanti Gurav

Similar marathi story from Inspirational