STORYMIRROR

रुपाली पाटील

Inspirational

3  

रुपाली पाटील

Inspirational

शोषण

शोषण

4 mins
199

आरु घाई घाईने बसमध्ये चढली.रोज प्रमाणे कंडक्टर काकांनी तिची जागा ठेवली होती..खरं तर आरुला अशा प्रवासाची बिलकुल सवयच नव्हती..तिची शाळा,कॉलेज सगळं घरा जवळ ..प्रवास,लोकं यांचा बिल्कुलच अनुभव नव्हता.. जाताना तिची जागा धरलेली असायची पण येताना गर्दीत घुसून जागा मिळवावी लागायची..जिथे जागा मिळेल तिथे बसायचं..कारण प्रवास मोठा..इतका उभं राहून करणं अवघड. त्यादिवशी कंडक्टर काकांनी काही LIC च्या महिलांशी ओळख करून दिली..ती येता जाता त्यांना नेहमी बघायची..तोंड ओळख झाली होतीच.त्या चार जणी..सगळ्या खूपच छान.. काका म्हणाले, "या लहान आहेत आणि यांना जगाचा अनुभवही नाही .येताना थोडं सोबत रहात जा तुम्ही." सगळ्या गोड हसल्या.आणि येथून एक नवी मैत्री सुरू झाली..येताना त्या आरुची जागा ठेवायच्या..खूप लोकं अप डाऊन करायचे..चांगल्या चांगल्या पदावर असणारे..त्या चौघींमध्ये एक कदम म्हणून होत्या. आरुला त्या खूपच आवडायच्या.. कारणही तसं भारीच होतं. त्यांना सगळे घाबरायचेचं.. त्या दिसायला खूप छान,पण आवाज मोठा..थोड्या जाड्या..त्या चढायला लागल्या की एकाही पुरुषाची हिंमत नव्हती चढायची..आरुला प्रश्नच पडला होता इतकं का घाबरतात यांना.. अप डाऊन करणाऱ्यांमध्ये सगळेच खूप चांगले होते असं नाही..खरं तर चांगल्या पदावर काम करणारे ही फारच घाणेरडे..जसं कधी बाई पाहिलीच नाही..खूप घाण नजरेने बघत राहायचे..डी .एड.च्या मुलीही अप डाऊन करायच्या..तशा वयानं लहान..त्यांना तर नुसते धक्के मारणे,अंगाला हात लावणे असं सगळं सुरू असायचं..आरुला हे बघून आता किळसही यायला लागली होती आणि राग ही येत होता.तिलाही एक दोनदा हा अनुभव आलाच होता..तिने आज ठरवलंच होतं की ,कदम मॅडमला विचारायचंच की हे सगळे त्यांना का घाबरतात..आणि आज नेमकी ती येतांना त्यांच्या जवळंच बसली.


तिने त्यांना हळूच विचारले,'मॅडम ,हे सगळे पुरुष तुम्हाला इतके का घाबरतात.'


त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या,"बरं झालं तूंच हा विषय काढला .मला याविषयी तुला बोलायचंच होतं."


आरु थोडी घाबरली आणि म्हणाली," काय झालं?"


त्या हसल्या आणि म्हणाल्या,"अगं टेंशन घेऊ नकोस..माझ्या बदलीचे चालू आहे त्या आधी तुला काही डोस द्यायचे आहेत."


डोस हा शब्द ऐकून आरु पुन्हा टेंशनमध्ये आली.पुन्हा कदम मॅडम म्हणाल्या,"घाबरू नको,तू म्हणाली ना हे सगळे मला का घाबरतात तर ऐक." त्या पुन्हा बोलू लागल्या, "अगं सुरुवाती सुरुवातीला मलाही फारच घाण अनुभव आले..अंगाला धक्का देणे,मुद्दाम स्पर्श करणं, घाणेरड्या नजरेने बघत रहाणे..यातलेच एक दोन महाभाग जास्त घाणेरडे.. म्हणायला सुशिक्षित.. पण घाणेरडे."


आरु त्यांच्याकडे बघतंच होती आणि लक्ष देऊन ऐकत होती. त्या पुन्हा बोलायला लागल्या,"अगं आरु आपण घाबरतो म्हणून हे जास्त माजतात.आपण विरोध करतच नाही..सहन करत राहतो.आपल्याच शरीराची किळस यायला लागते नंतर..मलाही खूप घाण अनुभव आले.शोषण करत राहतात हे.एक अप डाऊन करणारा रोजं त्रास द्यायला लागला.मला ते सहन होत नव्हतं.एकदोनदा ओरडले ही, पण काहीच फरक पडला नाही..एक दिवस खूप गर्दी होती, जागा मिळालीच नाही म्हणून उभं राहावं लागलं आणि तो शहाणा माझ्या मागे येऊन उभा राहिला आणि मागून हात लावू लागला,मला त्यादिवशी ते सगळं खूपच असह्य झालं आणि मी त्याचा आलेला हात घट्ट पकडला,जोरात दाबला तसा तो जोरात ओरडला,सगळे बघायला लागले..पण मला इतका राग आला होता ना मी तो अजून जोरात पिरगळला.. सोडा सोडा म्हणत तो ओरडत होता.लोकं मला ओढत होते, पण मी काही सोडला नाही. मग खूप वेळाने राग शांत झाल्यावर सोडला."


आरूनं घाईतंच विचारलं, ‘'तो काही म्हणाला नाही का?'


त्यावर हसून कदम म्हणल्या,"तो काय म्हणेल,मान खाली घालून उभा होता स्टॉप येईपर्यंत."त्या पुन्हा सांगू लागल्या,"मी लोकांनाही खूप बोलले,रोज सगळे हा घाणेरडा प्रकार या माणसाचा बघता, पण एकाची हिम्मत नाही म्हणा किंवा ही बाई आपली तर कोणी नाहीना हाच विचार करून नजर फिरवायची.. लाज वाटली पाहिजे सगळ्यांना.. बरीच बडबड केली."


आरुला हे सगळं ऐकून काय बोलावं कळेना..पण कळत नकळत एक ऊर्जा नक्कीच मिळाली..कदम मॅडम पुन्हा सांगू लागल्या,"आरु ,तू ना हे सहन करायचं नाही..आपली नजरच इतकी तीक्ष्ण हवी की कोणाची आपल्या जवळ यायची हिंमत व्हायला नको,आणि आलाच तर सोडायचं नाही ,मग परिस्थिती नुसार वागायचं..नेहमी सेफ्टी पिन,तिखट,स्प्रे जवळ ठेवत जा..खूप कामाच्या वस्तू या." आरु हसली. आज एक गुरुमंत्र कदम मॅडमनी दिला होता.. हे ऐकून आरु थोडी धीट झाली होती..


असेच दिवस चालले होते,कदम मॅडमनी म्हटल्याप्रमाणे त्यांची बदली झाली..आरुला आता थोडं बोरच व्हायला लागलं होतं.असंच एकदा येताना खिडकीजवळ बसलेली असताना मागून कोणीतरी पोटाला हात लावला तिच्या, तिला वाटलं चुकून असेल..असे दोनदा झाले..तिने उठून मागे रागाने वळून पाहिले.. रोजचाच एक चांगल्या पदावर काम करणारा आरुपेक्षा कितीतरी वयाने मोठा माणूस तो..तिला खूप किळस आली आणि रागही.तिला वाटलं आता पुन्हा असं करणार नाही पण पुन्हा तसंच.. मग तिनं मागून येणारा त्याचा हात घट्ट पकडला आणि सेफ्टी पिनने हातावर मारायला सुरुवात केली.. त्याने हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला..पण आरुत जणू दुर्गा अवतरली होती..हातातून रक्त यायला लागलं..पण ती तो काही सोडेना. तिच्या मनाला शांतता लागल्यावरंच तिने तो हात सोडला..ती व्यक्ती तिथून पटकन उठली आणि पुढे जाऊन उभी राहिली.. आरुला आज खूप शांत वाटत होतं.


पाच सहा दिवस ती व्यक्ती तिला दिसली नाही..नंतर एक दिवस बसमध्ये चढताना दिसला..तिच्या बाजूला जागा रिकामी होती, पण तिथे न बसता खूप मागे जाऊन बसला.आज आरु बसल्या बसल्या विचार करत होती..समोरचा अन्याय सहन करतो म्हणून करतच राहायची वृत्ती..खरं तर लोकं काय म्हणतील या भीतीने स्त्री हे सगळं सहन करतंच राहते आणि यातूनच या घाणेरड्या प्रवृत्ती वाढत जातात..हे थांबवणं खूप गरजेचं आहे.दुर्लक्ष करणे बंद केलं पाहिजे..आणि हे वाढतंच चाललं आहे म्हणून स्त्री सुरक्षित नाही.आज बस मधून उतरताना आरु याच विचारात उतरली..आपल्या मुलींना याविषयी मार्गदर्शन करणं किती गरजेचं हे वाटून दुसऱ्या दिवशी पासून ती कामाला लागली.खरंच बदल हवा..मानसिकतेत.हे शोषण थांबलं पाहिजे.कोणी आपल्या रक्षणाला यावं ही अपेक्षा स्त्रीने करणे बंद केले पाहिजे.खरं तर शिक्षणात याची सोया हवी..स्त्रीच्याही मानसिकतेत बदल होणे तितकेच महत्वाचे.


Rate this content
Log in

More marathi story from रुपाली पाटील

Similar marathi story from Inspirational