शंभवीची जिद्द
शंभवीची जिद्द
सातपुड्याच्या कुशीत वसलेलं सोनपेठ नावाचं गाव. गाव फार सुंदर होत.या गावातील लोक फार प्रेमळ, मनमिळाऊ आणि याच गावात माझं प्राथमिक शिक्षण झालं. माझ्या शाळेच नाव मराठी पूर्व माध्यमिक शाळा. इयत्ता सहावी पर्यंत मी या शाळेत शिकलो नंतर वडिलांची बदली झाली आणि आम्ही आमच्या मुळ गावी आलो. असो मी या कथेचा नायक नाही मी फक्त कथा सांगणारा.
ही कथा आहे शंभवीची. ती सोनपेठला राहायची आम्ही एकाच शाळेत शिकायचो पुढे मी माझ्या गावी गेलो व सर्व मित्रासोबत संपर्क तुटला. पण मनापासून खूप इच्छा होती या सर्व बालमित्रांना भेटाव, बोलावं शेवटी काही वर्षानंतर या सर्वांचे संपर्क क्रमांक मिळाले व भेटण्यासाठी नियोजन सुरू झाले. आता या सर्वांशी बोलतांना समजल की "आम्ही सर्व तुटलेल्या स्वप्नातून नवे स्वप्न जोडून उभे राहलो" प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष, दुःख आणि काही भंगलेली स्वप्न होतीच.
मला शंभवी भेटली ती लहानपणापासून बिनधास्त, बेधडक आणि निर्मळ मनाची होती आणि आहे. तिला भेटल्यावर तिच्याशी बोलल्यावर समजल की स्त्रियांच्या जीवनात समस्या आल्यावर तिने शंभवी सारख जगाव सर्व सहन करुन तुटलेली स्वप्न स्वबळावर, स्वकर्तृत्वावर पुन्हा जोडावीत व आयुष्यात आपल्या इच्छांचा ही मान ठेवावा. ती श्रीमंत घरची लाडाची लेक, तिच 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि ती 20 वर्षांची असतांनाच आई वडिलांनी तिचे लग्न एका सधन शेतकऱ्यासोबत लावून दिलं तिच्या मनाचा येथे कोणीच विचार केला नाही.तिला शिकायच होतं, तिला काहीतरी बनायचं होतं पण आई वडिलांनी एका नातेवाईकावर डोळे झाकून विश्वास ठेवला व शंभवीला लग्न बंधनात बांधले.
शंभवीची सारी स्वप्न येथे तुटली, तिची स्वप्न वेगळी होतीआणि वास्तवात नियतीने तिच्या नशिबासोबत वेगळाच खेळ रचला होता. लग्नानंतर तिच्या आयुष्याला वेगळेच वळण लागलं, तिला तिच्या स्वप्नांची हत्या होतांना दिसत होती. तिच्या घरी खूप सारी शेती होती म्हणून सासू,सासरे व नवरा तिला शेतात राबायला न्यायचे,आई वडिलांच्या घरी लाडात वाढलेली ,जी कामे करायला तिच्या बाबांच्या घरी मजूर असायचे, ती कामे शंभवीला सासरी करावी लागत होती.ती पण शांत राहून सर्व काम करायची, शेण काढणे,शेतात जाणे,घरची कामे एका मजूराप्रमाणे तिला राबवल्या जायच.तिने सर्व संयमाने सहन केलं. ती जगत होती एक असाहाय्य, जबाबदारीचं,कर्तव्याचं ओझ घेऊन. तिला कसलच स्वातंत्र्य त्या घरात नव्हतं,कुणाचाच आधार नव्हता. ती गरोदर असताना एक दिवस तिची पोहे खाण्याची फार इच्छा झाली होती परंतु त्या श्रीमंत सासरी अती कोत्या मनाची,निष्ठूर व कंजूष माणसं होती. तिने तिची ईच्छा व्यक्त केली पण तिचे ते डोहाळे पूर्ण करण्यास कोणीही तयार नव्हते, साधे पोहे तिला त्यावेळी दिले नव्हते. तिची इच्छा जागीच संपवली,रोज त्याघरात शंभवीच्या इच्छांचा खून केल्या जात होता. 14 वर्ष वनवास सहन करत शंभवी जगली पण हरली नाही,हताश झाली नाही.
प्रत्येक गोष्टीचा एक अंत असतो तसा तिच्या संयमाचासुध्दा अंत झाला आणि तिने आता आवाज उठवायच ठरवलं स्वतःसाठी मुलांसाठी जगायचं ठरवल. तिने स्वतःच्या जिद्दीवर शिलाईचे काम सुरू केले.नंतर ब्युटी पार्लरचा कोर्स करून मेकअप आर्टिस्ट झाली. ती एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट झाली तिने स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. स्वतः कमवायला लागली व स्वतःच्या स्वप्नांना आकार द्यायला लागली. तिने तिच्या मुलीला उच्च शिक्षित केले. शंभवी आता खूप प्रगत विचारांची झाली ती एक स्वावलंबी व कर्तबगार स्त्री झाली. ती हळव्या मनाची, सत्य बोलणारी व स्वतःच अस्तित्व निर्माण करणारी नव्या युगातील नव स्त्री शक्ती ठरली.
तिने स्वतःच्या बळावर आपलं अस्तित्व तयार केलं, स्वतःच पार्लर सुरू केलं. मुलीला डॉक्टर करण्याच स्वप्न डोळ्यात ठेवून शंभवी आज प्रगतीपथावर आहे व नारी शक्तीला प्रेरणा देण्याचं ती काम करत आहे.
अशा या शंभवीच्या कर्तृत्वाला सलाम......
लेखक-
गजानन दशरथ पोटे
अकोला
शिक्षक स्कूल ऑफ स्कॉलर्स
बिर्ला कॉलनी अकोला
9923208775
