शापित कळी
शापित कळी
आजच्या उगवणाऱ्या सूर्याची किरणे आयुष्यात लख्ख प्रकाश चमकवतात याचा अनुभव आज स्वप्नाली घेत होती, जगातील सर्व आनंद तिच्या उराशी बाळगल्याचा भास तीला होत होता, एका स्त्रीच्या जीवनातील परमोच्च आनंदाची संकल्पना जेव्हा सत्यात उतरते तो क्षण म्हणजे आई होणे. या आनंदाची अनुभूती आज स्वप्नालीला मिळणार या विचाराने मनोमनी प्रसन्न होत होती. ती सहजच आरशासमोर तिचा चेहरा न्याहाळत होती. तिच्या चेहऱ्यावर अचानक आलेला टवटवीतपणा स्पष्ट उठून दिसत होता. ती वारंवार तिच्याच चेहऱ्यावर कटाक्ष टाकत होती. मनोमनी "मी आई होणार" या सुखद गोष्टीचा प्रत्यय घेत होती.
तोच खालून सासुबाईचा आवाज आला, "अगं किती उशीर, सुर्यनारायण वर आलेत".
"हो..हो..आलेच" असे म्हणून स्वप्नाली स्वयंपाक घरात गेली. गॅस पेटवून दूध गॅसवर ठेवले.
दुधावर आलेली साय तिला छोट्या बाळाच्या अंगावर मायेची चादर टाकली की काय, असा स्पर्श करून गेल्यासारखे वाटत होते.
तोच सासुबाई पुन्हा ओरडल्या, "अगं मन्याला आज काय सुट्टी आहे का? कचेरीत नाही का जायचे! उठव त्याला."
"हो उठवते, तुम्ही नका काळजी करू मी आहे त्यांची काळजी घ्यायला..!" स्वप्नाली म्हणाली.
तोच सासूबाईनी नेहमीसारखे ठसक्यात उत्तर दिले, "म्हणून तर जास्त काळजी वाटते", हातातील माळ ओढत पुन्हा पुटपटल्या, "परमेश्वरा काय होईल रे बाबा, किती दिवस वाट पाहायला लावतो, एकदा नातवाचा तोंड पाहिलं, म्हणजे जीवन सार्थक झालं बाबा..!"
स्वप्नालीला वाटलं, सांगावे लगेच, पण मनीष उठल्यावर ही आनंदाची बातमी त्याला आधी सांगावी की, आपल्या संसाररुपी वेलीवर लवकरच एक फुल उमलणार आहे. या सर्व मनातील इमल्या घेऊन स्वप्नाली मनीषला उठवायला गेली.
"अहो.. अहो.. उठा बघाना, सूर्यनारायणाच्या किरणात आज किती तेज आहे." ती म्हणाली.
"सूर्याच्या किंचित कमी, पण मला तर आज तुझ्या मुखकमलावर जास्त तेज दिसत आहे..! काय?" मनीष स्वप्नाली चा हात हातात घेऊन म्हणाला.
तोच स्वप्नाली लाजली आणि म्हणाली, "मी आज तुम्हाला एक आपल्या आयुष्यातील सर्वात गोड बातमी देणार आहे..!"
मनीष ला खूण गाठ पटली. "म्हणजे, म्हणजे मी बाप होणार, बरोबर ना..! हीच ती गोड बातमी ना.." मनीषने स्वप्नालीला जवळ घेतले. दोघेही ही या सुखद क्षणाने क्षणभर एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहीले.
"चल लवकर, ही गोड बातमी आधी आईला सांगू" असे म्हणून दोघे आईकडे आले.
सासूबाईला दोघे जोडीने नमस्कार करत, "आई, तु लवकरच आजी होणार" मनीष म्हणाला.
"देवा माझं गाऱ्हाणं ऐकलं रे बाबा तू, चला नातू झाला म्हणजे घराचा वंश वाढेल, आम्हाला मुक्ती, काय रे मन्या..!"
तोच स्वप्नालीने चढ्या आवाजात सुनावले "नात काय आणि नातू काय, दोघे सारखेच, पण खरं सांगू मला तर मुलगीच हवी आणि सर्वात शेवटी मातृत्व महत्त्वाचे, नाही का हो..?
"हो.. हो.. ते तर आहेचकी..! चल आवर लवकर, आजच डॉक्टर भाले यांच्याकडे जाऊन दाखवून घेऊ." मनीष म्हणाला.
शितल चांदण्यात मनसोक्त चालताना, मिळणारा जो आनंद असतो, तो आज स्वप्नाली अनुभवत होती. खरंच मातृत्वाची चाहूल किती सुखावह, किती हृदयस्पर्शी आणि प्रेमळ जाणीव, सुखात चिंब भिजवणारी, याची जाणीव करून देत होती. परंतु सासुबाईच्या नातवाच्या अट्टाहासाने, मन खजील झाल्याची भावना जागृत होत होती. शेवटी मन चिंती, ते वैरी न चिंती, मनाची समजूत काढून, स्वप्नाली तयारीला लागली.
दवाखान्यात आल्यानंतर, फोटोमधील गोंडस बाळाकडे स्वप्नाली एकटक पाहत होती, व स्वप्नातील दुनियेत रममाण होत होती. परंतु तेथील नर्सने, स्वप्न भंग करत मोठ्याने आवाज दिला, "स्वप्नाली कोण आहे? जा आत!"
डॉक्टरने तपासणी करून औषधे लिहून दिले व बाहेर थांबण्यास सांगितले. मनीष डॉक्टरशी बोलण्यासाठी केबिनमध्ये थांबला.
डॉक्टर म्हणाले, "हे पहा, मनीष, गर्भ वाढ चांगली आहे. दुसरा महिना चालू आहे. आता सोनोग्राफी वरून दिसून येते, परंतु गर्भ मुलीचा आहे, तुम्ही दोघे विचार करा व नंतर कळवा."
"नाही डॉक्टर, मुलगा काय आणि मुलगी काय दोघेही समान, शेवटी बाप होणे हे महत्त्वाचे", असे म्हणून मनीष बाहेर स्वप्नालीकडे आला.
घरी स्वागतला सासुबाई तयार होत्याच. "या..या.., हळू चाल आता, असं चालून नाही जमायचे, तुझ्या पोटात या खानदानाचा वंश वाढतोय..!"
"हो, हळू चालते, मला पण माझ्या बाळाची काळजी आहेच की..!" स्वप्नाली सासुकडे पहात म्हणाली.
विचार चक्राच्या चक्रव्युहात गुरफटलेला मनुष्य जणू मेलेलाच असतो. त्याचा जगाशी संबंध दूरदूरपर्यंत तुटतो. असेच काही मनीषला झाले होते. एकीकडे बाप होण्याचा आनंद मनोमनी होत असताना, दवाखान्यातील डॉक्टरचे शब्द टोकदार हत्याराने कान टोकरावेत, अशा असह्य वेदना देऊन जात होते. मनीष स्वप्नालीला औषध देऊन झोपल्यानंतर असह्य विचाराच्या वेदनेने गुरफटला होता.
तोच आईचा आवाज कानी पडला. "मनीष, मला तुला महत्वाचे बोलायचे आहे, जरा खाली ये."
मनीष खाली येताच, आई म्हणाली, "हे बघ मला तर वंशाचा दिवा हवा आहे. डॉक्टर काय म्हणाले? सांग ना काही तरी बोल..!"
मनीष चेहरा लपवत म्हणाला, "आई, तुला नात होणार, असे म्हणाले डॉक्टर..!
आभाळ कोसळून एखादे मोठे संकट यावे असा चेहरा आईचा झाला होता. ती म्हणाली, "हे बघ मनीष, तुला माझी शपथ आहे. तुला माझे तोंड पाहायचे असेल तर, उद्याच डॉक्टरकडे जाऊन काम कर."
"अग, पण आई काय हरकत आहे?" मनीष म्हणाला.
"तुझ्या बापाला अन् मला निदान स्वर्गात तरी सुख भेटू दे..?" असे म्हणून आई तिच्या खोलीत निघून गेली.
"म्हणजे, म्हणजे मी….!" मनीष नाराज होऊन वर खोलीत गेला.
पण शेवटी आईची इच्छा व मायेपोटी मनीष भयंकर पाप करण्यास तयार झाला. दोघांच्या विचारा नुसार, दुसऱ्याच दिवशी हा कट पूर्ण करण्याचे ठरले.
स्वप्नालीच्या स्वप्नात देखील या क्रूर वादळाची जाणीव तिला झाली नाही. ती तिच्या आयुष्याच्या स्वप्नात रममाण होऊन झोपी गेली. एका गोड स्वप्नात, परंतु तिला ठाऊक नव्हते की, आजचे हे गोड सत्य स्वप्न तिच्या पोटातील अंकुर कुरतडणार होते. तिच्या पोटातील कळीला फुल होण्या अगोदरच चुरडणार होते.
दुसऱ्या दिवशी, मनिष स्वप्नालीला ठरल्या प्रमाणे दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरशी त्याचे रात्रीच बोलणे झालेले होते.
डॉक्टर स्वप्नालीला सांगितले की, "तुमच्या पोटातील गर्भ काढणे आवश्यक आहे. कारण गर्भाची वाढ खुंटली आहे. हा गर्भ नाही काढला तर ते अपंग म्हणून जन्माला येईल किंवा पोटातच ते मरेल आणि त्यामुळे तुमच्या जीवलाही खुप मोठा धोका आहे."
स्वप्नाली चे हात पाय थरथरत होते. ती स्तब्ध झाली. जेव्हा एखाद्या गाईची खाटकाकडे कापण्यासाठी नेत असताना, जशी अवस्था होते, तशी तिची अवस्था झालेली होती. सर्व स्वप्न धुळीस मिसळून गेले, असे तिला वाटले. हाती फक्त कटोरी यावी, या विवंचनेतून ती जात होती, परंतु देवानंतर डॉक्टरच असतात, असा समज नव्हे, गैरसमज करून, शेवटी ती तयार झाली.
कुसा बाजूला असलेली रिकामी जागा, त्या बाळाच्या नसलेल्या अस्तित्वाची जाणीव तिला करून देत होती. असंख्य सुया टोचून होणाऱ्या वेदना तिच्या मनाला डंख मारत होत्या. नियतीपुढे हतबल होऊन आलेला हुंदका आतल्या आत ती दाबत होती.
शेवटी प्रत्येकाला जन्म देणारी एक स्त्रीच असते, याची चेतना जागृत होऊन, दवाखान्यातील नर्सने सगळा प्रकार तिला नंतर सांगीतला.
पायाखालील वाळू सरकावी, असे स्वप्नालीला झाले. ती गर्भगळीत झाली. हातातोंडाशी आलेला घास या राक्षसांनी हिसकावून घेतल्याने, डोळ्यात रक्त उतरून, लालबुंद होऊन ओक्साबोक्शी रडू लागली.
शेवटी कळीची काय चूक? या नराधमांनी त्या कळीला, या जगात येण्याआधीच संपवले यांनी. स्वप्नालीला स्वप्नात दिसलेली, ती कळी तिच्या डोळ्यासमोर तरळू लागली.
"नाही, नाही मी अन्यायाला वाचा फोडीनच.." या निर्धाराने तिचे मन पेटून उठले. एकीकडे कपाळाचे कुंकू तर, एकीकडे न उमललेली कळी. तिच्या मनात असंख्य विचार घर करून गेले. संसाराचा गाडा असाच पुढे हकावा की, त्यां न उमललेल्या कळीला न्याय मिळवून द्यावा..? आपल्या सारख्या, असंख्य सुशिक्षित स्त्रियांवर होणाऱ्या, अत्याचाराला वाचा फोडावी, का बसावे असेच जीवन जगत..? पण त्या न उमललेल्या कळीला काय वाटेल..? आपल्या आईनेच आपल्याला न्याय मिळवून दिला नाही, तर मग कोण न्याय मिळवून देणार. केव्हातरी एका स्त्रीला पुढाकार घेऊन अन्यायाविरुद्ध लढावेच लागेल. मग मीच पुढाकार घेऊन लढले तर. या सर्व विचारांचे काहूर तिच्या मनात चालू होते.
शेवटी स्वप्नालीने या सर्वांविरुद्ध लढण्या साठी मन खंबीर केले. दुसऱ्या दिवशी पहाटेच घराबाहेर पडण्यास तयार झाली. एक तिरपा कटाक्ष आपल्या पापी पतिकडे व सासूकडे टाकून निर्धाराने आपले पाऊल पुढे टाकले. स्वप्नालीला हे माहित होते की, आपल्या या लढ्याने, आपला पती आपल्याला सोडून देईल. परंतु इतिहासात नवीन पर्व सुरू करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो, तो मी का घेऊ नये. या सर्व विचारचक्रात मनातील खूणगाठ पक्की करत ती तयार झाली लढण्यासाठी.
मनात ठरविल्याप्रमाणे, तीने सर्व जीव एकवटून, त्या न उमललेल्या कळीसाठी तडक पोलीस स्टेशन गाठले व सर्वां विरूद्ध तक्रार केली. आपली सर्व कैफियत मिडिया समोर कथन केली, कशी कोमेजली नव्हे तर कशी मुरगाळली, या नराधमांनी ती कळी.
शेवटी सर्व नराधमांना पोलिस अटक करून घेऊन गेले. क्रूरकर्मा डॉक्टर भाले, यांच्या दवाखान्यावर पोलीस धाड टाकून सील केले व पीसीपीएनडीटी ॲक्ट या कायद्यान्वये कार्यवाही केली.
परंतु या सर्वांमध्ये स्वप्नालीला आपण काय गमावले, याची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. स्वप्नाली हतबल झाली पण खचून गेली नाही.
एकटक आकाशातील लुकलुकणाऱ्या चांदण्याकडे पहात बसली. एक अशीच लुकलुकणारी चांदणी, तिला तिची न उमललेली कळी भासली. जणू ती आकाशातून तिच्याशी बोलत होती व या सर्वांना शाप देत पुटपुटत होती..
"एका निष्पाप जीवाला, तु पृथ्वीची दारे बंद केली..!"
"पण यामुळे तुझ्यासाठी सुद्धा, स्वर्गाची दारे आता बंद झाली..!"
"असे वाईट कृत्य करताना, तुला जराही कीव नाही आली..?"
"जन्मदात्री तुझीही एक कळीच होती, याची तुला आठवण नाही झाली..?"
शापित कळी…………..
(या कथेतील सर्व नावे व पात्रे काल्पनिक आहेत. त्याचा कुठल्याही मृत अथवा जिवंत व्यक्तीशी संबंध नाही. झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच कथेच्या शेवटी उल्लेख केलेल्या चार काव्य ओळी, या श्री गणेश गं. शिवलाड, परभणी यांनी रचलेल्या "एक कळी न उमललेली" या कवितेतून त्यांच्या परवानगीने घेतल्या आहेत.)
