सेल्फी भाग -२
सेल्फी भाग -२
बांद्रा बॅंड स्टॅण्डवरुन रुमवर आल्या आल्या रॉकीने साराला फोन केला.साराने फोन कट केला.असे दोन तीनदा झाल्यावर साराने रॉकीचा फोन उचलला.
'हॅलो,बोल लवकर, मी कामात आहे,'सारा रुक्षपणे म्हणाली.रॉकी लग्नाचा विषय काढला की टाळाटाळ करतो हे तिच्या लक्षात आले होते.त्याला लग्नाची जबाबदारी न घेता नुसताच टाईमपास करायचा आहे हे एव्हाना तिला कळून चुकले होते.लग्न करण्यासाठी घरच्यांनी लावलेला तगादा आणि दुसरीकडे रॉकीची चाललेली टाळाटाळ याने ती अगदी वैतागून गेली होती.
'हॅलो, ऐक ना पिलू,'रॉकीचा मधाळ स्वर ऐकून साराच्या मनात आशेची पालवी फुटू लागली.तरी तिने थोडे ताणून धरायचे ठरवले.
'बोल लवकर, मी कामात आहे सांगितलं ना तुला?'
साराचा गुरकावणीच स्वर ऐकून रॉकीच्या कपाळावरची शीर तटतटली.पण राग दाखवून चालणार नव्हते.शक्य तितकं मार्दव आणत म्हणाला,
'सारा मेरी जान, मला तुझ्याशी आपल्या लग्नाबद्दल बोलायचं आहे!'
'आपल्या लग्नाबद्दल?'आपल्याला रॉकीचा खूप राग आला आहे असं दाखवायचं विसरून सारा ओरडली.तिच्या स्वरात आनंद, उत्सुकता डोकावत होती.
'हो जानू,'रॉकी आर्जवी स्वरात म्हणाला.'पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर आपण फोनवर कसं बोलायचं? त्यापेक्षा आपण एखाद्या रम्य ठिकाणी जाऊ आणि आपल्या सुंदर भविष्याबद्दल बोलू, त्या सोनेरी क्षणांची साक्ष म्हणून छानपैकी सेल्फी काढू.... तुला पटतंय ना स्वीटहार्ट मी काय म्हणतोय ते!'
रॉकीने आर्जवी स्वरात विचारले आणि सारा हुरळून गेली.इतके दिवस टाळाटाळ करणारा तिचा रॉकी आज अखेर लग्नाला तयार तर झाला होताच शिवाय एखाद्या रमणीय स्थळी जाऊन सेल्फी काढत तो आनंदाचा क्षण साजरा.....
'ऐक सारा,आपण आपल्या दोघांच्या सोयीने एखाद्या संध्याकाळी भेटू आणि आपल्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेवर सेल्फीने शिक्कामोर्तब करू.चालेल ना तुला राणी?'आवाजात शक्य तितके माधुर्य आणत रॉकीने खुंटा बळकट केला.
'होsss' ,म्हणत साराने फोन ठेवला.तिच्या मनात चांदणे फुलले होते.तिने रॉकीबरोबर संसार करण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते लवकरच प्रत्यक्षात येणार होते.मग गावी मम्मी पप्पांना फोन करून ही बातमी सांगू,सगळे कसे खूष होतील....सारा स्वप्नात हरवून गेली.
रॉकीने सनीला फोन केला.'हॅलो सनी,तू माझं एक काम करशील का?'
'अरे एक काम काय, हजार कामं सांग.दोस्तासाठी काय पण करायला हा सनी तयार आहे.'सनी पेशाने फोटोग्राफर होता.रॉकीच्या 'द एडव्हेंचर्स 'मध्ये तो आवड म्हणून रील्स शूट करत असे.
'मी साराला बॅंड स्टॅण्डवर propose करणार आहे. तू करशील त्यावेळचं शूटींग?'
'अरे congrats तुम्हा दोघांना !'सनी ती बातमी ऐकून excite झाला.'आम्हाला अंदाज होताच.मी नक्की येईन.डोंट वरी.कधी आणि कुठे यायचंय ते सांग.'
'ते मी तुला नंतर सांगतो.'रॉकी घाईघाईने उत्तरला.
रॉकी रोज मुंबईचे हवामान, पाऊस, समुद्राच्या भरती ओहोटीच्या वेळा याकडे बारकाईने लक्ष ठेवू लागला.
आणि लवकरच तो दिवस उजाडला ज्या दिवसाची रॉकी वाट पहात होता.
त्या दिवशी हवामान खात्याने सावधानतेचा इशारा दिला होता.समुद्राच्या लाटा जोरदार उसळत असल्याने कोणीही समुद्राजवळ जाऊ नये असे आवाहनही केले होते.
रॉकीने साराला फोन केला,'सारा आज आपण बांद्रा बॅंड स्टॅण्डवर जाऊया.मी तुला तिथेच propose करतो.'
सारा सुद्धा 'द एडव्हेंचर्स 'ची मेंबर असल्याने साहसांची आवड तिला होतीच!ती त्या वादळी हवामानात बांद्रा बॅंड स्टॅण्डवर यायला एका पायावर तयार झाली.रॉकीने मग सनीला फोन केला.
रॉकी,सारा आणि सनी रॉकीच्या बाइक वरून बॅंड स्टॅण्डवर आले.सोसाट्याचा वारा सुटला होता.समुद्राच्या लाटा उंच उंच उसळत होत्या.समुद्रावर त्यांच्यासारखे काही अचाट साहसवीर सोडले तर बाकी जनता फिरकली नव्हती.
तिघेही बाइकवरुन उतरले.सनीने फोटोग्राफरच्या नजरेने आसपास फिरुन एक आदर्श स्पॉट शोधून काढला.पावसाचे सपकारे सर्वांगावर बसत होते पण त्याची त्यांना फिकीर नव्हती.नाहीतरी अशी साहसं करण्यात त्यांचा हातखंडाच होता.
सनीने इशारा करताच रॉकीने खिशातून एक डबी काढली.त्यातील चांदीची अंगठी उजव्या हातात धरुन, एका गुडघ्यावर तो बसला आणि ती अंगठी त्याने सारा समोर धरली आणि विचारले,'will you marry me?'
साराच्या गालांवर गुलाब फुलले.ज्या क्षणाची ती आतुरतेने वाट पहात होती तो क्षण सत्यात साकारत होता.या अमूल्य क्षणांची साठवण सनी आपल्या कॅमेरात बंदिस्त करत होता.
मग सुरू झाले सेल्फी सेशन.रॉकी आणि साराने सूर्याला साक्षी ठेवून, एकमेकांना बिलगलेल्या स्थितीत, अंगठी केंद्रस्थानी ठेवून असे अनेक सेल्फी काढले आणि अचानक रॉकीने प्रस्ताव ठेवला,'आपण त्या खडकावर बसून फोटो काढूया.'
समुद्राच्या आत असलेल्या त्या खडकावर पाण्याच्या लाटा आपटत फुटून त्या वेगामुळे खडकाभोवती पाण्याचा पडदा तयार होत होता.सारा आणि सनी तो खडक बघून उत्तेजित झाले.अगदी वेगळा स्पॉट!
बॅंडस्टॅंडवरील त्या खडकाळ वाटेने हातात हात घालून सारा आणि रॉकी त्या आत आत असलेल्या खडकाच्या दिशेने, सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत चालू लागले.पदोपदी अडखळत दोघेही त्या खडकावर जाऊन बसले.साराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.ती रॉकीला बिलगून बसली होती.पाठीमागून जोरदार लाट उसळत त्या खडकावर आपटून फुटली की दोघेही चिंब भिजून निघत होते.सनीचा कॅमेरा सारा,रॉकी आणि निसर्गाचे ते तांडव चित्रित करत होता.
एक प्रचंड लाट उसळली, तिच्या वेगाने खडकाला आपटून पाणी उंच उंच उसळले.सारा आणि रॉकीभोवती पाण्याचा पडदा तयार झाला आणि....
बेसावध असलेल्या साराला रॉकीने जोराचा धक्का दिला.सारा पाण्यात पडली आणि पहाता पहाता पाण्याबरोबर वाहून जाऊ लागली.
'रॉकी,रॉकी,'साराचा आकांत ऐकू येत होता.तिच्या चेहऱ्यावर भय, अविश्वास स्पष्टपणे दिसत होते.
आणि काही क्षणातच तिचं अस्तित्व पाण्यात मिटून गेलं.....
क्रमशः
