Madhuri Kakade

Inspirational

4  

Madhuri Kakade

Inspirational

सौंदर्य

सौंदर्य

3 mins
454


     सूर्य आग ओकत होता !

चिटपाखरूही नव्हतं आसपास. उन्हाच्या झळा मृगजळ दाखवत होत्या. भानावर येऊन मी अचानक ब्रेक दाबले.अचानक झाडीतून येऊन रस्त्यावर आडवं पळणारं कुत्रं सुदैवाने वाचलं...पण हे पहिल्यांदाच घडलं होतं.... मी पहात होते, माझ्या गाडीचा वेग आधीच कमी केला असता तर ते कुत्रं सहज रस्ता पार करू शकत होत. केवढा अनर्थ घडला असता...


    मी गाडी बाजूला घेत जरा विचार केला. डोक्यात विचारांचा गोंधळ म्हणूनच घडलं हे.... एवढ्यातच आई-बाबा देवाघरी नको होते जायला.... दोन महिन्यांवर आलं नातवाचं लग्न. तेवढं तरी पाहायला हवं होतं.


    त्यांना जाऊन काही दिवस उलटले नाहीत तोच अनाथ असल्याची भावना आजूबाजूचे लोक जागृत करू पाहताहेत. अगदी घरातलेही... मी बंगला बांधला त्यांच्या नातवासाठी एवढं तरी निदान समाधान होतं म्हणा. फारच ओढाताण होते आपली. घरातलं ऑफिसमधलं काम.... आई असती तर म्हणाली असती, अगं जरा आराम कर. नको करूस एवढी धावपळ. स्वतःला जप. नवऱ्याला काय वाटणार आपल्या कष्टाचं ?... शेवटी परक्याचं लेकरू सासरघरी आपण. कितीही वय झालं तरी.


आणि तो ऑफिसला बाॅस... खुशाल जास्तीची ड्युटी सक्तीने....उन्हात सेल्समन असल्यासारखं भटकायचं...काय अवतार झालाय नुसता.... आरशासमोर उभं राहिलं की काळवंडलेला चेहरा पहावेना झालंय. उंटावरून शेळ्या हाकतात सगळे.... आपणच करायची सगळी तारेवरची कसरत... त्यात कामवालीने दांडी मारली चार दिवस. म्हणे लेकीचे बाळंतपण करते.


पिट्टा पडलाय नुसता माझा कामाने.... तासभर मोबाईल घेऊन बसले तरी पोटात दुखतय सगळ्यांच्या. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे नुसतं पळत राहिले म्हणजे सगळे खूश ! कोणत्या जन्मात पाप केलं आहे म्हणून हे दिवस आलेत...? येणारी सूनबाई तरी जाणून घेईल की नाही कोण जाणे ? अन्यथा आहेतच मागचे दिवस पुढे. नशिबाचे भोग, दुसरं काय ? कधीकधी तर वाटतं पळून जावं दूर कुठेतरी.... जंगलात....


    थकवा जास्तच जाणवू लागला. मी गाडी झाडाच्या सावलीत लावून खाली उतरले. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला खडी फोडण्याचं काम चालू असावं. 

मी इकडे-तिकडे पाहिलं. इतक्यात झाडावरून धपकन् उडी मारून ती माझ्या समोर उभी ठाकली ! मी दचकलेच! पंचविशीच्या आसपासची एक काळी कुळकुळीत पण तरतरीत तरुणी होती ती.


"कोण गं तू ? इथे काय करतेस ?"


कमरेला पदर खोचून ती बोलू लागली, "ताई ,मी सुंदरा. चिंचा काढाया चढले व्हते झाडावं. खडी फोडते पल्याड."


      ती खूप ओळख असल्यासारखी बोलत होती.


"एकटीच?" 


ती खळखळून हसली "न्हाय वं. यवढी सनगं कशाला आणली असती यकटीनं? छन्नी, हातुडी, पहार, घमिली....बाकीची माणसं गेलीत दवाखान्यात.

चक्कर येऊन पडलं गंगीचं म्हातारं म्हूंन."


"त्रास नाही होत उन्हाचा ? 

शाळा नाही शिकली ? 

 हाताला लोशन चोपडत विचारलं.


   "कसली साळा आन् कसली बुकं ? आमची जिंदगी म्हंजी वाऱ्यावरची वरात.ठावठिकाणा हाय व्हय यका जाग्यावं?

कष्ट तर पाचवीलाच पुजल्याली..."


"राहतेस कुठे ? कोण-कोण आहे घरी ?"


दगडावर बसून चिंच चावत ती म्हणाली,

"घरी व्हय ? माझा नवरा आन् त्‍याची म्हतारा-म्हतारी.

म्हतारी लय तरास देते बघा.

पण मी काय मनावर घित नाय. तिच्या सासूनी तिला

तरास दिलता म्हूंन बिच्चारी

काढती माझ्यावं राग."


"आणि नवरा?"


"त्यो घरातच असतो. मी यकटीच कमविते. आठ सालाआधीची गोष्ट. खडी फोडत व्हता रस्त्यावं. ट्रक गेला नवऱ्याच्या पायावून... लंगडा झाला... 

तरी मी लय जीव लावते त्याला. लगीन झाल्यावं जेजुरीगडाच्या पायऱ्या चढला व्हता मला पाठकुळी घिऊन. इसरन व्हय मी ?" 

ती लाजली. 


    माझं कुतूहल वाढलं. "तुला मूलबाळ ?"


"दत्तक घेतल्याली पोरगी हाय. दारुड्या बानं दिली व्हती सोडून रस्त्याला. तान्ही असतानाच...मला तर लाटरी लागल्यागत् झालं!माज्या नवऱ्याच्या आपरिशनच्या यळी डाक्टरनी सांगितलं, पोरंबाळं व्हनार न्हाय याला..."

     मी आतून हादरत होते.तिची कहाणी ऐकून.


"ताई आता तुमीच सांगा, माझ्या बानं ल्हानपनीच मला पैशासाठी यका दारुड्याला इकली व्हती. आसं असल्यावर मी त्या लेकराला रस्त्यावं कशी सोडलं वं ?"

       ब्युटीपार्लरमध्ये देण्यासाठीचे पर्समध्ये ठेवलेले ३००० रुपये काढून मी तिला द्यायला लागले. ती नम्रपणे म्हणाली,

"ताई इनाकष्टाचं पचायचं नाय आम्हाला. राग मानू नका."

    

पलीकडे जाऊन दगडावर हातोडा आपटत ती माझ्याकडे पाहून गोड हसली. 'सकारात्मक दृष्टीकोन' असलेल्या तिच्या स्वभावाचं आरसपानी 'सौंदर्य' माझी डबडबलेली नजर टिपत होती ! उन्हात चांदणं पडल्यासारखं वाटलं ! हसताना तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं !

सकारात्मकतेचं सौंदर्य !


Rate this content
Log in

More marathi story from Madhuri Kakade

Similar marathi story from Inspirational