सा य ना ई ड (१४ व १५)
सा य ना ई ड (१४ व १५)
प्रकरण १४
पाणिनी तुरुंगातल्या एका खोलीत अनन्या गुळवणी ला भेटायला आला होता. पडद्याच्या पलीकडे ती शांतपणे आणि समाधानी चेहेऱ्याने बसली होती. नेहेमी पेक्षा जास्तच सुंदर दिसत होती.
“ मला तुम्ही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे करणार आहात ? “
‘’ एक गोष्ट स्पष्ट पणे ध्यानात घे, तुला पिंजऱ्यात उभं केलं तर आईने तुझ्या कडे दिलेल्या त्या पत्रा बद्दल तुला सांगावच लागेल. त्यामुळे त्यात काय मजकूर होता हे मला समजायला हवं.” पाणिनी म्हणाला.
“ मी तुम्हाला सांगितलं ना, की मी ते कधी ही कोणालाही सांगणार नाही.”
“ तुझा वकील म्हणून मला ते माहीत असणे गरजेचे आहे.तुला समजत नाहीये की परिस्थिती किती निराशाजनक आहे. खांडेकर, सरकारी वकील तुझ्यावर ब्लॅक मेल चा आरोप ठेवणार आहेत. तू हर्षल मिरगल ला त्याच्या घरी तुला आणायला , तुझं शिक्षण पूर्ण करायला , त्याच्या मृत्यू पत्रात उर्वरित वारस म्हणून तुझं नाव लावायला त्याला भाग पाडलस म्हणून. त्यामुळे न्यायाधीश एवढे पूर्वग्रह दूषित होतील की तू त्याला विष दिल्याचा थोडा जरी पुरावा सादर झाला तरी तू खुनी असल्याचा निवडा देतील.”
“ मग आपण काय करू शकू?” तिने विचारलं.
“ आपण विरुध्द विधाने करू आणि त्यांना दाखवून देऊ की तू तसे ब्लॅक मेल केलेले नाहीस.”
“ तुम्हाला हे कधी लक्षात नाही का आले की मी या पत्राचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला नाही कारण सरकारी वकील बरोबर आहेत ?”
पाणिनीने भुवया उंचावल्या.
“ मी ब्लॅक मेल केलंय त्याला ! आणि आणखी काही गोष्टींसाठी नाही केलं याची खंत वाटत्ये ! “
पाणिनी ने दचकून तिचे बोलणे कोणी ऐकले नाही ना याचा कानोसा घेतला.” तुझ्या आवाजातला ती कटुता काढून टाक “
“ मिरगल खुनी होता माझ्या वडीलांचा त्यामुळेच माझ्या आईलाही प्राण गमवावे लागले.”
“ तुला आईने दिलेल्या पत्राचे काय केलेस तू?”
“ जाळून टाकल ते.”
“ काय होत पत्रात?”
“ आईने मला खुलासा केला होता की माझा जन्म विवाह बंधनातूनच झाला होता.आणि बरंच काही पण मी जेव्हा ते पत्र वाचत गेले तेव्हा दोन ओळी मधले, प्रत्यक्षात शब्दाने न लिहिलेले पण सूचित केलेले अनेक संकेत मला मिळत गेले.भागीदारीतले काही व्यवहार. हर्षल ने काही गोष्टीत अशी काही फसवणूक केली होती की विचारू नका. शाळेच्या .मोठया इमारतीचे बांधकाम त्यातूनच केले आणि त्याची जबाबदारी माझ्या वडिलांवर येईल अशी व्यवस्था केली. माझ्या वडिलांनी जेव्हा हे सर्व हर्षल ने च केल्याचा पुरावा दाखवला तेव्हा त्याने माझ्या वडलांचा खून केला.”
“माझ्या आईने एक पत्र बँकेत ठेऊन दिलंय हे हर्षल ला माहीत होते पण त्यात काय लिहिलंय याची त्याला कल्पना नव्हती. त्याच गोष्टीची त्याला भीती वाटत होती.माझ्या आईला कितपत माहिती असेल याचे त्याला नवल वाटत होते. मी एक जुगार खेळले. त्याला सांगितलं की त्याने माझ्या वडलाना मारल्याचे पुरावे ता पत्रात आहेत.भागीदारी च्या व्यवहारात केलेल्या घोटाळ्याचे ही पुरावे आहेत. त्या मुळेच त्याच्या घरी रहायला त्याने मला बोलावले , शिक्षणाचा खर्च केला, म्हणूनच सरकारी वकील जर म्हणतील की मी त्याला ब्लॅक मेल केले, तर ते सत्य आहे ! “
“ तुला ते पत्र मिळाल्यावर तू माझ्याकडे आली असतीस आणि मला माझ्या पद्धतीने हे....”
पाणिनी म्हणाला पण त्याला मधेच तोडत ती म्हणाली. “ मी जेवढ केलं त्यापेक्षा तुम्ही अधिक चांगलं करू शकला नसता., लक्षात घ्या, त्या पत्रात फक्त संशय व्यक्त करण्यात आला होता, कसलाही पुरावा नव्हता. मी त्यावर एक जुगार खेळून त्याला ब्लॅक मेल केले तुम्ही ते करू शकला नसता.”
“ मी गुप्त हेर लाऊन पुरावे गोळा केले असते.”
“ नसतं शक्य झालं तुम्हाला ते. तो फार चतुर होता, पण कालांतराने त्याला कोणी पिन मारली माहीत नाही पण त्याच्या लक्षात आलं की मी नुसतीच पोकळ धमक्या देत्ये त्याला.म्हणूनच मी आणि निमिष जयकर जेव्हा प्रेमात पडलो तेव्हा त्याने त्याचे हुकमी हत्यार बाहेर काढले आणि सांगितले की मी जर लग्नाच्या निर्णयावर ठाम राहिले तर मी ब्लॅक मेलर असल्याचे आणि अनौरस मुलगी असल्याचे जयकर च्या कुटुंबाला तो सांगेल.”
“आता सांगा पाणिनी पटवर्धन , माझ्या वरच्या या खटल्यावर कितपत परिणाम होईल?”
“असं दिसतंय की जणू काही तूच त्याला मारलं आहेस.” पाणिनी म्हणाला.
“ मलाही तसच वाटतंय. आणि तुमच्या देहबोली वरून तरी मला फार संधी आहे अस वाटत नाही.”
पाणिनी उठला , बाहेर गेला, पत्रकार बाहेर होते त्यांना सामोरा गेला,” बोला काय हवंय तुम्हाला?”
“ अनन्याची हकीगत” एक पत्रकार म्हणाला.
“ ती तुम्हाला उद्या कोर्टातूनच समजेल.”
“ बर , मग त्या प्रकरणाबद्दल सांगा, बचाव पक्षाची स्थिती काय आहे?”
“ माझी अशील ही योगायोगाने घडलेल्या परस्पर विरोधी घटनांची शिकार बनली आहे.” पाणिनी ने उत्तरं दिले.
प्रकरण १५
राज्य सरकार विरुध्द अनन्या गुळवणी असा खटला उभा राहिला तेव्हा पत्रकारांचे दृष्टीने ‘ त्यात हवी ती सर्व नाट्यमयता ’ होती. पत्रकारांनी आरोपीचा अत्यंत सुंदर म्हणून उल्लेख करून आधीच प्रसिद्धी दिली होती.आता हे सर्व श्रुत झालं होत की तिच्या प्रियकराला आता तिच्याच विरुध्द साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाईल कारण पळून जाऊन लग्न करण्यापूर्वीच ते पकडले गेले. अशीही एक वदंता होती की सरकारी वकील अस सिध्द करणार आहेत की वरपांगी लाजाळू आणि सुंदर दिसणारी आरोपी ही प्रत्यक्षात अत्यंत थंड माथ्याची ब्लॅक मेलर आहे. आणि जेव्हा मिरगल ने तिच्या या ब्लॅक मेलिंग ला न घाबरता,तिला जयकर शी लग्न करायला विरोध केला तेव्हा तिने त्याला विषप्रयोग करून मारले.
या शिवाय या खटल्यात अनेक कायदेशीर बाबींचा थरार होता. आरोपीचा वकील पाणिनी पटवर्धन, हा आपल्या नाविन्य पूर्ण आणि नाट्यमय क्लुप्त्यांसाठी प्रसिद्ध आहे, तोच अशा क्लुप्त्या लढवताना रंगे हात पकडला गेला होता. साध्या गोळ्यांची बाटली तळ्यात टाकून पाणिनी पटवर्धन ने पुराव्यात गोंधळ निर्माण केला असे सिध्द करण्यात जरी अडचण असली तरी सरकारी वकील तशा प्रयत्नात होते.
औषधाच्या अंमलाखाली असताना डॉक्टरां समोर टेप रेकॉर्डवर आरोपीने दिलेला कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो का ? हा तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा ही होता.
या क्षेत्रातील वर्तुळात अस बोललं जात होत की या खटल्यात पाणिनी पटवर्धन ला बचाव करण्या सारखे फारसे काही नाही, सतत कायदेशीर त्रुटी काढत राहणे , तांत्रिक बाबींवर हरकती घेणे असे करून खटला लांबवणे एवढेच त्याच्या हाती आहे.
तो हा खटला जिंकू शकेल का यावर अनेक वकिलांनी पैजा लावल्या होत्या.
.......आणि आता. हेरंब खांडेकर कोर्टाच्या आवारात शिरत होते...
. खांडेकररांनी केलेले प्राथमिक भाषण म्हणजे बचाव पक्षाला तिखट पण सभ्य शब्दात वाहिलेली शिव्यांची लाखोली होती.
त्यांनी त्याच्या भाषणाचा शेवट करताना म्हंटल, “ न्यायाधीश आणि कोर्टात जमलेल्या सभ्य स्त्री पुरुषांनी आरोपीच्या वकिलांनी पत्रकारांना उद्देशून केलेले विधान वाचले असेल, की ‘ माझी अशील ही योगायोगाने घडलेल्या परस्पर विरोधी घटनांची शिकार बनली आहे ‘ आम्ही सिध्द करणार आहोत की आरोपी ही योगायोगाने नाही तर जाणून बुजूनच खुनी, ब्लॅक मेलर झाली.”
एवढे बोलून त्यांनी कंबरेत वाकून नाटकी पणाने न्यायाधीशांना अभिवादन केले.आणि दमदार पावलं टाकत वकिलांसाठी राखून ठेवलेल्या जागी मांडलेल्या आसनावर जागा अडवल्या सारखे बसले. त्यांचा आवेश असा होता की विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करायची ताकद त्यांच्यात होती.
“बचाव पक्षाला काही बोलायचं आहे का?” न्यायाधीशांनी विचारले
“ अत्ता यावेळी नाही बोलायचे.” पाणिनी म्हणाला.” म्हणजे प्राथमिक भाषण करायची गरजच नाही. कारण खांडेकर नी जे सिद्ध करायच्या वल्गना केल्या ते कधीही सिध्द होवू शकणार नाही.” एवढ्याच बोलण्यातून.पाणिनी ने खांडेकर च्या लंब्याचवड्या भाषणातली हवाच काढून घेतली.
न्यायाधीश हिरण्यगर्भ सरकारी वकिलांकडे वळून म्हणाले, “ तुमचा पहिला साक्षीदार बोलवा.”
“डॉ. नितीन राजे” खांडेकर नी नाव पुकारले.
डॉक्टरांनी पुढे येऊन शपथ घेतली. डॉक्टरांची पदवी, सर्जन म्हणून त्यांची योग्यता,या बद्दल उलट तपासणीचे हक्क राखून ठेवत पाणिनी ने मान्यता दिली त्यामुळे या गोष्टी बद्दलचे प्रश्न खांडेकर यांना विचारण्याची गरज पडली नाही. “ डॉक्टर,तुम्ही मिरगल हयात असताना आणि त्याच्या शेवटच्या आजारपणात त्याच्यावर रुग्ण म्हणून उपचार करत होता?”
“ होय “
“ मिरगल शेवटच्या घटका मोजत असताना तुम्ही त्याच्या सोबत होतात?”
“ तो गेल्या नंतर थोड्या वेळाने मी आलो.”
“ त्याची त्यावेळी शारीरिक स्थिती कशी होती? तुमच निरीक्षण काय होते?”
‘ माझ्या लक्षात आलं की त्वचेवर लालसर पणा आला आहे., एक पूर्व इतिहास आहे.....”
“एक मिनिट,” पाणिनी मधेच उठून उभा राहिला. “ माझी या पूर्व इतिहासाला हरकत आहे कारण हो गोष्ट ऐकीव आहे. डॉक्टर मी समजतो की हे तुम्ही नर्सेस ने तुम्हाला सांगितलेल्या माहिती च्या आधारे म्हणताय.”
“हो बरोबर.” डॉक्टर म्हणाले.
“ मग ते ऐकीव आहे. तुम्ही फक्त शरीराच्या प्रत्यक्ष स्थिती बद्दल बोला.” न्यायाधीश हिरण्यगर्भ म्हणाले.
“माझ्या लक्षात आलं की त्वचेवर लालसर पणा आला आहे, त्याला जेव्हा झटका आला तेव्हा तो चॉकलेट घातलेलं दूध पीत होता.”
“एक मिनिट,” पाणिनी पुन्हा उठून उभा राहिला. “ या उत्तरातला शेवटचा भाग विचारात घेऊ नये, चॉकलेट बद्दलचा. कारण तो भाग म्हणजे साक्षीदाराने काढलेला निष्कर्ष आहे.आणि दिलेले उत्तर हे, विचारलेल्या प्रश्नाचे नाही.”
“ ते वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून साक्ष देत आहेत. ते त्यांचे मत हे तज्ज्ञ म्हणून देऊ शकतात.” खांडेकर म्हणाले.
“ त्यांनी वैद्यकीय निष्कर्ष काढू देत.पण परिस्थितीजन्य पुरावा या विषया मधील ते तज्ज्ञ नाहीत. जे बघितले तेवढेच त्यांना सांगू दे. योग्य वेळ येईल तेव्हा त्यांनी वैद्यकीय अनुमान काढू दे.” पाणिनी म्हणाला.
“ ओ हो, हा एक तांत्रिक मुद्दा आहे.” खांडेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
“ बचाव पक्ष आपणास सूचित करू इच्छितो की या खटल्याची परिस्थिती बघता, तांत्रिक बाबी मधे कायद्याने देऊ केलेल्या प्रत्येक सवलतीचा फायदा घेण्याचा आमचा इरादा आहे. ज्याचा उल्लेख सरकारी वकील तांत्रिक बाब असा करत आहे ते प्रत्यक्षात, आरोपी अन्यायाने गुन्हेगार ठरवला जाऊ नये म्हणून कायद्याने आरोपीला दिलेले सुरक्षा कवच आहे. बचाव पक्षाचा आग्रह आहे की यातील एकही संरक्षण दुर्लक्षिले जाता काम नये.”
“ बचाव पक्षाचे म्हणणे मान्य केले जात आहे. डॉक्टरांच्या उत्तरातील चॉकलेट बद्दलचा भाग वगळण्यात आला आहे. ” न्यायाधीशांनी आदेश दिला.
“ ठीक आहे.” खांडेकर चिडून म्हणाले.
“ डॉक्टर तुम्ही काय बघितलंत? तुम्हाला जे दिसलंय तेवढचं सांगा कारण तुम्ही अत्ता दुसऱ्या वकिलांनी काय हरकत घेतली ते पाहिलंय.” खांडेकर म्हणाले.
“ मी मिरगलला पाहिले. तो गेलेला होता. त्वचेवर मी लाल छटा बघितली.फरशीवर फुटलेल्या कपाचे तुकडे बघितले.मी खाली सांडलेले आणि मिरगल च्या शर्टवर ओघळलेले एक पातळ पेय पाहिले त्याला चॉकलेट चा वास येत होता.”
“ छान, जेव्हा कोर्टाच्या आदेशानुसार, मिरगलचे पुरलेले प्रेत पुन्हा उकरून काढले गेले तेव्हा तुम्ही हजर होतात? “
“ मी होतो हजर.”
“ शव विच्छेदन प्रक्रियेत तुम्ही मदत केली?”
“होय”
“ त्या प्रक्रियेनंतर तुम्ही मृत्यूचे कारण काय होते याचे अनुमान काढले?’’
“ हो.”
“ काय कारण होते?”
“ मी अनुमान काढले की हर्षल मिरगल शरीरात विष गेल्यामुळे मरण पावला.”
“ विषाच्या प्रकारा बद्दल तुमचे अनुमान काय होते?”
“ पोटॅशियम सायनाईड “
“ घ्या उलट तपासणी.” खांडेकर विजयोन्मादाने म्हणाले.
पाणिनी उभा राहिला, ‘’ सरकारी वकिलांनी उल्लेख केलेली सर्व लक्षणे,तुम्ही मिरगल ला पाहिलेत तेव्हा तुमच्या लक्षात आली होती?”
“ हो “
“ तुम्ही त्या सर्वांचा विचार केला होता?”
“ नाही, मी पहिली ती.”
“ तुम्ही ती काळजी पूर्वक विचारात घेतली नाही?”
“ त्या वेळी नाही.”
“ का?”
“ कारण त्या सर्व गोष्टींचे एकत्रित महत्व तेव्हाच काय अजूनही माझ्या लक्षात आलेले नाही.”
“तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टर म्हणूनच बोलावले गेले होते?”
“ अर्थात”
“ तो माणूस गेल्याचे तुम्हाला माहीत होते?”
“ हो”
“ तुम्हाला माहीत होते की दाखल्यात मृत्यूचे कारण द्यावे लागणार आहे.?”
“ हो”
“ म्हणून तुम्ही शरीराची तपासणी करून आणि आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेऊन मृत्यूचे कारण निश्चित केलेत?”
“ हो , आणि नाही सुध्दा.”
“ म्हणजे काय?”
“ म्हणजे मला म्हणायचं आहे
की मी वरवरचीच तपासणी केली.”
“ आणि अशी वरवरची तपासणी करून मृत्यूचे कारण काय असावे याचा निर्णय घेतला?”
“ मी मृत्यू दाखला सही करून दिला.”
“ प्रश्न टाळू नका डॉक्टर .मी तुम्हाला विचारतोय की त्यावेळी तुम्ही कारणा बाबत निर्णय घेतला की नाही.”
“ हो”
“ आणि तुम्ही ठरवलं की रक्त वाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होऊन तो गेला? बोला डॉक्टर, ठरवलं की नाहीत? “
“ हो”
“ आणि ते कारण नमूद करून तुम्ही दाखल्यावर सही केली?”
“ हो सर.”
“ आणि आता तुम्हाला वाटतंय की ते कारण देण्यात तुमची चूक झाली होती?”
“ नक्की वाटतंय”
“ आता तुम्हाला वाटतंय की मिरगल रक्त वाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होऊन गेला? “
“ मला माहिती आहे आता की तो त्या कारणाने गेला नाही.”
“ तुम्हाला मान्य आहे की त्याच्या मृत्यूचे कारण देताना तुमची चूक झाली.”
“हो सर आणि मला त्या मागची कारण मिमांसा सांगायची आहे.”
“मला ते ऐकण्यात सध्या तरी रस नाही. “ पाणिनी म्हणाला .” मला एवढंच ऐकण्यात रस आहे की तुम्ही चुकीचा निष्कर्ष काढलात की नाही? हो किंवा नाही या स्वरुपात उत्तर द्या.”
“ हो.” डॉक्टरांचे ओठ रागाने थरथरत होते.”
“ चॉकलेट प्याल्यामुळे रक्त वाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात का?”
“ बिलकुल नाही.”
“ ज्या क्षणी मिरगल गेला तेव्हा त्याच्या मृत्यूचा दाखला आपल्याला द्यावा लागणार आहे हे तुम्हाला माहीत असेल ना?”
“ अर्थातच, स्वाभाविकपणे.”
“ म्हणून तुम्ही ते कारण शोधण्यासाठी आजू बाजूला पाहिलेत?”
“ मी नेहेमीच्या पद्धतीने जसे इतरत्र ही लक्ष देतो तसे.”
“ तुम्हाला म्हणायचयं की तुमची नेहेमीची पद्धत ही निष्काळजी पणाची आणि भोंगळ पणाची आहे?”
“ अजिबात नाही.”
“ तुम्हाला म्हणायचयं की तुमची नेहेमीची पद्धत ही मृत्यूचे कारण ठरवण्यासाठी वापरली गेली नाही?”
“ नक्कीच नाही.”
“ तुम्हाला न्यायाधीशांची अशी समजूत करून द्यायची आहे का की त्या वेळेला मृत्यूचे कारण ठरवताना,तुम्ही तुमचं व्यावसायिक कौशल्य,अनुभव,अंदाज सर्व काही पणाला लावले होते?”
“ मला कबूल करावेच लागेल की त्वचेवरील लाली चा मुद्दा माझ्या डोक्यातून निसटला.”
“ म्हणजे, तुम्हाला न्यायाधीशांची अशी समजूत करून द्यायची आहे का की त्यावेळी तुम्ही तुमचं व्यावसायिक कौशल्य पूर्ण क्षमतेने वापरले नाही?”
“ म्हणजे... मी... चुकीचे अनुमान काढले एवढेच मी म्हणू शकतो.”
“म्हणजेच तुम्ही तुमच्यातले सर्वोत्कृष्ट असे दिले नाही.”
“ मान्य नाही हे मला, मी सर्वोत्कृष्ट असेच दिले.”
“ तुम्ही सर्व वस्तुस्थिती आणि परिस्थिती विचारात घेतली होती?”
“ नक्कीच ! “
“ मग या म्हणण्याला अर्थ काय तुमच्या की त्वचे वरील लालसर पणा तुम्ही विचारात घेतला नाही?”
“ त्यावेळेला त्या लालसर पणाचा मृत्यूच्या कारणाशी काही संबंध असेल असे मला वाटले नाही.”
“ तुमच्या नजरेस तो लाल पणा आला होता?”
“हो, लक्षात आला होता.”
“ मृत्यूचे कारण ठरवताना जे अन्य मुद्दे गृहित धरले होते त्यात हा पण मुद्दा होता?”
“ हो विचारात घेतला होता.” डॉक्टर म्हणाले.
“ आणि नंतरच ठरवलं की हा लालसर पणा रक्ताच्या गुठळ्या मुळे मृत्यू आल्याचे दाखवतो.”
“ नक्कीच नाही, उलट पक्षी, असा लालसर पणा सायनाईड मुळे किंवा कार्बन मोनोक्साईड मुळे मृत्यू आल्याचे दाखवतो.”
“ तुमच्या हे त्यावेळी लक्षात आलं ?”
“ हो”
“ आणि तुम्ही ते मृत्यू चे कारण ठरवताना विचारात घेतले?”
“ हो, एका अर्थी.”
“ आणि त्यावेळी सायनाईड मुळे मृत्यू झाला असेल असे तुम्हाला वाटले नाही?”
“ त्यावेळी नाही वाटले.”
“ कारण काय?”
“ कारण त्यावेळी मला त्यावेळेच्या परिस्थिती मधील काही घटनांची माहिती नव्हती. ज्याच्यामुळे नंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळाच पैलू प्राप्त झाला.”
‘ त्या गोष्टींची माहीती झाल्यावर नंतरच्या काळात तुम्ही तुमचे मत बदललेत ?”
“ हो”- डॉक्टर
“ म्हणजे कोणी तरी नंतर तुम्हाला काहीतरी सांगितले म्हणून तुम्ही तुमचे मत बदलले?”
“ नाही सर तसे नाही.”
“कोणी तरी नंतर तुम्हाला काहीतरी सांगितले म्हणून त्वचेच्या लालसर पणाबद्दल तुम्ही तुमचे मत बदललेत ?”
डॉक्टर घुटमळले. असहाय्य पणे त्यांनी सरकारी वकिलांकडे पाहिले. “ मी अस म्हंटल की प्रकरणातील पूर्व इतिहास बघून .”
“ जेव्हा तुम्ही पूर्व इतिहास असं म्हणताय तेव्हा त्याचा अर्थ कोणीतरी तुम्हाला सांगितलेली गोष्ट?”
“ हो”
“ म्हणजेच तुम्ही तुमचे मत ऐकीव पुराव्याच्या आधारे बदलले?”
“ मी तसे म्हणालोच नाही.”
“त्वचेच्या लालसर पणाबद्दल तुम्ही तुमचे मत ऐकीव पुराव्याच्या आधारे बदललेत ?”
“ बर , ठीक आहे. तुम्हाला तसे म्हणायचे असेल तर “
“ आभारी आहे डॉक्टर. “ पाणिनी म्हणाला.” झालं माझं !”
“ थांबा जरा डॉक्टर, “ हेरंब खांडेकर उठून उभे रहात म्हणाले. “ फेर तपासणीत मला काही प्रश्न . पुन्हा विचारायचे आहेत खरं तर मला अपेक्षा होती की त्याचा उलट तपासणीत अंतर्भाव होईल.”
“ डॉक्टर, तुम्ही आता का म्हणताय की हर्षल मिरगल चा मृत्यू, पोटॅशिअम सायनाईड ने झाला?”
पाणिनी पुन्हा उठला. “ एक मिनिट, या प्रश्नाला माझी हरकत आहे.ही फेरतपासणी योग्य नाही. सरतपासणीतच हा मुद्दा विचारायला जायला हवा होता. काय घडलंय इथे लक्षात घ्या. सरतपासणी पेक्षा या मुद्द्याला उलट तपासणीत उत्तर दिले गेले तर ते अधिक प्रभावी ठरेल असा विचार करून सरकारी वकिलांनी एक जुगार खेळलाय. तो आता त्यांच्यावर बंधनकारक आहे ! “
न्यायाधीशांनी आपल्या हनुवटीवर बोटाने हलकेच चापटी मारली. काय निर्णय घ्यावा या संभ्रमात ते दिसले.
“ मी जरा खुलासा करू का?” खांडेकर यांनी विचारले.
न्यायाधीशांनी मानेने नकार दिला. “ मला वाटतं की परिस्थिती पुरेशी बोलकी आहे. मला अस वाटत की वस्तुस्थितीचा विचार केला आणि कायद्यातील नियमावली पाहिली तर बचावाच्या वकिलांच म्हणणे बरोबर आहे. या कोर्टाचे काम हे एखाद्या खेळाच्या पंचाचे असते तसे दोन वकिलांमधील वादाचा निर्णय देणाऱ्या पंचाचे नाही तर न्यायाची अंमलबजावणी करणे हे आहे. उलट तपासणी घेणाऱ्या वकिलाचा गोंधळ व्हावा म्हणून काही महत्वाच्या घटना सर तपासणीमध्ये न आणता मुद्दाम उलट तपासणीत पुढे येतील असे सापळे सर्रास लावले जातात , अत्ता असाच प्रकार सरकारी वकिलांनी केला पण पाणिनी पटवर्धन यांनी अत्यंत चातुर्याने तो ओळखला आणि त्यातून सुटले.”
‘’ परंतू, कोर्टाला याची पूर्ण कल्पना आहे की साक्षीदाराच्या तपासणी यथा योग्य आहे की नाही हे ठरवायचा पूर्ण अधिकार कोर्टाला आहे.मी आधी म्हंटल्या प्रमाणे हे काही दोन वकिलांमधील कायद्याचे युद्ध नाही. महत्वाच्या घटनांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. कोर्ट साक्षीदाराला उत्तर द्यायची परवानगी देत आहे पण त्याच बरोबर हे पण स्पष्ट पणे सूचित करत आहे की बचाव पक्षाचे सर्व तांत्रिक हक्क अबाधित आहेत. डॉक्टर उत्तर द्या खांडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाचे.”
आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टर मुद्दामच थोडेसे खाकरले “ सुरुवातीला मी निष्कर्ष काढला होता की,रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे तो गेला. शव विच्छेदानात दिसले की रक्ताच्या गुठळ्या झाल्या नव्हत्या. एवढेच काय त्यातून मृत्यूचे कारणच उघड झालं नाही ! या सर्वाचा विचार करता, माझे असे स्पष्ट मत आहे की पोटॅशिअम सायनाईड मुळेच त्याचा मृत्यू आला आहे.”
“ बास ! एवढंच मला काढून घ्यायचं होत, तुम्ही हवी तर पुन्हा उलट तपासाणी घेऊ शकता.” खांडेकर म्हणाले.पाणिनी पाणिनी पटवर्धन पुन्हा उठून उभा राहिला,
“ दुसऱ्या शब्दात सांगायचं तर,आता तुम्ही जे म्हणताय की तो विष प्रयोगामुळे मेला, याचे कारण असे आहे की दुसरे कोणतेही कारण तुम्ही देऊ शकत नाही?”
“ तशा अर्थाने ते खरे आहे.” डॉक्टर उद्गारले.
“ तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे डॉक्टर, की काही प्रकरणात, देशातले या क्षेत्रातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ सुध्दा मृत्यूचे कारण सांगू शकत नाहीत?”
“ माहिती आहे पण अशी उदाहरणे फार आहेत असे नाही वाटत मला.”
“ किती टक्केवारी असेल?”
“मला नाही वाटत की त्याचा काही संबंध आहे याच्याशी.”
“ मला वाटतंय की संबंध आहे. काय टक्केवारी असेल?”
“ ती बदलती आहे.”
“ म्हणजे ही टक्केवारी काही प्रमाणात बदलते?”
“ अशा पद्धतीने मांडता येणार नाही पण योग्य पद्धतीने उत्तर देतो.”
“अगदी अशाच पध्दतीने मृत्यू आल्याने कारण देता आले नाही अशी अन्य प्रकरणे तुम्ही हाताळली आहेत का?” – पाणिनी.
“ हो “
“ तीन ते पाच टक्के ?”
“ होय”
“ या तीन ते पाच टक्केवारी मधल्या प्रकरणात, जिथे नेमके कारण देता आले नाही त्या ठिकाणी तुम्ही सायनाईड ने मृत्यू असेच कारण दिले का?”
“ असमंजस पणे बोलू नका पाणिनी पटवर्धन. नक्कीच असे कारण दिले नाही.”
“ अशा काही तुम्ही हाताळलेल्या प्रकरणात तुम्ही दाखला दिला आहे का?”
“नाही “
अशा काही प्रकरणात मृत्यूचे कारण माहीत नाही असा दाखला तुम्ही दिला आहे?”
डॉक्टर अडखळले, “ अं, अं नाही.”
“ तुम्हाला कारण माहीत नव्हतं, तुम्हाला ते शोधून काढता आलं नव्हतं ! “
“ बरोब्बर.”
“ तरी तुम्ही तसे दाखल्यात नमूद केले नाहीत ?”
“ मृत्यू च्या दाखल्यात, काहीतरी कारण द्यावेच लागते.वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याकडे, अशा कारणांची यादीच असते, आणि जेव्हा नेमक्या कोणत्या कारणाने मरण आले हे कळणे अशक्य असते तेव्हा या यादीमधील एखादे कारण दिले जाते.”
“ म्हणजे जेव्हा नेमके कारण समजत नाही तेव्हा तुम्ही काल्पनिक कारण दाखवता.?”
“ तुम्हाला काहीतरी कारण द्यावेच लागते पण ! “
“ तेच म्हणायचयं मला,ज्या ठिकाणी तुम्ही कारण देऊ शकला नाहीत, तेथे तुम्ही सरळ सरळ काहीतरी कारण टाकले? “
“ हो अशा प्रकरणात टाकले. “
“ म्हणजे तुमच्या कडील किमान तीन टक्के प्रकरणात तुम्ही जाणीव पूर्वक खोटा मृत्यू दाखला दिला?”
“ खोटा नाही दिला.”
“ चुकीचा होता?”
“ मला नाही माहीत”
“ तरी तुम्ही दाखल्यात नमूद केले की तुम्हाला कारण माहीत आहे?”
“ सगळेच डॉक्टर अस करतात.”
“ आणि तुम्ही पण करता?”
“ तुम्हाला हवा तसा अर्थ काढा तुम्ही.”
“ या प्रकरणात तुम्ही म्हणाला होतात की मृत्यू सायनाईड ने झाला, हा अपवाद वगळता हे प्रकरण इतर प्रकरणा प्रमाणेच होत ? “
“ हे प्रकरण अगदी हुबेहूब अन्य प्रकरणा प्रमाणे नाही.”
“ का नाही?”
“ कारण यात सायनाईड च्या वापराच्या शक्यतेचा पुरावा आहे.”
“ काय पुरावा आहे?”
“ कातडीचा लालसर रंग”
“परंतू तुम्ही रक्तवाहिन्या मधील गुठळ्या मुळे मृत्यू असे कारण दाखल्यात दिले तेव्हा हा रंग तुम्हाला दिसलाच होता ना?”
“ होय.”
“ ठीक आहे , आणखी काय होत तिथे?”
“ आरोपीने स्वतः दिलेला कवुली जबाब ! “
“ आता कसं बोललात ! तुम्ही नंतर च्या काळात दाखला बदललात याचे कारण म्हणजे आरोपीने दिलेला कबुली जबाब आणि त्यात तिने केलेला विष प्रयोग , याबद्दल तुम्हाला सांगितल गेल होत.”
“ ते अनेक कारणा मधील एक कारण आहे.”
“ पण अत्ता या ठिकाणी तुम्हाला सांगण्यासारखे ते एकमेव महत्वाचं कारण आहे ? “
“ ते आहेच आणि दुसरे म्हणजे अन्य कोणतेही दृष्य स्वरूपाचे कारण नव्हते.”
“पण तुम्ही अत्ताच सांगितले की बऱ्यापैकी टक्केवारी मधे तुम्ही मृत्यू चे कारण सांगू शकला नाही म्हणून?”
“ हो बरोबर आहे.”
“ पण तुमचा दाखला तसे नमूद करत नाही.”
“ मी मृत्यू चे कारण दिलंय.”
तुम्हाला प्रत्यक्षात कारण माहीत नसूनही विशिष्ठ कारण देऊन तुम्ही दाखला सही करून दिला?”
“ वैद्यकीय क्षेत्रात ती प्रचलित पद्धत आहे.”
“ ठीक आहे , “ पाणिनी उलट तपासणी संपवण्याच्या दृष्टीने म्हणाला.
खांडेकर यांनी त्यांच्या सहाय्यक वकिलाकडे पाहिले.आणि कानात कुजबुजले. सकृत दर्शनी ते डॉक्टरांच्या साक्षीवर समाधानी नव्हते पण झालेले नुकसान कसे भरून काढायचे त्यांना कळत नव्हते.
“ आणखी काही प्रश्न आहेत?” न्यायाधीशांनी विचारले.
“ नाही.” खांडेकर यांनी मान हलवून नकार दिला. त्यांची देहबोलीच सांगत होती की सहाय्यकाच्या कानात कुजबुज ल्या मुळे आपली स्थिती आणखीनच नाजुक झाली आहे.