Vishal Ingole

Inspirational

2.8  

Vishal Ingole

Inspirational

"पत्ताच नसलेले पत्र..."

"पत्ताच नसलेले पत्र..."

3 mins
9.0K


आज ज़रा शुद्धीवर आल्यावर, तुम्ही लिहून ठेवलेले पत्र ... नव्हे तुमच्या निर्जीव खिश्यातला तो सजीव कागद वाचायला घेतला, अन शरीर नक्की कश्यानं तुडुंब भरुन आलय हे शब्दाच्या कोणत्याच चौकटीत बसेना. शब्दही हतबल झाले, निर्जीव झाले की काय सांगता येईना नक्की.

तुम्ही लिहून ठेवले,

"मी कर्ज, दुष्काळ, नापीकी, अतिवृष्टी या अस्मानी व महागाई, मालाचे उतरलेले भाव. अश्या सुलतानी संकटांना कंटाळलो, हतबल झालो हे नक्की पण म्हणून आत्महत्या करत नाही मी. पण तसे लिहावे लागेल. कारण माझी आत्महत्या 'शेतकरी आत्महत्या ' सिद्ध व्हावी म्हणजे या मृत देहाला तरी वाढवून भाव मिळेल. वाकलेल्या घराला जरासा आधार मिळेल,असे साधे बेरजेचे गणीत आहे."

काय उत्तर देऊ मी या पत्राला..? आणि कोणत्या पत्त्यावर देऊ पाठवून? कसे सांगू? कोणत्या फुटपट्टित मोजू, तुम्ही असण्या नसण्यातला फरक?

लग्नाच्या पहिल्या रात्री बोलला होता, जगण्याच्या धड़पडीत अन पड़झडीत लढायला आता दोनाचे चार हात झाले. तू फ़क्त ज़रा स्वप्नांना मर्यादा आखून घे. म्हणजे नांदता येईल सुखाने, नसेल पैसा, सुबत्ता पण या जमिनीतून  सोनं पिकवता येई तू असल्यावर. कितीतरी संकटग्रस्त रात्रींचे ते संवाद तसेच ताजे आहेत. सारेच प्रसंग जत्रा भारल्यागत आवाज करताहेत सभोवती अन मधोमध गोल फिराणाऱ्या आकाशपाळण्या सारखी मी.

आयुष्याच्या वाटेवर सोबत चालतांना मी बघितले आहे, तुमचे कितीतरी मित्र पैसे नावाची जादूची कांडी फिरवून चिटकले सरकार दरबारी, व्यापारात गाठली उंची कित्येकांनी, बदलत गेला दर्जा जीवनाचा पण तुम्ही गुंतला नाही कधी न्यूनगंडाच्या भोवाऱ्यात. चरफडला असाल. कधी शिक्षण, व्यवस्थेच्या नावाने पण तोल जाऊ दिला नाही. सोडला नाही हट्ट शिकून पोराला मोठे करण्याचा. जगण्याच्या सुत्रांचे पुस्तक होतात तुम्ही माझे तरीही ....हे घडावे..का? हे भले मोठे प्रश्नचिन्ह उभे रहाते उभ्या आयुष्याला अजगरासारखे लपेटून. अन जीव गुदमरायला लागतो, डोळयापुढे फ़क्त अंधार.आठवते एक एक कविता तुम्ही लिहिलेली....कोणत्याच कवितेत दिसत नाही आत्महत्येच्या गावाकडे जाणारा रस्ता..असतील जरी तिच्यात भोगलेल्या ठाई ठाई खस्ता. जगण्याचे बोट धरून चाललेला हां प्रवास असा अचानक डेड एंड वर येउन पोहचला कसा. जातांना बेरजेचे गणित सांगितले तुम्ही, प्रश्नांच्या उत्तरात जीव देण्याने खरच प्रश्न मिटले?...सुटले?...

चार हाताचे दोन हात करून कोणते बेरजेचे गणित केलेत तुम्ही? खरच. तुम्ही म्हटले तशी स्वप्नात सुध्धा स्वप्नाच्या गावी गेले नाही. आजन्म तुम्ही आणि तुमचेच स्वप्न उराशी ठेवले. मातीतून सोने पिकविण्याचे. आता कोण लिहील मातीवर पेरण्याच्या ओळी? कसे उगवेल वांझोटया मातीतून सोनेरी स्वप्न?

तुमच्या कणखर बाहुत निश्चिन्त मिटणारे डोळे आता थकून जड़ झाले तरी मिटत नाहीत. अन या चिमुकल्यांचे निरागस प्रश्न सुटत नाहित. मी काय उत्तर देऊ या पिलांना? किती दिवस सांगू तुम्ही गावाला गेल्याच्या गोष्टी...? कोणत्या सूत्रात घेऊ त्यांचे न सुटणारे आयुष्य गणित? तुम्हीच सांगा. त्या झिजल्या हाडाच्या वयस्कर पिंजर्याना कोणते देऊ सांत्वन? सारे कसे विहिरिचा एक एक झरा आटत चालल्यासारखे, अन सारे आयुष्य कोरडे पडत चालल्यासारखे ..!

तुम्ही असता तर दोन हाताचे गणित चार हाताचे करता आले असते

जराजरा का होइना सगळ्याना जगता आले असते...

जगण्याच्या पर्हाटीला लागली असती किती बोंड...आणि ढवळया कापूस वावरणं दिले असते जीव झाकायला कापड हे माहित नाही..पण ...दान्यासारखे कणसात सोबत राहिलो असतो ताठ उभे....तुम्ही असता तर...इतकेच


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational