STORYMIRROR

AMOL UMBARKAR

Tragedy Others Children

2  

AMOL UMBARKAR

Tragedy Others Children

पत्रास कारण.. ‘आई’

पत्रास कारण.. ‘आई’

3 mins
85

प्रिय आईस,

खूप दिवस झाले तुला पत्र लिहण्याचा विचार करत होतो. मात्र शाळा सुटल्यामुळे हातात पेन आणि कागद कधीच लागला नाही. आई तू कशी आहेस, असा विचारायचा मला अधिकारच नाही. कारण सगळे मला म्हणतात. ‘तू तुझ्या आईला गिळलंस म्हणून...’! आई, मी खरंच इतका वाईट आहे का गं? लोकं मला खूप वाईट-साईट बोलतात. मात्र माझ्या अश्रूंना कधीच बांध फुटत नाही. कारण आई काय असते तेच मला माहीत नाही. अगदी बारा दिवसांचा असेन मी तेव्हा तू मला सोडून गेलीस, असं लोक म्हणतात. मला तुझा चेहराही नीटसा आठवत नाही. पण आई आजही तुझा तो मायेचा स्पर्श मला जाणवतो. तुझ्या निधनानंतर मला मावशींने जीव लावून सांभाळलं खरं .. पण आईचं ममत्व मावशी कधी देऊ शकते का? आईच्या पदराची ऊब मावशीच्या कुशीत येऊ शकते का ? नाही ना.. ?


आई कुठे असशील तिथून मला भेटायला एकदा येऊन जा गं... तुला पाहण्याची खूप इच्छा आहे. तुझ्या मिठीत अगदी मरेन यावं असेही वाटतंय. पण आई तू कुठे जाऊन बसली आहेस. लोक मला म्हणतात, ‘बरं आहे तुझं.. माय मेली तरी मावशी आहे’. तूच सांग आई; मावशी असली तरी तिच्याकडे मला हक्काने रडता येते का, तिच्याशी मला वेड्यासारखं वागता येतं का, मी जेवलो नाही तरी तिला काही फरक पडत नाही. पण मला अजून आठवतेय. शेवटच्या श्वासापर्यंत तू मला स्तनपान केलं असशील. कारण लेकराची भूक भागली नाही तर आईलाही अन्न गोड लागत नाही, असं म्हणतात. आजही मी उपाशीपोटीच झोपणार आहे आई. कारण तुझ्या आठवात गाळलेल्या अश्रूंनी माझं पोट अगदी गच्च भरलं आहे. कॉलेजात मुलं मला वडील असूनदेखील ‘अनाथ’ म्हणत होते. शाळेत तर मित्राच्या आईकडे पाहिलं की वाटायचं आपली आई असती तर ..!


शाळेत एकदा सरांनी खूप मारलं तेव्हा मावशीनेही घरी आल्यानंतर चांगला चोप दिला. तू असतीस ना तर मला कोणी मारलं? का मारलं? याची विचारपूस केली असती. तसंच यापुढे असं करु नकोस, अशी प्रेमळ ताकीद दिली असतीस. पण तू नाहीस ना..! हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आजवर जगताना मी कधीच एवढा एकटा पडलो नव्हतो. मात्र आज माझ्या एका मित्राची आई वृद्धपकाळाने निधन पावली तरीही तो हरवलेल्या गायीच्या बछड्याप्रमाणे हंबरडा फोडत होता. आई प्रत्येकाच्या आयुष्यात इतकी महत्वाची असते का..?


माझा मित्र म्हणत होता... ‘एकवेळा बाप नसला तरी चालेल पण प्रेमाने जवळ घेणारी आई प्रत्येक लेकराला असलीच पाहिजे’. आईचं प्रेम काय असतं हे मला कधी कळलंच नाही. पण आज त्या मित्राचा हंबरडा पाहून मलाही आई असती तर... मी जगातला सर्वात सुखी व्यक्ती असतो, ही भावना मनात चमकून गेली. लहानपणीच आई गेलेल्याचं दुःख मी माझ्या डोळ्याने पाहण्याऐवजी मी स्वतः भोगतोय याचा त्रास खूप होतोय. आई या शब्दाचा उच्चारही मी कधी माझ्या मुखातून केला नाही, कारण मला आईच नाही. 

 

असह्य वेदना साहून तू मला जन्म दिलास मग माझा लडीवाळ खोडकरपणा तुला सहन झाला नसता का? आई काय असते हे कळण्यापूर्वीच का, मला सोडून गेलीस. एखाद्या रोपट्यावर कळी उमलावी आणि कुणीतरी येऊन ती कळीच घेऊन जावी ,अशी अवस्था झालीये माझी. मला धड रडताही येत नाही आणि हसताही येत नाही. कारण आई तू माझ्याजवळ नाहीस.


आई तुला म्हणून सांगतो खूप दिवस झालं मलाही मरावंस वाटतंय. कारण जगण्यात अर्थच उरला नाही. आज लाखो- करोडोंची संपत्ती माझ्याकडे असूनही मी भिकारीच आहे. आई म्हणजे भूतलावर अवतरलेला देव म्हणतात. मग माझ्याच नशीबात अशी असुरी अवस्था का? जगताना प्रत्येक श्वासात तुझी आठवण मला होत असते. मात्र आसवांचा मार्ग मोकळा होतच नाही.


बहुतेक मी मागच्या जन्मात काहीतरी मोठं पाप केलं असेल म्हणूनच या जन्मात देवाने मला माझ्या आईपासून वेगळे केलंय.आई तू कुठे आहेस, कशी आहेस ते मला माहीत नाही. पण जिथे असशील तिथे तू सुखी राहावीस म्हणून मी रोज देवाला प्रार्थना करत असतो. आई काय असते याचा अनुभव मला या जन्मात जरी मिळाला नसला तरी पुढच्या जन्मात माझी आई होऊन माझे सगळे लाड पुरवशील ना आई..? आणि हो आई, मी इतर मुलांसारखा वेड्याप्रमाणे वागत नाही हा....लहानपणी तू जी गाणी गायचीस ना ती गाणी मी माझ्या हृदयात बिंबवली आहेत. तुझा पहिला स्पर्श मला रोज जाणवत असल्यामुळे मला जगायची उभारी मिळते. आई नसलेल्या मुलांची काय अवस्था असते. तू पाहतच आहेस. म्हणून आई हे पत्र मिळाले की, मला लगेच दुसरं पत्र पाठवून दे.आज पत्राच्या माध्यमातून का होईना, मी माझ्या भावनांना मार्ग मोकळा केला आहे. तू माझी आई आहेस आणि मला हेही माहित आहे की, तू या पत्राला नक्कीच उत्तर देशील.

तुझ्याच पत्राच्या प्रतिक्षेत

तुझा सोनू....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy