AMOL UMBARKAR

Tragedy Others

3  

AMOL UMBARKAR

Tragedy Others

प्रेम ‘संजीवनी’

प्रेम ‘संजीवनी’

6 mins
793


‘प्रेम’ या शब्दाची ओळख अनेकांना लहानपणीच होते. लहानपणी आईच्या प्रेमाला आसुसली मुले शाळेत गेल्यानंतर मित्रमैत्रिणींमध्ये रमायला लागतात. आई वडिल आणि आपलं कुटुंब यात प्रेम शोधणारी मुले आता शाळेतल्या मैत्रीत प्रेम शोधायला लागतात. याचाच वेध घेणारी ही कथा.

अनेकांना त्यांच्या शाळेतील त्यांची पहिली लव्हस्टोरी कदाचित विसरता येत नाही. शाळेचा निरोप घेताना अनेकांना आसवांचे बांध फोडावे लागतात. कारण शाळेत जाणारा प्रत्येकजण कधी ना कधी प्रेमात पडलेला असतोच. काही लोकांचे प्रेम यशस्वी होते. तर काही लोकांच्या पदरी नेहमी निराशाच वाढलेली असते. या कथेतील सौमित्र नावाच्या मुलांची ही प्रेमकथा आहे.

दहावी इयत्तेत चांगल्या गुणांनी पास होऊन सौमित्र आता महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत आला होता. सौमित्र अगदी साधा सरळ आणि कोणात न मिसळणारा मुलगा होता. मात्र कोणीतरी म्हणून गेलंय की, ‘कॉलेजची हवा भल्याभल्यांना बदलते’. सौमित्रही त्यातून सुटला नाही. कॉलेज सुरू होऊन सहा सात महिने लोटल्यानंतर त्याची तीन चार मित्रांशी गट्टी जमली होती. जानेवारीचा महिना उजडला की, प्रत्येक कॉलेजमध्ये फेस्टिव्हलची धामधूम सुरू होते. तशीच त्यांच्या कॉलेजमध्येही झाली.

फ्रेबुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेल्या ‘कॉलेज डे’ मध्ये सर्वजण उत्साहाने भाग घेत होते. सौमित्रही ‘गावाबरोबर गुलाल उधळत होता’. ‘व्हॅलेंटाइन डे’ दिवशी सौमित्र मित्रांबरोबर कॉलेजच्या कट्ट्यावर बसला असताना एका सुंदर मुलीने त्याला गुलाब देऊन, “माझा व्हॅलेंटाइन होशील का”?, असं विचारलं. हा प्रश्न ऐकून सर्व मित्रांच्या भुवया उंचावल्या. सौमित्र काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सौमित्रने तिला सांगितलं की, “माझी गर्लफ्रेंड आहे, सॉरी..!!”

ती मुलगी तेथून निघाली आणि जाता जाता ‘हॅप्पी व्हॅलेंटाइन डे’ बोलली.

यानंतर सौमित्रच्या मित्रांनी त्याला घेरले आणि प्रश्नांचा भडिमार केला. आजवर सगळं शेअर करणारा सौमित्र आपल्याशी खोटं बोलला आहे. हे कळाल्यावर त्यांचा पारा चढला. मात्र सौमित्रने त्यांच्यापुढे नमते घेऊन त्यांना खरी घटना सांगितली.

सौमित्र सांगू लागला की, “मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं. मात्र जे प्रेम पूर्णच होऊ शकत नाही ते करायचंच कशाला”, असा विचार करून मी या मुलीला नकार दिला. माझीही शाळेत एक चांगली मैत्रीण होती. नववीपर्यंत मी कोणत्याही मुलीकडे पाहायचो नाही. मात्र ती आमच्या वर्गात आल्यानंतर मी पहिल्याच दिवसापासून तिच्यावर नजर खिळवून बसलो होतो. वर्गात पहिल्याच दिवशी तिचा परिचय सांगताना तिने तिचं नाव आणि गाव सांगितलं. तिचं नाव ‘संजीवनी’ होती. तिचं नाव ऐकून मला ‘प्रेमसंजीवनी’ मिळाल्याचा काही क्षणांपुरता भास झाला. मात्र मी तिच्यात गुंतून राहायचे नाही, असे ठरवले असतानाही तिच्यात गुंतत गेलो. पहिल्या दिवसापासून तिच्या प्रेमात अडकून पडल्यामुळे मी तिच्याशी मैत्री वाढवली. मधल्या सुट्टीत आम्ही एकत्र डबा खायचो. एकेदिवशी तिने डबा आणला नव्हता. त्यादिवशी मी तिला डबा दिला होता. मात्र तिने पहिला घास मला भरवल्यामुळे आमचं नातं मैत्रीच्याही पुढे असल्याची खात्री पटली. आमच्यात दिवसेंदिवस प्रेम बहरत गेलं. आम्ही एकमेकांना भेटलो की, वेळ कसा जायचा कळायचं नाही. अगदी एकमेकांत हरवून जायचो आम्ही. या प्रेमप्रकरणामुळे मी वर्गात हुशार असूनही नापास झालो होतो. सहामाहीचा निकाल लागल्यानंतर ती चार- पाच दिवस माझ्याशी बोलली नव्हती. मी तिला त्याचे कारण विचारल्यानंतर तिने सांगितले की,

“तू नापास कसा झालास, तुझा पहिला नंबर आला असता तर मला खूप आनंद झाला असता, पण तुला माझी काही पडलेली नाही! आता जर तू नापास झालास तर मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही”.

तिचे हे शब्द ऐकून मला माझ्यावर कोणीतरी खरं प्रेम करतंय याची जाणीव झाली. त्यादिवशी ठरवलं की, चांगला अभ्यास करून पहिला नंबर काढायचा. पण प्रत्येक लव्हस्टोरीमध्ये माशी शिंकतेच असंच आमच्याबाबतीतही झालं.


शाळा सुटल्यानंतर आम्ही एकदा गावकीच्या आंब्याखाली भेटलो होतो. ती माझ्यासाठी इतकी वेडी होती की, आम्ही एकमेकांना एकमेकांचे होण्यापासून थांबवू शकलो नाही. दररोज आम्ही त्या आंब्याच्या झाडाखाली भेटायचो. मात्र त्यादिवशी अचानक संजीवनीच्या भावाला आमची खबर लागली. संजीवनीचा भाऊ म्हणजे गावगुंडच होता. उंच, बलाढ्य आणि क्रूर असं काहीतरी त्याचं जुजबी वर्णन करता येईल. आम्ही त्यादिवशी सांजवेळी त्या झाडाखाली बसलो असताना अचानक त्याने येऊन माझ्या कानाखाली मारली. ‘भविष्याची स्वप्न’ बघणाऱ्या आमच्या दोघांची स्वप्ने एका क्षणात भंगली. संजीवनीच्या भावाने आणि त्याच्या साथीदारांनी मला बेदम मारहाण केली. मात्र संजीवनी मला वाचवायला पुढे आल्यामुळे त्यांनी तिलाही मारून घरी पाठवून दिले.


“संजीवनीला परत भेटलास तर हातपाय गळ्यात घालून फिरावे लागेल”, अशी करड्या आवाजात धमकी देऊन संजीवनीचा भाऊ तेथून निघून गेला. मी मात्र अंधारात माझी आसवं लपवतं बसलो होतो. इकडे माझ्या आईने सगळा गाव गोळा केला. मी घरी गेल्यानंतर, तुला एवढं लागलं कसं? हाच तिचा पहिला प्रश्न होता. मी तिला टाळले आणि हात पाय धुऊन अंथरूणात शिरून झोपलो.

दुसऱ्यादिवशी शाळेत सगळेच जण मला ‘बिनाशेपटीचा मारूती’ म्हणून चिडवू लागले होते. मात्र तिच्या डोळ्यात अलगद आलेला अश्रू मी माझ्या काळजात टिपला होता. तिच्या भावाने केलेल्या मारहाणीनंतर ती मला भेटली. माझ्या जखमांवर हात फिरवून बोलली,

 “तुला खूप लागले असेल ना रे?... आपण सगळं एकत्र शेअर करतो मग माझ्या भावाचा मार तू एकट्यानेच का खाल्लास?... मी माझ्या वडिलांना दादाच्या गुंडगिरीबद्दल सांगितले पण त्यांनीही मलाच गप्प केलं. सौमित्र माझ्या कुटुंबात माझं कोणीच नाही रे ... कोणीच माझं ऐकतं नाही.... माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही.... तू माझ्यावर प्रेम करतोस ना?”,

असं म्हणून ती माझ्या कुशीत विसावली. तिला कसंबसं समजावून मी तिला घरी पाठवलं. मला कळून चुकलं होतं की, प्रेम फक्त आपल्या लायकीच्या लोकांबरोबर केलं पाहिजे. कारण ती गावच्या पाटलाची मुलगी होती आणि मी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा. खूप विचार केल्यानंतर मी घरी आलो.

घरी आल्यानंतर डोक्यात अनेक विचार थैमान घालू लागले. मात्र या सर्व विचारांना काटशह देऊन मी एक निर्णय घेतला. यापुढे तिला भेटणार नाही तिच्याकडे पाहणारही नाही असा निर्धार मी केला. मात्र वार्षिक परीक्षा तोंडावर आली असतानाच तिने पुन्हा मला त्या आंब्याच्या झाडाखाली पकडले. मी पुरता घाबरलो होतो. ती धायमोकळून रडत होती. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. ती मला विचारत होती.

“गेले सहा महिने तू माझ्याशी बोलत का नाहीस? तू ही पळपुटा निघालास मला वाटलं आपलं प्रेम यशस्वी होईल पण तू रणसंग्राम सुरू होण्याआधीच रणांगण सोडून पळून गेलास... का केलंस असं.... का खोटं प्रेम केलंस माझ्यावर....?”

 असे अनेक प्रश्न विचारून तिने मला बेजार केलं. शेवटी तीच म्हणाली...

“आता बस्सं झालं आपण पळून जाऊन लग्न करूया मला त्या नरकात राहायचं नाही. तू मला झोपड्यात ठेवलंस तरी आपण सुखाने संसार करू”.

 माझ्यापेक्षा लहान असूनही ती एखाद्या शहाण्या माणसासारखं बोलत होती. मी नाही नाही म्हणत शेवटी पळून जाण्याचा निर्णय मान्य केला. ठरल्याप्रमाणे आम्ही १३ फेब्रुवारीला घरातून पळून जाणार होतो. मात्र नशीब कोणालाही बदलता येत नाही. त्यामुळे जे दैवाने लिहले होते तेच घडले.


१३ फेब्रुवारीच्या रात्री आम्ही अंधार चिरत चिरत गावची वेस ओलांडली होती. मात्र नेहमीप्रमाणे नशीबाने आमच्यासमोर काहीतरी वाईटच वाढून ठेवलं होतं. वेस ओलांडल्यानंतर काही लोकांनी आमचा पाठलाग केला. जीव मुठीत घेऊन आम्ही काटेकुटे तुडवत पळत सुटलो होतो. मात्र काही उपयोग झाला नाही. समोर यमदेवासारखा बुलेटवर बसलेला तिचा भाऊ आमच्यासमोर आल्यानंतर आमची ‘पळता भुई थोडी झाली’. आता पळून काही उपयोग नाही हे आम्हाला कळून चुकले. आम्ही दोघेही एकमेकांचे हात घट्ट धरून उभे राहिले होतो. अचानक पाठलाग करणाऱ्या लोकांनी मला मारायला सुरुवात केली. अर्धा एक तास मारहाण करून झाल्यानंतर त्यांनी संजीवनीलाही मारहाण केली.

“त्याच्याबरोबर पळून जाण्यासाठी तुला एवढी मोठी केली होती का?”, असा प्रश्न विचारून संजीवनीच्या भावाने पुन्हा तिला मारहाण करणे सुरूच ठेवले.

 “प्रेम केल्यावर काय होतं हे बघायचंय का”?, असं संजीवनीला विचारून त्याने धारदार चाकू काढून माझ्यावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. संजीवनी माझ्यासाठी त्याच्या हातापाया पडत होती. मात्र तो राक्षस क्रोधाने आंधळा झाला होता. शेवटी संजीवनीच्या भावाने माझ्यावर चाकू उगारला मात्र प्राण संजीवनीचे गेले. माझ्यासाठी प्रेमसंजीवनी ठरलेली संजीवनी रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडली होती. आसवे थांबवूनही मी अश्रूंना बांध घालू शकलो नाही. मरता मरताही ती म्हणाली, “मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते आणि यापुढेही तुझ्यावरच प्रेम करत राहिन”, असे म्हणून तिने माझ्या मांडीवर प्राण सोडले.

मित्रांनो ही जरी एखाद्या फिल्मची स्टोरी वाटत असली तरीही या वाईट क्षणांची चित्रफीत माझ्या डोळ्यासमोरून अजूनही जात नाहीये. त्यामुळे मला या प्रेमाच्या फंदात पडायचं नाही आणि हो होती माझी गर्लफ्रेंड आणि अजूनही ती आहे... माझ्याजवळ माझ्यासोबत!!

त्यामुळे मी त्या मुलीचा प्रपोज नाकारला. माझी ‘संजीवनी’ आजही माझ्यासाठी गुलाबाचं फूल घेऊन उभी राहिली असेल. तिच्यासमोर जर मी कोणा दुसऱ्या मुलीचं प्रपोज स्वीकारलं असतं तर मग तिच्या या प्रेमबलिदानाला काय अर्थ उरला असता? शाळेत टाइमपास म्हणून केलेलं प्रेम इतकं सीरियस होईल, असं कधी वाटलं नव्हतं. तसंही खरं प्रेम कधीही मरतं नाही, असं म्हणतात. त्यामुळे आजही माझी ‘संजीवनी’ माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर माझ्यासोबत जगत आहे. म्हणून येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ आहे. मला ही गोष्ट खरंतर कोणाला सांगायची नव्हती. पण ‘व्हॅलेंटाइन डे’ जवळ आला की, प्रत्येकाच्या हृदयाच्या अडगळीच्या खोलीत बंद असणाऱ्या गुलाबी गोष्टींना उजाळा मिळतो. तसंच माझंही झालं.....

आजवर मी माझ्या मनातलं तिच्यासोबत बोललो नाही. मात्र या ‘व्हॅलेंटाइन डे’ ला तिला “आय लव्ह यू” म्हणायचं... !!!



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy