प्रसन्नतेचा मंगलदीप
प्रसन्नतेचा मंगलदीप
दिवाळीची गडबड आटोपून आजचा रविवार हळूच डोकावला. घरात सुस्तावलेली सकाळ तरी सुमेधाला सवयीप्रमाणे लवकरच जाग आली. हॉल मध्ये येऊन सोफ्यावर विसावली तो झेंडूच्या फुलांच्या माळा तिच्याकडे बघून स्मित करत आहेत असं तिला वाटलं. काल भाऊबीजेनिमित्त काढलेल्या फ़ुलांच्या रांगोळीतील काही फुले जरा कोमेजली होती तर काही अजूनही टवटवीत वाटत होती. आणि त्या फुलांमधील चैतन्यगंधाने सुमेधाची मरगळ कुठल्या कुठे पळून गेली. फ्रेश होऊन मस्तपैकी कॉफीचा मग घेऊन ती बागेतील पाळण्यावर येऊन बसली. मोबाईल वर कुठलंही संगीत न लावता निसर्ग संगीताशी एकरूप झाली. तोच सुमेधचा हलकासा स्पर्श तिच्या खांद्यावर जाणवला. तिने मागे वळून बघितले तर त्याने एक टपोरे लाल गुलाब पुष्प देऊन तिला सुप्रभात मॅडम म्हणून अभिवादन केले. दोघेही खळाळून हसले ...... अन क्षणभर 30 वर्षांपूर्वीच्या आठवणीत दंग झाले. तेवड्यात रिया आजीच्या मांडीवर चढून विचारू लागली आजी तू तल फुलं तोडू नये म्हणालीस अन आज तूच कसं ग फुल तोललं. आजोबा बघा न आजीनी फुल तोललं . अरे पिल्लू केव्हा आलं गडे उठून असे म्हणत सुमेधनी तिला कडेवर उचलून घेतलं अन म्हणाला ' बेटा आजींनी इतक्या मेहनतीने बाग तयार केलीय न म्हणून ती नाही तोडत फुलं, मीच तोडून तिला गिफ्ट दिलं आज . खूप दमली होती न आजी दिवाळीत सगळ्यांसाठी खूप खूप खाऊ नी सजावट करून.
बघ बरं आजी आता या फुलाईतकीच प्रसन्न म्हणजे फ्रेश दिसतेय होय की नाही? "अले हो खलचं की ,मग आबा मला आता 2 फुलं द्या तोलून एक आत्याला अन एक मम्माला देईन " रिया म्हणाली. तसं नाईलाजास्तव पण मधाळ हसून सुमेधा म्हणाली करा आता नातीचे आज्ञापालन सगळं घर प्रसन्न ठेवायला हवं ना! आणि रियाला म्हणाली बाळ तू लहान आहेस ग पण एक लक्षात ठेव तू पण एक फुल हो आपल्या अस्तित्वाने प्रसन्नता पसरविणारं . आहेच न मी हसले फुल म्हणत फुलं घेऊन रिया घरात पळाली.
चला झोपमोड झाल्याने पोरी वैतागतील त्यामुळे त्यांच्यासाठी ग्रीन टी अन तुझा फक्कड चहा करते चला सुमेध महाराज आता स्वयंपाकघराच्या सम्राज्ञीच्या भूमिकेत शिरायलाच हवे आम्हाला असं म्हणत सुमेधा स्वयंपाक घरात आली. तीन कप चहा अन दोन ग्रीन टी आणि रियाचे दूध घेऊन ट्रे डायनिंग टेबलवर ठेवला तसं रिया लाडात येऊन मम्माला म्हणाली आजी आबा सालखं आपण पण बाहेल बागेत थंडीत बसून पिऊयात न सगले. रिचाने ट्रे उचलला आणि सगळ्यांनी अमृततुल्य चहाचा आस्वाद घेतला.
श्रुतीला एकदम आठवले आई आज तू अनाथालयात जात असते न फराळाचे घेऊन ? आम्ही सगळेच येऊ आज तुझ्यासोबत आजच्या सुटीचा खरा उपयोग करून घ्यायला काय सुमित आणि श्रेयस तयार ना? सुमित लगेच म्हणाला आम्ही राणी सरकारांच्या आज्ञेबाहेर नाही, आपका हुकूम सर आँखों पर! पण श्रेयस तू काही प्लॅन बनवला होता त्याचं काय?
रिचा लगेच म्हणाली श्रेयस पिकनिक तर नेहमीचीच यावेळी जाऊन बघुयात ना आपण सर्वंच आईसोबत....! चला तुम्ही सर्व यायला तयार आहात तर आपण 2 वाजताच निघू .... मी वयोगटाप्रमाणे खेळणी लिहून देते बॉल, सापसीडी, शैक्षणिक साहित्य अजून काय काय ते घेऊन या .... धम्माल करूयात आज तिकडे आणि हो भरपूर फुगे सुध्दा आणा आत जाता जाता सुमेधा मुलांना म्हणाली. रिचा श्रेयसला म्हणाली रियाचं तू आटोप आज, मी जरा आईंना मदत करते त्यांनी आज आपण बाहेर जाणार म्हणून मावशींना सुटी दिलीय . अग रिचा थांब श्रुतीने आवाज दिला आज आपण चौघे मिळून करूयात स्वयंपाक जसं आपापल्या घरी करतो. आई बाबा आणि रियाला खेळू देत निवांत. वा हुशार आहे माझी बछडी म्हणून सुमेधने कौतुकाने श्रुतीच्या पाठीवरून हात फिरवला. चला लाडुबाई म्हणून श्रेयसनी बहिणीला चिडवायची संधी सोडली नाही . सगळं आटोपून उत्साहाने सर्वजण घरून निघाले अन अगदी शार्प दोनला स्नेहालयाच्या दाराशी गाडी उभी केली श्रेयसने! 5 ते 15 वयोगटातील मुले सुमेधा आजींच्या येण्याने नेहमीप्रमाणे सुखावले पण आजी सोबत मामा मावशी आल्याचं सुमेध आजोबांनी जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्व मुलांना फुगे फुगवायला सांगून छान सजावट केली. विविध खेळणी वाटून त्यासोबत मनसोक्त खेळून झालं. रिया तर खेळुन खेळून दमली पण झोपायला तयार होईना. नियमाप्रमाणे 6 वाजता निघायला हवे म्हणून प्रत्येकाला फराळाचे स्वतंत्र पाकीट देऊन पाय निघत नसतांनाही सर्व जण टाटा बाय बाय करत निघाले. धावत आत जाऊन जरा मोठी असलेल्या वंदनाने छान रंगवलेल्या पणत्या प्रत्येकाला भेट म्हणून दिल्या. आणि आज तुम्ही आम्हाला इतका वेळ दिलात आणि आमची दिवाळी गोड केलीत म्हणून thank you ....
पुन्हा याल ना! असा आवाज घुमू लागला...
सुमित, रिचा, श्रुती, श्रेयस एका सुरात म्हणाले प्रसन्नतेचा मंगलदीप उजळायला आम्ही आता दरवर्षी आईबाबांसोबत येणार.
