प्रेरणादायी ती
प्रेरणादायी ती
कालची“ती”आणि आजची“ती”यांमध्ये फक्त काळानुरूप बदल झालेला नसून हा बदल कालच्या तुलनेत सर्वांगानुरूप आणि सर्वसमावेशक आहे. आजची स्त्रीही जुन्या बंधनांना मोडीत काढून नव्या स्वरूपातल्या बंधनांना आव्हाने देते आहे आणि आकाशामध्ये उत्तुंग भरारी, तर तिने केव्हाच घेतलेली होती, पण आता उत्तुंग विहार करण्यासाठी स्वतः समोर एक नवा आदर्श आणि नव्या संधी निर्माण करते आहे.
कुटुंबामधली आजची “ती” ही एक कर्ती स्त्री आहे आणि कर्त्या पुरुषाच्या अनेक पावले पुढे आहे आणि तरीही तिची महत्वाकांक्षा ही “स्त्री-प्रधान संस्कृती”ची बीजे रोवणे नसून किंवा “पुरुष-प्रधान संस्कृती”वर हल्लाबोल करणे नसून, “स्त्री-पुरुष प्रधान संस्कृती”ची जोपासना करून, तिचा विस्तार करणे आणि अशी समानता विचारांमध्ये व कृतींमध्ये आणणे ही आहे.
पुरुष-प्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना नेहमीच गृहीत धरले गेले,पण आज मात्र तिने स्वतःच स्वतःची ह्या संस्कृतीतून, विचारांमधून सुटका करून घेतलेली आहे आणि समानतेच्या, वैश्विक बंधुतेच्या विचारांनी प्रेरित होऊन ती बाहेर पडलेली आहे. आज ती स्वतःच एक प्रेरणा आहे. तिने काल आणि आज संयमाने स्वीकारलेला आहे. “उत्तम उद्या”चा निर्माण करण्याची जबाबदारी तिने इतर महिलांच्या साथीने आणि पुरुषांच्या बरोबरीने स्वतःवर घेतलेली आहे. आज तिच्यामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत आणि आत्मविश्वास आहे. आज तिच्या विचारांमध्ये खुलेपणा, नावीण्य आहे. तिच्या विचार करण्याच्या क्षमतेमधे एक कमालीचा वेगळेपणा निर्माण झालेला आहे. ह्याच गोष्टींमुळे “ती”हा आज एक स्वतंत्र विचार बनलेला आहे. तिची स्वतःची आज एक वेगळीच ओळख, प्रतिमा निर्माण झालेली आहे. आज अनेक क्षेत्रात “ती”अग्
रेसर आहे. तिचं आयुष्य फक्त ‘गृहिणी’ह्या साच्यापुरतं मर्यादित नसून “ती”आज एक “बहुगुणसंपन्न आणि व्यावसायिक गृहिणी” आहे. आज स्रीया स्वतःचं जीवन स्वतः घडवत आहेत आणि सोबत इतरांचंही. एक स्त्री कधीही स्वतःचा विचार करत नाही,कारण तो तिचा मूलतः स्वभावाच नाहीये, पण आज स्त्री स्वतःचा विचार करत आहे,आयुष्यात काहीतरी नवीन करू पाहत आहे तर ह्या विचाराचं निःसंकोच मनाने आपण स्वागत केलं पाहिजे. तिने स्वतःमधे अनेक बदल सकारात्मक बदल करून घेतले आहेत, तिची जीवनशैली बदलत आहे आणि पुरुष म्हणून आपण ह्या सर्व गोष्टींचा आदर केला पाहिजे.
आज भारतासारख्या संस्कृती-प्रधान आणि कैक प्रकारची विविधता आढळणाऱ्या देशात महिलांचे कार्य आणि कर्तबगारीला नेहमीच दुय्यम महत्त्व दिले गेले आहे. आजच्या स्त्रियांना हीच गोष्टं कायमची बदलायची आहे आणि एक व्यक्ती म्हणून आपल्या कार्याची दखल घेतली पाहिजे आणि योग्य तो समाजात सन्मान दिला गेला पाहीजे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर “भारतीय स्त्री”उद्या जगभरात आदराने ओळखली जावी असे तिचे स्वप्न आहे.
ह्या सर्व गोष्टींची सुरुवात प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वतःच्या घरापासून केली पाहिजे. आजपर्यंत पुरूष समाजाने स्त्रियांना गृहीत धरले आहे,दुय्यम स्थान दिले आहे. आज कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबातल्या “स्त्री”ला पाठिंबा दिला, तिच्यावरची बंधने,तिच्यावरच्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांना समजून त्यातून तिला मुक्त केले आणि तिला तिच्या पद्धतीने जगण्यासाठी प्रोत्साहन दिले,तर भारत देश हा काही वर्षातच “स्त्री-पुरुष प्रधान संस्कृती”चा देश म्हणून जगभरात नावाजला जाईल आणि ह्यामधे स्त्री-पुरुष दोहोंचा सहभाग सम-समान असेल.