Swati Ekar

Inspirational

3  

Swati Ekar

Inspirational

प्रेमाची भाषा

प्रेमाची भाषा

2 mins
11.8K


८ मार्च २०२० - महिला दिनाच्या दिवशी शीतलबरोबर माई बालभवनमध्ये जाण्याचा योग आला. तिथे जवळजवळ ४० अनाथ मुली होत्या. त्यांचे संगोपन प्रतिभा देशपांडे माई करतात कुणी मुकबधीर, कुणी अंध, कुणी पीडित अशा मुली आहेत.


पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव इतके निष्पाप, निरागस की नकळत आपण त्यांच्या प्रेमात पडतो. प्रत्येकीची गोष्ट निराळी. कुणाला गाता छान येतं तर कुणाला नृत्य, काहीजणी तर चक्क क्रिडाक्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या. तिथेच मला पूनम

भेटली. छान गोरीपान, शिडशीडीत बांधा पण तिला दृष्टी नव्हती, ती अंध होती. मला राहवेना तिच्या गळ्यात मंगळसुत्र आणि मांडीवर दोन वर्षांचं गुटगूटीत बाळ. त्या बाळाला ती भरवत होती... एक घास चिऊचा एक घास काऊचा... मी तिच्या जवळ जाऊन बसले... म्हटलं, न बघता तू बाळाला बरोबर घास कसा भरवतेस...


तेव्हा ती म्हणाली, मला दिसत नाही पण बाळाला दिसतंय... त्याला आईचं प्रेम कळतंय...


मी नि:शब्द झाले. तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली. "मला माहीत नाही माझे जन्मदाते कोण?... माझं सगळं काही माई आहेत. मी इथेच खेळले, वाढले, शिकले."


ती सांगत होती मी ऐकत होते... "तीन वर्षापुर्वी माझ्यासाठी स्थळ आलं. मी लग्नाला नकार कळविला. नकार ऐकून माईंची परवानगी घेऊन तो मला भेटायला आला. तो मुकबधीर आहे त्याचं नाव रोहीत. त्याच्या घरची परिस्थिती चांगली आहे. तो घरचीच शेतीवाडी सांभाळतो. तो फक्त एवढंच म्हणाला... तेरी आंखोंके दीप जलाऊंगा... मेरी आंखोंसे दुनिया दिखलाऊंगा... मग काय मी लग्नाला होकार दिला. प्रत्येकवेळी भेटायला येताना तो माझ्या आवडीची भेटवस्तू आणायचा. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तर त्याने चक्क मला मोबाईल भेट दिला. मग लग्न होईपर्यंत रोज फोनवर प्रेमाच्या आणाभाका सुरु झाल्या. त्याने शेवटपर्यंत अंतर न देण्याचं कबुल केलं आणि मी अजूनच प्रेमात पडत गेले. लग्नासाठीची प्रत्येक गोष्ट त्याने माझ्या पसंतीने घेतली. मी लग्नाची स्वप्न रंगवू लागले... दिसती मजला सुखचित्र नवे... लग्न करून मी त्याच्या घरी गेले. हळूहळू एकमेकांना समजून घेऊ लागलो. माझ्यापेक्षा तो मला जास्त समजून घेतो. माझ्या नजरेला पटेपर्यंत एखादी गोष्ट समजावून सांगतो. कारण माझ्यापेक्षा त्याचं माझ्यावर जास्त प्रेम आहे आणि सुंदर बाळ आमच्या प्रेमाची निशाणी..." असं म्हणून ती लाजली.


माझ्या सामान्य बुद्धीच्या डोक्यात एक प्रश्न आला आणि तो मी विचारला, "आत्ता तू इथे कशी?"


तर ती म्हणाली, "ताई भलतासलता विचार करु नका. आश्रमातल्या आमच्या मैत्रिणीचं लग्न ठरलंय. तिचं नाव संतोषी. तिलासुद्धा तिच्यावर खूप प्रेम करणारा नवरा मिळालाय. तिची एकच अट होती, चारचाकी चालवणारा नवरा हवा आणि तो तिला मिळाला. तिच्या लग्नासाठी माझा नवरा मला इथे घेऊन आला आहे, आम्हीच करवल्या ना..."


सगळ्या खूप आनंदात होत्या. तो आनंद डोळ्यात साठवून आणि करवल्यांना सजण्यासाठी दागिने देण्याचं आणि इथून पुढच्या प्रत्येक लग्नासाठी करवल्यांना दागिने देण्याचं कबुल करुन मी निघाले.


खरंच प्रेमाला भाषा नसते. प्रेम एकतर असतं किंवा नसतं...

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational