प्राधान्य नोकरीला का घराला
प्राधान्य नोकरीला का घराला
विधात्याचा सुंदर अविष्कार तू
सहनशक्ती अन् त्यागाची मूर्ती तू
इच्छाशक्तीच्या बळावर अंतराळापर्यंतची
गरुड झेप घेणारी स्त्रीशक्तीची साक्षात मूर्ती तू
पूर्वीपासून स्त्रियांकडे 'चूल आणि मूल' या दृष्टीनेच बघितले जाते.पण तरीही वैदिक काळापासून स्त्रीने आपले अस्तित्व,आपली ओळख टिकवण्याचा प्रयत्न केला आहे.आपल्या कर्तृत्वाची छाप तिने अगदी पूर्वीपासून टाकली आहे, मैत्रेयी, गार्गी, राजमाता जिजाऊ, मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, सुनिता विल्यम्स अशा कितीतरी रणरागिणींनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाडला आहे.
स्त्री
आजच्या एकविसाव्या युगात प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे, आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचा, आपली स्वप्ने साकार करण्याचा.माझ्या मते,प्रत्येक स्त्रीने नोकरी,व्यवसायाला प्राधान्य द्यायलाच हवे. सावित्रीबाईंनी समाजाचा विरोध पत्करुन मुलींना शिक्षण दिले, ते फक्त घरात चूल आणि मूल सांभाळायला? आज स्त्रीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घरापासून अगदी अंतराळापर्यतची झेप घेतली आहे
, तिच्या बुद्धीच्या, कर्तृत्वाच्या, साहसाच्या जोरावर. घरातील प्रत्येक व्यक्तीचे तिला मदत करणे, प्रोत्साहन देणे हे पहिले कर्तव्य आहे. अहो, आजही स्त्री एवढी पुढे गेली, तरीही पुरुषप्रधान संस्कृती अजूनही शाबूत आहे. घर, मुलं सांभाळूनही ती नवऱ्याच्या शब्दाबाहेर न जाता आपली नोकरी, व्यवसाय करते, आपल्या कला जोपासते. बऱ्याच ठिकाणी तिला म्हणावा तेवढा पाठिंबा दिला जात नाही.
'स्त्री' ही शक्तीचे रुप आहे, सहनशक्तीची मूर्ती आहे. गरज आहे, तिच्याकडे सबला म्हणून बघण्याची, तिची स्वप्ने साकार करण्यासाठी तिला मदत करण्याची. काही स्त्रिया या अशिक्षित आहेत, तर काहींनी पुरेसे शिक्षण घेतलेले नाही, पण तरीही त्या घरगुती व्यवसाय करून घराला, मुलांच्या शिक्षणाला हातभार लावताना दिसतात, शेतात काम करतात, मजूरी करतात, एवढंच काय पण रस्ते स्वच्छ करतानाही दिसतात. खरंच आजची स्त्री ही अर्धनारीनटेश्वराचे साक्षात रुप आहे. स्त्री व पुरुष दोघांचीही कामे करुन संसारवेल मोहरुन टाकते. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,
स्त्रीजीवनाचे सार्थक करुन
उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविला
ईश्वराच्या सुंदर आविष्काराचा
योग्य तो आदर ठेविला