पोकळी
पोकळी
"पोकळी"
आज सगळी सुख पायाशी असून देखील आयुष्य कसं निर्विकार भासतंय ना ? असा क्षण आपल्या आयुष्यात येईल असं कधी वाटलंही नव्हतं. पण आज तो क्षण अचानक समोर येऊन उभा आहे. कित्येक वर्षानंतर. पण आता सगळं बदललंय. काय उपयोग. एकेकाळी समीर माझा जीव की प्राण होता. श्वास होता. आज मला वाटतंय समोरच्या नदिच्या कोरड्या पात्रांप्रमाणे शांत रितं पोकळ झालंय मन. ही पोकळी कधीच भरून निघणार नाही समीर! भेगाळलेल्या काठावर आता कधीच हिरवळ उगवू शकणार नाही. कारण शुष्क वाळवंट झालंय त्याचं. खूप ऊशीर झालाय आता. कितीही प्रयत्न केला तरी बुळबुळीत झालेल्या शेवाळासारखं आयुष्य झालंय.
कदाचित कित्येक दिवस मनात लपलेल्या सुप्त ईच्छा पूर्ण करण्यासाठी आसुसलेला देह समर्पणासाठी तयार ही होईल. पण मनाचं काय ? मृगजळामागे धावण्यात काय अर्थ आहे ? का तू मला तेंव्हा असा सोडून गेलास ? थोडाही विचार आला नाही मनात ? आला तर भेटायचा प्रयत्न केलास ?खूप प्रेम आहे तुझं समीर माझ्यावर माहीत आहे मला. माझं ही आहे. पहिलं प्रेम असंच असतं कधीही न विसरता येणारं .वेड लावतं. आठवतंय समीर तू मला पाहता क्षणी प्रेमात पडला होतास.चा
र पानी निनावी पत्र पाठवलं होतंस तू. मी ही तुला न पहाता त्या पत्राच्या प्रेमात पडले होते.तू प्रेमात होतास.पण खरंच का ? का ते एक अल्लड स्वप्नं का भास होते फक्त ? प्रेम असायला संवाद आणि विश्वासाबरोबर साथ ही हवी. दुरून डोंगर साजरे. असं नावाला फक्त नातं नको होतं मला समीर. तू तुझ्या विश्वात मश्गुल होतास. यशाची शिखरं गाठत होतास. पण मी कुठे होते त्यात ? मी उध्वस्त होत होते...तू एकदाही मागे वळून पाहिले नाहीस. मी तिथेच उभी होते. पण आज खूप लांब आलेय वळणावरून पुढे. आता मी माझी वाट निवडलीय.
आता आपल्या या नात्याला मी स्विकारू शकत नाही. कारण ही मैत्री होऊ शकत नाही.ना कुठल्या नात्यात मी या प्रेमाला बांधू शकते. नको खूप गुंता आहे.आणि भितीही वाटते. पुन्हा ? आता सावरलेय मी यातून. पण परत तू ..गायब झालास तर ? आता नाही...नको..आपण छान बोलत जाऊ फोनवर .भेटायला नको. पाणावलेल्या कडा पुसत जड झालेला आवाजात सई म्हणाली ," ठेवते फोन नंतर बोलू. "हॅलोऽऽ हॅलो ऽऽऽ सई..ऽऽऽ ऐकना प्लीज प्लीज.. माझं ऐकून तर घे. मला एकदाच भेट.सई ऽ..सई..ऽ.. " समीर कदाचित हाच प्रयत्न तू वीस वर्षापूर्वी केला असतास तर ?"