पियुषची जिज्ञासा....
पियुषची जिज्ञासा....


चुणचुणीत, हुशार, बोलका, जिज्ञासू अन् समजदार असा एक असतो पीयूष. साधारणपणे सहा वर्षांचा असलेला पीयूष एका छोट्या परंतु सुधारलेल्या गावात राहात असतो. त्याच्या घरी आई, बाबा, आजी, आजोबा, लहान बहीण जाई व स्वतः पीयूष असे सहा सदस्य असतात.
पीयूषचे वडील जवळच असलेल्या तालुक्याच्या गावी पंचायत समितीत नोकरीस असतात, आई गृहिणी तर आजोबा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असतात. पीयूषचे गाव छोटे असले तरी छान, सर्व सुविधांयुक्त असते. तिथे बँक, पोस्ट कार्यालय, दवाखाने इ. सारे उपलब्ध असतात. गाव स्वच्छ, सुंदर असल्याने गावाला स्वच्छ, सुंदर, आदर्श गावाचा पुरस्कार मिळालेला असतो.
पीयूषच्या आजोबांचे जवळच असलेल्या बँकेत कामानिमित्त नेहमी जाणे-येणे होत असते. त्यांचे रोजचे बँकेतले चक्कर बघून पीयूषच्या मनात बँकेत चालणाऱ्या व्यवहारांविषयी कुतूहल निर्माण होते. तो आजोबांना आता त्या विषयी अनेक प्रश्न विचारु लागतो. आजोबाही त्याला वेळोवेळी योग्य उत्तर देत परंतु जेव्हा पीयूषचे प्रश्न वाढायला लागले तेव्हा आजोबा त्याला बँकेतच नेण्याचे ठरवतात अन् बँकेतला कमी गर्दीचा दिवस बघून थेट बँकेतचं घेऊन जातात.
बँकेत पोहचल्यावर आजोबांनी पीयूषला बँकेतले सर्व विभाग दाखविण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी पीयूषला चलन मिळण्याचे यंत्र दाखविले. त्या यंत्राचा उपयोग काय, त्यात काय माहिती टाकायची, कुठले बटण कधी वापरायचे, चलन कुठून स्वीकारायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. त्या यंत्राचे एकदा प्रात्यक्षिकही करुन दाखवले. चलन यंत्राची सविस्तर माहिती दिल्यानंतर आजोबा पीयूषला प्रतिक्षा कक्षाकडे घेऊन गेले व तो कक्ष ग्राहकांना बसण्यासाठी असल्याचे सांगितले व तिथूनच काही अंतरावर असलेल्या चौकशी कक्षाची सविस्तर माहिती सांगितली.
तेवढ्यात चलनानुसार त्यांचा नंबर आला. आजोबा लागलीच पीयूषला घेऊन पहिल्या टेबलपाशी गेले. तिथे गेल्यावर आजोबांनी प्रथम आपल्या खात्याच्या चौकशीचे काम करुन घेतले व तेथील कर्मचाऱ्याच्या परवानगीने तिथे चालणाऱ्या कामाविषयी पीयूषला सविस्तर समजावून सांगितले. त्यानंतर आजोबांनी पीयूषला पुढील दोन कक्षांविषयी म्हणजेच खातेधारकांच्या खात्यांची माहिती ठेवणाऱ्या कक्षांविषयी सविस्तरपणे सांगितले. त्यानंतर आजोबा पीयूषला रोखपालाच्या कक्षाकडे घेऊन गेले व त्या ठिकाणी आपण पैसे जमा करतो किंवा तेथूनच आपल्या खात्यातील जमा रक्कम आपण काढतो, असे सविस्तरपणे सांगितले. त्यानंतर आजोबांनी पीयूषला शाखा व्यवस्थापकाचा कक्ष दाखविला व ते म्हणजेच शाखा व्यवस्थापक संपूर्ण बँकेचे नियोजन तसेच कामकाजाचे नियंत्रण करतात असे सांगितले.
आता मात्र बँकेविषयी सविस्तर ज्ञान मिळाल्याने पीयूष आजोबांसह आनंदात बँकेच्या बाहेर पडतो. बाहेर आल्यावर आजोबा पीयूषला जवळच असलेल्या बँकेच्या एटीएममध्ये सुरक्षारक्षकाची परवानगी घेऊन आत नेतात व एटीएममधून
पैसे कसे काढावे हे प्रात्यक्षिकासह समजावून सांगतात. अशाप्रकारे बँकेतल्या कामाविषयी इत्यंभूत माहिती देऊन आजोबा पीयूषला आनंदाने घरी घेऊन जातात.