पावसातला प्रेमांकूर
पावसातला प्रेमांकूर
तिला कितीही विसरण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची आठवण मनातून काही कायमची जात नाही. खूप विसरण्याचा प्रयत्न करतो आणि तसं पाहिलं तर विसरतोसुद्धा तिला... पण पावसाळा आला आणि पहिल्या पावसाला सुरुवात झाली की लगेच तिची आठवण येते आणि परत माझं मन तिच्या आठवणीत गुंतून जाते.
अनु... हो तिचं नाव अनु होतं. ती आणि मी एकाच कॉलेजला एकाच वर्गात शिकायला होतो. अनु दिसायला खूप सुंदर होती आणि ती हसायची तेव्हा तिच्या गालावर मस्त खळी पडायची तेव्हा ती खूप सुंदर दिसायची. तिच्या मुखावर ती केसांची बट आली की हळूच आपल्या हाताने बाजूला करायची. राहणीमान एकदम साधं आणि सरळ होती स्वभावपण खूप गोड होता. तिचा आवाज खूप मधूर होता ती तिच्या मैत्रिणीशी बोलायची तेव्हा मी ऐकायचो तिचा बेंच आणि माझा बेंच आजूबाजूला होता तिचा आवाज मला रोज ऐकायला मिळायचा. मी कधी अनुशी बोललेलो नव्हतो कारण मुलींशी बोलायचं म्हटलं तर मी खूप घाबरतो. मी कॉलेजला एसटी बसने ये-जा करायचो कारण माझं कॉलेज जिल्ह्याच्या ठिकाणी होतं आणि माझा गाव जिल्ह्याच्या ठिकाणाहून अठरा किमी अंतरावर होतं म्हणून मी कॉलेजला सकाळच्या सहा वाजेच्या बसने जात असे.
अनुही जिल्ह्याच्या ठिकाणीच राहत असे. तिचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. कॉलेज सुरु होऊन दीड-दोन महिने झाले असले तरी अनु व मी अजून एकमेकांशी एक शब्दसुद्धा बोललेलो नव्हतो. जुलै महिना आता संपत आला होता. मी नेहमीप्रमाणे कॉलेजला निघालो. बसमधून उतरल्यावर लगेच कॉलेजचा रस्ता धरला. बस स्टॅण्डपासून कॉलेजचा रस्ता वीस मिनिटांचा होता व अनुचा पण कॉलेजला जायचा हाच रस्ता होता. मी तिला खूपदा याच रस्त्याने कॉलेजला येताना पाहिलं होतं. आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. बस स्टॅण्डमधून निघालो तसा पावसाने जोर धरला व मी अर्धा भिजलो म्हणून मी आता एका झाडाखाली उभा राहिलो. पावसाच्या विश्रांतीची वाट पाहत... तेवढ्यात अनु माझ्या शेजारी येऊन कधी उभी राहिली मला कळलंपण नाही. मागे वळून पाहतो तर अनु दिसली व तिची-माझी नजरानजर होताच ती मस्त गोड हसत मला बोलली की काय रे राम तू तर पूर्ण भिजला. छत्री आणायची ना तू खेड्यातून येतो मग छत्री ठेवायची जवळ... ती माझ्याशी बोलत होती व मी तिच्याकडे एकटक पाहत होतो.
तिने मला परत विचारलं की अरे मी तुझ्याशी बोलतेय. तेव्हा मी तू तू मी मी... करत म्हटलं हो आज विसरलो छत्री आणायला, असं तिला सांगितलं. पाऊस काय बंद होत नव्हता. उलट त्याचा जोर वाढतच होता. आता पावसाने मात्र रौद्ररुप धारण केलं होतं. विजेचा कडकडाट होत होता. आता अनु मात्र खूप घाबरत होती. जसजसा विजेचा आवाज
होत होता तसतशी अनु माझ्याजवळ सरकत होती. एक वीज जोरात कडकडाट करून गेली आणि अनु मला बिलगुन गेली... मला काहीच सुचत नव्हतं की हे काय झालं अनुने मला घट्ट पकडलं होतं... माझं शरीर खूपखूप थरथर कापत होतं. विजेचा आवाज आता बंद झाला होता पण अनु मला पंधरा-वीस मिनिटं बिलगुन होती आणि त्याच वेळात आमचं मन एकमेकांशी जुळून त्या पावसात आमच्या प्रेमाला प्रेमांकुर कधी फुटला हे तिलापण नाही कळलं व मलापण नाही...
त्या दिवसापासून आमचं हळूहळू बोलणं वाढू लागलं. एकमेकांकडून नोट्स मागू लागलो. आता मी तिला पसंद करू लागलो होतो. मी सतत तिच्याकडे पाहत राहायचो. कधीकधी ती पण माझ्याकडे चोरून पाहायची आणि अचानक नजरानजर व्हायची तेव्हा खूप गोड हसायची. असं करतकरत आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो ते आम्हाला कळलंच नाही. अनु बोलताबोलता कधीकधी मला म्हणायची तू चोर आहे, माझ्याकडे चोरून पाहतपाहत माझं मन कधी चोरलं ते मला कळू दिलं नाही आणि आम्ही दोघेजण खूप हसायचो. आता दिवस कधी होईल आणि कॉलेज जाऊन अनु कधी भेटेल असं व्हायचं. खूप सवय झाली होती आता आम्हाला एकमेकांची. असं करतकरत वर्ष कधी संपलं आम्हाला कळलंच नाही.
आमच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा संपल्या. आता दोन महिने सुट्टया असणार होत्या. आता अनुपण तिच्या मामाच्या गावाला जाणार होती. त्या दिवशी आम्ही खूप उदास होतो. कारण आता आमची रोज भेट होणार नव्हती. जड अंतःकरणाने आम्ही एकमेकांना निरोप दिला. आता कॉलेज सुरु व्हायची वाट पाहत होतो व एकदाचं कॉलेज सुरु झालं माझी नजर अनुला इकडेतिकडे शोधत होती पण अनु नजरेला काही दिसत नव्हती. पंधरा दिवस झाले पण अनु कॉलेजला येत नव्हती. मग माझ्या मित्राला विचारलं की अनु कॉलेजला का येत नाही तेव्हा तो म्हणाला की अरे तिच्या वडिलांनी त्यांच्या जिल्ह्यात बदली करून घेतली आहे आणि आता ते त्यांच्या गावाकडे राहायला गेले आहेत. कालच अनुचे वडील अनुचे कागदपत्रं कॉलेजमधून घेऊन गेले. आता ती तिकडे शिकणार आहे... असं माझ्या मित्राने सांगितल्यावर माझं मन सुन्न झालं. मी खूप निराश झालो.
खूप मनापासून प्रेम केलं होतं मी अनुवर... एकदापण मला सांगावं अस तिला वाटलं नसेल का..? तिला तर माहित होतं की मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो असं मग तरी तिने मला एकदापण भेटायला नको यायला हवं होतं. खूप विचार करत होतो. अनुचे विचार करतकरत कॉलेजचं वर्ष कधी संपलं कळलेच नाही. आता बरीच वर्षे झाली... अनुची माझी भेट नाही पण जेव्हा पावसाळा येतो आणि विजेचा कडकडाट करत मुसळधार पाऊस बरसतो तेव्हा मात्र अनुच्या आठवणीत माझ्या डोळ्यातूनसुद्धा अश्रूंची मुसळधार बरसात होते