Prasad Kulkarni

Others Tragedy

3  

Prasad Kulkarni

Others Tragedy

पाहुणा

पाहुणा

3 mins
775


   तात्या गेल्यानंतरचे तेे दुसरे वर्ष होते. या वेळी पुन्हा पाहिल्यासारखीच सगळ्यांनी एकत्र दिवाळी साजरी करायची हे ठरलं होतं. त्याप्रमाणे फोनाफोनी झाली होती. ठरल्याप्रमाणे तयारी करण्यासाठी सुषमा तीन दिवस आधी आली. सुरेशराव मुलांना घेऊन मागून येणार होते. तिने पाहिलं तर भाजणी तयार होती, पोह्यांना ,डाळ्याला ऊन देऊन झालं होतं. किराणा भरून झाला होता. आई तू कशाला केलंस हे सारं मी यासाठीच लवकर आले ना? आई (जानकीबाई) म्हणाल्या, अग मी काहीच नाही केलं हे सारं या आजूबाजूच्या सगळ्या मुलींनी त्यांच्या सोबत केलं आहे. 

      दुपारी जेवणं झाल्यावर या मायलेकी जरा लवंडल्या असताना दाराशी रिक्षा थांबली, सुषमाने पाहिलं तर धाकट्या काकांची सून मनीषा आली होती. आल्या आल्या तिने चुलत सासूला (जानकीबाईंना) वाकून नमस्कार केला तेव्हा अग आत्ता आणि एकटीच कशी काय अस विचारल्यावर "मदत करायला आली आहे, बाकीचे नंतर येतील" अस तिने सांगितलं.

कशाला उगाच अस सुषमाने म्हणताच, मग काय शेवटच्या दिवशी आयत खायला यायचं का? मदत नको का करायला? तिचं उत्तर ऐकून त्या दोघी मनोमन सुखावल्या. सुषमा म्हणाली अग आईने सगळं आधीच केलंय. खरतर प्रत्यक्ष फराळाचे पदार्थ वासुबारसे पासून करायचे हे त्यांनाही ठाऊक होत पण आधीची तयारी करायला त्या आल्या होत्या.

      वासुबरसे दिवशी सकाळी थोरली लेक कांचन आली. मग त्या तिघींनी मिळून सगळा कामाचा फडशा पाडला. यंदा जनकीबाईंना फक्त सल्लागाराची भूमिका होती. तरी मनीषा च्या उत्सुकतेखातर त्यांनी आठ वेटोळ्यांची चकली पाडून दाखवली. दुपारी गावाकडच्या शेतावरून गडी डाळिंबाची परडी घेऊन आला. कांचनला पाहून पुन्हा तात्यांची आठवण निघाली. दोन वर्षांपूर्वी कांचनकडे असताना तात्या गेले तेव्हा हे गडी लगोलग निघाले पण नाशकात घर शोधताना रात्री नऊ वाजून गेले. मयत झाल्या घरी कसं जेवायचं या विवंचनेत असताना जानकीबाई पुढे झाल्या अन् अक्षरशः दहा मिनिटात भाकरी आणि तव्यावरच पिठलं टाकून त्यांनी त्या दोघांना जेवायला लावलं होत आणि ते पण मालकिणीला नाही न म्हणता गुमान जेवले होते.

      धनत्रयोदशीला बायकांची न्हाणी झाल्यावर अनारसे करताना मात्र जानकीबाईंचा अनुभव कामास आला. दुपारी बच्चे कंपनी यायला सुरुवात झाली तसा जनकीबाईंचा उत्साह वाढला. सुरेशराव आणि मुकुंदराव पण आल्या वर चहा घेऊन लगेच फटाके आणि कंदील आणायला बाजारात गेले. संध्याकाळी चुलते पण आले. आता फक्त देशमुखांचे "कुलदीपक" दिपक तेवढे सहकुटुंब यायचे राहिले होते. ते सगळे नरकचतुर्दशीला सकाळी आले. हा हा म्हणता चार दिवस गेले. भाऊबीजेला दुपारी जेवणा नंतर जसे घर रिकामे होऊ लागले तसा जानकी बाईंचा जीव जड झाला. मोठी कांचन नंतर दोन दिवस राहणार होती.

        फोनच्या आवाजाने जनकीबाईंची तंद्री मोडली तशा त्या गावाकडच्या आठवणीतून या शहरातल्या सत्यात आल्या. त्या मधल्या आजरपणामुळं दीपक कडे आल्या होत्या. एव्हाना दिवस मावळून तिन्हीसांज झाली होती. फोनवर पलीकडून सुनबाई होत्या. आई, आज माझ्या माहेरच्या नातेवाईकांचे गेट टू गेदर आहे आणि दीपक पण कामावरून थेट इथेच येणार आहे तेव्हा उशीर होईल, वाट पाहू नका...अस म्हणाली, "अग आज धनत्रयोदशी आहे ना.." हे त्यांचं वाक्य फक्त फोननेच ऐकलं. त्यांनी दिवा लावेपर्यंत स्वतःकडच्या किल्लीने दार उघडून नातू प्रथमेश आत आला. त्या घाबरल्या आणि ओरडल्या त्याला , पण त्याला काही फरक पडला नाही.त्याच्या कानात वायरी होत्या. थोड्या वेळाने बेल वाजली प्रथमेशने दार उघडून पार्सल घेतलं आणि डायनिंग टेबल वर ठेवलं. हे काय अस आजीने विचारताच " फराळ आहे" असं म्हणत तो परत खोलीत गेला.

      दुसऱ्यादिवशी शुभेच्छा द्यायला सुरेशरावांचा फोन आला तेव्हा त्यांनी केलेल्या आमंत्रणाचा लगोलग स्वीकार करत जानकीबाई लेकीकडे जायला तयार झाल्या. कितीही नाही म्हंटल तरी ते जावई, त्यांच्याकडे अस "पाहुण्यासारखं" किती राहणार या दिपकच्या म्हणण्यावर, मी इथंही पाहुणीच आहे कीं अस रागाने म्हणत त्या निघून गेल्या आवरायला.

जावयाकडं राहायला त्यांना जड जायला लागलं, साठीकडे झुकलेल्या नव्वारीतील आपल्या सासुबाई मानी आहेत हे सुरेशराव जाणून होते. तेव्हा मुकुंदरावना (साडूना) सोबत घेऊन त्यांनी दीपक ची समजूत काढली आणि जानकीबाई गावीच राहतील यावर शिक्कामोर्तब झाले. शेजारचे गोडबोले, सावंत आणि साळुंखे यांनी पण जानकी बाईंची काळजी घेण्याची खात्री दिली.

       जानकीबाईंना घेऊन सुरेशराव घरी आले तेव्हा संध्याकाळ झाली होती. घरात आल्याआल्या त्यांनी दिवे लावले, तात्यांचा फोटो पुसून त्यापुढे निरंजन लावले. तेवढ्यात शेजारची मंजू चहा घेऊन आली. जुजबी लागणारे सामान आणायला सुरेशराव गावात गेले.ते परतले तेव्हा आंबेमोहोर तांदळाच्या भाताचा घमघमाट पसरला होता आणि रटरटणारे पिठलं हलवत ती माउली एका बाजूला भाकरी टाकत होती. जावयाला जेवायला वाढताना जानकीबाई म्हणाल्या " मुलाच्याच घरात पाहुणी म्हणून राहण्यापेक्षा मी इथे सुखात राहीन" तुम्ही निश्चित राहा.


Rate this content
Log in