हॉटेल Green view
हॉटेल Green view


ही बरीच जूनी गोष्ट आहे. तेव्हा काही न काही कामानिमित्त कृषी विद्यापीठात माझं सारखं जाणं येणं व्हायचं. रविवारची सुट्टी जोडून आली तर शनिवारी काम झाल्यावर मी तिथूनच जवळ असणाऱ्या समुद्रकिनारच्या हॉटेलात रहायचा, हॉटेलवाल्याशी ओळख होण्याइतपत माझं जाणं होत.
एकदा मला एका आठ्वड्यासाठी तिथे जाण्याची वेळ आली. काम , त्या समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलात राहावं आणि करावं येऊन जाऊन असा विचार करून मी गेलो, पण नेमकं त्या वेळी ते हॉटेल फुल्ल होतं. आपण एकावर विसम्बुन राहिलो आता काय? असा प्रश्न उभा राहिला, अस काही होईल असा विचार मी केलाच नव्हता. मालक एव्हाना ओळखीचा झाला होता, त्याचंही बरोबर होतं एका दिवसासाठी तो त्याची ही खोली द्यायला तयार होता पण आता प्रश्न आठवड्याचा होता. मी त्यालाच विचारलं, काय करता येईल? पण या प्रश्नाचं आश्वासक उत्तर त्याच्याकडे नव्हतं.
मी बाहेर पडलो, समुद्र पाहत पाहत चालू लागलो. किती दूर आलो हे समजलच नाही. मी समुद्राकडे पाहण्यात गढून गेलो होतो. ते मगाचचं हॉटेल झाडीमध्ये गुडूप झालं होतं आणि आता मला समोर दिसत होतं ते हॉटेल Green view. मनात विचार आला, साला हे हॉटेलवाले किती पाण्यात पाहतात एकमेकांना! मा मी बाहेर पडलो, समुद्र पाहत पाहत चालू लागलो. किती दूर आलो हे समजलच नाही. मी समुद्राकडे पाहण्यात गढून गेलो होतोहित असूनही त्याने मला सांगितलं नाही. बाहेर एक दोन गाड्या उभ्या होत्या.
मी पटकन आत गेलो. रिसेप्शन ला कोणीच दिसलं नाही. हॅलो....हॅलो, कुणी आहे का? या माझ्या प्रश्नाला बऱ्याच उशिरा "आलो....." अशी हाक आली. एक साधारण पाच साडेपाच फुटी, कुरळ्या केसांचा, छान कोरीव दाढी ठेवलेला असा तरुण पुढे आला. अंगात मस्त पैकी त्या एकूणच जागेला शोभेल असा निळा फुलाफुलचा शर्ट , गळ्यात एक जाड सोन साखळी आणि एक थ्री फोर्थ घातला होता, पायात सपाता.. एकदम cool आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसतमुख चेहरा.
मी विचारलं- रुम मिळेल का ?
तो- हो मिळेल ना, किती दिवसांसाठी पाहिजे?
मी-आठ्वड्यासाठी,
तो- मिळेल पण AC नाही, चालत असेल तर रजिस्टर मध्ये माहिती भरा आणि हो, सध्या किचन च काम चालू आहे so जेवण नाही, डबा मागवू, सोय होत नसेल तर..
मी म्हंटल, ठीक आहे बाबा...सगळं चालेल.
सगळे सोपस्कार झाल्यावर तो 105 नंबर ची किल्ली देत म्हणाला, मी रॉबिन. फोन चालू नाही...काही लागलं तर बिनधास्त हाक मारा, मी मागे असतो काम चाललंय तिथं.
रात्रीचा डबा सांगितला आणि वर गेलो. रात्री जेवायला गेलो तर आम्ही दोघेच, बाकी काही हालचाल नाही. सगळं सामसूम... नारळाच्या झावळ्यांची सळसळ आणि गरजणारा समुद्र..लाईट ही अगदी डीम.उगाच एक भीतीची झाक डोकावली मनात, पण मी तिला झटकली आणि रॉबिन शी गप्पा मारत समोरच्या सुरमई वर ताव मारला. एव्हाना रॉबिनने माझी जुजबी माहिती घेतली होती आणि मी ही. तो मुंबई सोडून आला होता..इथं हॉटेलिंग business करायला. एकूणच मला आवडला रॉबिन. जेवणानंतर मला म्हणाला, उद्या तयार व्हा तुम्ही 9 वाजेपर्यंत, मी इथला गावातला रिक्षेवाला बोलावतो तो सोडेल- आणेल तुम्हाला. मी खुश झालो, न मागता आपली गरज ओळखून मदत करणारे कुणाला नाही आवडत.
सकाळी मी आवरून खाली आलो तेव्हा बाहेर एक रिक्षा उभी होती. रॉबिन कडे किल्ली दिली तेव्हा पठया वडापाव खात होता..मी मानेनेच नको म्हंटल आणि रिक्षेकडे पाहिलं. त्याने किश्या.. अशी आरोळी ठोकली. किशोरशी माझी ओळख कोकणीत करून दिली, काय बोलला देव जाणे पण त्या किशोरने माझी बॅग उचलली आणि म्हणाला चला. मी गेलो, आपण रात्रीच्या डब्याचं सांगायचं विसरलो हे मला पाच वाजता लक्षात आलं, मी भरभर आवरून बाहेर आलो तर किशोर आलाच होता...मी खूप घाईत त्याला चल चल म्हंटल.किल्ली घेताना रॉबिन म्हणाला, जेवण आलं की देतो आवाज, करा आराम तवर... मी सुखावलो.
माझे दोन दिवस मस्त गेले. एकदा दुपारी विद्यापीठात चहा पिताना मला एका प्रोफेसरांनी विचारलं, तुम्ही येता कसे? मी रिक्षेवाल्या विषयी सांगत असताना त्यांचा चेहरा बदलला. मी खोदून विचारल्यावर ते म्हणाले, या गावात काही लोकांना एक रिक्षा आणि त्यात दोन माणसं बसलेली दिसतात (एक धोतर नेसलेला म्हातारा आणि एक मुलगा) म्हणे कधीकधी आणि काही वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता म्हणतात... संध्याकाळी रिक्षेत बसताना मला उगाच त्या मगाचच्या गप्पा आठवल्या पण रिक्षेत तर मी एकटाच होतो अस म्हणत मी निर्धावलो. अस करत करत शुक्रवार आला.सकाळीच वारं सुटलं होतं, पावसाची पुरेपूर लक्षण दिसत होती. दुपारनंतर प्रचंड उकडायला लागलं, 4 च्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरु झाला.5 वाजताच पूर्ण अंधार झाला. पाऊस आणि विजा.. नुसतं थैमान चाललं होतं. विद्यापीठाच्या गेट मधून एक लाईट दिसला, ती माझीच रिक्षा होती. मी पळतच रिक्षेपाशी गेलो. किशोरने लावलेलं झाडपं उघडून रिक्षेत बसलो. या इतक्यात ही मी पूर्ण भिजलो होतो. Laptop भिजला नाही ना हे मी चेक केलं. सुदैवाने नव्हता भिजला. एव्हाना रिक्षेने निम्म अंतर कापलं होत.जरा स्थिरावल्यावर मी बाजूला पाहिलं, आज रिक्षेत माझ्याशिवाय अजूनही कोणी होत. नीट निरखून पाहिल्यावर दिसलं तर एक तरुण, आणि एक म्हातारा बसला होता. मी हादरलो, मला त्या प्रोफेसरांचे शब्द आठवले...... मी निरखून पाहिलं तर तो धोतर नेसलेलाच म्हातारा होता.. मी एकवार त्या तिघांकडे पाहिलं त्या प्रोफेसरांचे शब्द घुमू लागले डोक्यात... मला दरदरून घाम फुटला होता, घेरी येऊ लागली होती, काही सुचत नव्हतं.डोळ्यापुढे अंधार पसरला...
मला जाग आली तेव्हा मी हॉटेलच्या रिसेप्शन च्या सोफ्यावर पडलो होतो. खूप अशक्तपणा जाणवत होता. हातपाय हलवायला त्रास होत होता. मी रूम मध्ये गेलो, सगळं सामान बेपत्ता होत, मी रॉबिन ला खूप हाका मारल्या पण रॉबिनच काय तिथे कुणाचाच मागमूस नव्हता...सार भयाण वाटतं होत. मी तसाच घाबरलेला पळत बाहेर आलो, बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची चाकं चिखलात रुतलेली..जणू त्या गाड्या कितीतरी वर्ष तिथेच होत्या..येताना गडबडीत मी हे पाहिलंच नव्हतं. काय घडतंय ते कळतच नव्हतं, मी चार दिवस राहत होतो ते हॉटेल मलाच भकास आणि भयाण वाटत होत. AC नाही, जेवण नाही, फोन नाही....माझी अक्कल कुठं माती खायला गेली होती. मी तिथून धूम ठोकली ती थेट आधी माहित असलेल्या हॉटेल पाशीच येऊन थांबलो.तिथं गाड्यांची खूप गर्दी झाली होती. अशातही माझा जोरात चाललेला श्वास, माझे कपडे आणि भेदरलेली नजर पाहून तो मॅनेजर माझ्याकडे आला. मला ऑफिस मध्ये घेऊन गेला. आज शनिवार होता, रूम बुकिंग ची गडबड दिसत होती.
तो मॅनेजर आत आला तेव्हा त्याच्या पाठी मला दिसले माझे तीन मित्र...सनी, अद्या आणि अंशु...मी कॅलेंडर पाहिलं, तर आज 2 एप्रिल....म्हणजे काल 1 एप्रिल....म्हणजे... एक गाठ सुटावी आणि भरलेलं धान्याचं पोतं उलगडाव तसं सार माझ्या लक्षात आलं. का ह्या साऱ्यांना मी विचारलं येण्यासोबत तेव्हा वेळ नव्हता कुणाकडे , का या हॉटेलात रूम उपलब्ध नव्हती तेव्हा का का....सगळ्यांनी मिळून आपल्याला एप्रिल फुल केलं आणि आपण अलगद जाळ्यात सापडलो..सार सार कळालं आणि या जगात भूत फक्त आपल्या मनात लपलेल्या भीतीत आहे हेच अधोरेखित झालं.....