अबोली
अबोली


जिजींच्या जीवाचा तुकडाच तो, पण तीन वर्षांपूर्वी मुलगा सून तिला आपल्या पदरात टाकून जेव्हा पुढच्या प्रवासाला निघून गेले तेव्हापासून मात्र तिला हे जड जाऊ लागलं होतं.
नावाप्रमाणेच अबोली ती , आता लग्नाच्या वयाची झाली पण तिला कोण स्वीकारणार या विवंचनेत आपलं उरलेलं आयुष्य जास्त भरभर निसटतय अस जिजींना वाटत होतं.
घरात त्या दोघींचा मूक संवाद चालत असला तरी एकतर जीजी किंवा मग रेडिओ यापैकी एकाची किणकिण सदैव चालू असे.
नातेवाईक आणि इतरांच्या सांगण्यावरून मूक बधिर विवाह नोंदणी केंद्रात नाव नोंदवलं पण तिथून आलेली स्थळ अबोलीसाठी अजिबातच योग्य नव्हती. यात धीर द्यायला अबोलीची एक बालमैत्रीण स्वरदा होती, ती नेहमी म्हणायची अबोलीसाठी "चूप चूप के" सारखा कोणी तरी येईलच जिजी. पण आज जिजी ला जास्त त्रास होत होता कारण हो हो म्हणत स्वरदाच लग्न आठवड्यावर येऊन ठेपल होत.
जिजी विचारात गढून गेली असताना बेल वाजली, दारात स्वरदा आणि अबोली खिदळत होत्या. जीजीचा रडवेला चेहरा बघून स्वरदा आत आली. जिजींनी मनातली खंत बोलून दाखवली तेव्हा पहिल्यांदाच स्वरदा शांत झाली कारण कितीही हो हो म्हंटल तरी ती लग्नानंतर बेंगलोर ला शिफ्ट होणार होती. नाही म्हणायला कौमर्स ग्रॅज्युएट झालेल्या अबोली ला एका प्रख्यात चार्टर्ड अकाऊंटंट कडे चांगल्या पगाराचा जॉब होता. त्या क्षेत्रातील तीच ज्ञान वाखणण्याजोग होत.
स्वरदाच्या लग्नात ग्रहमखापासून ते पाठवणीपर्यंत सगळीकडे अबोली स्वरदाच्या पाठी होती. आपल्या दोन लेकीच समजून साने दाम्पत्याने अबोलीची सगळी खरेदी केली होती. लग्नाहून घरी आल्यानंतर रात्री सवयीने अबोलीने स्वरदा ला मेसेज करायला whatsapp उघडलं आणि अचानक तिला आपली मैत्रीण आता फक्त आपली राहिली नाही हे जाणवलं. जिजी आपल्याला हेच सांगत होती, ते तिला आत्ता पटलं. जिजी आणि ती मनसोक्त रडल्या.
दोन दिवसांनी अबोली आणि तिच्या बॉस क्षिप्रा मॅडम संध्याकाळी घरी आल्या. एका काँफरन्सला अबोली ला सोबत न्यायची परवानगी जिजीकडे मागायला त्या आल्या होत्या. अबोली तिथे येऊन काय करणार उगाच माझ्या लेकराला हिणवतील अस जिजीच मत होतं अन ते रास्त पण होतं. क्षिप्रा मॅम ठाम होत्या, मी स्वतः आहे काळजी नको आणि जे काम केलंय ते तिनेच केलंय तीच सादर करेल फक्त आवाज माझा असेल. हे ऐकताना जिजी धन्य होत होत्या. अतीव आनंदाने जिजींनी क्षिप्राच्या दोन्ही गालावरून हात फिरवला आणि अचानक संकोचल्या. मी पण तुमची मुलगीच आहे ना अस क्षिप्रा म्हणाली लगेच.
जिजीची परवानगी मिळाली तेव्हा अबोलीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आता प्रश्न एकच होता की जिजी संवाद साधणार कशी अबोलीशी? तिला काही whatsapp वगैरे वापरत नव्हती मग ती जबाबदारी पण क्षिप्राने उचलली.
प्रचंड आत्मविश्वास घेऊन अबोली परतली आणि तिने स्वतःला कामात झोकून दिलं. नवनवीन कल्पना लढवत तिने क्षिप्राच्या मदतीने नवीन software विकसीत केलं. बघता बघता नऊ वर्ष सरली. नातीचे हात पिवळे करण्याच्या जिजीच्या अनेक प्रयत्नांना इतक्या वर्षात काही यश आलं नाही. नाही म्हणायला दोन कटू अनुभव पदरी पडले. आता मात्र जिजी थकली वयानेही, पदोपदी स्वामी स्वमर्थाना लेकीची काळजी घेण्याची विनंती करण इतकंच तिच चालू होतं.
एक दिवस अबोली दुपारी लवकर आली आणि जिजीला आवरायचा आग्रह करू लागली, क्षिप्राचा फोन आला आणि तिनेही गाडी पाठवते आहे तयार राहा असा निरोप दिला. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या जिजीला तेव्हाही कुठलं तरी स्थळ असेल असच वाटल. प्रत्यक्षात त्या दोघी एका मोठ्या पॉश बिल्डिंग मध्ये गेल्या जिथं एक ऑफिस मस्त सजवलं होत. जिजीला गोंधळलेले पाहून क्षिप्रा पुढे आली आणि हे अबोलीचे ऑफिस आहे असं सांगितलं. तिला कस झेपेल हा प्रश्न जिजी ने विचरण्या आधीच क्षिप्रा म्हणाली की इथे तुमची नात माझी बॉस आहे बर जिजी, मी तिच्या हाताखाली काम करणार आहे. जिजी, अशा गोंधळू नका माझा व्यवसाय मुलगा निखिल आणि होणाऱ्या सुनबाई विशाखा संभाळणार आहेत. जिजी आ वासून पाहत राहिल्या.
आणखीन एक वर्ष लोटलं, जिजीची अबोली आता यशस्वी उद्योजिका होती. तिच्या क्षेत्रात तिचाच "आवाज" दणाणत होता.
निखिल च लग्न झालं, पण जिजी आजारी असल्याने नाही गेली. दोन दिवसाने क्षिप्राच मुलाला आणि सुनेला घेऊन जिजीना भेटायला आली, या वेळी तिचे यजमान देखील सोबत होते. जिजी बरीच अशक्त झाली होती तरी पण क्षिप्रा म्हणाली जिजी मला तुमची मदत हवी आहे. अहो, लग्न होऊन दोन दिवसही नाही झाले पण आम्ही उभयता बेघर झालो हो. आम्हाला तुमच्या घरी आसरा मिळेल का? जिजी गोंधळली, अबोलीला पण काही कळेना या क्षिप्राकडन नेहमी काहीतरी धक्के मिळतात हे जाणून असल्याने जिजी ने तेवढ्या अशक्तपणात ही विचारलं, नक्की काय गडबड आहे क्षिप्रा, या वयात आता धक्के नाही पचत, सांग बेटा काय आहे नक्की..??
तेव्हा अत्यंत गंभीर आवाजात चेहऱ्यावर अगतिक भाव आणत क्षिप्रा म्हणाली. जिजी आता निखीलच लग्न झालं, आम्ही मोकळे झालो तेव्हा आताच आमचं घर त्या दोघांना राहायला देऊन आम्ही दोघे तुमच्याकडे येणार राहायला .... आम्हाला स्विकाराल का ?
आपल्या मनातली घालमेल आणि अबोलीचे भविष्य याचा जीवाला लागलेला घोर या मुलीने किती खुबीने ओळखला याच जिजीला आश्चर्य वाटलं, मन भरून आलं तिचं. इयकयाय पुन्हा क्षिप्रा म्हणाली, जिजी आणखी एक? आता काय असा चेहरा झाला जिजीचा, तेव्हा क्षिप्रा म्हणाली... जिजी खरतर आम्ही निखिल साठी नवं घर पाहत होतो पण आता असा निर्णय झाला आणि तुम्ही पण हो म्हणालात..तेव्हा घराचे ते सारे पैसे आम्ही अबोलीच्या नावाने ठेवणार आहोत. जिजीच्या डोळ्याला धारा लागल्या. ती कृतकृत्य झाली.
एका बाजूला आपली नात नक्षत्रासारखी पण बोलू न शकणारी आणि एका बाजूला ही क्षिप्रा, नात्याने कुणी नाही पण न बोलता किती नी काय काय करत गेली... दोन्ही अबोलीच.... ती दोघींनाही पाहत राहिली नुसतं....