STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

नव्या-प्रेमाचा एक नवीन प्रवास

नव्या-प्रेमाचा एक नवीन प्रवास

4 mins
464

मस्त ब्लैक कॉफी चा मग हातात घेऊन सँडी काचेतून स्नो फॉल न्याहाळत होता. बाजूलाच नव्या ही कॉफीचा आस्वाद घेत होती.


सँडी बोलत होता,


“हा कापसा सारखा पडणारा बर्फ पाहिला की मला आपण लग्नानंतर फिरायला नैनीतालला गेलो होतो, ते दिवस आठवतात. आकर्षक वाटली ती हिरवीगार कुरणे, बर्फाच्छादित डोंगर, टुमदार घरं, स्वच्छ, निळे रस्ते, हेवा वाटावा अशी गावं. त्यात तू स्नो फॉल बघत स्वत:ला हरवून घेतलं होतं आणि मी तुला बघत तुझ्यात हरवलो होतो.”

“काय सुंदर दिवस होते ना ते!”

तेव्हा तू मला म्हटलेलं मला चांगलं आठवतंय, “सँडी, मला नं, असं कुठेतरी राहायला आवडेल, जिथे तू आणि मी, आपलं छानसं लाकडी कौलारू घर. बाहेर असाच बर्फ पडत असेल, आणि हो, घराला मोठ मोठ्या काचेच्या खिडक्या म्हणजे घराच्या कुठल्याही कोप-यातून पाहिलं तरी बाहेर हा कापसा सारखा पडणारा बर्फ , हिरवीगार कुरणे, बर्फाच्छादित डोंगर आणि निळेशार पाणी दिसेल.”


“पण , खरं सांगू नव्या, त्या नैनीताल च्या हॉटेल रूमच्या वास्तूपुरूषाने तथास्तू म्हटलं असावं आणि आज आपण इथे कैलिफ़ोर्निया मध्ये आपल्या घरात आहोत.”

सँडी-नव्याच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या.


तेवढ्यात ओजस सांगत आला , “ए बाबा, डॉक्टरांची उद्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे”.

सँडी च्या जीवात जीव पडला. कित्ती तरी दिवस झाले अपॉइंटमेंट हवी म्हणून फॉलोअप सुरू होता. पाणावलेल्या डोळ्यांनी सँडीने ओजसच्या खांद्यावर हात ठेवला.

बेजवाबदार आयुष्य तुम्हाला कधी मोठं होऊ देत नाही आणि जवाबदारी घेतल्यावर तुम्हाला कधी लहान होता येत नाही. ओजसही सँडीच्या हातावर हात ठेवत म्हणाला, “ए बाबा, रिलैक्स , सगळं ठीक होईल, काळजी नको रे करूस “, मी डॉक्टर झाल्यावर इथे अमेरिकेत रेसिडंसी करत असतांना चा माझा एक मित्र आहे, त्याने सुचवलेत हे डॉक्टर, मला खात्री आहे, आपल्याला नक्कीच फायदा होईल”.

ओजस सँडीला खात्री वजा धीर देत होता, सँडी चा चेहरा मात्र तसा निष्क्रीय च वाटत होता.


सँडी बाहेर पडणा-या बर्फाकडे बघत बोलत होता, “तुला माहित आहे ओजस, तुझ्या नाना आजोबांनी जेव्हा नव्या चा हात माझ्या हातात दिला , तेव्हा म्हणाले, माझी नव्या मनाने खूप हळवी आहे. तिच्या मनातलं पटकन कोणाला सांगत नाही, खूप खंबीर आहे असं दाखवते, पण आतून तशीच भांबावलेली असते. तेवढं मात्र समजून घ्याल “.


सँडी तसाच कधी बाजूला बसलेल्या नव्याकडे तर कधी बाहेर पडणा-या बर्फाकडे बघत होता.


नव्याचा अतिशय सौम्य सोज्वळ चेहरा आणि पाणीदार बोलके डोळे , बोलणं इतकं लाघवी की शत्रूला ही आपलंसं करेल असंच. म्हणायला हुशार आणि स्वकर्तुत्वावर भाळणारी. आणि तेच तिने सँडीमध्ये हेरलं आणि लग्नाला होकार दिला. सँडी आणि नव्या चा संसार सुरू झाला. दोघांचे नवनवलाई चे गुलाबी दिवस आनंदाने सुरू होते. नुकताच सुरू झालेला नवीन संसार, दोघांचाच नवीन घरातला सहवास त्यांना जगाचा विसर पाडणारा होता. नव्याला स्वत:च्या संसारात सुखाचं चित्र दिसतं होतं. तिने ह्या संसारात भरलेले रंग सँडी ला मोहून टाकणारे होते. घरात छोट्या-मोठ्या वस्तू घेऊन घर सजवलं गेलं. कधी कधी ती एकटीच प्रसन्न चेह-याने स्मित हास्य करत कौतुकाने स्वत:च्या हाताने लावलेल्या स्वत:च्याच संसाराकडे बघत बसायची. नव्याचे बाबा म्हटल्या प्रमाणे सँडी ही आता तिचं मन वाचायला शिकला होता.


नव्या खूप साध्या आणि समाधानी आयुष्याचं सूत विणत होती.

चार प्रेमाचे नातेवाईक आणि दोन-चार जिव्हाळ्याचे मित्र असा छोटासा परिवार होता . लाघवी स्वभावाने नभाने सगळ्यांच्याच हृदयात स्थान मिळवलं होतं.

पुढे या परिवाराच्या यादीत अजून एकाची भर पडली आणि ओजस नावाचं फुल सँडी-नव्याच्या वेलीवर फुललं.


दोघांसाठी ओजस म्हणजे आखों का तारा वगैरे असंच होतं. नव्यातर ओजस ला तळहाताच्या फोडाप्रमाणेच जपत होती. नव्याला तर ओजस नावाचा अनमोल खजिनाच मिळाला होता. कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही. तशी नव्या ओजस मध्ये रमली होती आणि सँडी ऑफिसचं काम आणि नुकतचं मिळालेलं प्रमोशन.

सुखाने यायचंच म्हटलं तर सगळीकडून ते वाट काढत तुमच्या पर्यंत पोहोचतंच.


नव्याच्या चेह-यावरून ही सुख त्याचं तेज दाखवतंच होतं.

सँडीला फिरायची अत्यंत आवड, ओघाने फिरण मग नव्याला ही आवडू लागलं . सँडीला ऑफिसच्या कामातून डोकंवर काढता आलं की सँडी-नव्या-ओजस यांच त्रिकूट निघायचं भटकंतीला. तेव्हा ही नव्याचा कल कायम बर्फाळ ठीकाणी जाण्या साठी असायचा. ती ब-याचदा सँडीला म्हणायची हे बर्फाच्छादीत परिसर,पर्वत,नदी पाहिले की असं वाटतं , निसर्गाने जशी बर्फाची चादर पांघरली आहे आणि सगळं गोठून टाकलंय, तसंच सुख ही आयुष्यात गोठून राहावं. नव्या ला बर्फाबद्दल असणारं आकर्षण आताशा लक्षात आलं होतं.

सँडीच्याही ऑफिसच्या जवाबदा-या वाढल्या , त्याला हवं तेव्हा नव्या आणि ओजस साठी हजर राहणं शक्य होत नव्हतं. मग सँडीने नव्याला होन्डा सिटी गाडी घेऊन दिली. जेणेकरून ऊन-वारा,पाऊस-पाणी, रात्री-अपरात्री फोर व्हीलर मध्ये ती आणि ओजस सेफली कुठेही जाऊ शकतील .


ओजस चा १२ वा वाढदिवस, ‘टीन एज्’ सुरू होणार होतं, म्हणून नव्या-सँडीला त्याचा हा वाढदिवस थाटात साजरा करायचा होता.


सँडी ला ही सध्या कामाच्या व्यापात कोणाला जास्त भेटणं शक्य होत नव्हतं, त्या निमीत्त्याने छानसं गेटटुगेदर होणार होतं. मग काय उत्साही नव्या लागली कामाला.

आयुष्यात सगळं काही बरोबर होतंय हे कळण्यासाठी काही तरी चुकीचं घडावं लागतं...


क्रमश:....पुढील भाग दोन मध्ये



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational