मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

नव्या प्रेमाचा एक नवीन प्रवास

नव्या प्रेमाचा एक नवीन प्रवास

6 mins
346


भाग तिसरा-३


आज अशीच ही पर्व वाटणारी रात्र संपता संपत नव्हती. सँडीचा ही काळजीने डोळ्याला डोळा नव्हता. केव्हातरी अचानक लागले डोळे किलकिले करत सँडीने आजूबाजूला पाहिलं तर पहाट झाली होती. छान कोवळी किरणं त्याच्या समोरच्या बाकावर पडली होती. रात्री हजर असलेल्या असिस्टंट डॉक्टरांना विचारलं असता ते म्हणाले, “नव्याला, रात्री ही शुद्ध नाहीच आली , आता डॉक्टर रिपोर्ट बघून सांगतील काय करायचं ते”. तिकडे ओजसही वाट पाहत असेल म्हणून सँडीने ओजसला फोन करून कळवलं. आता मात्र सँडी ओजसला सगळंच सांगत होता. “आईसाठी मी इथे हॉस्पीटल मध्येच आहे, चालेल ना तुला?” ओजस काय बोलणार, आलेल्या परिस्थीतीत काय बोलावं , हे समजण्याच वयच नव्हतं मुळात. 


सँडी ला एव्हाना, डॉक्टरांना दुपारी सिटीस्कैनचा रिपोर्ट मिळणार आहे , मग डॉक्टर भेटायला बोलावतील, असा निरोप मिळाला. आता इथेही वाट पाहणं आलंच, असं म्हणत सँडीची नजर शून्यात गेली. 


अखेर सिटीस्कैनचा रिपोर्ट आला आणि सँडी डॉक्टरांच्या केबिन मध्ये दाखल झाला. 


डॉक्टर रिपोर्ट वाचतच होते, सँडीला बसायला सांगितलं, डोळ्यावरचा चष्मा काढला. डॉक्टर सँडीकडे बघत म्हणाले, “सिटीस्कनचा रिपोर्ट बघता, थोड्या प्रमाणात इंटर्नल ब्लिडींग झालंय. १-२ ब्लड क्लॉट ही आहे , जे सर्जरी करून काढावे लागतील. थोडी रिस्क आहे, ती म्हणजे ब्लड क्लॉट ब्रेन मध्ये अशा ठिकाणी आढळलाय जिथून सगळ्या शरीराच्या हालचाली न्यूरॉन्स तर्फे कंन्ट्रोल केल्या जातात. तर त्यामध्ये शरीराच्या काही भागाच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो. “ 


हे ऐकून सँडी थोडा धास्तावला होता , पण उपाय आहे आणि नव्या बरी होणार हे त्याच्यासाठी पुरेसा होतं. 


डॉक्टरांना म्हणाला, “आपण लवकरात लवकर ऑपरेशन करू, म्हणजे नव्या लवकर बरी होईल”. आशा वेडी असते. डॉक्टरांनी सांगितलं की त्यासाठी ती शुद्धीवर येणं गरजेचं आहे. 


सँडीचं सगळं लक्ष आता नव्या शुद्धीवर येण्याकडे लागलं होतं. कशाचाही शुद्ध नव्हती भूक तहान हरपली होती. दिवसभर नव्या कडेच नजर होती. 


इकडे ओजसला मात्र नव्या ला भेटायची इच्छा दाटून आली होती आणि तो अजयला घेऊन हॉस्पीटल ला पोहोचला. ओजस ची नजर नव्याला शोधत होती, सँडी त्याच्याशी बोलत होता , पण तो एक ही शब्द काढत नव्हता . सँडीच्या लक्षात आले आणि तो ओजसला नव्याकडे घेऊन गेला. नव्या अजूनही तशीच निपचीत पडली होती . 


ओजसच्या चेह-यावर बरेच बदलणारे भाव होते, अचंबीतपणाचे , घाबरलेले, उदास, खिन्न , सगळंच दाटून आलं होतं. सँडीची नजर ओजसचे भाव टिपत होती , पण त्याचे शब्द मूके झाले होते. एकदा सँडीच्या मनात आलं ही की नसतंच सांगितलं ओजसला आणि नसतंच येऊ दिलं हॉस्पीटल मध्ये तर ? , पण दुसरीकडे असंही वाटत होतं की किती वेळ थोपवून धरलं असतं हे वादळ ?  


बरेचदा डोळे आणि स्पर्श शब्दांपेक्षा जास्त स्पष्ट बोलतात आणि तेच सँडीने केलं होतं. 


ओजसचे पाय नव्याकडे वळत होते, तो बाजूला उभा राहून एकटक नव्या कडे बघत होता. डोळ्यात पाणी थिजलं होतं. सगळ्या भावनांचा अतिरेक होता, हे एवढं पेलू शकण्याचं वय नव्हतं. आईला कायम खंबीर पाहिलेला तो , तिला आज असं आगतिक, मशीन्स च्या हवाले झालेल बघून निराश झाला होता.


काही वेळाने सँडी त्याला आय सी यू तून बाहेर घेऊन आला. सँडी ओजस च्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला , “सगळं ठीक होईल काळजी करू नकोस.” ओजस सँडीला प्रत्युत्तर देत म्हणाला, “आई शुद्धीवर येईपर्यंत इथेच थांबणार आहे.” ह्या वेळी सँडी ओजसला काही समजवण्याच्या मनःस्थितीत नव्हता. 


दुसरा दिवस ही गेला तरीही नव्या शुद्धीवर आली नव्हती. सँडी ओजस ला समजवत होता, “दिवसभर काहीच खाल्लं नाहीयेस, थोडं तरी खाऊन घे”. आणि ओजस मात्र अजूनही नकारच देत होता. ओजसची नजर मात्र नव्याकडेच होती. तेवढ्यात नव्याचा हात हलल्यासारखा त्याला वाटला. तो काही बोलणारच एवढ्यात नव्याने थोड्याप्रमाणात डोळे उघडले. सँडीने लगेच डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी चेक केलं आणि लगेच उद्या ऑपरेशन करूयात, असं सांगून तयारी सुरू केली. 


नव्या शुद्धीवर आल्याने सँडी ही थोडा रिलैक्स झाला होता. दुसरा दिवस उजाडला. सँडी पहाटे लवकर उठून घरी गेला , घरात झाडपूस केली, आंघोळ करून छान मनोभावे देवाची पूजा केली. सकाळचं प्रसन्न वातावरण नव्या ला कायम उल्हासीत करायचं. अगदी नव्या ला आवडतो तसा चहा केला. थोडा तिच्यासाठीही थर्मासमध्ये भरला. सँडी ओजस बरोबर , “देवासमोर नतमस्तक झाला, नव्याला सुखरुप घरी येऊ दे”, असं म्हणून दोघेही हॉस्पीटल मध्ये पोहोचले. 


नव्याने दोघांनकडे पाहिलं, सँडीची नव्यावर आणि नव्याची ओजसवर खिळलेली नजर ऑपरेशन थिएटर मध्ये जातांना तशीच त्यांच्याकडेच राहावी म्हणून सँडी ओजसने त्यांची पावलांची गती वाढवली. अखेर ती नजरे आड झाली, ऑपरेशन थिएटर चे दार बंद झाले आणि दोघांची नजर त्या दारावरच्या लाल लाईटावर जाऊन स्थिरावली. 


सुखाचे क्षण पा-याप्रमाणे असतात, हातात आलेसे वाटतात , तेव्हाच निसटून गेलेले असतात. 


सँडीला आता कुठे सुख भोगतोय, असं वाटतच होतं आणि हे असं काही तरी समोर आलं होतं. 


साधारण दोन तास उलटले होते, तरीही काही कळत नव्हत. काही नर्सेस् , डॉक्टर्स यांची ये-जा सुरूच होती. सँडी ची घालमेल सुरू होती , त्याचं लक्ष लागण कठीण होतं. ऑपरेशन थिएटर मधून येणा-या जाणा-या प्रत्येक नर्स किंवा डॉक्टरांच्या नजरेत आत काय घडतयं हे वाचण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरत होता आणि हृदयाचे ठोके अजूनच वाढत होते. 


अखेर ५ तासांनंतर ऑपरेशन थिएटर चे दार पूर्णपणे उघडले. डॉक्टर्स बाहेर आले आणि सँडी काही बोलणार, एवढ्यात ऑपरेशन चांगलं झालं हे डॉक्टरांचे शब्द त्याच्या कानावर पडले आणि सँडीच्या डोळ्यातून येणा-या अश्रूंबरोबर त्याचे हात नकळत डॉक्टरांसमोर जोडले गेले आणि तोंडातून एकच शब्द बाहेर पडला ‘बाप्पा !’


सहन केल्या जाणा-या किंवा कराव्या लागणा-या अनेक व्यथांना भाषा असते , कमी पडतात ते फक्त शब्द. 


सर्जरीनंतर ८ तासांनतर नव्या शुद्धीवर आली. पण अजूनही सेडेशन असल्याने लगेच डोळे मिटले. सँडीसाठी आणि डॉक्टरांसाठी नव्या शुद्धीवर येणं अतिशय महत्वाचं होतं. ओजसला आई ठीक आहे , तिने माझ्याकडे पाहिलं ह्यातच सगळं आलं होतं. 


अजय सारखेच काही मित्र परिवार नव्याने मायेने जोपासलेले ही भूक तहान हरपून सँडी च्या खांद्यावर आधाराचा हात ठेवून साथ देत होते. नव्याच्या अनुपस्थितीत ह्याच मित्र परिवाराने खूप प्रेमाने ओजसलाही आपलंसं केलं होतं , त्यामुळे सँडीची ती काळजी मिटली होती.


नव्याच्या तब्येतीत ही आता चांगली सुधारणा होत होती. डॉक्टरांनी ही तब्येत ठीक आहे , हे बघून नव्याला हॉस्पीटल मधून डिस्चार्ज करायचं ठरवलं. आज मात्र प्रसादला ख-या अर्थाने मनावरचा भार कमी झाल्यासारखं वाटत होतं. नव्या घरी येणार ह्या विचारानेच त्याच्या मनात चैतन्याच्या लाटा उसळत होत्या. सँडी हॉस्पीटल मधून चांगली तीन तासांची सुट्टी घेतली आणि छान घर सजवलं. आज त्या घरची लक्ष्मी नव्याने गृहप्रवेश करणार होती. सगळ्या घरात मांगल्य त्याच्या हजेरीची साक्ष्य जागोजागी देत होतं . ओजसच्या मनातला चा आनंद त्याच्या निरागस चेह-यावर झळकत होता. 


सँडी आणि अजय हॉस्पीटलमध्ये नव्याला डिस्चार्ज करून घेण्यासाठी निघाले. नव्या ही तयारच होती. घरी परत जाणार या भावनेने तिच्या चेह-यावर परत पुर्वीसारखं तेज आलं होतं. 


सँडी नव्याला म्हणाला , “ चलं नव्या, घरी जाऊया “. हे बोलतांना सँडीचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते आणि ऐकून नव्याही भावूक झाली होती.


घरी पोहोचताच दारात उभ्या ओजसला नव्याने लगेच जवळ घेतलं.


घराला घरपण देणारी आज सुखरूप घरी परतलीये, म्हणून घरंही त्याचं चैतन्य दाखवण्यात मागे नव्हतं. 


क्रमशः.... पुढील भाग चार मध्ये



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational