निवदाचा नवस - भाग तिसरा
निवदाचा नवस - भाग तिसरा
भाग::-- तिसरा
धनतेरसला दहाच्या सुमारास रघू कामतवाडी रेल्वे स्टेशनवर उतरला. खेडेगावातलं छोटसं स्टेशन.
कामतवाडी ही तिथंच कुठं तरी दूर अंतरावर. तो पहिल्यांदाच तिथं येत होता. उतरताच फलाटावर त्याला काशी दिसला.त्याला एकदम हायसं वाटलं.त्यानं लाबूनच काशीला हाक देत इशारा केला. तरी काशी जागेवरून न हालत न पाहिल्या सारखं करू लागला. रघूनं जवळ जात त्याला सोबत नेण्याबद्दल सांगितले.
" इथंच बसा, मी मिनलताईला शोधतो, मग जाऊ सोबत" कपाळावर आठीचं जाळं उमटवत काशी बोलला व मिनलताईला शोधायला गाडीकडं निघाला. रघूनं बाकड्यावर बसत जाणाऱ्या काशीवर लक्ष ठेवलं.गाडीनं शिटी देत फलाट सोडला.गर्दी कमी झाली. काशी हळूच गाडीकडं सटकला.
" भुनाजी बापू, ते ग्रामसेवक कार्टून आलंय पण मिनलचा पत्ता नाही, गाडी तर गेली."
" ती तर येणार होती ना? मग कशी नाही आली? नीट शोध एकवेळा पुन्हा जाऊन”भुनाजी काशीवर गरजला.
" सारं शोधलं. गाडी गेली गर्दी पांगली.आली असती तर दिसलीच असती.काय ठाऊक येण्याचं रद्द केलं असावं की आपला सुगावा लागला? आता त्या कार्टुनला तरी आणतो"
नागानं नागिणीच्या शोधात निघावं व नागिण गावूच नये त्यामुळं नाग फुत्कारावा तसाच भुनाजी फुत्कारला.
" सारा प्लॅन विचकटला.जा त्या उंदराला तरी आण"
'आज मिनल मुलाला घेऊन येतेय कामतवाडीला ' हा निरोप सुनाजीरावाचा ड्रायव्हर काशीनं भुनाजीला पोहोचता करताच दुपारीच भुनाजीनं आज दोघांना संपवून सुनाजीच्या खानदानाचा दिवाच विझवावा असं ठरवत काशीबरोबर आला होता.ऐनवेळेस त्या रघू झोपेला कल्टी मारण्याचं ठरवलं ही होतं.पण मिनल आलीच नाही.मग मिनल गेली कुठे?
काशीनं फलाटावर जात रघूला घेतलं व गाडीकड आणलं.
" मिनलताई आल्या नाही वाटतं! चला निघूयात.नी जळगावला गेलेले भुणाजीही आहेत मात्र गाडीत" काशी अंधारात बोलला.
भुनाजीला गाडीत पाहताच रघूला भिती वाटली.
" या झोपे अप्पा, तुम्ही पण आहेत का! मी जळगावला गेलो होतो.अनायासे हा काशी भेटला.बरं झालं गाडी आहे" भुणाजीराव गाडीतून बोलले.
गाडीनं स्टेशनाला वळसा मारत खलवाडीचा रस्ता पकडला असावा.अंधारात रघूला काहीच दिसत नव्हतं. फक्त गाडीच्या लाईटात समोरचा रस्ता व आजुबाजूची झाडं जाणवत होती. गाडी तट्ट फुगलेल्या तापी पात्राला लागून हाकेच्या अंतरावरील वळणा वळणाच्या रस्त्यानं धावत होती.एका बाजुला ऊस, केळी, कापसाची शेतं व दुसऱ्या बाजुस नदीकाठावरची सौंदळ, चिलारीची झाडं, चढ उताराची खोरी. गाडीत रघू शांत बसला.भुणाजीराव व काशी आपापसात खुसूरफुसूर करत होते.
गाडीनं तीनेक किमी अंतर पार केलं.नी तोच भर रस्त्यावर दूर बाई व माणूस गाडीला थांबवण्यासाठी हातवारे करू लागले.
"कोण रं ही वावदूक या वेळेस, काशी?"
"भवानी मातेच्या मंदिरात आले असतील कुणी ! उद्या चतुर्दशीचा नवस फेडायला!" सांगत काशीनं गाडीचा वेग कमी केला. घूर्र घूर्र्र करत इंजीन बंद झालं
" काय रे काय हवंय?मरायचं का गाडीत येऊन?" भुणाजीराव बोलत त्याच्याकडं डोळे फाडत पाहू लागला.आणि विस्मयानं किंचाळलाच
" बाल्ट्या तू? अन तारी तू?"
तोच गाडी थांबवणाऱ्यांनी भुणाजीला ओळखलं असावं ते एकमेकांना इशारा करत पळू लागले.
" अरे! थांबा. थांबा.कुठं पळताहेत?काशी उतर, पकड यांना!" भुणाजी उतरत गरजला.
तोच काशीनं छलांग मारत तारीला पकडलं. तारी धरली जाताच दूर धावणारा बाल्ट्या ही थांबला.
" बाल्ट्या पळू नको, घाबरू नको.मी काहीच करणार नाही.उलट इतके दिवस कुठं होतात नी आज एवढ्या रात्री इथं कसे?" भुणाजी विचारू लागला.
तारी दम टाकू लागली तसा बाल्ट्यालाही धीर आला व तो खाली मान घालत परत फिरला.
" तारी, बाल्ट्या मला वाटलं त्या रात्री मारलंच तुम्हाला! पण तुम्ही तर... मग होतात तरी कुठं?" भुनाजी उताविळतेने विचारू लागला.
" बापू काही दगा करणार नसाल तर सर्व सांगतो." तारी बोलली.
" अरे काहीच करणार नाही.सांगा"
" बापू तुम्ही पाठवलेली पुडी धना पावडरमध्ये कालली.कोंबडं ही बनवलं.पण तुमचाच माणुस फुटला नी घोळ झाला. पाचही मेंबर जेवायला बसणार तोच संदेशराव आला"
" मग काय झालं तारी पुढं बोल?"
" बापू संदेशराव मला व माझ्या नवऱ्याला मारणारच होते तोच त्यांनी विचार करत सांगितलं. पैशासाठी विकले गेलात ना ! मग मी आणखी देतो पण इथनं काळ तोंड करा. उद्याच काय पण कधीच गावात फिरकू नका. जीव वाचतोय या खुशीत फेकलेले पैशे उचलले व सरळ कामतवाडी हून रेल्वे पकडली. गेलो तमिळनाडूत निघून.तेथेच कोडाईकॅनाल ला हाॅटेल टाकलीय व स्थीर झालोत"
" च्या मारी तुमच्या माझ्याकडून पण नी संदेशकडंनं पण घेऊन पळालात?" भुणाजी संतापला.
"बापू काही करायचं नाही हं" बाल्ट्या हात जोडू लागला.
" बरं मग आज इथं का कोलमडलात इतक्या दिवसानंतर?"
" बापू निवदाचा नवस फेडायला आलोत! भवानीमातेला निवद देऊन पाच लोकांना खाऊ घालायचं व कुणाला न दिसता लगेच निघायचं म्हणून रात्रीचच आलोत!सारा स्वयंपाक झालाय निवद चढवला पण आमच्या सोबतचे तीन जेवलेत,अ जुन दोन लोक हवेत जेवायला. तोच गाडी दिसली येतांना म्हणून हात देत थांबवत होतो तर तुम्हीच आलात"
भुणाजीनं खात्री करण्यासाठी त्यांना मंदिराकडं चालायला लावलं.
" काशी, झोपे चला तर खरी, हे खरं बोलताहेत की खोटं ते ही पाहू" म्हणत काशी, भुणाजी भवानी मातेच्या मंदिराकडं निघाले.रघूला हा काय प्रकार ते कळेना. पण गाव अजुन चारेक किमी दूर व रात्र. एकटं कसं जायचं म्हणून तो ही त्यांच्या मागं निघाला.
तापी काठावरच भवानीमातेचं मस्त टुमदार देऊळ होतं.देवळाच्या बाजुलाच दक्षिणेला पश्चिमेकडून येऊन तापीला मिळणारा भला मोठा नाला होता. जवळ जाताच मटणाचा खमंग वास शांत रातीच्या वातावरणात घुमत नाकात शिरला.साऱ्याच्या भूका चाळवल्या. चूल ढणाणा ढणढणत होती.सारी लाकडं पेटत जाळ उठलेला.भाजी रटरट शिजत होती. तापी काठावर मंदिरापासून दूर तीनेक माणसं झोपलेली होती?
" तारी तिकडं कोण आहेत?"
" आमच्यासोबत आलीत ती.तमिळी आहेत.त्याचं जेवण आटोपलं"
" भाजी तर अजून शिजतेय मग त्यांचं जेवण कसं आटोपलं" भुणाजीनं चुलीत चालू जाळ व रटरट शिजणाऱ्या भाजीकडं पाहत विचारलं.
" बापू भाजी तर केव्हाच शिजलीय आम्ही तिकडं आलो तेव्हा हवेनं लाकडं पेटली असावीत" सांगत तारीनं बाल्ट्याला जाळ विझवायला लावला.
" अगं जाळ विझवतो पण तू आधी पत्रावळी लाव बापूंना" बाल्ट्या बोलला व त्यानं लक्ष नाही पाहत जाळ पुन्हा चेतवला.
भुणाजीस तारी व बाल्ट्याची खात्री पटली. त्याला भूक तर लागलीच होती.त्यानं काशीला जेवायची खूण केली.तोच लघुशंकेसाठी रघू काठाकडं निघाला. भुणाजी व काशी बसले.तारीनं मोठमोठ्या दोनतीन बादल्या भरल्या.तोच तिकडं काठावर झोपलेली माणसं उठून भुणाजीकडं सरकली.
" तारी तो एक चालला गं तिकडे,त्याला पण बोलव ना!" बाल्ट्या विचीत्र विव्हळू लागला.
" अहो तीन झालीत आता दोन तर लागणार आहेतनी हे दोन आहेतच.यांना तर आधी..." तारीचा आवाज बदलला.
भुणाजी चक्रावला.काठाकडील माणसं जवळ आली.त्यांना पाहताच भुनाजी जोरात किंचाळला
" संदेश, किरण तुम्ही ......?, काशी उठ पळ..."
" अय बापू कुठ पळतोय तीन झालीत आज दोन तर करणारच..."
" तारी...तो एक तिकडं गेलाय त्याला ही आण ना.." बाल्ट्या
" आधी यांना जेवू घाला"
तोच भुणाजी काशी उठून पळू लागले.बाल्ट्यानं बादली उचलली नी दोघांच्या अंगावर फेकली.भुणाजी काशी जोर जोरात किंचाळताच ल
घुशंका करून काठावरूनच रघूनं पाहिलं. दोन्ही माणसांनी भुनाजी व काशीला पकडलं होतं व तारी बाल्ट्या कढईतून बादल्या भरून भरून त्यांच्या अंगावर टाकत होते.भुनाजी, काशी भाजलेल्या डुकरागत जिवाच्या आकांताने बोंबलत होते.लोळत होते.पण माणसं सोडतच नव्हते.संदेश किरण सोडा रं पाया पडतो. रघु थरथरला, गरफाटला.त्यानं काठाकडंनंच परभारे पळ काढला.ती माणसं भाजलेल्या ,शिजलेल्या काशीला व भुणाजीला चुलीत घालत होते.
" तारी ते एक बांदर चाललं गं पळून! त्याला आणतोच मी!" म्हणत बाल्ट्या त्याच्याकडं जाऊ लागताच त्या माणसा जवळ झोपलेली बाई जी आता पर्यंत शांत होती ,ती आडवी होत " बाल्ट्या मागं फिर त्याला हात नको लावू" गरजली.रघू काठा काठा कडंनं रस्त्याकडं धावू लागला.त्याला तारी बाल्ट्या दिसला होता पण ती माणसं व बाई यांचा चेहरा मात्र दिसलाच नव्हता.रघूला दूरपर्यंत भुणाजी व काशीच्या किंकाळ्या, आक्रोश ऐकू येत होता.
बरच अंतर आल्यावर रघू रस्त्यावर धापा टाकत रडू लागला.तोच कामतवाडीकडंन गाडी येतांना दिसली. त्याला अंधुकशी आशा पालवली.त्यानं रस्त्यात आडवं होत रडतच गाडी थांबवू लागला.गाडी थांबली." मला वाचवा!,मला वाचवा!" म्हणत तो ड्रायव्हरच्या अंगावर पडला.ड्रायव्हरनं जवळ बसलेल्या माणसाकडं पाहीलं. त्यानं स्मित हास्य करत होकार देण्या आधीच रघू मधल्या शीट वर बसला.तिथं आधीच बाई बसलेली.
गाडी सुरू झाली मधला छोटा बल्ब सुरू झाला.रघुच्या पायातल्या चप्पल गायब होत्या.कपडे चिल्लारीच्या काट्यांनी फाटले होते. अंगावर ओरखडे होते.उजेडात त्यानं आपली दशा पाहताच रडायला लागला.माणसं काहीच बोलत नव्हती.तोच त्याचं लक्ष जवळ बसलेल्या बाईकडं गेलं नी बाईचं लक्ष त्याच्याकडं गेलं.
रघूनं चार वर्षानंतरही अचुक ओळखलं.
" शितल.....शितल... तू!" नी रडू लागला
तोच ती बाई पण " तू ..तू.. रघू ना..?, मिनाचा मित्र?"
" हो शितल मी मीच तो रघू! तुझ्या लग्नात मिनानं भेटवलं होतं तुला.आठवतं ना?" रघू अजुनही घाबरत रडतच होता.
" रघू ओळखलं रे मी तुला!, पण इकडं कसा काय?नी असं रडायला काय झालं तुला?"
" शितल अगं खलवाडीत ग्रामसेवक म्हणून चार दिवसांपूर्वी च आलो.आज बोधवडला गेलो होतो. दहाच्या रेल्वेने कामतवाडीहून भुणाजीरावासोबत येत होतो तर या मंदिराजवळ जाळलं गं त्यांना! नी मी कसाबसा पळालो तेथून.वाचव मला", म्हणत तो तिला बिलगला व रडू लागला.
" अरे रघू घाबरू नकोस.आम्ही आहोत ना आता" शीतल शीटवरच दूर सरकत त्याला धीर देऊ लागली.माणसं अजुनही शांतच होती.गाडी धावतच होती.खलवाडी मात्र येतच नव्हतं.
रघुचा आवेग थोडा शांत झाला.
" शितल तु इकडं कशी काय पण?"
" अरे रघू ! कशी म्हणजे? वलवाडी माझं गाव आहे रे! नी तू ज्या पंचायतीचा ग्रामसेवक आहे त्या पंचायतीची मी सरपंच आहे!"
रघूला धक्काच बसला.तो विस्मयानं पाहू लागला.
" अरे 'शितल'हे नाव माहेरात.इथं लग्न करून आले नी 'मिनलताई' नाव झालं"
आता रघूची ट्यूब पेटली.
" म्हणजे सुनाजीराव आबांची तू सून?"
" होय तेच" म्हणत शितलनं रघूला दिसू न देता कपाळावर हात पुसला.
" अगं मग तू तर दहाच्या गाडीनं येणार होतीसना? आबांनी काशीला पाठवलंही होतं"
" रघू हो! पण काशी भुणाजीला मिळाल्याचं आबांना कळताच आबांनी आधीच दुसरी गाडी देत यांना पाठवत कामतवाडीच्या आधी येणाऱ्या दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणीच मला उतरवलं. नी नंतर मग दोनला निघालो."
रघूला भुणाजी व काशी गाडीत काही तरी खुसूरफुसूर करत होते ते आठवलं. नी खात्री झाली.सुनाजीआबांची सून मिनलताई हीच शीतल आहे समजल्यावर त्याला धीर आला.त्याला आता मिना आठवू लागली.शीतल मिनाबाबत काही तरी सांगेल म्हणून तो शीतल- मिनलताईकडं पाहू लागला.
" रघू हे माझ्या भावकीतले दीर आहेत.आमचे स्वामी संदेशराव व दीर किरणराव हे गेलेत रे!" मिनलताई सांगत असतांना डोळ्यात आसवं तरळली.गाडी मात्र धावतच होती.अचानक त्याला '.....आपले सहर्ष स्वागत करीत आहे ' नावाची कमान भर्रकन मागे गेल्याचा भास झाला.माणसं मात्र अजुनही शांतच होती.
" रघू तू जो बाल्ट्या व तारी सांगतोय यांनीच संदेशरावांना व किरणरावाना मारलं रे! गावात साऱ्यांना अपघात झालाय असंच माहितीय.पण नाही रे" मिनल आसवं गाळतच सांगत होती.
रघूला संदेश,किरण ही नाव ऐकल्यासारखं वाटू लागलं.
मिनल रघूला सांगू लागली.
पण तोच मंदिरात काकडा सुरू झाला.
" पुरे आता परतावं लागेल .घरही आलं." एका माणसानं मिनलला सांगितलं.
" रघू चल घर आलं, बाकी नंतर बोलू आधी फ्रेश हो चहा घे.मगच सकाळी निवांत खलवाडीत जा.रघू व मिनल वलवाडीत सुनाजी आबांच्या घरी उतरताच दोन्ही माणसं गाडी घेऊन गेले.
सुनाजी आबांचं घर बंदच होतं.अजुन कोणी उठलंच नव्हतं.मिनलनं पुढे होत दरवाजा जोरजोरानं वाजवला.रघू ओट्याच्या खालीच उभा राहत अंधारात इकडं तिकडं पाहू लागला.दरवाजा उघडताच मिनल आत गेली असावी.रघूनं वळून पाहिलं तर त्रागा करत डोळे चोळत आबा उभे.दरवाजा कोण एवढं जोरजोराने वाजवतंय म्हणून आबा पाहू लागले तर रघू खाली उभा.
" अप्पा. तुम्ही वाजवला का दरवाजा? या वेळेस तुम्ही इथं कसं काय? या वर आत या!"
" मिनल ताईंनी वाजवला दरवाजा.सोबत आलो आम्ही कामतवाडीहून!" रघू आबांना वर चढत बोलला.
" मिनलताईनी वाजवला? नी तुम्ही सोबत आला कामतवाडीहून? काय सांगता काय?" आबांची झोप खाडकन उघडली.
" कामतवाडीहून नाही पण भवानीमंदिरापासून सोबत आलो" रघू आता ओसरीत आला.
" अहो अप्पा सोबत आलात तर मिनल कुठंय?" आबा चौकसपणे विचारू लागले.
" तुम्ही दरवाजा उघडला नी त्या आत गेल्यात"
" अहो अप्पा मिनल व मी तालुक्यावरनं रात्री बारालाच आलोत घरी नी झोपलीय ती घरात.मग तुम्ही सोबत आलात कसं म्हणताय." आबांचा आवाज आता चढला.
तोच रघूचं लक्ष समोरच्या भिंतीवर टागलेल्या फोटोकडे गेलं.
" आबा हे फोटोत दिसतात ते दोघं माणस ही सोबत होते आमच्या गाडीत.ते गाडी लावून येतीलच आता."
रघू दाखवत असलेल्या संदेश व किरणच्या फोटोकडे पाहत आबा किंचाळलेतच
" काय? हे पण सोबत होते?"
" हो.हवं तर मिनल ताईला घरातून बोलवा व विचारा"
आता मात्र आबा थरथरू लागले.मामला काही तरी वेगळाच आहे म्हणून त्यांनी घरात झोपलेल्या मिनलला जोरात आवाज दिला.
" मिनल, मिनल! उठ बाहेर ये जरा!"
अचानक आवाज ऐकून बाराला येऊन गाढ झोपलेली मिना उठत आपली पांढरी साडी व्यवस्थीत करत बाहेर आली.
" काय झालं आबा!"
तोच तोच रघूनं तिला पाहिलं व तिनं रघूला पाहिलं नी दोघे एकमेकांकडं पाहतच राहिले.
" मिना......! तू?"
"........" मिना ...मिनल स्तब्ध.
अप्पा ही मिनल होती का तुमच्या सोबत? आबा विचारते झाले.
" नाही. ही तर मिना आहे!"
आबा समजले. काय घडलंय ते. त्यांनी रघुला मागचे फोटो दाखवत विचारले
" अप्पा तुमच्या पाठीमागं पहा ही होती का सोबत?"
रघू मागे वळला त्यानं फोटो पाहताच
" होय हीच शितलताई आलीय माझ्या सोबत!" सांगितलं.
" आबा व मिनल थरथरत खाली गप्पगार बसले.
" अप्पा पोरा ती शितलच आहे. मिनल नाही. मिनल तर ही जिला तू मिना म्हणतोय.! वाचला पोरा तू!" आबानी उठत रघुचा खांदा पकडला.
रघूला मात्र धक्क्यावर धक्के बसत होते रात्रभर.
कोण बाल्ट्या?कोण तारी? भुनाजी ओरडतांना संदेश किरण बोलला होता. पण तरी आपण शितलच्या बोलण्याकडं लक्ष दिलं नाही. नी कोण शितल? कोण मिनल? कोण मिना? मिनल की मिना? की ते सर्व खरे व हेच खोटे? तो बेशुद्ध पडला.
आबा व मिना मात्र रडत त्याला बाजेवर झोपवू लागले?
(क्रमशः)