Nandkumar Marawade

Inspirational

3  

Nandkumar Marawade

Inspirational

न फिटणारे ऋण

न फिटणारे ऋण

6 mins
465


मातृऋण, पितृऋण, समाजऋण व अन्य प्रकारचे ऋण प्रत्येक जन्माला आलेल्या मनुष्य प्राण्याला फेडावे लागतात. हे ऋण आपण कितीही प्रयत्न केले तरी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत फेडू शकत नाही. ज्या आई-वडीलांचे पोटी आपण जन्म घेतो त्यांचे ऋण हे सर्व ऋणात फार महत्त्वाचे व मोठे असल्याने आपण आपल्या आयुष्यात आई-वडीलांसाठी किती काहीही केले तरी ते कमीच असते.


असे म्हणतात, माणसांच्या भावी जीवनाचा पाया हा बालपणीच भरला जातो. आई-वडीलांवरच त्याचे भावी जीवन अवलंबून असते. त्यामुळेच आई-वडीलांनी बालपणी दिलेली शिकवण व केलेले संस्कार हे फार महत्त्वाचे असतात. आज आम्ही भावंडेदेखील समाजात विविध क्षेत्रात काम करीत असताना ताठ मानेने जीवन जगत आहोत याचे सारे श्रेय हे आमच्या आई-वडीलांनाच जात आहे. कारण आपल्या मुलांच्या वाट्याला सुखाचे दिवस यावेत यासाठी त्यांनी आयुष्यात प्रचंड खस्ता खाऊन व प्रसंगी जे मिळेल ते खाऊन दिवस काढले. उद्देश हाच की, आपल्या वाट्याला जे दु:खाचे क्षण आले ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत.


आमचे वडील हे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले व चौथीपर्यंतचे शिक्षण घेतलेले एक सद्गुहस्थ. १९३४ साली जन्माला आलेल्या आमच्या वडीलांचे चौथीपर्यंतचे शिक्षण म्हणजे त्यावेळचे मोठे शिक्षण. त्यामुळे त्यांना विविध ठिकाणी नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली होती. परंतु, नोकरीच्यापाठी न पडता वडीलोपार्जित शेती क्षेत्रालाच त्यांनी प्राधान्य देऊन व काबाडकष्ट करून त्यांनी आपले सारे जीवन व्यतित केले. तर त्यांची अर्धांगिनी म्हणून आमच्या आईनेही त्यांच्या पाठीमागे सावलीसारखे उभं राहून त्यांना सदैव साथ दिली.


आमचे वडील म्हणजे कष्ट, सदाचार, प्रेम, वात्सल्य, त्याग, बुद्धी व संयमाची मूर्ती. प्रचंड बुद्धीमत्ता अंगी असल्याने शेतीच्या कामातून फावला वेळ मिळाल्यावर ते वाचनाला प्राधान्य देत. वाचलेले सारे त्यांच्या लक्षात राहत असे. म्हणून तर ग्रंथराज ज्ञानेश्वरी त्यांच्या तोंडपाठ होती. तर तुकाराम गाथेतील बहुतांश अभंगही त्यांचे तोंडपाठ होते. रामायण, महाभारत, हरिविजय, शिवलिलामृत आदी ग्रंंथही ते लिलया वाचत. आयुष्यात खूप कष्ट झेलले पण आपला संयम कधी ढळू दिला नाही की चिडाचिड केली नाही. "रात्रंदिन आम्हां युद्धांचा प्रसंग," या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या रचनेप्रमाणे सतत काम हाच धंदा पत्करला होता. त्यांच्या या कष्टाळू वृत्तीने सारा गाव अजब होत असे.


आम्ही लहान असल्यापासून ते नेहमी म्हणायचे, मनुष्य जीवन हे दुर्लभ आहे. परमेश्वराने आपल्याला मनुष्य योनीत जन्माला घातले असल्याने परमेश्वराला आपण शरण जाऊन सदोदित भगवान परमात्म्याचे नामस्मरण केले पाहिजे. तर आपले जीवन सार्थकी कसे लागेल यासाठी आपण चांगले कर्म केले पाहिजे. विविथ अमिषांनी नटलेल्या या जगाकडे न पाहता आपण आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सतत झटले पाहिजे. तर जग कसेही वागले तरी आपण आपली पायरी सोडायची नाही. अशाप्रकारच्या त्यांच्या अनमोल शिकवणीतून आम्ही घडत गेलो. तर जीवनात कोणाशी कसे वागावे, वायफळ बडबड करू नये, आपल्याहून गरीब असणांऱ्याना सहकार्य करावे, अंगात कायम नम्रता असावी ही आमच्या वडीलांनी दिलेली शिकवण. त्या शिकवणीचा आम्ही अंगिकार करुन व त्यादृष्टीने वाटचाल करून जीवनात कितीही अडचणी आल्या तर त्या निभावून नेण्याचे आत्मिकबळ हे त्यांच्या शिकवणीतूनच मिळत आहे.


आमची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यात खाणारी तोंडे सहा आणि वाट्याला असलेली शेती म्हणजे फक्त एक एकर. या एक एकराच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून संपूर्ण वर्षभराच्या रोजीरोटीची तरतूद करणे व दैनंदिन गरजा भागविताना वडीलांची पुरती दमछाक व्हायची. अशावेळी त्यांनी अरदळ, तिरदळ पद्धतीने दुसऱ्यांची शेती राबायला घेतली होती. आमच्याकडे उन्हाळी भातशेती पिकविण्यासाठी कालव्याच्या पाण्याची व्यवस्था असल्याने उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामात वडील भाताचे पिक काढत. उद्देश हाच की कुटुंबाच्या गरजा भागविल्या जाव्यात. या दोन्ही हंगामात शेत जमिनीत पेरणी, उखळण, बेर करणे व भात लागवडीच्यावेळी चिखळणी करणे आदी नांगरणीची कामे वडील स्वतःच करायचे. शेतीच्या कामात इतरांना मजूरी द्यायला परवडायचे नसल्याने आई आणि वडील दोघेच जास्तीत जास्त शेतावर राब राब राबायचे. भात लागवड व भात कापणीच्या हंगामात वडीलांच्या पायाला बिल्कूल विश्रांती नसायची. लागवडीच्या वेळी सकाळी सहालाच त्यांचा दिवस सुरु व्हायचा ते सायंकाळी काळोख पडेपर्यंत ते शेतावरच असायचे. तर कापणीच्या हंगामात भात कापल्यानंतर त्याची झोडणी करून साफसफाईची कामे अगदी रात्री बारा-बारा वाजेपर्यंत करायचे. विश्रांती हा प्रकार त्यांना माहितच नव्हता. दोन्ही हंगामात भातशेती करणे याशिवाय पावसाळ्यात माळरानावर वरी व नाचणीची पिके घेणे, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालनाचा व्यवसायही त्यांनी केला. उद्देश हाच की आपल्या मुलांना शिक्षणात काहीही कमी पडू नये व ती चांगली शिकली पाहिजेत.


वडीलांनी आयुष्यात कोणतीही हौसमौज न करता अत्यंत साधी राहणी पत्करून व वेळप्रसंगी आपल्या गरजा मारून दिवस व्यतित केले. स्वतःच्या कुटुंबासाठी राबत असतानाच गाव व समाजातील प्रत्येक उपक्रमात देखील आपला वेळ खर्च करीत. "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान", या संत वचनाप्रमाणे आपल्या परिस्थितीचा कधीही बाजार न मांडता अत्यंत आनंदात त्यांनी दिवस व्यथित केले. दुसऱ्यांच्या दु:खाची जाणीव असल्यानेच वेळप्रसंगी स्वतः अर्धपोटी राहून घासातला घास दुसऱ्यांना दिला तर एखाद्याच्या गरजेच्या वेळी थोडीफार आर्थिक मदतही करीत असत. परिस्थिती नसतानाही शेजारच्या दोन तीन परिवाराला नेहमीच सर्वोतोपरी सहकार्य केले. तर कधी कधी त्यापैकीच एखाद्या परिवारात काहीवेळा खायला काहीच नसले की वडीलांकडे येत. मग वडील आईला लगेचच सांगायचे आज मला जेवायला नसले तरी चालेल. माझ्या वाट्याचे आज यांना देऊन टाक. अशावेळी आईदेखील मोठ्या प्रेमाने घरातील थोडेफार सामान, तांदूळ व पिठ आदी देऊन त्यांची व्यवस्था लावून देत असे. आई-वडीलांनी अशाप्रकारे लहानसहान गोष्टीत केलेला त्याग व परिस्थिती नसतानाही केलेली सहकार्याची भावना त्याचेच पुण्य आमच्या पदरात पडल्यानेच आमच्या वाट्याला आज त्यांच्यामुळेच चांगले दिवस आले आहेत.असे म्हटले तर वावगे ठरू नये.


"कष्टाची तू मूर्ती, कष्ट सारे तुझ्या हाती", खरोखरच आयुष्यात कोणत्याही प्रकारची लांडीलबाडी न करता व दुसऱ्यांची फसवणूक न करता फक्त कष्ट करून कुटुंबासाठी कसे राबराब राबायचे हे आमच्या वडीलांकडूनच शिकावे. या जाणिवेतूनच आम्ही भावंडेही सुट्टीच्या वेळी इतर मुलांबरोबर खेळणे अथवा गप्पा गोष्टीत वेळ न घालविता आई-वडीलांना शक्य तेवढी घरकाम व शेतीच्या कामात मदत करायचो. तर कोणताही हट्ट न करता मिळेल त्यात समाधान मानून चांगले शिक्षण घेतले. त्यांनी आयुष्यात आमच्यासाठी केलेल्या कष्टांमुळे व सोसलेल्या हालअपेष्टांमुळेच आम्ही चांगले शिक्षण घेऊन समाजात आज आम्हाला नावलौकिक प्राप्त झाला आहे.


त्यावेळी आमच्या गावात व जवळच्या नातेवाईकांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच काही सुखवस्तू परिवार होते. बाकी नात्यामध्ये व गावात जवळजवळ आमच्या सारखीच इतरांची परिस्थिती होती. या सर्वांमध्ये आम्हीच भावंडांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात पुढे आलो. कारण आई-वडीलांनी लहानपणी आमच्यावर केलेले संस्कार व वेळोवेळी करून दिलेली परिस्थितीची जाणीव. आज केवळ त्यांच्यामुळेच आमचे जीवन आनंदीमय झाले आहे. आज आमचे दिवस सुखाचे व आनंदाचे जरी असले तरी मागील दिवस न विसरता आई-वडीलांनी केलेले संस्कार व घालून दिलेल्या शिकवणीतून समाजात वावरत आहोत.


आम्ही शिकून सवरून कामधंद्याला लागल्यावर त्यांच्या हयातीतच चांगले घर बांधून व त्यांचे उर्वरीत आयुष्य सुखासमाधानाने जावे यासाठी वडीलांकडून शेतीची कामे काढून घेतली व इतर गडी माणसांच्या साहाय्याने ती करू लागलो. त्यांना कोणत्याही गोष्टींची कधीही उणीव भासू दिली नाही. कालांतराने कामधंद्याच्या निमित्ताने आम्ही दोन्ही भाऊ बाहेरगावी राहायला गेल्यावर तिथे स्वतःचे फ्लॅट घेतले.


आई-वडीलांना मी माझ्यासोबत घेऊन गेलो. संपूर्ण आयुष्य गावामध्ये व शेती करण्यात घालविल्याने वडीलांना फ्लॅटमध्ये राहायला थोडे अवघडल्यासारखे वाटायचे. जेमतेम सहा महिनेच ते आमच्याबरोबर राहिले असतील आणि एका अल्पशा आजारात त्यांना देवाज्ञा झाली. चांगले सुखाचे दिवस आले असताना वडील एकाएकी आम्हाला सोडून गेले. "परि नाही घडली सेवा काही", या उक्तीप्रमाणे खरोखरच आमच्यासाठी आमचे वडील आयुष्यभर राबराब राबले आणि आमचे चांगले दिवस आले असता त्यांच्या सेवेची संधीही आम्हाला मिळाली नसल्याचे शल्य आजही बोचत आहे.


अतिशय शांत, नम्र, परोपकारी व कष्टाळू अशा आई-वडीलांच्या पोटी आम्हाला जन्म मिळाला हे आम्ही आमचे भाग्य समजतो. कारण त्यांच्याच पुण्याईने आमच्या जीवनाचे तर सोने झालेच याशिवाय आमचीही मुलेही हुशार व संस्कारक्षम निघाली. वडीलांनी आमच्यासाठी इतकं केलं आहे की,त्याला मोल नाही. त्यांना देवाधर्माची तसेच देवदर्शनाची खुप आवड होती. त्यामुळे त्यांना विविध तिर्थक्षेत्राचे दर्शन घडवू ही आमची खूप इच्छा होती. परंतु, त्यांचे आमच्यातून एकाएकी निघून जाण्याने आमची ती इच्छा मात्र अधूरीच राहिली आहे. त्यांच्यासाठी शेवटी इतकचं म्हणता येईल,"काय द्यावे त्यांसी होऊ उतराई, ठेवितो हा पाय जीव थोडा."


Rate this content
Log in

More marathi story from Nandkumar Marawade

Similar marathi story from Inspirational