न फिटणारे ऋण...
न फिटणारे ऋण...


'Woman Of The Year' award goes to Drushti Bhosale... नाव पुकारताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्या कडकडाटात आपल्या नेहमीच्या आधारासोबत दृष्टी सावकाश स्टेजवर जाऊ लागली. नेहमीसारखा हसतमुख चेहरा, त्यावर ओसंडून वाहणारा प्रचंड आत्मविश्वास! हीच तिची ओळख होती. एरवी तिच्यासारख्या असंख्य लोकांची ओळख असते काठी! तिचा तो आधार होता; परंतु तिने जिद्दीने स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्याचेच फलित होते आजचा पुरस्कार सोहळा! खरंतर अशा काही व्यक्ती असतात ज्यांना पुरस्कार मिळाला की, पुरस्काराची उंची वाढते. आज तेच घडत होते माझ्यासमोर. तसा तिचा हा कौतुक सोहळा नवीन नव्हताच माझ्यासाठी. अशा अनेक सोहळ्यांची मी साक्षीदार झाले होते. तिने मनोगत व्यक्त करायला सुरुवात केली आणि मी तिच्या भूतकाळातील आठवणींत हरवून गेले...
"मी 'दृष्टी.' अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असेल ना? साहजिकच आहे. अनेकांना माझ्याकडे पाहून प्रश्न पडतो.. माझ्या आई-वडिलांनी माझे हे नाव कसे ठेवले? किती हे धाडस! खरंच धाडसच होते ते! ही फक्त सुरुवात होती. असे अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले आणि यशस्वी करून दाखवले माझ्यासाठी. घरात नवीन पाहुणा येणे म्हणजे त्या घरासाठी एक उत्सवच असतो. खूप आनंदात होते माझे आई-वडील माझ्या जन्माने. पण.. पण.. हा आनंद फार काळ नाही टिकू शकला. जन्मानंतर दहा दिवसातच तापाचे निमित्त झाले आणि माझी दृष्टी गेली. परमात्म्याने निर्माण केलेली सृष्टी पाहण्याआधीच दैवाने माझी दृष्टी हिरावून घेतली होती. काय अवस्था झाली असेल माझ्या जन्मदात्यांची? हे तेव्हा मला कळणे शक्य नव्हते आणि जेव्हा मला कळायला लागले, तेव्हा त्यांनी मला ते कळूच दिले नाही. त्यांच्या नजरेतून मी हे जग पाहायला शिकले. एरवी मूल चालायला लागेपर्यंत पालकांचे बोट धरते, पण मला मात्र सतत त्यांचे बोट धरावे लागत होते. याबाबत कधीही त्यांनी नशिबाला दूषणे दिली नाहीत. त्यांच्या आधाराने मी वाढू लागले. हे जग खूप सुंदर आहे! ते मन:चक्षूनी कसे पाहायचे, हे त्यांनी मला शिकवले. माझ्यासाठी स्वतःच्या कितीतरी इच्छांना त्यांनी तिलांजली दिली. माझ्या पालनपोषणात काही कमी पडू नये म्हणून एकाच अपत्यावर ते थांबले. त्यासाठी जगाचे कटू बोलही ऐकले. किती हा नि:स्वार्थीपणा!
जेव्हा आपण अशा परिस्थितीत असतो तेव्हा सल्ले देऊन जखमेवर मीठ चोळणारे अनेकजण भेटतात. "हिला अंधांच्या शाळेत घाला, नाहीतर शिकवू नका काही उपयोग नाही," अशा फुकटच्या सल्ल्यास त्यांनी अजिबात जुमानले नाही. आमची 'दृष्टी 'सर्वसामान्य मुलांसारखी शिकेल आणि स्पर्धेत टिकेलही हे ठणकावून त्यांनी सर्वांना सांगितले. त्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली हे तितकेच खरे! त्यांचा माझ्यावरील विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता माझी होती. मी जिद्दीने शिकू लागले. त्यात मला शिकवायला येणाऱ्या माझ्यासारख्याच दृष्टीहीन सावंत सरांचा तसेच शाळेतील शिक्षकांचा मोठा वाटा आहे. मजल-दरमजल करत मी एक-एक टप्पा ओलांडू लागले. मला हे जमणार नाही, असे माझ्या मनाला कधीच शिवले नाही कारण तो विश्वास माझ्या आई-बाबांनी मला दिला होता. स्वावलंबी बनवले होते त्यांनी या दृष्टीला. सर्व परीक्षांमध्ये मी अव्वल राहिले. पाचवी, आठवी या इयत्तांमध्ये शिष्यवृत्ती मिळवली आणि तेव्हाच माझे ध्येय ठरले, मी जिल्हाधिकारी होणार! माझा निर्णय ऐकून अनेकांनी तोंडात बोटं घातली. पण 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे' हे माझ्यावर लहानपणीच बिंबवले गेले होते. दिवस-रात्र एक करून मी अभ्यासाला लागले. आई-बाबांची मान ताठ ठेवायची असेल, तर कष्टाशिवाय पर्याय नाही हे मी स्वतःलाच बजावले होते. अभ्यासासोबत माझी संगीतातील रुची पाहून माझ्या बाबांनी त्याचीही तालीम देण्याची सोय केली. तबला, पेटी, गायन सर्वच गोष्टी मी शिकले. माझा वक्तृत्व गुण हेरून त्यांनी मला भाषण स्पर्धेत उतरवले. गर्दीची, लोकांच्या माझ्यावरील नजरेची भीती मला कधी शिवलीच नाही. अनेक स्पर्धांमध्ये मी अव्वल आले. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण सगळे टप्पे पूर्ण करत मी माझ्या स्वप्नाला गवसणी घातली आणि पहिली दृष्टीहीन जिल्हाधिकारी होण्याचा अविश्वसनीय पल्ला गाठला. हे यश माझे नव्हतेच. माझ्या स्वप्नांना पंख द्यायचे काम ज्यांनी केले, त्या माझ्या माझ्या आई-बाबांचे हे यश होते.
आज त्यांच्या आशीर्वादाने, त्यांनी दिलेल्या जिद्दीने या प्रवासातही मी अनेक आव्हाने पेलली. शासनाच्या अनेक योजना यशस्वीपणे पूर्ण केल्या. माझ्या जिल्ह्याचा विकास करू शकले. जनतेचा विश्वास मिळवला. त्याचेच फलित म्हणजे तुम्ही आज माझा केलेला सन्मान! हा सन्मान मी माझ्या आई-बाबांना अर्पण करते. ज्या कलयुगात मुलगी 'नकोशी' झाली आहे. त्या काळात त्यांनी माझ्यासारख्या दृष्टीहीन मुलीला दिलेले हे जीवन माझ्यासाठी एक 'न फिटणारे ऋण' आहे. मी कायम या ऋणात राहीन आणि माझ्यासारख्या अनेक अंध भगिनींच्या उज्ज्वल जीवनासाठी प्रयत्नशील राहीन,अशी ग्वाही आज मी तुम्हाला देते आईबाबा! प्रकाश आणि साधना भोसले या. हा सन्मान स्वीकारून मला कृतकृत्य करा."
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने मी भानावर आले. साश्रू नयनांनी पाहिले. माझी दृष्टी आम्हाला व्यासपीठावर न्यायला आली होती. आज ती माझे बोट पकडून मला घेऊन जात होती. आमचा विश्वास सार्थ ठरवून आम्हाला कधीही 'न फिटणाऱ्या ऋणात' अडकवले होते आमच्या डोळस दृष्टीने.