मुलगी झाली तर...?
मुलगी झाली तर...?


दरवर्षीप्रमाणे यंदाही मी माझी दिवाळीची सुट्टी गावाकडेच आनंदात घालवायची असे ठरवले होते. नोकरी निमित्ताने गावातून शहरात आलेल्या सर्व मित्रांचे एकमेकांना फोन झाले होते. दिवाळीत आम्ही सर्व मित्र आवर्जून एकत्र येत असतो. गावात मिळणारे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा पुन्हा शहरात येऊन काम करण्यासाठी नवी ऊर्जा देते. आणि मित्रांची जमणारी मैफल तर पुढे वर्षभर मनात सतत भरत राहते..
सर्व तयारी झाली होती. मिसेसने गेल्या वेळी सगळ्यांंनी सागितल्यानुसार त्यांच्या आवडीच्या सर्व गोष्टी बॅगमध्ये भरून ठेवल्या होत्या. सकाळी लवकर उठून गावाकडचा प्रवास सुरु झाला. मन मात्र कधीच गावात पोहोचले होते.
गावी विनू हा माझा अत्यंत जवळचा मित्र. गावातच किराणा दुकान चालवतो. त्याच्या मनमिळाऊ व प्रामाणिक स्वभावामुळे सगळं गावच विनूकडे किराणा खरेदी करते! गेल्या उन्हाळ्यात शेजारच्या गावातील मुलीशी त्याचे लग्न झाले होते. आई-वडील आणि आता बायको असा सुखी संसार.
विनुचे दुकान म्हणजे आम्हा सर्व मित्रांचा भेटीचा 'कट्टा'! संध्याकाळी जेवण झाल्यानंतर गप्पांची मैफल तिथेच भरते. यावेळीही आम्ही सगळे मित्र एकत्र जमलो, एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर केल्या. आणि सुखाने मनं कधी भरून गेली कळलेच नाही.. आनंदात दिवाळी सण पार पडला. पण का कुणास ठावूक माझे मन मला सारखे म्हणत होते, एकदा विनूला एकांतात जाऊन भेटले पाहिजे. कारण विनू म्हणजे आमच्या मित्र परिवारातील विनोदाचा बादशहाच! पण यावेळी भेटलेला विनू काहीसा आतून चिंतातुर भासला.
दुपारचे जेवण आटपून त्याच्या निवांत वेळेत दुकानात गेलो. तो एकटाच होता. "काय विन्या, काय चाललंय निवांत वाटतं?" मी सुरुवात करायची म्हणून केली.
"हो, अरे दुपारच्या वेळी निवांतच असतं आणि तसंही दिवाळीच्या आधीच गडबड असते कामाची... ते जाऊदे तू कसा काय आलास यावेळी झोप सोडून?" विनूने हसत विचारले.
"विनू, काही प्राॅब्लेम वगैरे आहे का? काहीसा टेन्शनमध्ये वाटलास..." मी सरळ विषयाला हात घातला. "घरात सगळे ठीक...."
मला मध्येच रोखत विनू म्हणाला, "नाही रे तसं काही नाही. सर्व मजेत आहे, व्यवसाय चांगला आहे, आई-वडील ठणठणीत आहेत, तुझी वहिनीदेखील खुप समजूतदार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ती प्रेग्नंट आहे."
"काय? विन्या लेका कळविलेदेखील नाही. छान छान अभिनंदन! अरे मला उगाचच असे वाटले की, तू काही तरी टेन्शनमध्ये आहेस की काय? जाऊ दे पुन्हा एकदा अभिनंदन!" मी आनंदाने बोलत होतो.
"खरं सांगायचं तर मला हीच चिंता वाटते आहे." विनू खुर्चीत बसत बोलला.
"अरे त्यात कसले आले टेन्शन, होईल सगळं व्यवस्थित, काही काळजी करू नकोस."
थोडं थांबत दीर्घ श्वास घेत विनू म्हणाला, "मुलगी झाली तर?"
मला धक्काच बसला मी त्याच्यावर ओरडत म्हणालो, "अरे कुठल्या जगात राहतोस तू? मुलगा-मुलगी असा भेद आता राहिला नाही. मुली आज सर्वच क्षेत्रात मुलांपेक्षा जास्त यशस्वी आहेत आणि तू हे काय घेऊन बसलास?"
"मित्रा, मला हे सगळं माहीत आहे, मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत, बोर्डात दरवर्षी मुलीच बाजी मारतायत, खेळात देशाला सुवर्णपदकदेखील मुलीच मिळवून देतायत... पण... मला हे देखील माहित आहे की, आज दररोजची वर्तमानपत्र बलात्काराच्या बातमीशिवाय पूर्ण होत नाही, विनयभंग, छेडछाड तर गुन्हा वाटूच नये इतके त्यांचे प्रमाण वाढले आहे! आपले गाव खेडे आहे. इथे राहणारी सर्व देव माणसं आहेत. पण भविष्यात जेव्हा आपले गाव सोडून माझ्या मुलीला शिक्षणासाठी शहरात जावे लागेल, तिथे तिला कशा प्रवृत्तीचे लोक भेटतील? तिथे कशी परिस्थिती असेल?"
विनू आगतिकतेने बोलत होता, "दोन महिन्यापूर्वी शेजारच्या गावातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. पोलिसांनी गुंडांना अटक केली पण काही दिवसांतच ते सुटले व आपण काहीतरी मोठा पराक्रम केला आहे अशा मस्तीत ते फिरु लागले. इकडे त्या मुलीसह तिच्या संपूर्ण कुटुंबाने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली!"
मी शांंतपणे ऐकत होतो. विनूच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती दिसत होती. एक मोठा आवंढा गिळत विनू म्हणाला, "आजूबाजूला घडणाऱ्या या सर्व घटनांमुळे मी विचार करतोय... एकदा 'चेक' करून घ्यावे की काय..."
आता मात्र माझा पारा चढला, "अरे वेड लागले की काय तुला? जगात वाईट प्रवृत्ती आहेत तशाच चांगल्यादेखील आहेत. काही ठराविक वाईट लोकांना घाबरून जर तू एवढा मोठा टोकाचा निर्णय घेणार असशील तर सगळ्याच मुलींच्या बापांनी त्यांच्या मुलींसह आयुष्य संपवून टाकले पाहिजे... काॅलेजला असताना तू लिहिलेल्या 'राजमाता जिजाऊ' निबंधाला जिल्हास्तरीय पारितोषिक मिळाले होते. ते स्वीकारताना तू म्हणाला होता, 'प्रत्येक मुलीने जिजाऊंसारखे लढवय्ये बनले पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन पुढे जायला पाहिजे.' आणि आज तूच असा नकारात्मक विचार करतोस?... तुला मुलगी झाली तर तू बनव तिला जिजाऊंप्रमाणे, तिला आत्मसंरक्षणाचे धडे दे, स्वावलंबी बनव... मुलगी म्हणजे बापाचं काळीज असते. मलाच बघ... मलाही मुलगी आहे. मग मी काय असाच विचार करायचा? 'गर्भलिंगनिदान' कायद्याने गुन्हा आहे आणि हा कलंक घेऊन आयुष्यभर तू कसा जगू शकतोस? माझी तुला हात जोडून विनंती आहे, हा व्याभिचार मनातून काढून टाक... तुझ्या अशा विचाराने तू बाप होण्याचा आनंदच घालवून बसलाय..."
काही वेळ निःशब्द शांतता पसरली. विनूचे डोळे पाणावले होते. "मुलगी झाली तर तिचे नाव तू ठेवायचे..." डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंंना वाट मोकळी करून देत विनू माझ्या गळ्यात पडला.
मी तिथून निघालो. घरी जाताना मनात विचार येत होते, विनूला जे प्रश्न पडले, भिती वाटली, तेच प्रश्न तिच भीती आज असंख्य विनुंना सतावत असेल, म्हणूनच मुलींचा जन्म दर घसरत नसेल ना ? विचारांच्या तंद्रीत घराच्या अंगणात खेळत असलेली माझी मुलगी कधी येऊन मला बिलगली ते कळलेच नाही....