मुक्तेची गीतामाय..
मुक्तेची गीतामाय..
मुक्ता... कदाचित नावात असलेला जो गूढ अर्थ आहे तो जणू तिला कधी कळालेलाच नाही. अत्यंत अबोल, अव्यक्त मनाची मुक्ता वयाच्या चाळीसाव्या वर्षी अत्यंत निराशेचे जीवन वाट्याला आल्यासारखे जगत असते.. खरंतर वस्तुस्थिती अशी नसते, कारण ऐहिक जीवन अभ्योदयाच्या वाटेवर चाललेले असते. चांगले कुटुंब, चांगले वातावरण.. घर, गाडी, पैसा... सगळं सगळं काही असतं. पण फक्त गृहिणीपण असणं हे तिला मान्य नसतं. आत काहीतरी सल असते.. जी सल तीच्या रोजच्या दैनंदिन जीवनातले अनेक प्रसंग किंवा संकटं तिच्या त्या प्राप्त न झालेल्या गोष्टीपाशीच येऊन थांबत असतात. जेव्हा सारखे सारखे एकंच टोचणी मनाला टोचते नं.., तेव्हा ते खरंच खूप गंभीर असतं.
सतत डोळ्यांसमोर वावरणाऱ्या अनेक स्त्रिया ज्या काहीतरी आपलं स्वतःचं अस्तित्व किंवा समाजामधील स्थान निर्माण करण्यासाठी काहीतरी झगडा देतांना ती पहात असते. आपण काहीच करत नाही फक्त घर सांभाळतो.. किंवा अशा काही नवनवीन कलात्मक गोष्टी करतंही असली तरी त्याच्यातून कुठलाही मोबदला मिळत नाही त्यामुळे सतत दुय्यम दर्जाचं वागणं मिळत असतं. तिला ते आदराचं स्थान हवं असतं. ज्यात तिच्याकडे अवगत असलेल्या कलेचंही कौतुक केलं जाईल आणि तिच्याकडे पाहताना सगळ्यांच्या दृष्टीत एक वेगळाच स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा भाव असेल...!!
भरीस भर काही विखुरलेली जवळची नाती खूप भयंकर गैरसमजात, अपेक्षांच्या , दोषारोपांच्या ढिगाखाली जगण्याचा प्रयत्न चालू असतो. तसं पाहिलं तर लहानपणापासून गुरूभक्तीची ओढ, तळमळ होती.. लग्न झाल्यावर लगेच २/३ वर्षात सद्गुरूंच्या एका कटाक्षाने तीला गुरुमंत्र मिळून खरंतर तीची वाटचाल आता प्रपंचाबरोबर परमार्थ साधण्यात मार्गस्थ व्हायला हवी होती. पण भौतिकतेचे किंवा मायेचे आवरण तोडने फार अवघड.
मुक्तेला अध्यात्मिक वाचन,त्यावर चर्चा, एखादा विषय निवडून त्यावरील प्रवचन ऐकणे हे खूप आवडते. गेली अनेक वर्षे तीच्यावर गुरुकृपा बरसत असली तरी ती कृपा समजून घेण्यास ती अपात्र आहे असे तीला वाटायचे कारण मग एवढा मनस्ताप होण्याचे कारणंच नव्हते.
अशा परिस्थितीत मुक्ताला बहिणीचा फोन येतो. ती म्हणते की, मी शास्त्रशुद्ध पद्धतीने भगवद्गीता म्हणायला शिकत आहे. पुण्यामधील एक ओळखीच्या काकू आहेत ज्या रोज पाच श्लोक शिकवतात. आणि दुसऱ्या दिवशी आपण त्यांना श्लोक म्हणून दाखवायचे. खरंतर मुक्तेची आता नवीन काही शिकण्याची मनस्थिती नव्हती. तिने काही दिवस या गोष्टीला टाळण्याचा प्रयत्न केला. पण बहिणीच्या आग्रहाला ती नाही म्हणू शकली नाही. आता मुक्ततेला निदान एवढे तर माहीतंच होते की, समोर येणारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्रसंग प्रत्येक परिस्थिती ही सद्गुरूंच्या इच्छेने आहे आता आपले सर्वस्व त्यांच्या स्वाधीन आहे. त्यामुळे तिने कसेबसे हो म्हटले. आणि भगवद्गीता शिकण्याचा वर्ग सुरू झाला. भगवंताची वाणी जी आहे तिला अजिबात हलक्यात घ्यायचे नाही. ती जशाला तशी निर्दोष आणि स्पष्ट उच्चारली गेली पाहिजे असा काकूंचा आग्रहंच मला त्यांच्या गीतेविषयी असणाऱ्या उत्कट भावना दिसून येत होत्या. त्यांच्यासारख्या अनेक बायकांना भगवद्गीता मुखोद्गत असल्याचे होणारे परिणाम, त्यांचे अनुभव.. त्या मुक्तेला रोज सांगत असत. हळूहळू मुक्तीच्या मनात यायला लागले की हे मला पण अनुभवायचे आहे. भगवद्गीता ही आपली माय आहे ती फार गूढ आहे समजायला.. तिला जेव्हा आपण विश्वासाने आणि प्रेमाने म्हणायला लागतो तेव्हा घरात अत्यंत सकारात्मक पवित्र मंगल्याची कंपने उत्पन्न व्हायला लागतात. आपल्या मनातला द्वेष, भीती, चिंता हे हळूहळू कमी व्हायला लागते. हे मुक्ता हळूहळू अनुभवायला लागली होती.
रोज पाच श्लोक शिकत असताना त्याचे शब्दशः अर्थ आणि ते निर्दोष पद्धतीने म्हटले जाणे याचे महत्त्व काकूंनी शिकवले. शिवाय त्याच्याबरोबर प्रत्येक श्लोकाच्या ज्ञानेश्वरीतील ओव्या वाचणे आवश्यक आहे, हाही अट्टाहास होता त्यांचा. जेणेकरून भगवद्गीता हे जास्त चांगल्या पद्धतीने समजण्यास माऊली आपल्याला मदत करतात, असा ठाम विश्वास होता त्यांचा. एकेक दिवस पुढे चालला होता पाच अध्याय झालेले होते.
रोज पाच श्लोकांचा अभ्यास होत होता,त्यावर चर्चा होत होती. हळूहळू लक्षात यायला लागली की, हा अभ्यास करत असतांना भगवंतांनी रोजच्या जगण्यातील प्रत्येक संकटांबद्दल, आपल्या अडचणी बद्दल, विचारांच्या गुंतांबद्दल...या श्लोकांमध्येच त्यांची उत्तर दिलेली आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही स्त्रीचा आधारस्तंभ असतो तो म्हणजे माहेरची माणसं..!! आणि ह्या जवळच्या नात्यांमध्ये प्रचंड कटूता निर्माण झाल्यानंतर, प्रचंड दोषारोप झाल्यानंतर,... येणारी निराशा आणि उदासीनता याला कसे ओलांडून पुढे जावे.., स्वतःवर परिणाम न करून घेता आपले कार्य कसे करावे...हे तिला कळत नव्हते. आपल्या विरोधात समोर उभी राहणारी माणसे ही आपलीच आहेत हे तिला पचनीच पडत नव्हते. पहिल्या अध्यायापासूनच प्रश्नांची उत्तरे मिळायला सुरुवात झाली. अर्जुनासमोरंही त्याची स्वतःचीच माणसं होती.. पण विहीत कर्म करणे त्याला भाग होते. परिस्थितीनुसार जसे प्रसंग येतील त्याला तोंड देणे त्याला भाग होते.
त्यानंतर कर्मयोग आणि कर्म संन्यास योग जाणून घेत असताना स्वतःच्या चुकांची यादी समोर उभी राहिली. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडले आतून बाहेरून पळवटल्यासारखे झाले. कधी अपराधी भावना वाटली, कधी तीला केलेल्या चुकांचा पश्चाताप करावासा वाटला, कधी धन्यवाद म्हणावेसे वाटले...!! प्रत्यक्ष श्लोकाचा अर्थ समजून घेत असतांना स्वधर्म म्हणजे काय?, कर्म करून त्याच्या फळाच्या बाबतीत उदासीनता बाळगणे म्हणजे काय? किंवा आपल्या नात्यात किंवा सानिध्यात असलेला प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक जन्मात वेगवेगळी भूमिका निभावत असतो. आत्ताचे सानिध्य फक्त कर्माचे देणे घेणे असते. किंवा 'मी' कर्म करतो ही भावना किती चुकीची आहे हे सगळं काही समजून घेत असतांना.. नात्यांबाबतीतल्या तीच्या सगळ्या अपेक्षा गळून पडल्या. अहंकार गळून पडला.
नाती जोडून ठेवण्यासाठी चार गोष्टी स्वीकारल्या तर काही हरकत नाही, कोणी लहान मोठं होत नाही. मला काय करायचं आहे हे सुद्धा तीला गीतामाईने स्पष्ट करून दिले .
वर्णाश्रमाप्रमाणे जे पूर्व नियोजित कार्य नेमून दिलेले आहे त्या 'स्वधर्माचे' आचरण सुखाने आणि निष्काम बुद्धीने करायला हवे. ह्या शिकवणीने मुक्तेला तिच्या न्यूनगंडापासून मुक्त केले. आता तिच्या वाट्याला आलेले गृहिणीपण जे आहे, तिचा तो स्वधर्म आहे.. तो तिला छान पद्धतीने करायचा आहे असं समजून तिचे मन अत्यंत आनंदाने सुखाने आणि तृप्तीने भरले. येणारा प्रत्येक, प्रसंग प्रत्येक परिस्थिती, आयुष्यात येणारी प्रत्येक नवीन व्यक्ती ही त्याच्या इच्छांनी घडत आहे हे समजून आयुष्याची वाटचाल करायची आहे.
आपण भौतिक विषयांमध्ये गुरफटलेले असतो ते केवळ मायेच्या आवरणामुळे. त्यामुळे खोल खचत जातो. यातून उभारायचं असेल तर विषयांमध्ये असक्ती कमी व्हायला हवी. त्यासाठी भगवंताचे स्मरण,चिंतन सतत अखंड व्हायला हवे. मग मुक्ताला या ठिकाणी सद्गुरूंनी सांगितलेल्या उपादेशाचे,साधनेचे चे महत्व कळायला लागले.. जी आजवर तिला कधी नीट कळालेले नव्हते किंवा खूप अवघड वाटायचे. आता परत ती वाटचाल भगवद्गीतेमुळे सुकर झाली.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानामुळे कर्माचे आचरण शुद्ध व्हायला मदत होते. आणि आचरण सुधारले की भक्तीची गोडी यायला लागते. अनेक प्रकारचे भक्त आहेत, आपल्याला कोणत्या प्रकारचा भक्त बनायचे आहे ते आपण ठरवायला हवे. माणूस जन्माचे नेमके ध्येय भगवद्गीतेमुळे जर कळते आहे तर.., तो भगवंत प्राप्त करण्यासाठी अभ्यासयोगाचा कसा अवलंब करायचा आहे हे लक्षात आले.
भगवद्गीता वयाच्या चाळीसाव्या वर्षी आयुष्यात आल्यानंतर ॲक्शन असे वाटले आधीचे 40 वर्ष खरंच वाया गेले पण आता त्याबद्दल खंत ही व्यक्त करता येत नव्हती पण भगवद्गीतेची ही शिकवणंच नाही की, खंत करत बसणे.
आज खऱ्या अर्थाने 'योग' या शब्दाचा अर्थ कळाला. कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात कधी येणार याचा 'योग' भगवंताने आधीच लिहून ठेवलेला असतो.. आता मुक्तीला आयुष्यात करण्यासाठी खूप काही आहे.., तिला वेळ कमी पडणार होता. पण आता हा प्रवास ती आता आनंदाने करणार याची तिला खात्री होती. तिचा रोजचा आणि जेवण आत्मानंदाने भरलेलं होतं.. यापेक्षा अप्रतिम प्रचिती कुठली असू शकते..!!
